अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये गेल्या आठवड्यापासून बेकायदा स्थलांतरितांवरील कारवाईविरोधात निदर्शने सुरू आहेत. आता या निदर्शनांना हिंसक वळण लागले आहे. कागदपत्रे नसलेल्या बेकायदा स्थलांतरितांना सरकारकडून लक्ष्य केले जात आहे. त्यांच्या घरांवर छापे टाकले जात आहेत. त्याचाच विरोध म्हणून मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले आहेत. विशेषतः राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संपूर्ण शहरात नॅशनल गार्ड सैन्य आणि मरीन तैनात केल्यानंतर सुमारे ४०० जणांना अटक करण्यात आली आहे, त्यामुळे परिस्थिती आणखीनच चिघळली आहे.
ट्रम्प यांनी ४,००० हून अधिक नॅशनल गार्ड सदस्य आणि ७०० मरीन सैन्य तैनात केले आहेत. अमेरिकेतील या अशांततेच्या काळात डेमोक्रॅटिक पक्षातील नेत्यांकडून, कार्यकर्त्यांकडून आणि काही सामाजिक गटांकडून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना पदावरून काढून टाकण्याची मागणी जोर धरत आहे. परंतु, त्यांना काढून टाकणे कायदेशीररित्या खरंच शक्य आहे का? ट्रम्प यांच्यावर महाभियोग चालवण्याची मागणी का होत आहे? एकूण प्रकरण काय? जाणून घेऊयात.

ट्रम्प यांच्यावर महाभियोग चालवण्याची मागणी
- टेक्सास येथील डेमोक्रॅटिक पक्षातील लोकप्रतिनिधी अल ग्रीन यांनी ट्रम्प यांच्यावर महाभियोग चालवण्याची मागणी केली आहे.
- त्यांनी असा आरोप केला आहे की, ट्रम्प यांना ३४ गंभीर गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवण्यात आले आहे.
- त्यांच्याविरोधात यापूर्वी दोनदा महाभियोग चालवण्यात आला आहे, त्यामुळे ते पदावर राहण्यास अयोग्य असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
- अल ग्रीन यांनी पत्रकारांना सांगितले की, ते महाभियोगाचे लेख तयार करण्याच्या प्रक्रियेत आहेत.
ट्रम्प पुन्हा सत्तेत परतल्यापासून त्यांच्या धोरणांवर आणि नेतृत्वावर ट्रम्पविरोधी मतदारसंघातील अनेक डेमोक्रॅटिक नेत्यांनी तीव्र टीका केली आहे. परंतु, हाऊस आणि सिनेटमध्ये रिपब्लिकन पक्षाचे बहुमत असल्याने महाभियोग चालवण्याची शक्यता कमी आहे. ‘एक्स’वरील अनेक पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, न्यूयॉर्क आणि कॅलिफोर्नियासारख्या डेमोक्रॅट नेतृत्वाखालील राज्यांमध्ये राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या स्थलांतर धोरणांवर, शुल्कांवर आणि विदेशी विद्यार्थ्यांवरील निर्बंधांवर मोठ्या प्रमाणात निदर्शने सुरू आहेत. काही वापरकर्त्यांनी सध्या अमेरिकेतील परिस्थितीचे वर्णन ‘गृहयुद्ध’ असे केले आहे.
कॅलिफोर्नियामध्ये ट्रम्प यांच्या इमिग्रेशन धोरणामुळे स्थलांतरित नागरिकांमध्ये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात संताप निर्माण झाला आहे. त्यांच्यावर अधिकाऱ्यांकडून कायदेशीर कारवाई सुरू झाली आहे. मुख्य म्हणजे, आतापर्यंत ट्रम्प प्रशासनाने सुरू केलेल्या विविध धोरणांना आव्हान देणारे १०० हून अधिक खटले आणि सुमारे ५० तात्पुरते प्रतिबंधात्मक आदेश दाखल करण्यात आले आहेत. मात्र, असे असले तरी ट्रम्प यांच्या धोरणांच्या अंतर्गत कायदेशीर कारवाई अजूनही सुरूच आहे. त्यांच्यावर महाभियोग चालवण्यासाठी काँग्रेसमध्ये (अमेरिकन संसद) महत्त्वपूर्ण पाठिंबा आवश्यक असेल, जो सध्या मिळणे अवघड आहे.
ट्रम्प यांना हटवण्याची मागणी का होत आहे? परिस्थिती किती गंभीर?
ट्रम्प यांना हटवण्याची मागणी प्रामुख्याने डेमोक्रॅटिक पक्ष आणि कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. अल ग्रीन यांच्यासारखे नेते ट्रम्प यांच्या धोरणांचा तीव्र विरोध करत असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत आहेत. परंतु, काँग्रेसमध्ये रिपब्लिकन पक्षाची संख्या जास्त असल्याने त्यांना यश मिळणे अवघड आहे. स्थलांतरित नागरिक आणि विद्यार्थी गटांमध्ये तीव्र संताप आहे. परंतु, अद्यापतरी परिस्थिती ट्रम्प यांच्या अध्यक्षपदासाठी धोका निर्माण करेल इतकी गंभीर नाही.
ट्रम्प यांना अध्यक्षपदावरून हटवता येणे शक्य आहे का?
डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेच्या अध्यक्षपदावरून हटवणे शक्य आहे, परंतु ही प्रक्रिया गुंतागुंतीची आहे. मुख्य म्हणजे केवळ अमेरिकन संविधानात दिलेल्या तरतुदींद्वारेच हे शक्य होऊ शकते. अमेरिकेच्या संविधानात महाभियोग, २५ वी घटनादुरुस्ती यांचा समावेश आहे. अमेरिकेत प्रतिनिधी सभागृहात दोन तृतीयांश बहुमताने राष्ट्राध्यक्षांच्या विरोधात महाभियोग आणता येतो. परंतु, रिपब्लिकन पक्षाकडे बहुमत असल्याने, ट्रम्प यांना हटवणे अशक्य दिसते.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना कधी आणि कसे हटवले जाऊ शकते?
अमेरिकन संविधानाच्या कलम ४ मधील कलम २ अंतर्गत, राष्ट्राध्यक्षांना देशद्रोह, लाचखोरी किंवा इतर गंभीर गुन्हे आणि गैरकृत्यांसाठी महाभियोगाद्वारे काढून टाकता येते. या प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात महाभियोग प्रस्ताव कायदेमंडळाच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह या कनिष्ठ सभागृहामध्ये बहुमताने मंजूर होणे आवश्यक असतो. दुसऱ्या टप्प्यात या प्रकरणाचा खटला सिनेटमध्ये चालतो. या सभागृहात दोष सिद्ध होण्यासाठी दोन तृतीयांश बहुमत (६७ सिनेटर) आवश्यक असते. खटल्याचे अध्यक्षपद मुख्य न्यायाधीश भूषवतात. भारतात जशी संसदेची दोन सभागृहे असतात राज्यसभा आणि लोकसभा, तशीच अमेरिकेतील संसदेचीदेखील दोन सभागृह असतात. एक म्हणजे सिनेट व दुसरे हाऊस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्ह.
जसे आपल्याकडे लोकसभेचे खासदार आणि विधानसभेच आमदार असतात, तसेच अमेरिकेत सिनेटच्या सदस्यांना सिनेटर, तर हाऊस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्हच्या सदस्यांना रिप्रेझेन्टेटिव्ह म्हणून ओळखतात. ट्रम्प यांच्यावर आतापर्यंत २०१९ आणि २०२१ असा दोनदा महाभियोग चालवण्यात आला. परंतु सिनेटने त्यांना दोषी ठरवले नाही. सध्या सभागृहात रिपब्लिकनचे बहुमत असल्याने महाभियोग चालवणे अशक्य असल्याचे दिसून येते. परंतु, सार्वजनिक दबाव वाढल्यास, नवीन पुरावे हाती लागल्यास किंवा परिस्थिती चिघळल्यास गोष्टी बदलू शकतात.
राष्ट्राध्यक्षांना पदावरून हटवता येणारी २५ वी घटनादुरुस्ती कोणती?
संविधानाच्या २५ व्या घटनादुरुस्तीमध्ये नमूद केल्यानुसार, उपराष्ट्राध्यक्ष आणि मंत्रिमंडळातील नेत्यांचे बहुमत मिळाल्यास राष्ट्राध्यक्ष त्यांची कर्तव्ये पार पाडण्यास असमर्थ असल्याचे घोषित करता येते. त्यानंतर, उपराष्ट्राध्यक्ष कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष होतात. सध्याच्या परिस्थितीत हे अशक्य आहे, कारण उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स आणि बहुतेक मंत्रिमंडळ सदस्य ट्रम्प यांच्याशी एकनिष्ठ आहेत. या परिस्थितीसाठी मानसिक किंवा शारीरिक अक्षमता यासारखे गंभीर कारण आवश्यक असते. अमेरिकेत २५ वी घटनादुरुस्ती दोनदा वापरली गेली आहे. परंतु, याचा वापर केवळ कलम ३ अंतर्गत तात्पुरते राष्ट्राध्यक्ष बदलण्यासाठी करण्यात आला आहे.
देशातील आंदोलने किंवा दबावामुळे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष राजीनामा देऊ शकतात का?
१९७४ मध्ये रिचर्ड निक्सन यांनी मोठ्या प्रमाणात जनतेच्या रोषाचा सामना केला होता. त्याचप्रमाणे जनतेचा रोष किंवा राजकीय दबाव ट्रम्प यांना राजीनामा देण्यास भाग पाडू शकतो. परंतु, ट्रम्प यांचा इतिहास दर्शवितो की, ते दबावापुढे इतक्या सहज झुकत नाहीत. प्रवास बंदी आणि परदेशी विद्यार्थ्यांवरील बंदी यांसारख्या वादग्रस्त निर्णयांमुळे जनतेत आणि विरोधकांमध्ये संताप निर्माण झाला आहे. परंतु, त्यांच्या मजबूत भूमिकेमुळे त्यांची राजीनामा देण्याची शक्यता कमी आहे. ट्रम्प यांच्या निर्णयांविरुद्ध खटले सुरू आहेत. जर मोठे कायदेशीर उल्लंघन सिद्ध झाले तर ट्रम्प यांच्यावर महाभियोग किंवा इतर कारवाई सुरू होऊ शकते. मोठ्या प्रमाणात त्यांच्या विरोधातील निषेध किंवा निवडणूक दबाव (२०२६ च्या मध्यावधी निवडणुका) ट्रम्प यांची स्थिती कमकुवत करू शकतात. परंतु, त्यामुळे ते पदावरून हटतील हे शक्य नाही.