-ज्ञानेश भुरे

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतील ‘अव्वल चार’ फेरीच्या सामन्यात भारताला पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला. प्रथम फलंदाजी मिळाल्यावर भारताने आव्हानात्मक धावसंख्या जरूर उभारली होती. मात्र, या धावांचा बचाव करण्यात जसे भारतीय गोलंदाजांना अपयश आले, तसेच आणखीही काही मुद्दे कारणीभूत ठरले. या सामन्याला कलाटणी देणाऱ्या क्षणांचा घेतलेला आढावा.

आक्रमक धावगती पण सातत्याने गडी गमावले…

दुबईच्या खेळपट्टीवर धावांचा पाठलाग करणे सोपे जाते, हा आजपर्यंतचा इतिहास आहे. याची जाणीव भारतालाही असावी. त्यामुळेच प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाल्यावर त्यांनी आक्रमकतेचे धोरण स्वीकारले. मोठी धावसंख्या उभी करण्याच्या दृष्टीने धावगतीही भारताच्या फलंदाजांनी राखली होती. मात्र, या आक्रमकतेच्या नादात भारताचे फलंदाज सातत्याने बाद होत गेले. त्यामुळेच अखेरच्या १० षटकांत भारताला केवळ ८८ धावाच करता आल्या.

नवाजला बढती देण्याचा पाकिस्तानचा निर्णय…

आव्हानाचा पाठलाग करताना मोहम्मद रिझवानने ५१ चेंडूंत ७१ धावांची खेळी उभारत एक बाजू सांभाळली. पाकिस्तानने नवाजला बढती दिली आणि त्यानेही २० चेंडूंत ४२ धावांची खेळी करताना पाकिस्तानची आवश्यक धावगती योग्य मार्गावर आणली आणि नंतर त्यावर असिफ अली, खुशदिल शाह यांनी विजयी मोहोर उमटवली. पण, भारतीय फलंदाजांकडून जी चूक झाली. ती पाकिस्तानने केली नाही.

अतिरिक्त गोलंदाजाची उणीव…

भारताने पहिल्या सामन्यात गोलंदाजीच्या आघाडीवर बाजी मारली होती. विशेषतः भारताच्या तिन्ही वेगवान गोलंदाजांनीच पाकिस्तानचा डाव गुंडाळला होता. मात्र, आज जसप्रित बुमरा, मोहम्मद शमी आणि दीपक चहर यांची अनुपस्थिती जाणवली. या सामन्यात अतिरिक्त वेगवान गोलंदाजाची उणीव तीव्रपणे भासली. दुखापतीमुळे आवेश खान या सामन्यात खेळू शकला नाही. त्याच्या जागी खेळण्यासाठी अन्य पर्याय उपलब्ध नव्हता. या सामन्यात काही गोलंदाज महागडे ठरत असताना बदली गोलंदाजाचा पर्यायही भारताकडे नव्हता. त्यात भुवनेश्वर कुमारने टाकलेले १९वे षटक महागडे पडले. यात १९ धावा निघाल्या. त्यामुळे सामना भारताकडून निसटला. फलंदाजाला बाहेर खेचण्याच्या नादात निर्णायक क्षणी रवी बिष्णोईकडून १८व्या षटकांत तीन चेंडू वाईड पडले. त्यात अर्षदीप सिंगने असिफ अलीचा सोपा झेलही मोक्याच्या वेळी सोडला. हा झेल सोडणे भारताला नक्कीच महागात गेले.

षटकांचा वेग राखण्यात आलेले अपयश…

पहिल्या सामन्यातही भारताला षटकांचा वेग राखता आला नव्हता. त्याचा फटका त्यांना बसला. पण, तो पाकिस्तानलाही बसला होता. या वेळी मात्र केवळ पाच गोलंदाज, त्यात दोन फिरकी गोलंदाज वापरूनही भारत षटकांची गती राखण्यात चार मिनिटे मागे राहिले. त्यामुळे नियमानुसार अखेरच्या षटकांत एक क्षेत्ररक्षक भारताला वर्तुळात उभा करावा लागला.

नाणेफेकीचा कौल…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रत्येक सामन्याच्या निकालानंतर नाणेफेकीच्या कौलची मोठी चर्चा होती. सामन्यावर परिणाम करणारा हा सर्वात मोठा घटक असतो. हा सामनाही त्याला अपवाद नाही. विशेष म्हणजे नाणेफेकीचा कौल करताना पाकिस्तानचा बाबर आझम नेमके काय म्हणाला इथपासून सुरुवात आहे. रोहितने नाणे उडवल्यावर बाबर आझम ‘टेल्स’ म्हणाला. त्याचवेळी  सूत्रसंचालक रवी शास्त्री यांनी बाबर ‘हेडस’ म्हणाला आणि नाणेफेक जिंकली असे सांगितले. काही वेळ गोंधळ उडाला पण, रोहितने बाबरने नाणेफेक जिंकल्याचे सांगितले आणि चर्चा थांबली. अर्थात, नाणेफेकीचा कौलसुद्धा सामन्यात निर्णायक ठरला.