हवामान विभागाने ऑगस्ट महिना संपत असताना दोन महत्त्वाच्या माहितीवजा सूचना दिल्या. एक, यंदा ऑगस्ट महिन्यात विविध राज्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस नोंदवण्यात आला. दुसरे, सप्टेंबर महिना यापेक्षा जास्त पावसाचा असणार आहे. यापैकी ऑगस्टचा अतिरिक्त पाऊस आपल्यासाठी फायद्याचा ठरत आहे की तोट्याचा, याचा थोडक्यात आढावा.
वायव्य भारतातील पावसाची स्थिती
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, वायव्य भारतामध्ये ऑगस्ट महिन्यात २६५ मिमी इतका पाऊस पडला. हे पर्जन्यमान सरासरीपेक्षा ३४.५ टक्के अधिक असून २००१नंतरचे ऑगस्ट महिन्यासाठी सर्वाधिक आणि १९०१पासून १३व्या क्रमांकाचे आहे. केवळ ऑगस्टच नाही तर जून आणि जुलैमध्येही या भागामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. आकडेवारीत सांगायचे तर जूनमध्ये १११ मिमी पावसाची नोंद झाली. हा वायव्य भारतात जूनमध्ये पडणाऱ्या पावसाच्या सरासरीपेक्षा ४२ टक्के इतका जास्त आहे. तर जुलैमध्ये हे प्रमाण २३७.४ मिमी असून ते सरासरीपेक्षा १३ टक्के जास्त आहे. जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांमध्ये या प्रदेशात पडलेला ६१४.२ मिमी पाऊस सरासरीपेक्षा (४८४.९ मिमी) सुमारे २७ टक्के जास्त आहे. वायव्य भारतामध्ये जम्मू-काश्मीर, लडाख हे केंद्रशासित प्रदेश आणि पंजाब, हरियाणा, राजस्थान, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांचा समावेश होतो. यापैकी पंजाबमध्ये ७४ टक्के तर हरियाणामध्ये ३२ टक्के अधिक पाऊस पडला. हिमाचल प्रदेशात ७२ टक्के अतिरिक्त पावसाची नोंद झाली आहे.
दक्षिण उपद्वीपाची स्थिती
दक्षिण उपद्वीपामध्ये आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू आणि तेलंगण या राज्यांचा समावेश होतो. ऑगस्टमध्ये या भागामध्ये २५०.६ मिमी पाऊस पडला. हे पर्जन्यमान सरासरीच्या (१९१.४ मिमी) ३१ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. २००१पासून हा तिसऱ्या क्रमांकाचा तर १९०१पासून आठव्या क्रमांकाचा पाऊस आहे. जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांमध्ये या प्रदेशात पडलेला ६०७.७ मिमी पाऊस सरासरीपेक्षा (५५६.२ मिमी) साधारण ९.३ २७ टक्के जास्त आहे.
उर्वरित भारताची स्थिती
सक्रिय आणि जोरदार मान्सूनच्या परिस्थितीमुळे मध्य प्रदेश, ओडिशा, छत्तीसगड आणि उत्तर हिमालयासह अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडला. पश्चिम भारताच्या महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये ऑगस्टमध्ये मुसळधार ते खूप मुसळधार पाऊस नोंदवण्यात आला. तर पूर्व आणि ईशान्य भारतात मिश्र पर्जन्यमान राहिले. सक्रिय मान्सूनचा प्रभाव काही भागात जाणवला असला तरी, हवामान विभागाच्या नोंदीनुसार ईशान्य आणि पूर्वेकडील एकूण पाऊस सरासरीइतका किंवा त्यापेक्षा काहीसा कमी होता. संपूर्ण भारताचा विचार केला तर ऑगस्टमध्ये २६८.१ मिमी पर्जन्यमान नोंदवण्यात आले असून ते सरासरीपेक्षा (२५५ मिमी) पाच टक्क्यांपेक्षा अधिक आहे.
सरासरीपेक्षा अधिक पावसाची कारणे
वायव्य भारतात सतत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने अरबी समुद्रातून पुरेशी आर्द्रता वाहून येत राहिली. त्यामुळे हवेतील बाष्पाचे प्रमाण अधिक राहिले. तसेच भूमध्यसागरी प्रदेशातून वारंवार आलेल्या उच्चवायवी विक्षेपांमुळे उत्तर भारतात ढगांचे प्रमाण वाढून पावसाची तीव्रताही वाढली.
पावसाशी संबंधित घटना
अचानक आलेला पूर, भूस्खलन आणि ढगफुटी यासारख्या घटनांमध्ये मोठी जीवितहानी झाली आहे. विशेषतः जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि पंजाबमध्ये लक्षणीय जीवितहानी झाली. एकट्या हिमाचल प्रदेशात २० जूनला पाऊस सुरू झाल्यापासून पावसाशी संबंधित घटनांमध्ये ३२० जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये भूस्खलन, पूर, ढगफुटी, पाण्यात बुडून मृत्यू आणि विजेच्या धक्क्याने मृत्यूच्या १६६ नोंदी आहेत. तर पावसामुळे झालेल्या रस्ते अपघातांमध्ये १५४ जणांचा जीव गेला आहे. तसेच हजारो कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामध्ये मुख्यतः घरे, शेती, गुरे-ढोरे आणि पायाभूत सुविधांचे नुकसान झाले आहे. हिमालय प्रदेशातील पंजाब, हरियाणा आणि उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये विक्रमी पावसामुळे सातत्याने मोठ्या प्रमाणात पूर आणि भूस्खलनाच्या घटना घडल्या. त्याशिवाय ढगफुटीच्या घटनांमध्येही वाढ झाली. २७ ऑगस्टला जम्मू भागात अपवादात्मकपणे मुसळधार पाऊस पडला. जयपूर आणि दिल्लीसारख्या शहरांमध्ये सतत पाणी साचले आणि पायाभूत सुविधांचे नुकसान झाले. विशेषतः हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये दरड कोसळून रस्ते बंद पडण्याच्या घटना सातत्याने घडल्या.
अतिवृष्टीचे व्यापक परिणाम
अतिवृष्टीचे फायदे आणि तोटे दोन्ही होतात. सर्वात महत्त्वाचा फायदा हा की, पाणीसाठा वाढतो. मातीचा ओलावा वाढतो. त्यामुळे रबी हंगामातील पिकांना फायदा होतो. तात्काळ दिसणारे तोट म्हणजे पुरामुळे शेती आणि पायाभूत सुविधांचे नुकसान होते. विशेषतः शेतीशी संबंधित तातडीची मदत व पुनर्वसन हे प्रशासनााठी आव्हानात्मक काम असते. दुर्गम पर्वत भागांमध्ये ढगफुटी आणि अचानक येणाऱ्या पुरांची वारंवारता वाढल्यामुळे स्थानिकांसमोरील समस्या वाढल्या आहेत.
सप्टेंबर महिन्याचा अंदाज
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, सप्टेंबर २०२५ मध्ये मासिक सरासरी पर्जन्यमान हे दीर्घकालीन सरासरीपेक्षा (१६७.९ मिमी) जास्त, म्हणजेच १०९ टक्क्यांहून अधिक असण्याची शक्यता आहे. या वाढलेल्या पावसाचा परिणाम म्हणून काही ठिकाणी ढगफुटी आणि त्यामुळे पूर येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
nima.patil@expressindia.com