पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर ७ मे रोजी भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांना लक्ष्य केले. त्यानंतर पाकिस्तानने मात्र भारतातील नागरी वस्त्या आणि धार्मिक स्थळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारताने पाकिस्तानचे सर्व हल्ले हाणून पाडले. मुख्य म्हणजे, भारतीय हवाई दलाने पाकिस्तानने डागलेल्या चिनी बनावटीच्या पीएल-१५ई या हवेतून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राला निष्क्रिय केले. १२ मे रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत भारतीय अधिकाऱ्यांनी रॉकेटचे अवशेष दाखवले आणि भारतीय हवाई दलाचे एअर मार्शल ए. के. भारती यांनी माहिती दिली की, पाकिस्तानने भारताविरुद्धच्या हल्ल्यात पीएल-१५ई क्षेपणास्त्रासह प्रगत चिनी शस्त्रे वापरली होती. त्यात आता एक नवी माहिती समोर येत आहे.
पाच राष्ट्रांचा समावेश असलेल्या फाइव्ह आईज (Five Eyes) या गुप्तचर संघटनेने सविस्तर तपासणीसाठी क्षेपणास्त्राचे काही भाग मिळविण्यात रस दाखविला आहे. त्यासह फ्रान्स व जपानकडूनही या क्षेपणास्त्राच्या अवशेषांची मागणी करण्यात आली आहे. परंतु, अनेक देशांना पीएल-१५ क्षेपणास्त्राचे अवशेष का हवे आहेत? त्यांच्यासाठी हा खजिना आहे का? त्याविषयी जाणून घेऊ…
भारताकडून चिनी बनावटीचे पीएल-१५ क्षेपणास्त्र जप्त
प्राप्त वृत्तांनुसार, भारतीय अधिकाऱ्यांनी पंजाबच्या होशियारपूर जिल्ह्यातील एका शेतात पीएल-१५ क्षेपणास्त्राचे तुकडे जप्त केले. पाकिस्तानने जम्मू-काश्मीर, राजस्थान व पंजाब येथील क्षेत्रांना लक्ष्य करून नागरी व लष्करी पायाभूत सुविधांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. प्रत्यक्षात पाकिस्तानने ४०० ड्रोन वापरून हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. या चकमकींमध्ये पाकिस्तानच्या चिनी बनावटीच्या पीएल-१५ई क्षेपणास्त्रांचे काही भाग भारतीय हद्दीत पडले. त्यामध्ये पंजाब प्रदेशातील होशियारपूर जिल्ह्यातील कामही देवी गावाजवळ पडलेले एक क्षेपणास्त्र आहे, ज्याचे बरेच भाग अद्याप सुरक्षित आहेत.
भारत-पाकिस्तान संघर्षानंतर पंजाबमध्ये इतरत्रदेखील पीएल-१५ चे छोटे भाग सापडल्याची माहिती आहे. १२ मे रोजी एका पत्रकार परिषदेत पीएल-१५ क्षेपणास्त्राचे अवशेष प्रदर्शित करण्यात आले. त्याव्यतिरिक्त भारताच्या हवाई संरक्षण प्रणालींनी पाडलेल्या तुर्कीच्या यिहा व सोंगर ड्रोनसह लांब पल्ल्याच्या रॉकेट, लोअर म्युनिशन आणि मानवरहित हवाई प्रणालींचे अवशेषदेखील प्रदर्शित करण्यात आले.
फ्रान्स, जपानला पीएल-१५ क्षेपणास्त्राचे अवशेष का हवेत?
भारताने पीएल-१५ क्षेपणास्त्राचे अवशेष सापडल्याची माहिती दिल्यानंतर फ्रान्स, जपानसह फाइव्ह आईज राष्ट्र म्हणजेच फाइव्ह आईज इंटेलिजन्स अलायन्स (अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड)ने या अवशेषांमध्ये रस दाखवला आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार चीननिर्मित या क्षेपणास्त्राची जप्ती ही भारतासाठी मोठी उपलब्धी आहे. या अवशेषांच्या साह्याने त्यांच्या क्षमता आणि मर्यादांबद्दलची अधिक माहिती जाणून घेण्यास मदत होईल. मुख्य म्हणजे त्याचा वापर नंतर नवीन रणनीती, तंत्रे व प्रक्रिया विकसित करण्यात केला जाईल.
मुख्य म्हणजे फ्रान्स आणि जपान या देशांनी हवेतून हवेत मारा करणाऱ्या प्रगत क्षेपणास्त्र प्रणालींमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. त्यामुळे पीएल-१५ क्षेपणास्त्रातून अधिक माहिती मिळवण्यास मदत होईल. जगातील अनेक देशांना क्षेपणास्त्राचे रडार सिग्नेचर, मोटर रचना, मार्गदर्शन तंत्रज्ञान व एईएसए म्हणजेच अॅक्टिव्ह इलेक्ट्रॉनिकली स्कॅन अॅरे रडारची रचनादेखील तपासता येईल. फ्रान्स या क्षेपणास्त्राच्या अवशेषात अधिक रस दाखवीत आहे. फ्रान्सच्या राफेल लढाऊ विमानांची क्षमता चिनी तंत्रज्ञानासमोर टिकते की नाही, याचा अभ्यास करण्याकरिताही हे क्षेपणास्त्र महत्त्वाचे मानले जात आहे. भारताला मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे विकणाऱ्या देशांमध्ये फ्रान्सचाही समावेश आहे.
पीएल-१५ क्षेपणास्त्राचा पाकिस्तानने युद्धात पहिल्यांदाच वापर केला आहे. त्यामुळे लष्करी पुरवठादार म्हणून चीनची वाढती भूमिकादेखील स्पष्ट होते. फाइव्ह आईज देश आणि जपान चीनच्या आशियातील वाढत्या प्रभावाकडे एक धोरणात्मक आव्हान म्हणून पाहतात. तज्ज्ञांनी हेदेखील स्पष्ट केले आहे की, पीएल-१५ क्षेपणास्त्राचे अवशेष अचानक सापडले आहेत; परंतु त्यातून गुप्तचर माहिती मिळवता येईल की नाही, हे अद्याप निश्चित नाही. कारण- क्षेपणास्त्राचे महत्त्वाचे घटक शाबूत आहेत की नाही हे अद्याप स्पष्ट नाही.
पीएल-१५ क्षेपणास्त्र काय आहे?
पीएल-१५ हे क्षेपणास्त्र एव्हिएशन इंडस्ट्री कॉर्पोरेशन ऑफ चायना (AVIC) या सरकारी एरोस्पेस कंपनीने विकसित केले आहे. हे क्षेपणास्त्र हवेतून मारा करणारे लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र आहे. २०११ मध्ये हे क्षेपणास्त्र विकसित करण्यास सुरुवात झाली आणि २०१२ मध्ये त्याची पहिली चाचणी घेण्यात आली. काही वृत्तांमध्ये असे म्हटले आहे की, चीनच्या हवाई दलात २०१८ मध्ये पीएल-१५ ला सामील करण्यात आले. हे क्षेपणास्त्र ड्युअल-पल्स्ड सॉलिड-प्रोपेलंट रॉकेट वापरते आणि त्यात प्रगत एईएसए रडार प्रणाली आहे. मिसाईलची कमाल मारा करण्याची क्षमता ही २०० ते ३०० किलोमीटर इतकी आहे.
ही क्षेपणास्त्रे मॅक ५ च्या वेगाने प्रवास करू शकतात. पीएल-१५ क्षेपणास्त्रे चीनच्या चेंगडू जे-२०, जे-१०सी व शेनयांग जे-१६ मध्ये फार पूर्वीच बसविण्यात आली आहेत. संरक्षण तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की, ही क्षेपणास्त्रे अमेरिकेच्या AIM-120D, AMRAAM आणि युरोपच्या MBDA Meteor ला टक्कर देणारी आहेत. ही क्षेपणास्त्रे विकसित झाल्यानंतर चीनने लगेचच त्यांच्या विक्रीला सुरुवात केली.
पाकिस्तान जेएफ-१७ बॅच ३ साठी या क्षेपणास्त्राची खरेदी करीत आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील लष्करी तणाव वाढला आहे. अशा वेळी चीनने पीएल-१५ क्षेपणास्त्र देऊन पाकिस्तानला केलेल्या मदतीचा त्यांना मोठा फायदा होणार आहे. परंतु, भारतासाठी ही स्थिती धोकादायक असल्याचे सांगितले जात आहे.