भारतीय हवाई दलासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या मिग-२१ लढाऊ विमानांना २६ सप्टेंबर रोजी समारंभपूर्वक निवृत्त केले जाणार आहे. त्यामुळे हवाई दलाची क्षमता सहा दशकांतील सर्वात कमी पातळीवर येईल. त्यांची जागा तेजस विमाने घेऊ शकतील का, याविषयी…
मिगने किती काळ सेवा दिली?
मिग-२१ ने जवळपास ६० वर्षांच्या सेवेत भारतीय हवाई दलाच्या क्षमतेला आकार दिला. या काळातील सेवेचे स्मरण करत त्याच्या प्रभावी इतिहासाचे दर्शन घडविणारी चित्रफीत हवाई दलाने प्रसारित केली. मिग-२१ हे १९६३ पासून भारताच्या हवाई शक्तीचा आधारस्तंभ ठरले. त्या वेळी चंडीगडमध्ये उभारण्यात आलेल्या २८ व्या तुकडीला (स्क्वॉड्रन) ‘फर्स्ट सुपरसॉनिक’ असे नाव देण्यात आले होते. कारण, ती ध्वनीहून अधिक वेगाने मार्गक्रमण करणाऱ्या विमानांची देशाची पहिली तुकडी होती.
निवृत्तीमुळे मारक क्षमतेवर परिणाम?
मिग-२१ विमानाच्या दोन तुकड्या (स्क्वॉड्रन) निवृत्त झाल्यामुळे हवाई दलाची लढाऊ ताकद २९ सक्रिय लढाऊ विमान तुकड्यांवर येईल. तेजस- एमके-१ एच्या वितरणास फेब्रुवारी २०२४ पासून सुरुवात होणे अपेक्षित होते. त्यास विलंब झाल्यामुळे हवाई दल एका गंभीर टप्प्यावर आले आहे. लढाऊ विमानांच्या ४२ तुकड्या मंजूर आहेत. मंजूर संख्येच्या तुलनेत मागील सहा दशकांतील तुकड्यांची ही सर्वात कमी संख्या मानली जाते. तेजसच्या उत्पादनातील विलंबाने हवाई दलाची चिंता वाढली. हिंदुस्थान एरॉनॉटिक्सच्या (एचएएल) कार्यपद्धतीवर मध्यंतरी हवाई दलप्रमुखांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. मिग-२१ नंतर पुढील काळात मिग-२९, जॅग्वार आणि मिराज- २००० ही विमाने निवृत्तीच्या वाटेवर येतील. या स्थितीत उत्पादनातील कालापव्यय दलाच्या लढाऊ क्षमतेवर परिणाम करेल, तुकड्यांचे संख्याबळ कायम राखणे जिकिरीचे ठरेल, याकडे आधीपासून लक्ष वेधले जाते.
आव्हानात्मक परिस्थितीत यशस्वी कसे ठरले?
मिग-२१ ने १९७१ मध्ये पाकिस्तानशी झालेल्या युद्धासह अनेक मोहिमांमध्ये महत्त्वाची कामगिरी बजावली. लढाऊ विमानांच्या अनेक वैमानिकांना त्यातून प्रशिक्षण मिळाले आणि ते कौशल्यसमृद्ध बनले. १९७१ च्या युद्धात मिग-२१ ने ढाका येथील राज्यपालांच्या निवासस्थानाला लक्ष्य करीत पाकिस्तानच्या शरणागतीच्या दिशेने महत्त्वाचे योगदान दिले. स्वतंत्र भारतीय हवाई दलाच्या इतिहासात सर्वाधिक युद्ध अनुभव याच विमानाच्या वाट्याला आला.
तेजसचे वितरण कसे आणि कधी?
प्रारंभीच्या करारान्वये एचएएल ८३ तेजस एमके-१ ए लढाऊ विमानांची पूर्तता साडेतीन वर्षांत करणार आहे. हवाई दलासाठी आणखी ९७ एमके-१ ए खरेदी केली जाणार असून ती २०३१-३२ पर्यंत वितरित केली जातील, असे एचएएलकडून सांगितले जाते. इंजिनसाठी परावलंबित्व हे तेजसचे उत्पादन रखडण्याचे प्रमुख कारण. इंजिनसाठी एचएएलने अमेरिकेतील जीई एरोस्पेसशी करार केला. या कंपनीमार्फत २०२३-२४ वर्षात १६ इंजिने दिली जाणार होती, मात्र त्याची आवश्यकतेनुसार पूर्तता न केल्यामुळे एचएएलची कोंडी झाली. एचएएलने आता तेजस एमके-१ एची पहिली तुकडी ऑक्टोबर ते डिसेंबरच्या दरम्यान देण्याची योजना आखली आहे. परंतु तेही इंजिनचा नियमित पुरवठा आणि विमानाच्या शस्त्रास्त्र चाचण्या यशस्वीरीत्या पूर्ण करण्यावर अवलंबून आहे.
उत्पादन वाढविण्याची तयारी?
एचएएलने दरवर्षी २४ तेजस एमके-१ ए लढाऊ विमाने उत्पादनाचे लक्ष्य ठेवले आहे. हवाई दलास दरवर्षी ३५ ते ४० लढाऊ विमानांची आवश्यकता आहे. तेजसच्या सध्या एचएएल बंगळूरु आणि नाशिक या प्रकल्पात दोन उत्पादन साखळ्या आहेत. बंगळूरुमध्ये तिसऱ्या उत्पादन साखळीतून दरवर्षीचे २४ विमानांचे लक्ष्य गाठले जाईल. उत्पादन दर आणि हवाई दलाची आवश्यकता यातील तफावत भरून काढण्यासाठी एचएएल खासगी भागीदारांना सोबत घेत आहे. त्यांच्यामार्फत सहा अतिरिक्त विमानांसाठी साहित्य पुरवठा केला जाईल. खासगी भागीदारी वाढल्यानंतर एचएएलची वार्षिक उत्पादन क्षमता ३० विमानांपर्यंत वाढेल, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातो.
आव्हाने कोणती?
चालू आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत १० ते १२ तेजस एमके-१ ए विमाने वितरित केली जातील, असे एचएएलचे प्रमुख डी. के. सुनील यांनी म्हटले आहे. यातील १० विमाने आधीच तयार आहेत. यापैकी दोन विमानांमध्ये नवीन पुरवलेले एफ ४०४ इंजिन बसवले गेले असून उर्वरित विमानांमध्ये तात्पुरते राखीव इंजिन वापरात आहे. संरक्षण तज्ज्ञांच्या मते १३ तुकड्यांची कमतरता भरून काढण्यासाठी मोठी योजना आखावी लागेल. परदेशी इंजिनवरील अवलंबित्व पाहता केवळ ‘एअर फ्रेम’ उत्पादन वाढविणे पुरेसे नाही. शस्त्रास्त्रे आणि संवेदकांचे एकत्रीकरण हेदेखील आव्हान आहे. केवळ स्वदेशी मार्गाने ही तूट भरून काढता येणार नाही, त्यासाठी २०३० पर्यंत अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. प्रहार क्षमता कायम राखण्यासाठी हवाई दलाने दशकभरात ३५० हून अधिक प्रगत लढाऊ विमाने ताफ्यात समाविष्ट करण्याची योजना आखली आहे. त्याअंतर्गत ११० बहुउद्देशीय मध्यम लढाऊ विमाने (एमआरएफए) परदेशातून अधिग्रहित करण्याचे नियोजन आहे.
aniket.sathe @expressindia.com