अणूबॉम्ब हे शस्त्र आहे, ज्याचा संपूर्ण जगाने धसका घेतलेला आहे. या अस्त्राची संहारकता पाहता अनेक देशांनी त्याची पुनर्मिती न करण्याचे ठरवलेले आहे. मात्र चीन नव्याने अणूचाचणी करण्याच्या तयारीत आहे. अमेरिकेतील जगप्रसिद्ध ‘न्यू यॉर्क टाईम्स’ या वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे. याच पार्श्वभूमीवर चीन नेमकं काय करू पाहतोय? न्यू यॉर्क टाईम्सच्या या वृत्तावर चीनने काय प्रतिक्रिया दिली आहे. हे जाणून घेऊ या…

चीनचा अणूचाचणी करण्याचा प्रयत्न?

चीनने आपल्या पश्चिम वाळवंटातील दुर्गम प्रदेशात अणूचाचणीसाठी तयारी सुरू केल्याचे म्हटले जात आहे. याआधी या देशाने १९६४ साली शिनजियांग प्रांतातील लोप नूर या अणूचाचणी केंद्रावर पहिली अणूचाचणी केली होती. शिनजियांग येथील लोप नूर अणूचाचणी केंद्रावर तशा हालचाली केल्या जात आहेत, असे न्यू यॉर्क टाईम्सच्या वृत्तात सांगण्यात आले आहे. हे वृत्त देताना न्यू यॉर्क टाईम्सने उपग्रहांच्या माध्यमातून मिळालेल्या काही फोटोंची मदत घेतलेली आहे. याच फोटोंच्या आधारे चीन अणूचाचणीसाठी प्रयत्न करत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. चीनने मात्र हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला आहे.

उपग्रहाच्या मदतीने मिळवल्या प्रतिमा

मॅक्सर टेक्नॉलॉजीज या कंपनीने उपग्रहाच्या मदतीने लोप नूर या अणूचाचणी केंद्राच्या काही प्रतिमा मिळवल्या आहेत. या फोटोंमध्ये एक मोठा उभा शाफ्ट दिसत आहे. हा शाफ्ट जमिनीत साधारण १७६० मीटर खोल जाऊ शकतो, असे न्यू यॉर्क टाईम्सने आपल्या वृत्तात म्हटले आहे. अशा प्रकारच्या उपकरणांसह या भागात आतापर्यंत एकूण ३० इमारती उभारण्यात आणि त्यांच्यात सुधारणा करण्यात आलेली आहे. २०१७ सालापासून हे काम सुरू असल्याचे म्हटले जात आहे.

लूप नूर येथे खोदकाम, बांधकाम

लूप नूर या अणूचाचणी केंद्राच्या परिसरात विमानांना उतरण्याची सोय आहे. या ठिकाणाचेही नुतनीकरण करण्यात आले आहे. अण्वस्त्र चाचणीसाठी डोंगराच्या बाजूला खोदकाम आणि बांधकाम करण्यात येत आहे, असेही न्यू यॉर्क टाईम्सने आपल्या वृत्तात म्हटले आहे. याच भागात नवे रस्ते, वीज, इलेक्ट्रिक सबस्टेशन उभारले जात आहे.

चीनचा नेमका उद्देश काय?

लूप नूर या ठिकाणी सुरू असलेले खोदकाम आणि बांधकाम पाहून चीन पूर्ण क्षमतेने अणूचाचणी किंवा सबक्रिटिकल चाचणी करण्याचा प्रयत्न करत असल्याचा अंदाज लावला जात आहे. जागतिक चाचणी बंदी करारानुसार सबक्रिटिकल टेस्टिंग करण्यास देशांना परवानगी दिली जाते. कारण अशा चाचण्यांत अणूस्फोट केला जात नाही. जगातील आण्विक देशांनी स्वत:हून अशा प्रकारची चाचणी न करण्याचे ठरवल्यानंतर १९९० सालापासून चीननेदेखील अद्याप पूर्ण क्षमतेने अणूचाचणी केलेली नाही.

चीनच्या या भूमिकेवर मात्र या क्षेत्रातील तज्ज्ञांचा विश्वास नाही. प्रमुख प्रतिस्पर्धी असलेल्या अमेरिका या देशाच्या हालचालींवर, निर्णयांवर पूर्ण क्षमतेने अणूचाचणी करायची की नाही, याबाबतचा निर्णय चीन घेऊ शकतो, असे या तज्ज्ञांचे मत आहे.

चीनने मात्र वृत्त फेटाळले

न्यू यॉर्क टाईम्सचे वृत्त मात्र चीनने फेटाळून लावलेले आहे. लूप नूर येथे अणूचाचणीसाठी तयारी सुरू नाही, असे चीनने सांगितले आहे. याबाबत चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. आमच्यावर अशा प्रकारचे आरोप करणे हे फारच बेजबाबदारपणाचे लक्षण आहे, असे परराष्ट्रमंत्री म्हणाले.

भारताने चिंता करावी का?

चीन हा भारताचा शेजारी देश आहे. चीनमध्ये अणूचाचणी केली जात असेल तर भारताला याचा धोका आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. १९९८ सालच्या पोखरण येथील अणूचाचणीनंतर भारताने अणूचाचणीवर आम्ही स्थगिती आणत आहोत, अशी भूमिका घेतलेली आहे. तुलनाच करायची झाल्यास शस्त्रांच्या बाबतीत चीन देश हा भारतापेक्षा वरचढ ठरतो. अशा स्थितीत चीनने अणूचाचणी केल्यास प्रादेशिक सुरक्षेचा मुद्दा निर्माण होऊ शकतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चीन-अमेरिका संबंधांचं काय?

दरम्यान, सध्या चीन आणि अमेरिका यांच्यातील संबंध म्हणावे तेवढे सलोख्याचे नाहीत. याच संबंधांत सुधारणा व्हावी यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याकडून प्रयत्न केले जात आहेत. अशा स्थितीत लोप नूर या अणूचाचणी केंद्रात अणूचाचणीसाठी तयारी केली जात आहे. त्यामुळे चीनने खरंच अणूचाचणी केल्यास त्याचे पडसाद जागतिक पातळीवर कसे उमटणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.