पॅरिस ऑलिम्पिक २०२४ कडे संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले आहे. जगभरातील खेळाडू पॅरिसच्या धरतीवर आपापली कामगिरी दाखवत असून अधिकाधिक पदके आपल्या पदरात पाडून घेण्याच्या प्रयत्नात आहेत. भारताने मनू भाकरच्या रुपाने आतापर्यंत एका कांस्य पदकावर आपले नाव कोरले आहे. ऑलिम्पिक खेळांमधील भारताची कामगिरी म्हणावी तितकी सरस नाही. याबाबतच्या चर्चा याआधीही बऱ्याचदा झालेल्या आहेत आणि त्या होण्यातही गैर नाही. मात्र, आता एका वेगळ्याच गोष्टीवरून ऑलिम्पिक २०२४ मध्ये गेलेले भारताचे खेळाडू चर्चेत आले आहेत. या खेळांच्या उद्घाटनप्रसंगी भारतीय खेळाडूंनी घातलेल्या पोशाखावरून टीका होत असून त्यावरून घमासान चर्चा होताना दिसते आहे. भारतीय बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टाने याबाबतची तक्रार आपल्या एका पोस्टमधून केल्यानंतर हा विषय चर्चेत आला आहे. काय म्हणाली ज्वाला गुट्टा? एक्सवरील एका पोस्टमध्ये ज्वाला गुट्टाने असा खुलासा केला आहे की, भारतीय महिला खेळाडू ब्लाऊजच्या खराब फिटिंगमुळे अस्वस्थ होत्या. ती म्हणाली की, "यावेळी ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय तुकडीसाठी तयार करण्यात आलेल्या कपड्यांमुळे मोठी निराशा झाली आहे." तिच्या या पोस्टमुळे एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. ऑलिम्पिकमधील भारतीय खेळाडूंचा पोशाख कुणाकडून ठरवला जातो आणि त्याची निर्मिती कुणाकडून केली जाते, याबाबतची माहिती घेऊयात. हेही वाचा : डेंग्यूप्रमाणेच येतो ताप! दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला ओरोपोच विषाणू आहे तरी काय? पोशाखाच्या डिझाईनबाबतचा निर्णय कोण घेते? इंडियन ऑलिम्पिक कमिटी (IOC) आणि निवडलेले डिझायनर हाऊस या दोघांच्या संयुक्त विद्यमाने पोशाखाची निर्मिती केली जाते. वाजवी बोलीनंतर डिझायनर हाऊसची निवड केली जाते आणि त्यांच्याबरोबर करार केला जातो. डिझायनर हाऊस किती सर्जनशील पद्धतीने काम करते आणि त्यासाठी किती पैसे घेते, या दोन्ही घटकांचा विचार करूनच कपड्यांसंदर्भातील कंत्राट त्यांना दिले जाते. भारत देशाची ओळख कपड्यांमधून प्रतीत करण्याची क्षमता त्या एजन्सीमध्ये असायला हवी, तसेच अशा स्वरूपाच्या कपड्यांची निर्मिती करण्यासाठी पुरेसे पैसे आणि मनुष्यबळही त्यांच्याकडे असायला हवेत. जी एजन्सी अशा स्वरूपाची सेवा द्यायला सक्षम असते, त्यांच्याबरोबरच हा करार केला जातो. त्यामुळे जवळपास प्रत्येक मोठे डिझायनर हाऊस आणि स्पोर्ट्सवेअर ब्रँड हे कंत्राट आपल्याला मिळावे यासाठी धडपडत असते, तसेच परस्परांबरोबर स्पर्धा करत असते. याच निकषांवर यावेळी पहिल्यांदाच ऑलिम्पिकमधील टीम इंडियाच्या पोशाख निर्मितीचे काम तरुण ताहिलियानी यांच्या 'तस्वा' या डिझायनर हाऊसला देण्यात आले होते. तरुण ताहिलियानी आणि आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेल लिमिटेड यांच्याकडून 'तस्वा' या डिझायनर हाऊसची निर्मिती करण्यात आली आहे. युनायटेड स्टेट्सचे राल्फ लॉरेन, फ्रान्समधील बर्लुटी आणि इटलीमधील एम्पोरियो अरमानी यांसह फॅशन उद्योगातील अनेक ब्रँड या ऑलिम्पिकच्या निमित्ताने चर्चेत आले आहेत. सरकारकडून यापूर्वी एखाद्या डिझायनरला कंत्राट देण्यात आले आहे का? आतापर्यंत तरी खेळाडूंसाठीच्या पोशाखामध्ये साडी, सलवार सूट, सूट, बंदगला, पगडी आणि ब्लेझर इत्यादींचा समावेश करण्यात आला आहे. सरकारने आतापर्यंत तरी नॅशनल कॅरिअर, एअर इंडिया आणि खादीच्या प्रचारासाठी म्हणून युनिफॉर्म डिझाइनरचा वापर केला आहे. एखाद्या डिझाईनची निवड कशी केली जाते? ताहिलियानी यांच्या मते, "डिझायनरला इंडियन ऑलिम्पिक कमिटीने निश्चित केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे लागते. लांबूनही संघाची ओळख पटवता यावी, याकरिता संपूर्ण संघाच्या पोशाखामध्ये भारतीय तिरंग्याचा अंतर्भाव असणे गरजेचे असते. बहुतांश देशांचे संघदेखील याच पद्धतीने आपापल्या ध्वजाचे रंग कपड्यांवर धारण करतात. सध्याच्या डिझाईनची निवड होण्यापूर्वी अनेक पर्याय सादर करण्यात आले होते. सध्याचे डिझाईन एका पडताळणी समितीकडून निवडण्यात आले आहे." ताहिलियानी यांच्या म्हणण्यानुसार, या पोशाखाच्या निर्मिती प्रक्रियेत बऱ्याच गोष्टी पुढे-मागे झाल्या. पोशाखावर वेगवेगळे अभिप्राय आले, त्यात सुधारणा झाल्या तसेच फिटिंगवेळीही बदल करावे लागले. खेळाडू तसेच संबंधित अधिकारी असे मिळून ३०० जणांसमोर या संदर्भातील बैठका झाल्या. ताहिलियानी म्हणाले की, "शेवटच्या क्षणी अनेक गोष्टी बदलल्या गेल्या. जेव्हा सर्व खेळाडूंचे एकसाथपणे लांबून निरीक्षण केले, तेव्हाही पोशाखाच्या रंगांमध्ये काही बदल करावेसे वाटले." ताहिलियानींवर सध्या टीका का होत आहे? बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा यांची पोस्ट चर्चेचे कारण आहेच, त्याबरोबरच मंगोलिया आणि श्रीलंका यांसारख्या लहान राष्ट्रांनीही अधिक सर्जनशील आणि विचारास प्रवृत्त करणारे सुंदर डिझाईन कपड्यांमधून यशस्वीपणे साकार केले आहे. या डिझाईनमधून त्यांच्या हस्तकलेची परंपरा आणि संस्कृतीची ओळख अधिक चांगल्या प्रकारे प्रतिबिंबित होताना दिसते. मंगोलियन खेळाडूंच्या पोशाखावर स्वातंत्र्यासाठी आसुसलेल्या पक्ष्यांचे चित्रण होते. भरतकाम करून हे पक्षी पोशाखावर चित्रित करण्यात आले होते. त्याबरोबरच त्यांच्या पोशाखामध्ये देशाचे निसर्गसौंदर्यही दर्शवण्यात आले होते. या पोशाखांवर सोनेरी आणि चंदेरी आवरणाचा वापर सुबकपणे करण्यात आला होता. कपड्यांच्या डिझाइनमध्ये मंगोलियाचे निळे, लाल आणि पांढरे राष्ट्रीय रंग वापरण्यात आले होते. दुसऱ्या बाजूला श्रीलंकेचा पोशाखही असाच लक्षवेधक होता. त्यांच्या पोशाखावर भरतकाम आणि मणीकामाचा उत्तम नमुना दिसून येत होता. ताहिलियानी यांच्यावर अशी टीका होत आहे की, त्यांनी भारतीय पोशाखनिर्मितीसाठी रेशमाचा वापर न करता सुताचा वापर केला. तसेच त्यांनी कपड्यांवर कसल्याही प्रकारचे विणकाम किंवा भरतकाम केले नाही, त्याऐवजी डिजिटल इकट प्रिंट्स निवडणे सोयीचे समजले. हा आपल्या समृद्ध भारतीय हस्तकला परंपरेचा अपमान आहे, असेही काहींना वाटले. अर्थात, अशाप्रकारची टीका फक्त ताहिलियानी यांच्यावरच होत आहे असे नाही. अगदी राल्फ लॉरेन आणि अरमानीसारख्या डिझायनर्सवरही सुमार डिझाईनची निर्मिती केल्याची टीका होत आहे. लहान राष्ट्रांच्या तुलनेत या मोठ्या ब्रँड्सनी अगदीच कमी दर्जाचे डिझाईन्स तयार केले, असे टीकाकारांचे म्हणणे आहे. हेही वाचा : विद्यापीठाच्या पदवी प्रमाणपत्रामध्ये वडिलांच्या बरोबर आईचेही नाव यायला हवे, असा आग्रह धरणारी ‘योगिनी’ कोण होती? ताहिलियानींनी काय प्रतिवाद केला? रेशमाऐवजी सुताचा वापर का केला, या टीकेवर प्रत्युत्तर देताना ताहिलियानी म्हणाले की, "जुलै महिन्यात पॅरिसमध्ये अधिक उष्णता असू शकते, त्यामुळेच खेळाडूंचा पोशाख सुती करण्यात आला होता. मी त्यांच्या पोशाखासाठी प्री-प्लीटेड साडी आणि बंडी जॅकेटचे कंटेम्पररी सिल्हूट्सचा वापर केला. अशा प्रकारचा पोशाख खेळाडूंना अंगावर वागवण्यासाठी सहज तर होताच, शिवाय तो पारंपरिक आणि आधुनिक अशा दोन्ही बाबींचे सुबक मिश्रण वाटत होता. जरदोजी घालून खेळाडूंना पाठवणे मला सहज शक्य होते; मात्र ते औचित्याला धरून अजिबातच नव्हते. सरतेशेवटी खेळाडू तिरंगी रंगांमध्ये छान दिसत होते, हे महत्त्वाचे आहे. हे काही लग्न नव्हते, तर खेळ समारंभाचे औपचारिक उद्घाटन होते, हे लक्षात घ्यायला हवे." पोशाखावर इकट विणण्याऐवजी प्रिंटचा वापर केल्याबाबतही टीका होत आहे. याबाबत बोलताना ताहिलियानी म्हणाले की, "होय, आम्ही प्रिंटचा वापर यासाठी केला, कारण तीन आठवड्यांमध्ये विणकाम करणे अशक्य होते. आम्हाला एवढाच वेळ देण्यात आला होता. या उपलब्ध वेळामध्ये अशी मागणी करणे हास्यास्पद आहे. फक्त शूजवर बनारसमध्ये जरीकाम करता आले. त्या तुलनेत मंगोलियन डिझायनर्सना केवळ ३२ खेळाडूंसाठी डिझाइन करण्यासाठी तीन महिने लागले." 'तस्वा'चा लोगो कपड्यांवर लावण्यात आला होता का? त्यासाठी ताहिलियानींना पैसे मिळालेत का? या आरोपावर बोलताना ताहिलियानी म्हणाले की, "कपड्यांवर लोगो कुठेही नव्हता. फक्त कपड्यांच्या बॉर्डरवर एक चिन्ह लावले होते इतकेच आणि जेव्हा तुम्ही खेळाडूंची छायाचित्रे पाहता, तेव्हा तुम्हाला ते लक्षातही येणार नाही. आम्ही आधी भारताचा ध्वज लावला होता, मात्र तो लावू नये वा लावला जाऊ शकत नाही, असे आम्हाला सांगण्यात आले." कपडे डिझाईन करून या कपड्यांवर लोगो लावण्यासाठी 'तस्वा'ने त्यांना पैसे दिले, या दाव्याचे ताहिलियानींनी स्पष्ट शब्दात खंडन केले. "हे काम पैशांसाठी नाही, तर खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी केले. इंडियन ऑलिम्पिक कमिटीने सांगितलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसारच सगळ्या गोष्टी केल्या गेल्या. मला वाटते की, प्रायोजकांना आपले ब्रँडिंग करण्याचा अधिकार आहे. ही काही नवी संकल्पना नाही. आम्हाला ध्वजाची रिबन लावायची होती, पण त्याऐवजी चिन्ह लावण्यात आले."