आपल्याला आयुष्यात अनेक व्यक्ती भेटतात, कधी त्यांची भेट प्रत्यक्ष असते तर कधी अप्रत्यक्ष. कळत -नकळत त्या तुम्हाला बरंच काही शिकवून जातात. आज सकाळीच मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख गेल्याची बातमी आली. वयाच्या ८५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आपल्यापैकी अनेकांची त्यांच्याशी प्रत्यक्ष भेट झालेली नसली तरी मुंबई विद्यापीठातून १९९८ पासून उत्तीर्ण झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी हे नाव महत्त्वाचं ठरणार आहे. खरंतर का, असं इथे वेगळं सांगायला नको. महाराष्ट्राच्या परंपरेला साजेसा असा निर्णय डॉ. स्नेहलता देशमुख यांनी मुंबई विद्यापीठाची धुरा सांभाळल्यानंतर घेतला होता. विद्यापीठाच्या प्रमाणपत्रांवर वडिलांबरोबर आईचेही नाव यायला हवे, असा प्रस्ताव त्यांनी मांडला होता आणि बऱ्याच प्रयत्नांनंतर कुलपती पी. सी. अलेक्झांडर यांच्या पाठिंब्यामुळे हा प्रस्ताव संमत झाला होता. त्याचेच फळ म्हणून १९९८ पासून डिग्री सर्टिफिकेटवर आईचे नाव येऊ लागले. ही तर प्रत्येक मुलासाठी अभिमानाची बाब होती. आई कोणीही असो, तिचे शिक्षण कितीही झालेले असो… आपल्या पिल्लाच्या भविष्यासाठी झटणाऱ्या मातेचे नावं आता (डिग्री- कॉन्व्होकेशन) पदवीदान प्रमाणपत्रावर वडिलांबरोबर आईचं नाव झळकत होतं, किती तो मोठा सन्मान! डॉ. स्नेहलता देशमुख यांच्याच शब्दात सांगायचं झालं तर आईचा गौरव याहून तो वेगळा काय असणार होता?. ..त्याच डॉ. स्नेहलता देशमुख यांच्या कार्यकर्तृत्त्वाचा घेतलेला हा आढावा !

अधिक वाचा: विश्लेषण: रामायण एक अन्वयार्थ अनेक!

प्राथमिक शिक्षण…

डॉ. स्नेहलता देशमुख यांचा जन्म ३० डिसेंबर १९३८ रोजी ज्येष्ठ कन्येच्या रूपात एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील डॉ. श्रीकृष्ण जोगळेकर केईएम रुग्णालयात कार्यरत होते. त्यांची वागणूक, कामाचा उरक व सचोटी पाहून लवकरच त्यांना सायन रुग्णालयाचा कार्यभार सांभाळण्यासाठी बढती मिळाली. डॉ. स्नेहलता देशमुख यांनी वडिलांकडूनच डॉक्टर होण्याची प्रेरणा मिळाली. स्नेहलता बाईंचे शालेय शिक्षण ‘आयईएस गर्ल्स स्कूल’मध्ये झाले. आजोबांच्या पुढाकारामुळे त्यांनी संस्कृत या विषयात प्रावीण्य मिळवले होते. मॅट्रिकला ६२ टक्के मिळवून त्यांनी रुईया महाविद्यालयात सायन्स शाखेला प्रवेश घेतला होता.

महिला म्हणून सर्जन होण्यास नकार..

त्यावेळी डॉक्टर होण्याकरता इंटर सायन्सला ६५-७० टक्के गुण असणे अनिवार्य होते, परंतु कमी गुणांमुळे मुंबईत त्यांना प्रवेश मिळेनासा झाला. मुंबईबाहेर प्रयत्न करावा तर आजोबा हे कर्मठ वळणाचे असल्याने त्यांनी आपल्या नातीला मुंबईबाहेर जाण्यास नकार दिला. शेवटी डॉ. स्नेहलता यांनी बीएस्सीला रुईयामध्येच अ‍ॅडमिशन घेतले. परंतु त्यानंतर चमत्कार घडावा असेच झाले. दोन महिन्यांतच जी. एस. मेडिकल कॉलेजमध्ये दोन जागा रिक्त झाल्या आणि तिथे स्नेहलताबाईंना मेडिकलसाठी प्रवेश मिळाला. १९६० साली त्या डॉक्टर झाल्या. पुढे त्यांना सर्जन व्हायचे होते. म्हणूनच पुरेपूर मेहनत घेऊन त्यांनी सर्जरी या विषयात कॉलेजमध्ये पहिला नंबर मिळवला आणि टाटा मेमोरिअल रुग्णालयात ‘हाऊसमन’ म्हणून फॉर्म भरला. मात्र तेव्हाच्या टाटा मेमोरिअल रुग्णालयाच्या डीनने त्यांना त्या मुलगी असल्याचे कारण सांगून ‘टाटा’मध्ये पोस्ट देण्यास नकार दिला. त्यावेळी रुग्णालयात महिलांसाठी हॉस्टेल नसल्याने हा नकार देण्यात येत असल्याचे त्यांना सांगण्यात आले. तरी त्यांनी हार न मानता केईएम मध्ये काम करण्यास सुरुवात केली. तीन वर्षांनी त्यांनी एमएसची परीक्षा दिली आणि पहिल्याच परीक्षेत उत्तम यश संपादन केले.

आईची खंबीर साथ..

त्याच सुमारास त्यांचा विवाह डॉ. शामराव देशमुख यांच्याशी झाला. संसाराची जबाबदारी, ड्युटी आणि अभ्यास अशा तिन्ही आघाड्या यशस्वीरित्या सांभाळण्याचे काम त्यांनी केले. याचे श्रेय त्या आपल्या सासरच्या मंडळींना, पती आणि आईला देतात. अनेक बिकट प्रसंगी त्यांची आई त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली होती. त्यांनी २०२० साली ‘लोकसत्ता’मध्ये लिहिलेल्या ‘गद्धेपंचविशी : आयुष्याच्या टोलेजंग इमारतीचा पाया’ या लेखात त्यांच्या आईने आधार देण्यासाठी दिलेल्या संस्कृत सुभाषिताचा दाखला दिला आहे. ‘उद्यमं साहसं धैर्य बुद्धि शक्ती पराक्रम षडेते यत्र वर्तते तत्र देवाही सहाय्यकृत.’ ‘सतत धर्याने वाग, उद्यमशील हो, साहस कर, धीर धर, बुद्धीचा वापर कर, शरीर शक्तिमान असू दे आणि पराक्रमी हो.’ आईने दिलेल्या याच धैर्याची कास पकडून डॉ. स्नेहलता पुढे मार्गक्रमण करत राहिल्या. डॉ.आर. के. गांधी, डॉ. सुभाष दलाल, डॉ. प्रफुल्लकुमार सेन यांसारख्या दिग्गजांच्या हाताखाली त्यांनी शस्त्रक्रियेचे धडे गिरवले.

अधिक वाचा: स्रियांचा सखा ते राष्ट्रपती भवनातील अशोक मंडप;अशोक वृक्षाचा प्रवास कसा?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१९९५ मध्ये त्यांची नेमणूक मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू म्हणून झाली. त्या आधी त्या सायन हॉस्पिटलच्या डीन म्हणून कार्यरत होत्या. कुलगुरू हे पद स्वीकारल्यानंतर त्यांनी बीएमएस हा मिडल मॅनेजर्स कोर्स, मास मीडिया आणि मराठी पत्रकारिता यांसारखे करिअरसाठी उपयोगी पडणारे अनेक अभ्यासक्रम सुरु केले. त्यांच्या हयातीत त्यांची १६ पुस्तके प्रकाशित झाली. गर्भ संस्कार, नवजात शिशू आणि माता आहार या विषयांवर त्यांनी काम केले. सध्या त्या मुंबईतील पार्ले टिळक विद्यालय संस्थेच्या संचालक मंडळावर विश्वस्त म्हणून कार्यरत होत्या.