Jyoti Malhotra पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली भारतातील लोकप्रिय ट्रॅव्हल यूट्यूबर ज्योती मल्होत्रा हिला अटक करण्यात आली आहे. ती ‘ट्रॅव्हल विथ जो’ या तिच्या ट्रॅव्हल चॅनेलसाठी ओळखली जाते. तिचे तब्बल ३,७७,००० हून अधिक सबस्क्राइबर्स आहेत. आता ज्योती मल्होत्रा हिचे नाव उत्तर भारतात कार्यरत असलेल्या पाकिस्तानशी संबंधित हेरगिरी नेटवर्कच्या चौकशीत आल्याने ती चर्चेत आली आहे. या प्रकरणात तिच्यासह आणखी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. नेमके ही प्रकरण काय? कोण आहे ज्योती मल्होत्रा? पाकिस्तानी अधिकाऱ्यांशी तिचा संबंध काय? त्याविषयी जाणून घेऊयात.
हेरगिरी केल्याबद्दल अटक
ज्योती मल्होत्राला हिसार पोलिसांनी हेरगिरी केल्याच्या आणि पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांना संवेदनशील भारतीय माहिती पुरवल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. तिच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम १५२ आणि ऑफिशियल सिक्रेट ॲक्ट, १९२३ च्या कलम ३, ४ आणि ५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिला पाच दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे आणि तिचा खटला आता पुढील तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला जाणार आहे.
ज्योती मल्होत्राचे पाकिस्तानी अधिकाऱ्यांची संबंध
हिसार सिव्हिल लाईन्स पोलिस ठाण्यामधील उपनिरीक्षक संजय यांनी नोंदवलेल्या एफआयआरनुसार, २०२३ च्या पाकिस्तान भेटीदरम्यान मल्होत्रा नवी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायोग (पीएचसी) मधील कर्मचारी एहसान-उर-रहीम ऊर्फ दानिशच्या संपर्कात आली. दानिशने तिचा हँडलर म्हणून काम केले. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेशी (PIOs) तिची ओळख करून दिली. तसेच एहसान-उर-रहीम ऊर्फ दानिश एन्क्रिप्टेड प्लॅटफॉर्मद्वारे तिच्याशी नियमित संपर्कात राहिला.
पाकिस्तान आणि बालीला भेट
२०२३ मध्ये ज्योती मल्होत्राने दोनदा पाकिस्तानला भेट दिल्याची माहिती आहे. या भेटीत तिने अली एहवान, शाकीर आणि राणा शहबाज यांसारख्या अधिकाऱ्यांना ती भेटली. तिच्यावर संशय येऊ नये म्हणून तिने ‘जट्ट रंधावा’सारख्या गुप्त नावांनी त्यांचे नंबर मोबाइलमध्ये सेव्ह केले. तिच्या पाकिस्तान भेटीदरम्यान, ती नवी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायोगात (पीएचसी) तैनात असलेल्या एहसान-उर-रहीम ऊर्फ दानिश या अधिकाऱ्याच्या संपर्कात आली. एहसानने तिची ओळख पाकिस्तानातील गुप्तचर अधिकाऱ्यांशी करून दिली.
या महिन्याच्या सुरुवातीला, एहसानला पर्सना नॉन-ग्राटा घोषित करण्यात आले आणि १३ मे २०२५ रोजी भारताने पाकिस्तानशी राजनैतिक संबंध कमी केल्याने त्याला देशातून हद्दपार करण्यात आले. ज्योती मल्होत्राने भारतात परतल्यानंतर व्हॉट्सअॅप, टेलिग्राम आणि स्नॅपचॅटसारख्या एन्क्रिप्टेड प्लॅटफॉर्मद्वारे पाकिस्तानी अधिकाऱ्यांशी संपर्क ठेवला. तिने गुप्तचर अधिकाऱ्यांपैकी एकासह इंडोनेशियातील बाली येथेही प्रवास केल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे.
पाकिस्तानमधील लाहोरला भेट
ज्योती मल्होत्राच्या यूट्यूबवर पाकिस्तानमधील व्हिडीओ सुमारे दोन महिन्यांपूर्वी पोस्ट केले गेले होते. तिच्या प्रवासवर्णनांमधून असे स्पष्ट दिसून येते की, ज्योती मल्होत्राने पाकिस्तानच्या अनेक सकारात्मक पैलूंचे चित्रण करण्याचा प्रयत्न केला आहे. सोशल मीडियावर असणाऱ्या तिच्या प्रभावामुळे परदेशी एजंटनी ज्योती मल्होत्राकडून व्हिडीओ रेकॉर्ड करून घेतले, असे तपासकर्त्यांनी सांगितले. तिच्या व्हिडीओंमध्ये ती अटारी-वाघा सीमा ओलांडल्याचे, लाहोरच्या अनारकली बाजाराविषयी सांगतानाचे, बस प्रवास करतानाचे आणि पाकिस्तानमधील सर्वात मोठ्या हिंदू मंदिर असणाऱ्या कटास राज मंदिराला भेट देतानाचे दाखवले आहे.
तिने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवरील एका फोटोमध्ये उर्दूमध्ये “‘इश्क लाहोर’ असे कॅप्शन दिले आहे. तिने पाकिस्तानी जेवणाबद्दलची माहिती आणि दोन्ही देशांमधील संस्कृतीचीदेखील तुलना केल्याचे पाहायला मिळाले आहे. ज्योती मल्होत्राने गेल्या वर्षी काश्मीरलाही भेट दिली होती. तिने दल सरोवरात शिकाराचा आनंद घेत असल्याचा व्हिडीओ, श्रीनगर ते बनिहाल असा ट्रेन प्रवास करतानाचा व्हिडीओ पोस्ट केला होता. तिच्या एका व्हिडीओपैकी ती पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर बोलली. “पहलगाम काश्मीरबद्दल माझे विचार: आपण पुन्हा काश्मीरला भेट देऊ का?” असे तिने तिच्या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे.
हरियाणा आणि पंजाबमधील हेरगिरी नेटवर्क
अधिकाऱ्यांनी उघड केले की, मल्होत्रा हरियाणा आणि पंजाबमधील एका मोठ्या हेरगिरी नेटवर्कचा भाग होती. हेरगिरी, संवेदनशील माहिती प्रसारित करणे आणि पाकिस्तानी हँडलर्सना आर्थिक व् लॉजिस्टिक सहाय्य पुरवणे या आरोपांखाली तिच्यासह सहा जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. पोलिस पुढील प्रकरणाचा तपास आणि यात सहभागी लोकांचा शोध घेत आहेत.
भारत-पाकिस्तान तणाव
जम्मू-काश्मीरच्या पहलगाम व्हॅलीमध्ये एप्रिलमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यातून बचावलेल्या काहींनी सांगितले की, हल्लेखोरांनी जाणीवपूर्वक हिंदू पुरुषांना जवळून गोळ्या घातल्या. या हल्ल्याची जबाबदारी काश्मीर रेझिस्टन्स नावाच्या दहशतवादी गटाने घेतली होती. हा गट लष्कर-ए-तैयबाशी जोडला आहे. या गटाला अनेक काळापासून पाकिस्तानचा पाठिंबा असल्याचा आरोप आहे, त्यामुळे पहलगाम हल्ल्याचे प्रत्युत्तर म्हणून भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’सुरू केले, ज्या अंतर्गत त्यांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांवर हल्ला केला.