भारतीय लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने रूद्र नावाच्या नव्या ऑल आर्म्स ब्रिगेड्सची घोषणा केली. लष्कर हे भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी एक भविष्योन्मुख सैन्य म्हणून विकसित होत आहे. त्यासाठी या एकत्रित ब्रिगेड्स आणि विशेष दलांना अधिक सक्षम करण्यात येत आहे असे द्विवेदी यांनी सांगितले. कारगिल युद्धात पाकिस्तानविरुद्ध लढताना शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली म्हणून तीन नवीन उपक्रमांची घोषणा करण्यात आली.
भारतीय लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी शनिवारी कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने रूद्र या नावाने ओळखल्या जाणाऱ्या नवीन ऑल आर्म्स ब्रिगेड्सची घोषणा केली. यावेळी त्यांनी सांगितले की, “भविष्यातील गरजांनुसार लष्कर आणखी सुसज्ज आणि सक्षम होण्यासाठी या ब्रिगेड्सची स्थापना करण्यात आली आहे.
या प्रकल्पांमध्ये शहीद जवानांना समर्पित ई-श्रद्धांजली अॅप लॉन्च करण्यात आले. यामध्ये कारगिल युद्धाच्या कहाण्या सांगणारे क्यूआर कोड आधारित ऑडिओ फीचर आणि इंडस व्ह्यूपॉइंट्सचा समावेश आहे. इथे भेट देणारे लोक एलओसीजवळील बटालिक सेक्टरमधील सैनिकांचे जीवन अनुभवू शकतील.
रूद्र ब्रिगेड म्हणजे काय
सेनाप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी रूद्र ब्रिगेडची घोषणा केली. ही ब्रिगेड सर्व शस्त्रांनी परिपूर्ण अशी आहे. याबाबत बोलताना द्विवेदी यांनी सांगितले की, “आजचे भारतीय सैन्य केवळ सध्याच्या आव्हानांना यशस्वीपणे सामोरेच जात नाही, परिवर्तनशील, आधुनिक आणि भविष्यातील मजबूत शक्ती म्हणून वेगाने पुढे जात आहे. या अंतर्गत रूद्र नावाच्या नवीन सर्व शस्त्र ब्रिगेड तयार केल्या जात आहेत आणि याला शुक्रवारीच मी मंजुरी दिली आहे.” कारगिलमधील द्रास इथे पार पडलेल्या २६व्या कारगिल विजय दिवस समारंभात ते बोलत होते.
नेमकं या ब्रिगेडचं वैशिष्ट्य काय?
या ब्रिगेडमध्ये पायदळ (इन्फंट्री), यांत्रिक पायदळ (मेकॅनाइज्ड इन्फंट्री), बख्तरबंद तुकड्या (आर्मर्ड युनिट्स), तोफखाना (आर्टिलरी), विशेष कमांडो दल (स्पेशल फोर्सेस) आणि मानवरहित हवाई प्रणाली (ड्रोन युनिट्स) यांचा समावेश असेल. या सर्व घटकांना कस्टमाइज्ड लॉजिस्टिक्स आणि लढाऊ सहाय्य पुरवले जाईल, असेही लष्करप्रमुखांनी सांगितले. तसंच सीमारेषेवर शत्रूला अचानक घेरणाऱ्या चपळ आणि सर्वात घातक अशा विशेष दलांच्या भैरव लाइट कमांडो बटालियन स्थापन करण्यात आल्याचेही यावेळी लष्करप्रमुखांनी सांगितले.
त्यांनी असेही सांगितले की, “प्रत्येक पायदळ बटालियनमध्ये आता ड्रोन प्लॅटून्स असतात, तर तोफखान्याची क्षमताही दिव्यास्त्र बॅटरी आणि लोटर म्युनिशन बॅटऱ्यांमुळे अनेक पटीने वाढली आहे. लष्करी हवाई संरक्षण दल स्थानिक बनावटीच्या क्षेपणास्त्र प्रणालींनी सज्ज केलं जात आहे, त्यामुळे भारताची लष्करी ताकद अनेक पटीने वाढेल.”
भैरव कमांडो बटालियन
लष्कर आता पारंपरिक १० पॅरा स्पेशल फोर्सेस आणि ५ पॅरा बटालियन व्यतिरिक्त ४० ते ५० नवीन भैरव बटालियन तयार करत आहे. या बटालियन वेगवान, प्राणघातक आणि आधुनिक तंत्रज्ञानाने पूर्णपणे सुसज्ज असतील. त्या ड्रोन, एआय आधारित प्रणाली आणि शस्त्रांनी सुसज्ज असतील.
सीएनएन-न्यूज १८ने दिलेल्या माहितीनुसार, दोन इन्फंट्री ब्रिगेड्सची आधीच रूद्र ब्रिगेड्समध्ये पुनर्रचना करण्यात आली आहे. आतापर्यंत सैन्य वेगवेगळ्या शस्त्रांच्या आधारे स्वतंत्र ब्रिगेड्स चालवत होते. मात्र, आता नव्या रूद्र ब्रिगेड्समध्ये विविध शस्त्रदलांना एकाच संरचनेखाली एकत्र आणले जाईल.
कारगिल विजयदिनी सुरू करण्यात आलेले तीन प्रकल्प
२६व्या कारगिल विजय दिनाच्या निमित्ताने भारतीय सैन्यप्रमुखांनी तीन नव्या प्रकल्पांची सुरुवात केली. यामध्ये एक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे, ज्यामुळे नागरिकांना शहीद जवानांना ई-श्रद्धांजली अर्पण करता येईल.
उर्वरित दोन प्रकल्पांमध्ये एका क्यूआर कोडवर आधारित ऑडिओ गेटवे आहे. यामध्ये १९९९च्या कागरिल युद्धातील कथा ऐकायला मिळतात. दुसरा इंडस व्ह्यूपॉइंट हा प्रकल्प आहे, यामध्ये पर्यटकांना बटालिक सेक्टरमधील नियंत्रण रेषेपर्यंत प्रवास करण्याची संधी मिळते.
ही संकल्पना संग्रहालयासारखीच आहे. इथे पर्यटकांना प्रदर्शनांची माहिती इयरफोनच्या साहाय्याने ऐकायला मिळते. इथे लोकांना सैनिकांच्या शौर्य, पराक्रम, धैर्य आणि बलिदानाच्या कथा ऐकायला मिळतील अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.
इंडस व्ह्यूपॉइंटमध्ये पर्यटकांना बटालिक सेक्टरमधील नियंत्रण रेषेपर्यंत पोहोचता येईल, जेणेकरून भारतीय सैनिक कोणत्या परिस्थितीत सेवा देतात हे समजून घेता येईल. यामुळे पर्यटकांना सैनिक कोणत्या कठीण परिस्थितीत राहून देशाच्या सुरक्षेसाठी सेवा देतात हे प्रत्यक्ष अनुभवता येईल. बटालिक समुद्रसपाटीपासून १० हजार फुटांहून अधिक उंचीवर आहे. कारगिल युद्धाच्या काळात हा महत्त्वाचा रणनीतिक भाग होता. हे बटालिक कारगिल, लेह आणि बाल्टिस्तान यांच्या मधोमध स्थित आहे.
ऑपरेशन सिंदूरबाबत बोलताना लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी म्हणाले की, या मोहिमेद्वारे पाकिस्तानला एक ठाम संदेश देण्यात आला की, दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्यांना माफ केले जाणार नाही. ७ मे रोजी करण्यात आलेले हल्ले हे फक्त पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे प्रत्युत्तर नव्हते तर पाकिस्तानला दिलेला स्पष्ट इशारा होते