Kidney Failure Causes: रोजचं काम, कुटुंब आणि भविष्य अशा शेकडो गोष्टींचा विचार आपण करतो. या धबडग्यात शरीरातील एका छोट्याशा अवयवाकडे दुर्लक्षच करतो. खरे तर हा अवयवच आपल्या आयुष्याचा आधार आहे, हा अवयव म्हणजे किडनी. रक्तातील विषारी द्रव्यं गाळणं, बाहेर टाकणं, पाणी-खनिजांचं संतुलन राखणं, रक्तदाबावर नियंत्रण ठेवणं, हाडं आणि रक्तनिर्मितीची काळजी घेणं अशा असंख्य जबाबदाऱ्या ही किडनी दररोज व्यवस्थित पार पाडते. तरीही, आपल्याला नकळत लागलेल्या काही सवयी तिला हळूहळू कमकुवत करतात. म्हणूनच या वाईट सवयी वेळीच ओळखून आजपासूनच त्या बदलणं आवश्यक आहे, कारण किडनीचं आरोग्य जपणं म्हणजे आपल्या संपूर्ण आयुष्याचं आरोग्य जपणं होय!
…तर किडनी फेल्युअर
युनायटेड किंगडममध्ये (UK) किडनीचे आजार हा सार्वजनिक आरोग्यासाठी एक मोठा आणि गंभीर प्रश्न मानला जातो. देशातील १० टक्क्यांहून अधिक लोकसंख्येला क्रॉनिक किडनी डिसीजला (Chronic Kidney Disease- CKD) सामोरे जावे लागत आहे. प्रत्येक दहा नागरिकांपैकी किमान एकाला किडनीची समस्या आहे. या अवस्थेत सुरुवातीला लक्षणं फारशी दिसत नाहीत, पण वेळेवर निदान आणि उपचार न झाल्यास किडनी फेल्युअरपर्यंत प्रकरण जाऊ शकते.
याशिवाय, दरवर्षी ६ लाखांहून अधिक लोकांना ॲक्युट किडनी इन्ज्युरी (Acute Kidney Injury- AKI) होते. या स्थितीत अचानक किडनीच्या कार्यात अडथळे येतात. परंतु, AKI ही स्थिती कायमस्वरूपी राहात नाही; योग्य वेळी निदान होऊन तत्काळ उपचार मिळाल्यास किडनी पूर्ववत होऊ शकते. परंतु उपचार मिळण्यास उशीर झाल्यास किंवा त्याच वेळी इतर आजार असल्यास हा धोका जीवघेणा ठरू शकतो. UK मध्ये वाढती लोकसंख्या, वयोमान, मधुमेह आणि उच्च रक्तदाबासारखे आजार हे या दोन्ही प्रकारच्या किडनी समस्यांना मोठ्या प्रमाणावर कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे तिथल्या आरोग्य यंत्रणेसाठी हे एक दीर्घकालीन आव्हान ठरलं आहे.
किडनी हा शरीरातील सर्वात महत्त्वाच्या अवयवांपैकी एक आहे, कारण ती केवळ मूत्र निर्माण करत नाही तर शरीराचं संपूर्ण अंतर्गत संतुलन टिकवून ठेवते. किडनी दररोज शेकडो लिटर रक्त फिल्टर करते आणि त्यातून वेस्ट (कचरा), अतिरिक्त पाणी तसेच सोडियम, पोटॅशियमसारखे इलेक्ट्रोलाइट्स वेगळे करून बाहेर टाकते. या प्रक्रियेमुळे शरीरातील द्रव व क्षारांचं प्रमाण योग्य मर्यादेत राहातं.
रक्तदाब नियंत्रणासाठी महत्त्वाची
याशिवाय किडनीची आणखी काही महत्त्वाची कामं आहेत. रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी ती हार्मोन्सचं स्रवण करते, लाल रक्तपेशी निर्माण होण्यासाठी आवश्यक हार्मोन तयार करते, तसेच हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक कॅल्शियम आणि फॉस्फेटचा समतोल राखते, इत्यादी कामांचाही त्यात समावेश होतो.
किडनीचं आरोग्य म्हणजे संपूर्ण शरीराचं आरोग्य
पण एकदा किडनीला इजा झाली की, तिचं हे संतुलन राखण्याचं सामर्थ्य हळूहळू कमी होतं. परिणामी, रक्तातील विषारी द्रव्यं शरीरात साचू लागतात, पाणी नीट बाहेर न टाकल्याने शरीरास सूज येते (fluid retention) आणि इलेक्ट्रोलाइट्सचा समतोल बिघडतो. हा असमतोल गंभीर ठरू शकतो. त्यामुळे हृदयाची धडधड अनियमित होणं, श्वास घेण्यास त्रास होणं, हाडं कमजोर होणं, थकवा वाढणं अशा अनेक समस्यांचा धोका निर्माण होतो. त्यामुळे किडनीचं आरोग्य टिकवणं म्हणजे संपूर्ण शरीराचं आरोग्य जपणं होय.
तर हाडं कमकुवत होतात…
किडनी व्यवस्थित काम करत नसले तर त्यामुळे त्याचे शरीरावर दूरगामी परिणाम होऊ शकतात. किडनी नीट कार्य करू शकत नसल्यास रक्तदाब नियंत्रणाबाहेर जातो आणि त्यातून उच्च रक्तदाब व हृदयरोगाचा धोका वाढतो. शरीरातील खनिजांचा समतोल बिघडल्याने हाडं कमजोर होतात, तसेच शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीवरही परिणाम होतो. योग्य लक्ष न दिल्यास, ही इजा हळूहळू वाढत जाऊन क्रॉनिक किडनी डिसीज (CKD) मध्ये बदलते आणि उपचार न झाल्यास अखेरीस किडनी फेल्युअर होऊ शकतं.
जीवनशैलीत बदल आवश्यक
म्हणजेच, किडनीला झालेलं नुकसान हे फक्त मूत्रवहन संस्थेपुरतं मर्यादित राहत नाही, तर त्याचा परिणाम शरीराच्या जवळपास प्रत्येक अवयवावर होतो. मात्र, या धोक्याला वेळेत आळा घालणं शक्य आहे. आहारात बदल, पुरेशी झोप, नियमित व्यायाम, पाणी योग्य प्रमाणात घेणं, धूम्रपान-मद्यपान टाळणं असे साधे जीवनशैलीतील बदल केले, तर भविष्यात किडनीचं मोठं नुकसान होण्यापासून वाचता येवू शकते.

किडनीला हानी पोहोचवू शकणाऱ्या सात सवयी: आजच टाळा!
१) वेदनाशामक औषधांचा (Painkillers) अतिरेक
सहज उपलब्ध होणाऱ्या आयबुप्रोफेन किंवा ॲस्पिरिनसारख्या OTC औषधांमधील anti-inflammatory घटक किडनीतील सूक्ष्म नलिकांना (kidney tubules) नुकसान पोहोचवू शकतात. त्यामुळे रक्तातील पोषक घटक परत रक्तप्रवाहात जाणं कमी होतं आणि किडनीतील रक्तप्रवाहावरही परिणाम होतो. ही समस्या विशेषतः वयोवृद्ध किंवा आधीपासून किडनीचे आजार असलेल्या रुग्णांमध्ये जास्त दिसून येते. त्यामुळे अशा औषधांचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय करू नये.
२) पाणी कमी पिणं
किडनीला कचरा बाहेर टाकण्यासाठी पुरेसं पाणी आवश्यक आहे. पाणी कमी प्यायल्याने मूत्र अधिक दाट होतं, त्यात खनिजांचं प्रमाण जास्त असतं. यामुळे किडनी स्टोन आणि मूत्रमार्गातील संसर्ग होण्याचा धोका वाढतो. सामान्य लोकांनी दररोज १.५ ते २ लिटर (सहा ते आठ ग्लास) पाणी पिणं आवश्यक आहे.
३) मद्यपानाचा (Alcohol) अतिरेक
दारू शरीरातील पाण्याचं संतुलन बिघडवते आणि शरीराला निर्जलीत करते. त्यामुळे किडनीवर ताण येतो. शिवाय जास्त मद्यपानामुळे रक्तदाब वाढतो आणि त्यामुळे किडनीला थेट नुकसान होतं. NHS (UK) नुसार, स्त्री-पुरुष दोघांनीही आठवड्याला १४ युनिटपेक्षा जास्त दारू पिऊ नये आणि काही दिवस पूर्ण दारूमुक्त ठेवावेत.
४) धूम्रपान (Smoking)
सिगारेटच्या धुरात असलेलं कॅडमियमसारखं विषारी रसायन किडनीला थेट नुकसान करतं. धूम्रपानामुळे रक्तवाहिन्या अरुंद होतात, ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढतो आणि पेशींवर दुष्परिणाम होतात. यामुळे किडनी इन्ज्युरीचा धोका वाढतो. तसेच धूम्रपानामुळे डायबेटीस आणि उच्च रक्तदाब होण्याची शक्यता जास्त असते. या दोन्हीच किडनी विकारांच्या कारणांमध्ये समावेश होतो.
५) जास्त वजन (Obesity)
स्थुलतेमुळे शरीरातील चरबीचं प्रमाण वाढतं आणि त्यामुळे किडनीवर अतिरिक्त ताण पडतो. विशेषतः पोटाभोवतीची चरबी (central obesity) हृदयरोग आणि डायबेटीससारखे आजार वाढवते. हे दोन्ही आजार किडनीला थेट हानी पोहोचवतात. संतुलित आहार आणि नियमित व्यायामाने वजन कमी करता येतं आणि किडनीचे आरोग्य सुधारता येतं. संशोधनानुसार आठवड्यातून ५ दिवस, दररोज किमान ३० मिनिटं व्यायाम करणं किडनीच्या दृष्टीने फायदेशीर ठरतं.
६) चुकीच्या अन्नसवयी (Unhealthy Diet)
Ultra-processed foods (UPFs) जसे की, कोल्ड ड्रिंक्स, पॅकबंद ब्रेड्स यात मेद, साखर, मीठ आणि कृत्रिम रसायनांचं प्रमाण जास्त असतं. या पदार्थांमुळे स्थूलता, हृदयरोग आणि टाईप २ डायबेटीस होतो. अमेरिकेतील २४ वर्षांच्या अभ्यासात दिसून आलं की, UPFs खाणाऱ्यांना २४% अधिक किडनी विकारांचा धोका असतो.
७) जास्त मीठ (High Salt Diet)
जास्त मीठ खाल्ल्याने रक्तदाब वाढतो आणि किडनीची कार्यक्षमता कमी होते. किडनीला सोडियम-पोटॅशियमचा समतोल राखणं कठीण जातं. परिणामी, उच्च रक्तदाबामुळे किडनीवर अतिरिक्त ताण येतो आणि क्रॉनिक किडनी डिसीज होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे दररोजच्या आहारात जास्तीत जास्त सहा ग्रॅम (एक चमचा) मीठ घेण्याची मर्यादा ठेवली जाते.
८) झोपेची कमतरता (Poor Sleep)
संशोधनात दिसून आलं आहे की, झोपेचा कालावधी व गुणवत्ता यांचा किडनीच्या आरोग्यावर थेट परिणाम होतो. सहा तासांपेक्षा कमी झोप किंवा दहा तासांपेक्षा जास्त झोप घेतल्यास किडनीवर वाईट परिणाम होऊ शकतो. दररोज ७ ते ९ तासांची गुणवत्तापूर्ण झोप घेणं किडनीच्या आरोग्यासाठी अत्यावश्यक आहे.
किडनी विकारांपैकी काही घटक आपल्या हातात नसतात, जसं की वाढतं वय किंवा आनुवंशिकता. मात्र, दैनंदिन जीवनशैलीतील हानिकारक सवयी बदलल्या, तर किडनीचं आरोग्य दीर्घ काळासाठी चांगलं टिकवता येऊ शकतं. संतुलित आहार घेणं, पुरेसं पाणी पिणं, नियमित व्यायाम करणं, धूम्रपान आणि मद्यपानापासून दूर राहणं तसेच पुरेशी झोप घेणं; हेच किडनी निरोगी ठेवण्याचे खरे उपाय आहेत.