– ज्ञानेश भुरे

भारताचा यष्टिरक्षक ऋषभ पंत शुक्रवारी झालेल्या भीषण अपघातातून वाचला. सुदैवाने त्याच्या दुखापतीही गंभीर नाहीत. पण, यानंतरही त्याला यामधून पूर्ण बाहेर पडण्यासाठी किमान ६ ते ७ महिन्यांचा अवधी लागणार आहे. यामुळे त्याला अनेक महत्त्वाच्या मालिका आणि स्पर्धांना मुकावे लागणार आहे.

ऋषभ पंतच्या कारला अपघात कसा झाला?

आईला आश्चर्यचकित करण्यासाठी ऋषभ पंत रात्री नवी दिल्लीहून घरी परतत होता. तेव्हा दिल्ली-डेहराडून मार्गावर त्याची कार दुभाजकाला धडकली आणि पुढे जाऊन कारने पेट घेतला. अपघात भीषण होता. हरयाना सरकारच्या एका बस ड्रायव्हरने हा सगळा प्रकार पाहिला आणि तातडीने त्याने ऋषभला गाडीच्या काचा फोडून बाहेर काढले. ड्रायव्हरच्या म्हणण्यानुसार गाडीच्या काचा फोडून बाहेर काढत असतानाच त्याला जखमा झाल्या.

सध्या पंतची स्थिती कशी आहे ?

ऋषभ पंतची स्थिती स्थिर आहे. त्याची दुखापत गंभीर नसल्याचा निर्वाळा पंतवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले. अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. गौरव गुप्ता सध्या पंतच्या दुखापतींवर उपचार करत आहेत. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली पंतवर उपचार सुरू आहेत. पंतची कुठलीही दुखापत धोकादायक आणि गंभीर नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

पंतला यातून बाहेर पडण्यासाठी किती दिवस जातील?

एम्स रुग्णालयात डॉक्टर कमर आझम म्हणाले, की पंतच्या दुखापती या निश्चितच गंभीर नाहीत. त्याच्या उजव्या हाताच्या मनगटाला आणि उजवा गुडघा आणि घोट्याला मार लागला आहे. गुडघा आणि घोट्याची दुखापत वरवर असेल, तर पंतला यातून बरे होण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागेल. मात्र, गुडघा आणि घोटा यांना सांधणारे स्नायू फाटले असतील तर मात्र, पंतला किमान नऊ महिने तरी विश्रांती घ्यावी लागेल.

हेही वाचा : ऋषभ पंतच्या X-Ray चा फोटो व्हायरल; पुन्हा क्रिकेट खेळण्याच्या शंकेवर डॉक्टर म्हणतात, “ही दुखापत..”

पंतला कुठल्या प्रमुख मालिकांना मुकावे लागेल?

या दुखापतीचा पंतच्या कारकीर्दीवर मोठा परिणाम होणार यात शंकाच नाही. फेब्रुवारी-मार्च दरम्यान होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेबरोबरच पंतला २०२३च्या संपूर्ण आयपीएल हंगामास मुकावे लागणार आहे. भारतीय संघ जागतिक कसोटी स्पर्धेची अंतिम लढत सलग दुसऱ्या वर्षी खेळू शकतो. भारताने जर अंतिम फेरी गाठली, तर या महत्त्वाच्या सामन्यासही पंतला मुकावे लागणार आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी त्याला वगळण्यात आले असले, तरी त्याला पुढे निवडणार नाही असे कधीच सांगितलेले नाही. त्यामुळे १८ जानेवारीपासून सुरू होणारी न्यूझीलंडविरुद्धची मालिकादेखील तो खेळू शकणार नाही. दुखापतीतून बरे झाल्यावर मॅच फीट होण्यासाठीदेखील ऋषभला वेळ द्यावा लागणार आहे. त्यामुळे किमान हे वर्ष तरी ऋषभ क्रिकेटच्या मैदानावर उतरू शकणार नाही. साहजिकच ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला पंतला मुकावे लागेल अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा : ऋषभ पंतच्या SUV चा टॉप स्पीड माहितीय का? Over Speed मुळे झाला अपघात? जाणून घ्या सविस्तर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अशा वेळी पंतचा पर्याय म्हणून कुणाकडे बघितले जाईल?

एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० या पांढऱ्या चेंडूवर खेळल्या जाणाऱ्या क्रिकेटसाठी सध्या तरी पंतला वगळण्यात आले आहे. श्रीलंकेविरुद्ध ईशान किशनच्या नावाचा विचार भारताने केला आहे. त्याला या मालिकेत अडचण आल्यास संजू सॅमसनचा पर्याय डोळ्यासमोर येईल. कसोटीसाठी लोकेश राहुलचा विचार केला जाऊ शकतो. त्याचबरोबर श्रीकर भरत याच्या नावाचाही विचार केला जाऊ शकतो.