विश्लेषण : "मी राम व कृष्ण यांना देव मानणार नाही", आपच्या मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला त्या डॉ. आंबेडकरांच्या २२ प्रतिज्ञा कोणत्या? | Know what are 22 vows of Dr Babasaheb Ambedkar for Navyan Buddha Dhamma | Loksatta

विश्लेषण : “मी राम व कृष्ण यांना देव मानणार नाही”, आपच्या मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला त्या डॉ. आंबेडकरांच्या २२ प्रतिज्ञा कोणत्या?

धम्म चक्र प्रवर्तन दिनाचा इतिहास काय, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नवबौद्ध धम्मासाठी लिहिलेल्या २२ प्रतिज्ञा कोणत्या, या प्रतिज्ञांचं महत्त्व काय? याचा आढावा घेणारं हे विश्लेषण…

Dr Babasaheb Ambedkar 22 Vows Buddha Dhamma
डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्या २२ प्रतिज्ञा…

दिल्लीत ५ ऑक्टोबरला ‘मिशन जय भीम’ आणि ‘द बुद्धिस्त सोसायटी ऑफ इंडिया’ या संस्थांनी धर्मांतरणाच्या निमित्ताने एका कार्यक्रमाचं आयोजन केलं. यावेळी जवळपास १० हजार लोकांनी बौद्ध धम्म स्वीकारला. या कार्यक्रमाला दिल्लीतील आम आदमी सरकारमध्ये मंत्री असलेले राजेंद्र पाल गौतम हेही हजर होते. मात्र, यावेळी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नवबौद्ध धम्मासाठी लिहिलेल्या २२ प्रतिज्ञा म्हटल्याने वाद निर्माण झाला. भाजपाने या प्रतिज्ञांवरून थेट मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्याची मागणी केली. अखेर मंत्री राजेंद्र पाल गौतम यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. या पार्श्वभूमीवर धम्म चक्र प्रवर्तन दिनाचा इतिहास काय, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नवबौद्ध धम्मासाठी लिहिलेल्या २२ प्रतिज्ञा कोणत्या, या प्रतिज्ञांचं महत्त्व काय? याचा आढावा घेणारं हे विश्लेषण…

थोर समाजसुधारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्मातील जात व्यवस्थेवर कठोर ताशेरे ओढले. आंबेडकरांनी अस्पृश्यतेसह हिंदू धर्मातील शोषण करणाऱ्या रुढीपरंपरांची चिकित्सा केली. तसेच आपल्या आयुष्याच्या अखेरच्या काळात १४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. आंबेडकरांनी नागपूरमधील दिक्षाभूमीत लाखो अनुयायांसह हिंदू धर्माचा त्याग करत बौद्ध धम्माचा स्वीकार केला. या बौद्ध धम्माला आंबेडकरांनी नवबौद्ध धर्म असं म्हटलं. धर्मांतरण करताना आंबेडकरांनी २२ प्रतिज्ञा म्हटल्या आणि आपल्या अनुयायांकडूनही म्हणून घेतल्या. या प्रतिज्ञांना धम्म चक्र प्रवर्तन दिनी अनन्य साधारण महत्त्व आहे. या प्रतिज्ञा नवबौद्ध धम्माचा गाभा असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळेच बौद्ध धम्मात प्रवेश करताना या शपथा घेणं परंपरा झाली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या या २२ प्रतिज्ञांची तीन प्रमुख वर्गवारी आहे. यातील एका वर्गवारीत हिंदू देवी-देवतांची पूजा करण्यास आणि हिंदू रुढी-परंपरा नाकारण्याचा संकल्प आहे. दुसऱ्या वर्गवारीतील प्रतिज्ञांमध्ये हिंदू धर्मातील ब्राह्मण पुरोहितांच्या मक्तेदारीला नकार देण्यात आला आहे आणि तिसऱ्या प्रकारच्या प्रतिज्ञांमध्ये बौद्ध धर्माची मुल्य पाळण्याचं वचन देणाऱ्या प्रतिज्ञा आहेत.

डॉ. आंबेडकरांनी लिहिलेल्या २२ प्रतिज्ञा कोणत्या?

१. मी ब्रह्मा, विष्णू, महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
२. मी राम व कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
३. मी गौरी-गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देव-देवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
४. देवाने अवतार घेतले, यावर माझा विश्वास नाही.
५. गौतम बुद्ध हा विष्णूचा अवतार होय, हा खोटा आणि खोडसळ प्रचार होय असे मी मानतो.
६. मी श्राद्धपक्ष करणार नाही; पिंडदान करणार नाही.
७. मी बौद्धधम्माच्या विरुद्ध विसंगत असे कोणतेही आचरण करणार नाही.
८. मी कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणाचे हातून करवून घेणार नाही.
९. सर्व मनुष्यमात्र समान आहेत असे मी मानतो.
१०. मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करीन.
११. मी तथागत बुद्धाने सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करीन.
१२. तथागताने सांगितलेल्या दहा पारमिता मी पाळीन.
१३. मी सर्व प्राणिमात्रावर दया करीन, त्यांचे लालन पालन करीन.
१४. मी चोरी करणार नाही.
१५. मी व्यभिचार करणार नाही.
१६. मी खोटे बोलणार नाही.
१७. मी दारू पिणार नाही.
१८. ज्ञान (प्रज्ञा), शील, करुणा या बौद्धधम्माच्या तीन तत्त्वांची सांगड घालून मी माझे जीवन व्यतीत करीन.
१९. माझ्या जुन्या, मनुष्यमात्राच्या उत्कर्षाला हानिकारक असणाऱ्या व मनुष्यमात्राला असमान व नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा मी त्याग करतो व बौद्धधम्माचा स्वीकार करतो.
२०. तोच सद्धम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे.
२१. आज माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो.
२२. इतःपर मी बुद्धाच्या शिकवणुकीप्रमाणे वागेन अशी प्रतिज्ञा करतो.

हेही वाचा : बाबासाहेब, अजूनही पाण्यासाठीचा संघर्ष संपलेला नाही!

नवयान बौद्ध धम्म काय आहे, त्याचा इतिहास काय?

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १३ ऑक्टोबर १९३५ रोजी नाशिक जिल्ह्यातील येवला येथे झालेल्या धर्मांतरण परिषदेत हिंदू धर्मातील जातव्यवस्था नाकारण्यासाठी हिंदू धर्म सोडण्याचं जाहीर केलं. यावेळी त्यांनी हिंदू धर्म सोडणार असल्याचं जाहीर केलं असलं तरी कोणता धर्म स्वीकारणार हे स्पष्ट केलं नव्हतं. पुढील दोन दशकं आंबेडकर सामाजिक आणि राजकीय लढ्यांमध्ये गुंतले. याच काळात त्यांनी विविध धर्मांचा अभ्यास केला. त्यात बुद्ध धम्म हिंदू धर्मातील जातीआधारित विषमतेला आव्हान देतो असं त्यांचं मत झालं आणि त्यांनी बौद्ध धम्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा : ‘धम्मदीक्षे’नंतर बदललेला समाज…

यानंतर १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूरमधील दिक्षाभूमीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर, त्यांची पत्नी आणि लाखो अनुयायांनी हिंदू धर्माचा त्याग करत बौद्ध धम्माचा स्वीकार केला. आंबेडकरांनी त्यावेळी स्वीकारलेल्या बौद्ध धम्माला नवयान बौद्ध धम्म म्हटलं. यालाच आत्ता नवबौद्ध समाज असं म्हटलं जातं.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 13-10-2022 at 14:13 IST
Next Story
विश्लेषण : क्षी जिनपिंग पुन्हा ठरणार चीनमध्ये सर्वसत्ताधीश? कम्युनिस्ट पक्षाच्या अधिवेशनाचे महत्त्व काय?