Why Gen Z protests in Ladakh?: बुधवारी लडाखमधील लेह शहरात हिंसाचार उसळला, जेव्हा आंदोलकांनी भाजपच्या कार्यालयाला आणि सीआरपीएफच्या व्हॅनला आग लावली. या हिंसाचारात किमान चार जणांचा मृत्यू झाला असून लेहमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. गेल्या काही आठवड्यांपासून लडाखी नागरिक शांततेने उपोषण करून आंदोलन करत होते, मात्र बुधवारी आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतला.
या आंदोलनाचे नेतृत्व करणारे प्रसिद्ध लडाखी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक म्हणाले की, तरुण पिढीच्या भावना उफाळून आल्यामुळे हे घडले. त्यांच्या म्हणण्यानुसार, “ही Gen Z ची क्रांती होती, त्यामुळे ते रस्त्यावर उतरले.”
भाजपाने या गोंधळासाठी काँग्रेसवर टीका केली आहे.
मोठ्या आंदोलनादरम्यान आणि बंदच्या पार्श्वभूमीवर तरुणांच्या एका गटाने दगडफेक केली, त्यानंतर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि लाठीमार केला. या चकमकीत चार जणांचा मृत्यू झाला तर सुमारे ७० जण जखमी झाले. आणखी असंतोष उफाळून नये, म्हणून संवेदनशील भागांत अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे.
उपोषणाला बसलेल्या १५ जणांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात हलवावे लागले आणि त्यामुळे बुधवारी बंद पुकारण्यात आला होता.
राज्याचा दर्जा व स्वायत्ततेची मागणी
२०१९ साली राज्यघटनेतील अनुच्छेद ३७० रद्द करून जम्मू-काश्मीरचे विभाजन करत लडाखला स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश घोषित करण्यात आले. मात्र जम्मू-काश्मीरप्रमाणे येथे विधिमंडळाची स्थापना करण्यात आलेली नाही, त्यामुळे हा प्रदेश थेट केंद्राच्या कारभाराखालीच राहिला आहे. त्यानंतर आजपर्यंत राज्याचा दर्जा मिळणे, सहाव्या अनुसूचीनुसार घटनात्मक हमी, तसेच आदिवासी ओळख आणि नाजूक परिसंस्थेच्या संरक्षणासाठी अधिक स्थानिक स्वायत्ततेची मागणी करत लडाखमध्ये अनेक आंदोलनं सुरू आहेत.
लडाखमधील आंदोलनाबाबत पाच महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे; उपोषण का सुरू झाले, बंद कुणी पुकारला आणि कोण यात सामील होते :
1.लडाखमध्ये लोक आंदोलन का करत होते?
- पर्यावरणवादी आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखालील एका गटाने १० सप्टेंबरपासून उपोषण सुरू केले होते. लडाखला सहाव्या अनुसूचीत (Sixth Schedule) समाविष्ट करण्यात यावे आणि राज्याचा दर्जा देण्यात यावा, अशी त्यांची मागणी होती.
- वांगचुक यांनी बुधवारी आपल्या एक्स (X) हँडलवर शेअर केलेल्या व्हिडीओ संदेशात म्हटले, “ही तरुण पिढीची उफाळलेली भावना होती, ज्यामुळे ते रस्त्यावर उतरले. गेल्या पाच वर्षांपासून ते बेरोजगार आहेत, वारंवार कुठल्या ना कुठल्या कारणाने नोकऱ्यांमधून दूर केले जात आहेत आणि लडाखच्या मागण्या अद्याप मान्य झालेल्या नाहीत. हे सामाजिक अस्थिरतेचं कारण ठरलं आहे. काहींना वाटतं की, ते फक्त आमचे समर्थक आहेत, पण प्रत्यक्षात संपूर्ण लडाख आमच्याबरोबर आहे आणि या लढ्यासाठी उभं आहे. ही जेन-झीची क्रांती होती.”
- त्यांनी पुढे आवाहन केलं, “मी तरुण पिढीला सांगू इच्छितो की, हिंसेकडे वळू नका; यामुळे गेल्या पाच वर्षांचे आपले प्रयत्न वाया जातील. ही आपली पद्धत नाही. आम्ही आपली मागणी सरकारपर्यंत शांततेच्या मार्गाने पोहोचवू पाहतो आहोत आणि मला हवंय की त्यांनी आमचा संदेश ऐकावा.”
- पुढील चर्चेची फेरी केंद्र सरकार आणि लडाखमधील प्रतिनिधी यांच्या मध्ये होणार असून त्यात लेह अॅपेक्स बॉडी (LAB) आणि कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्स (KDA) या संघटनांचे सदस्य सहभागी होतील. ही बैठक ६ ऑक्टोबर रोजी ठरविण्यात आली आहे.
- भारतीय संविधानातील सहाव्या अनुसूचीमध्ये आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराममधील आदिवासी भागांच्या प्रशासनासाठीची तरतूद आहे. या विशेष तरतुदीनुसार स्वायत्त जिल्हा परिषदा (Autonomous District Councils) स्थापन करून त्या प्रदेशांना स्वायत्तता दिली जाते. या परिषदांना जमीन, जंगल आणि स्थानिक प्रशासनाशी संबंधित कायदे करण्याचे अधिकार असतात. याचा उद्देश म्हणजे आदिवासींचे हक्क, परंपरा आणि स्वशासन यांचे रक्षण करणे हा आहे.
- आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, लडाखमधील अनुसूचित जमातींची लोकसंख्या सुमारे ९७% आहे. त्यामध्ये लेह जिल्ह्यात ६६.८%, नुब्रामध्ये ७३.३५%, खल्सीत ९७.०५%, कारगिलमध्ये ८३.४९%, सांकूमध्ये ८९.९६% आणि झंस्कारमध्ये ९९.१६% इतकी लोकसंख्या आहे.
2. बुधवारी आंदोलनाचे नेतृत्व कोणी केले?
- लडाखमध्ये राज्याचा दर्जा आणि सहाव्या अनुसूचीत समावेश करण्याच्या मागणीसाठी लेह येथे झालेल्या आंदोलनाचे नेतृत्व लेह अॅपेक्स बॉडी (LAB) या संघटनेने केले. ही संघटना धार्मिक, सामाजिक आणि राजकीय गटांचे एकत्रीकरण आहे.
- सोनम वांगचुक, हे लडाखच्या हक्क आणि विकासासाठी दीर्घ काळ काम करत आहेत, हे या संघटनेचे सदस्य आहेत. द हिंदूच्या १० सप्टेंबरच्या वृत्तानुसार, वांगचुक यांनी या आंदोलनात आघाडी घेतली होती. ते इतर सदस्यांसह उपोषण करत होते, ज्याद्वारे त्यांनी केंद्र सरकारवर लडाखच्या प्रलंबित मागण्यांवर परिणामकारक चर्चा करण्यासाठी दबाव आणला.
- द इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, मंगळवारी आंदोलनादरम्यान एक वृद्ध महिला आणि एक पुरुष बेशुद्ध पडल्याच्या घटनेनंतर LAB च्या युवक विंगने बुधवारी लेहमध्ये बंदची हाक दिली होती. बुधवारी लेहमधील भाजपा कार्यालयाबाहेर LAB ने मोठी मोर्चेबांधणी केली, त्यानंतर त्या कार्यालयाला आग लावण्यात आली.
- या चळवळीत कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सनेही (KDA) सहभाग घेतला. त्यांनी LAB च्या मागण्यांना पाठिंबा दर्शवला आणि २५ सप्टेंबर रोजी लडाख केंद्रशासित प्रदेशात एकात्मतेसाठी बंद पाळण्याचे आवाहन केले, अशी माहिती द हिंदूने दिली आहे.
- गेल्या चार वर्षांपासून या दोन्ही संघटना मिळून हे आंदोलन करत आहेत. त्यांनी आपापल्या मागण्या मान्य व्हाव्यात म्हणून सरकारबरोबर अनेकदा चर्चाही केल्या आहेत, असे वृत्त PTI या वृत्तसंस्थेने दिले आहे.
३. लेहमधील आंदोलनासाठी भाजप काँग्रेसला का जबाबदार ठरवत आहे?
- भाजप नेते अमित मालवीय यांनी लेहमधील हिंसाचाराचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत काँग्रेसवर आरोप केले. त्यांनी X वर लिहिले: “लडाखमधील दंगलीत दिसणारी ही व्यक्ती म्हणजे फुंतसोग स्टॅन्झिन त्सेपाग आहे, जो अपर लेह वॉर्डसाठी काँग्रेसचा नगरसेवक आहे. तो जमावाला भडकवत आहे आणि भाजप कार्यालय व हिल कौन्सिलवर झालेल्या हिंसाचारात सहभागी होताना स्पष्ट दिसतो आहे.” मालवीय यांनी प्रश्न उपस्थित केला; “हीच का ती अस्वस्थता ज्याची राहुल गांधी स्वप्ने पाहतात?”
- दरम्यान, काँग्रेसशी संबंधित एकाने लिहिले: “लेह, लडाखमधील सोनम वांगचुक यांच्या उपोषणानंतर आज जेन-झीच्या तरुणांची वेळ आली-ते मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आणि भाजपला त्यांनी वास्तव दाखवून दिलं.”
- काँग्रेस खासदार व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अलीकडेच भारतातील युवक आणि जेन-झीला लोकशाही वाचवा असे आवाहन केले होते आणि निवडणुकीतील कथित गैरव्यवहारांवर टीका केली होती.
- भारताच्या जनरेशन-झेडचा उल्लेख त्यांनी अगदी अलिकडेच केला होता, जेव्हा नेपाळमध्ये जनरेशन-झेडच्या आंदोलनामुळे KP शर्मा ओली सरकार कोसळले होते.
- भाजप नेत्यांनी राहुल गांधींवर आरोप केला की, ते तरुणांना भडकवून देशात अराजक माजवण्याचा प्रयत्न करत आहेत.
४. लडाखमध्ये जेन-झीच्या आंदोलनाचे दावे
- लडाखमधील आंदोलक हे जनरेशन-झेडमधील तरुणच असल्याचा दावा अनेकांनी केला आहे. एका व्यक्तीने X वर लेहमधील एक व्हिडिओ शेअर करत लिहिले: “जेन-झी रस्त्यावर उतरली आहे.”
- तर स्वतःला उद्योजक म्हणवणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीने आरोप केला की, “लडाखमध्ये जेन-झी आंदोलकांनी भाजप कार्यालयाला आग लावली, त्यामुळे गोंधळ निर्माण झाला आहे.”
- काहींनी याची तुलना अलीकडील नेपाळमधील आंदोलनाशी केली, जिथे जेन-झीच्या निदर्शकांनी ओली सरकार उलथवून टाकले होते. ‘द प्रोटॅगोनिस्ट’ नावाच्या एका व्हेरिफाईड अकाऊंटवरून कमेंट करण्यात आली आहे की, “हे नेपाळ नाही. हे लडाख आहे.”
- याशिवाय आणखी दोन व्हेरिफाईड अकाऊंटस् वरून लेहमधील आंदोलन हे लडाखच्या जेन-झीशी जोडण्यात आले आहे.
- दरम्यान, कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी चिंता व्यक्त करत म्हटले, “लेहमध्ये घडलेल्या घटना अतिशय दु:खद आहेत. शांततापूर्ण मार्गाचा माझा संदेश आज अपयशी ठरला. मी युवकांना आवाहन करतो की कृपया हा मूर्खपणा थांबवा. यामुळे फक्त आपल्या चळवळीचे नुकसानच होईल.”
५. बुधवारी लडाखमध्ये नेमकं काय घडलं?
- राज्याचा दर्जा आणि सहाव्या अनुसूचीमध्ये लडाखचा समावेश या मागणीसाठी सुरू झालेलं आंदोलन बुधवारी लेह शहरात हिंसक वळणावर गेलं. मंगळवारी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी आपला १५ दिवसांचं उपोषण सोडलं आणि समर्थकांना हिंसा टाळण्याचं आवाहन केलं. केंद्राबरोबरची ]बैठक ६ ऑक्टोबरला ठरली होती, परंतु उपोषणकर्त्यांची प्रकृती बिघडत असल्यामुळे आंदोलकांनी ही बैठक लवकरात लवकर घेण्याची मागणी केली होती.
- बुधवारी एनडीएस मेमोरियल ग्राऊंडवर मोठ्या प्रमाणावर जमलेली गर्दी राज्याचा दर्जा आणि सहाव्या अनुसूचीच्या मागणीसाठी घोषणाबाजी करत शहरातून मार्गक्रमण करत गेली, अशी माहिती पीटीआय वृत्तसंस्थेने दिली.
- हजारो आंदोलक रस्त्यावर उतरले. काही ठिकाणी आगी लागल्या आणि काळा धूर दूरवरून दिसत होता. भाजप कार्यालय आणि हिल कौन्सिलवर काही जणांनी दगडफेक सुरू केली तेव्हा परिस्थिती अधिकच बिघडली. पोलीस व निमलष्करी दलांनी अश्रुधुराचा वापर करून जमावावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला.
- भाजप कार्यालयाबरोबरच अनेक वाहनांना आग लावण्यात आली. कार्यालयातील फर्निचर आणि कागदपत्रे जाळण्यात आली. संपूर्ण लेह शहर ठप्प झालं होतं. अतिरिक्त फौजफाटा तातडीने घटनास्थळी पाठवण्यात आला. काही तासांच्या झटापटीनंतर प्रशासनाने परिस्थिती आटोक्यात आणली, मात्र शहरात तणाव कायम होता.
- हिंसाचारानंतर प्रशासनाने बीएनएसएसच्या कलम १६३ अंतर्गत जमावबंदीचे आदेश दिले, म्हणजेच पाच किंवा अधिक लोकांच्या जमावावर बंदी घालण्यात आली.
या हिंसाचारामुळे दोन दिवस चालणारा वार्षिक लडाख महोत्सव अर्धवट रद्द करण्यात आला. “अनिवार्य परिस्थिती”मुळे हा निर्णय घ्यावा लागल्याचं सांगत अधिकाऱ्यांनी खेद व्यक्त केला आणि कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेल्या स्थानिक कलाकार, सांस्कृतिक पथकं आणि पर्यटकांची माफी मागितली, अशी माहिती ग्रेटर काश्मीर (श्रीनगर) दैनिकाने दिली.