उथळ पाण्यात समुद्राखालील धोके शोधण्याच्या आणि ते निष्प्रभ करण्याच्या भारतीय नौदलाच्या क्षमतेला बळकटी देणाऱ्या १६ स्वदेशी बनावटीच्या पाणबुडीविरोधी युद्धनौकांच्या मालिकेतील पहिली ‘आयएनएस अर्नाळा’ कार्यान्वित झाली आहे.
आयएनएस अर्नाळाची वैशिष्ट्ये?
महाराष्ट्रातील वसईलगतच्या ऐतिहासिक अर्नाळा किल्ल्यावरून या युद्धनौकेचे नामकरण झाले आहे. तिची लांबी ७७.६ मीटर असून वजन १४९० टनांपेक्षा जास्त आहे. भारतीय नौदलात सर्वात मोठी डिझेल इंजिन युद्धनौका असल्याचा मानदेखील तिला मिळाला आहे. उथळ किनारी पाण्यातही ती संचार करू शकते. तिचा कमाल वेग २५ नॉट्स आहे. त्यामध्ये सात अधिकाऱ्यांसह ५० कर्मचारी सामावू शकतात. आयएनएस अर्नाळा आणि त्यानंतर सामील होणाऱ्या अन्य १५ एएसडब्ल्यू-एसडब्ल्यूसी श्रेणीच्या (उथळ पाण्यातील पाणबुडीविरोधी) युद्धनौका जुन्या अभयवर्गीय कॉर्व्हेट्सची जागा घेतील.
उथळ पाण्यात गरज का?
उथळ पाण्यातील पाणबुडीविरोधी क्षमतेची गरज ही भारतीय द्वीपकल्पाच्या पश्चिमेकडे असणाऱ्या अरबी समुद्राच्या तळाशी असणाऱ्या जलीय रचनेमुळे निर्माण झाली आहे. हे पाणी किनाऱ्यापासून १० सागरी मैल अंतरावरदेखील उथळ आहे. याच्या बरोबर विरुद्ध बंगालच्या उपसागरात स्थिती आहे. भारताचा पूर्वेकडील समुद्रकिनारा अत्यंत खोल आहे. किनाऱ्यापासून दूर जाताना समुद्रतळ अचानक खाली जातो. या अडचणींमुळे भारतीय नौदलास दुहेरी पाणीबुडीविरोधी क्षमता (खोल पाण्यातील तसेच उथळ पाण्यातील) राखाव्या लागतात.
स्वदेशीकरण कसे साध्य झाले?
गार्डन रीच शिपबिल्डर्स अॅण्ड इंजिनीअर्स, कोलकाता येथील एल अॅण्ड टी शिपबिल्डर्सबरोबर सार्वजनिक-खासगी भागीदारी अर्थात पीपीपी अंतर्गत या युद्धनौकेची रचना व बांधणी करण्यात आली. १६ युद्धनौकांसाठी १.९ अब्ज डॉलर्सचे दोन करार करण्यात आले. या युद्धनौकेत ८० टक्के स्वदेशी सामग्रीचा वापर केलेला आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स (बीईएल), एल अॅण्ड टी, महिंद्रा डिफेन्स आणि एमईआयएल यासारख्या आघाडीच्या भारतीय संरक्षण कंपन्यांच्या प्रगत प्रणाली यात समाविष्ट आहेत. या प्रकल्पात ५५ हून अधिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्याोग सहभागी झाले. त्यामुळे देशांतर्गत उद्याोगाला प्रोत्साहन मिळाल्याचे नौदलाने म्हटले आहे.
पाणबुडीविरोधी कारवाईसाठी कार्यक्षम?
आयएनएस अर्नाळाची रचना विविध प्रकारच्या पाणबुडीविरोधी युद्ध (एएसडब्ल्यू) कारवाईसाठी करण्यात आली आहे, ज्यात पृष्ठभागाखालील पाण्यात टेहेळणी, शोध आणि बचाव मोहिमा, कमी तीव्रतेच्या सागरी कारवायांचा समावेश आहे. ही नौका किनारी भागातील पाण्यात पाणबुडीविरोधात कारवाई करण्यास सक्षम आहे. समुद्राच्या तळाशी ती सुरुंग लावू शकते. ३० मीटरपेक्षा कमी खोली असलेल्या किनारी पाण्यात ती लघु किंवा मध्यम पाणबुड्या आणि लहान मानवरहित पाण्याखालील वाहने (यूयूव्ही) शोधण्यास आणि त्यांना लक्ष्य करण्यास सक्षम आहे. कायमस्वरूपी जोडलेले सोनार, पाण्याखालील विशिष्ट संवाद व्यवस्था आणि कमी कंपने असणाऱ्या सोनारसारख्या प्रगत संवेदकांनी सुसज्ज आहे.
वेगळेपण कशात आहे?
आयएनएस अर्नाळा ही मध्यवर्ती रेषेवर एकच रॉकेट लाँचर असणारी पहिली युद्धनौका आहे. पूर्वीच्या युद्धनौकेत दोन रॉकेट लाँचर होते. ‘सेन्सर टू वेपन हार्डवेअर’ची कमी गरज हे तिचे वैशिष्ट्य खर्चकपातीसाठी साह्यभूत ठरते. त्यामुळे युद्धनौकेच्या कारवाईतील प्रभाव कमी होत नाही. सुधारित रचना तिला कारवाईत अधिक कार्यक्षम बनवते.
किनारपट्टी क्षेत्रात संरक्षण मजबूत?
आयएनएस अर्नाळासह १६ एएसडब्ल्यू-एसडब्ल्यूसी युद्धनौकांच्या प्रस्तावित समावेशामुळे भारतीय नौदलास साडेसात हजार किलोमीटर लांबीची किनारपट्टी, १२ प्रमुख व १८४ लहान बंदरे, जवळपास ११९७ बेट आणि समुद्रातील महत्त्वाच्या मालमत्तांचे शत्रूच्या पाणबुड्यांपासून संरक्षण करण्यास मदत होईल. भारताच्या एएसडब्ल्यू-एसडब्ल्यूसीच्या नवीन ताफ्याचे हे कार्यक्षेत्र असणार आहे. उथळ पाण्यात काम करण्याची त्यांची क्षमता त्यांना गस्त घालणे, देखरेख ठेवणे आणि मानवतावादी मदत यासह किनाऱ्याजवळील कामांसाठी आदर्श बनवते. अत्याधुनिक प्रणालींमुळे त्या पाण्याखाली सर्वसमावेशक देखरेख करण्यास सक्षम असतील. त्यांच्याकडे अत्याधुनिक शस्त्र संच आहे. ज्यात हलके पाणतीर, पाणबुडी विरोधी (एएसडब्ल्यू) रॉकेट व सुरुंग लावण्याच्या क्षमतांचा समावेश आहे. एकात्मिक व्यवस्थापन प्रणालीत संवेदक व शस्त्रे समाविष्ट केल्याने त्यांची लढाऊ क्षमता विस्तारली आहे. या यु्द्धनौकांचा समावेश पाणबुडीविरोधी युद्धतंत्राचे स्वरूप बदलेल. किनारपट्टी क्षेत्राचे संरक्षण मजबूत बनवेल आणि हिंद महासागर क्षेत्रातील सक्षम, स्वावलंबी सागरी शक्ती म्हणून भारताचे स्थान मजबूत करेल, अशी आशा आहे.
aniket.sathe@expressindia.com