scorecardresearch

विश्लेषण: ठाणे जिल्ह्यात बिबट्याच्या अधिवासाची कारणे काय?

महाराष्ट्रातील विविध जंगले, अभयारण्यांमध्ये एकूण १ हजार ६९० बिबटे असावेत असे या क्षेत्रातील तज्ज्ञ तसेच प्राणीमित्रांचा दावा

विश्लेषण: ठाणे जिल्ह्यात बिबट्याच्या अधिवासाची कारणे काय?
कोविड काळानंतर ठाणे जिल्ह्याच्या विविध जंगल भागांमध्ये बिबट्यांचा वावर वाढल्याचे निरीक्षण या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी नोंदवू लागली आहेत. (फोटो – प्रदिप दास/इंडियन एक्सप्रेस)

-भगवान मंडलिक

महाराष्ट्राच्या चंद्रपूर, धुळे-नाशिक, पुणे जिल्ह्यात जुन्नर आदी भागांत सतत दर्शन देणारा बिबट्या गेल्या काही वर्षांपासून ठाणे जिल्ह्याच्या विविध भागांत वरचेवर दिसू लागला आहे. कोविड काळानंतर ठाणे जिल्ह्याच्या विविध जंगल भागांमध्ये बिबट्यांचा वावर वाढल्याचे निरीक्षण या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी नोंदवू लागली आहेत. भक्ष्यासाठी बिबटे गाव, शहरी भागात शिरकाव करत आहेत. ठाणे जिल्ह्यातील जंगल पट्टयातील हे वाढते भ्रमण येत्या काळात बिबट्याच्या वाढीव अधिवासाचे संकेत देत असल्याचेही तज्ज्ञांचे मत आहे. जिल्ह्याच्या भौगोलिक, नैसर्गिक परिस्थितीचा अंदाज घेऊन हा घरोबा वाढेल आणि त्यामुळे बिबट्याचा शहरी नागरी वस्तीमधील वावर वाढू शकतो. त्यामुळे वन विभागासह नागरिक, प्राणी मित्रांची जबाबदारी यापुढील काळात वाढू शकणार आहे.

महाराष्ट्रातील बिबट्यांची एकूण वावर, संख्या संख्या किती असू शकते?

महाराष्ट्रातील विविध जंगले, अभयारण्यांमध्ये एकूण १ हजार ६९० बिबटे असावेत असे या क्षेत्रातील तज्ज्ञ तसेच प्राणीमित्रांचा दावा आहे. दर दोन ते तीन वर्षांच्या कालावधीत बिबट्यांच्या संख्येत वाढ होते. बिबट्यांमधील अंतर्गत संघर्ष, शिकार, शेती संरक्षणासाठी लावलेले विद्युत तारेचे कुंपण अशा कारणांमुळे दरवर्षी दोनशेपेक्षा अधिक बिबटे जखमी होतात. तेवढेच मरण पावतात. यामध्ये काही वयोमानाने मरण पावतात. असे असले तरी बिबट्यांचा आकडा वाढत आहे याविषयी प्राणीमित्रांमध्ये दुमत नाही. आकडा वाढत असल्याने त्याचे अधिवास क्षेत्रही वाढू लागले आहे.

बिबट्या आता ठाणे जिल्ह्यातील जंगलांमध्ये का दिसू लागला आहे?

अभयारण्य, राखीव वनक्षेत्रांमध्ये बिबट्या आपला अधिवास करून असतो. भक्ष्यासाठी मुबलक वन्यजीव या जंगलात असतात. अधिवासाच्या ठिकाणी नर-मादीची ताटातूट झाली. नर किंवा मादीपैकी कुणाचा मृत्यू झाला की यामधील एक जण साथीदाराच्या शोधात राखीव जंगल सोडतात. नागरीकरण, राज्यात दळणवळणाची साधने उपलब्ध व्हावीत म्हणून जंगल, खोऱ्यांमधून रस्ते, बोगदे काढले जात आहेत. ही कामे करताना परिसराला हादरे बसत आहेत. त्या ठिकाणची मानवी, यंत्रांची वर्दळ वाढली आहे. हा जीविताचा धोका ओळखून बिबट्या, वाघ सारखे प्राणी अधिवास सोडून बाहेर पडत आहेत. ते भ्रमंती करत नवख्या जंगलात शिरतात. या जंगलात भक्ष्य, पाणी, सहसोबती मिळाला तर बिबट्या त्या परिक्षेत्रात आपले बस्तान बसवितो. ही सगळी परिस्थिती ठाणे जिल्ह्यातील वनपट्टीत बिबट्यासाठी अनुकूल आहे.

ठाणे जिल्ह्यातील जंगलक्षेत्र वाढते आहे का?

जंगल तोड हा ठाणे जिल्ह्याला लागलेला शाप मानला जातो. ब्रिटिश काळात सर्वाधिक कोळसा ठाणे जिल्ह्याच्या जंगल पट्टीतून शहरी भागातील कारखाने, रेल्वे कामासाठी आणला जात होता अशा नोंदी आहेत. कोळशासाठी झाडे जाळली होत होती. १९६० च्या दशकात हा व्यवहार बंद झाला. त्यानंतर जंगल कंत्राटदार शेतकऱ्यांच्या खासगी मालकीतील झाडे विकत घेऊन तोड करत होते. शेतकऱ्याची ५०० झाडे जंगल कंत्राटदाराने विकत घेतली असतील तर त्या झाडांमध्ये वन विभागाच्या जागेतील ५०० हून अधिक झाडे चोरून तोडून रात्रीच्या वेळेत खासगी मालकीत आणून टाकली जात होती. वनाधिकाऱ्यांचा यात हात असायचा असे आरोप सतत होत होते. अशा प्रकारे जंगल कंत्राटदारांनी १९६० ते १९८० च्या काळात ठाणे जिल्ह्यातील खासगी जमिनीबरोबर वन क्षेत्रातील झाडांची कत्तल केली. पुढे मात्र तोड कमी झाली त्यामुळे जंगले नव्याने फोफावली. चराई, कुऱ्हाड बंदीसारखे वन कायदे आले. वन विभागाचे वृक्षबंदीचे कठोर कायदे आले. त्यामुळे मागील तीस वर्षांच्या काळात जंगले फोफावली आहेत. त्यामुळेही ठाणे जिल्ह्यातील जंगलांमध्ये बिबट्यांचा अधिवास वाढल्याचे दिसते.

वन्यजीवांना पोषक वातावरण ठाणे जिल्ह्यात आहे का?

ठाणे जिल्ह्याच्या ४ हजार २१४ चौरस किमी भूभागावर उल्हास खोरे, तानसा अभयारण्य, नाशिक-कसारा-शहापूर (डोळखांब) खोरे, माळशेज घाट, बारवी धरण खोरे, ठाण्याच्या वेशीवरील मुंबईतील आरे, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, भीमशंकर खोरे, वाडा, जव्हार, मोखाडा असे विस्तीर्ण जंगल पट्टे आहेत.  धरणांमुळे माघार पाणलोट क्षेत्र आहे. वाघ, बिबटे, हरीण, भेकर, कोल्हे, लांडगे, रानगवा, रानडुकरे, मोर असे वन्यजीव या जंगलांमध्ये आढतात. हद्द ओलांडून भ्रमंतीसाठी बाहेर पडलेल्या बिबट्यांना हे सर्व वातावरण पोषक असल्याने ते या भागात संचार करता करता आपला अधिवास करू पाहतात.

जंगलातील मानवी वावर कमी झाला आहे का?

ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण, आदिवासी जीवन यापूर्वी पूर्ण जंगलावर अवलंबून होते. चुलीसाठी लाकूडफाटा, जंगलातील रानमेवा, भाज्या विकून उपजीविका केली जात होती. १९९० च्या दशकापासून गाव, खेड्यात गॅस शेगड्या आल्या. शिक्षणाच्या सुविधा झाल्या. वीज आली. मुले शिकून नोकरी व्यवसाय करत आहेत. यापूर्वी मार्च ते जून अखेरपर्यंत डोंगराळ भागातील रहिवासी उपजीविकेचे साधन म्हणून ससे, भेकर, मोर, डुक्कर यांच्या शिकारासाठी जंगलात भ्रमंती करत होते. या कालावधीत जंगलांना वणवे लावून शिकारीसाठी खाक केले जात होते. वन विभागाची गस्त, कायदेशीर कारवायांमुळे हे सगळे प्रकार कमी झाले आहेत. सामान्य वन्यजीव जंगल भागात वाढला आहे. वाघ, बिबट्यांचे ते भक्ष्य असल्याने भक्ष्यासाठी ते या भागात संचार करत आहेत.

ठाणे जिल्ह्यात बिबट्या घरोबा करू शकतो?

मागील दोन वर्षांपासून बिबट्या मुंबईतील पवई, ठाणे जिल्ह्यातील भिवंडी, उल्हासनगर, बदलापूर, शहापूर, कसारा, मुरबाड, कल्याण भागात दिसून आला आहे. नैसर्गिक पोषक परिस्थितीचा अंदाज आल्यानेच बिबट्याचा हा संचार वाढल्याचे या क्षेत्रातील अभ्यासकांचे मत आहे. नर-मादी असा योग जुळून आला तर याच भागात प्रजनन आणि पिलांची वाढ असा बिबट्याचा पुढचा प्रवास असू शकतो, असे प्राणीमित्र सांगतात. हीच पिलावळ आणि संचारी बिबटे असा परिवार एकत्र येऊन ठाणे जिल्ह्यातील जंगल कोपऱ्यात ते कायमचा अधिवास करू शकतात, असा प्राणीमित्रांचा कयास आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-11-2022 at 08:21 IST

संबंधित बातम्या