मुंबईकरांचे मेट्रोमधून गारेगार आणि वेगवान प्रवास करण्याचे स्वप्न ८ जून २०१४ ला पूर्ण झाले. या दिवशी मुंबईत पहिली मेट्रो घाटकोपर-अंधेरी-वर्सोवादरम्यान धावू लागली. आता याला दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. या दहा वर्षांचा मेट्रो १ चा प्रवास नेमका कसा होता, किती प्रवाशांनी आतापर्यंत मेट्रो १ मधून प्रवास केला याचा हा आढावा….

मुंबईत किती किमीचे मेट्रोचे जाळे? 

मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मेट्रोचा पर्याय पुढे आणला. आंतरराष्ट्रीय दर्जाची वाहतूक व्यवस्था पुरविणे आणि वेगवान प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एमएमआरडीएने मुंबई महानगर प्रदेशात ३३७ किमीचे मेट्रोचे जाळे विणण्याचा प्रकल्प हाती घेतला. यातील मेट्रो १ (घाटकोपर-अंधेरी-वर्सोवा) आणि मेट्रो २ अ (दहिसर ते डी एन नगर) आणि मेट्रो ७ (दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व) मार्गिका सेवेत आहे. त्याच वेळी सध्या मेट्रो २ ब (अंधेरी पश्चिम ते मंडाळे) , ३ (कुलाबा-वांद्रे-सिप्झ), ४(वडाळा-कासारवडवली), ४अ (कासारवडवली-गायमुख), ५ (ठाणे-भिवंडी-कल्याण), ६ (स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी), ७ अ (अंधेरी ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ), ९ (दहिसर ते भाईंदर) आणि १२ (कल्याण-तळोजा) चे काम सुरू असून लवकरच मेट्रो १० ( गायमुख ते मिरारोड) या मार्गिकेचे काम सुरू होण्याची शक्यता आहे. त्याच वेळी मेट्रो ८ (मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ), १३ (शिवाजी चौक ते विरार) आणि १४ (अंबरनाथ ते बदलापूर) मार्गिका प्रस्तावित आहेत. त्यामुळे सर्वच्या सर्व १४ मार्गिका वाहतूक सेवेत दाखल झाल्यास मुंबईत ३३७ किमीचे मेट्रोचे जाळे विणले जाणार आहे. यामुळे मुंबई महानगर प्रदेशाच्या कोणत्याही टोकावरून कुठे ही मेट्रोने जाता येणार आहे.

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…
loksatta editorial on ekanth shinde and ajit camps disappointment over the allocation of cabinet berths
अग्रलेख : उपयोगशून्यांची उपेक्षा!
vishal patil and uddhav thackeray
“उद्धव ठाकरेंना…”, काँग्रेसला पाठिंबा दिल्यानंतर अपक्ष आमदार विशाल पाटलांचं विधान
Leopard in Rashtrapati Bhavan
Video: मोदींचे मंत्री शपथ घेत असताना राष्ट्रपती भवनात दिसला बिबट्या? मंचाजवळून ऐटीत चालत गेला अन्…
What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”
What Sharad Pawar Said?
“हा भटकता आत्मा तुम्हाला…”, शरद पवारांनी पंतप्रधान मोदींना सुनावले खडे बोल
Ian Bremmer prashant kishor
भाजपाला किती जागा मिळणार? प्रशांत किशोरांपाठोपाठ अमेरिकन राजकीय संशोधकाने केलं विश्लेषण
Mumbai Thane Kalyan Bhiwandi Lok Sabha Election Result Live Updates in Marathi
Thackeray vs Shinde Lok Sabha Election Result 2024 Updates : मुंबईत ठाकरेंचे दोन, भाजपा अन् शिंदे गटाचा एक उमेदवार विजयी घोषित; दोन जागांवरचा निकाल प्रतिक्षेत!

हेही वाचा >>> विश्लेषण : देशाचा यंदाचा गाळप हंगाम कसा राहिला?

मेट्रो १ मार्गिका आहे कशी?

एमएमआरडीएच्या ३३७ किमीच्या मेट्रो प्रकल्पातील पहिली मेट्रो मार्गिका म्हणजे घाटकोपर-अंधेरी-वर्सोवा मेट्रो १ मार्गिका. या मार्गिकेची उभारणी खासगी-सार्वजनिक सहभागातून करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार रिलायन्स इन्फ्रा अर्थात मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडला (एमएमओपीएल) या कामाचे कंत्राट देण्यात आले. ११.४०  किमीची ही मार्गिका असून यासाठी २३५६ कोटी रुपये खर्च आला आहे. १२ स्थानकांचा समावेश असलेल्या या मार्गिकेच्या कामाला २००७ मध्ये सुरुवात झाली होती. उन्नत अशा या मार्गिकेचे काम २०१४ मध्ये पूर्ण झाले. तर या मार्गिकेच्या संचलन, देखभालीची संपूर्ण जबाबदारी एमएमओपीएलवर आहे.

आतापर्यंत किती जणांनी केला प्रवास?

मेट्रो १ च्या कामास २००७ मध्ये सुरुवात झाली आणि काम पूर्ण होण्यास २०१४ उजाडले. काम पूर्ण झाल्यानंतर सुरक्षा प्रमाणपत्र घेऊन ८ जून २०१४ मध्ये ही मार्गिका वाहतूक सेवेत दाखल करण्यात आली. ही मार्गिका सेवेत दाखल होऊन आता दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. या मार्गिकेला मुंबईकरांची पसंती मिळाली असली तरी अपेक्षित प्रवासी संख्या या मार्गिकेला गाठता आलेली नाही. ही मार्गिका सेवेत दाखल करताना एमएमआरडीएने या मार्गिकेवरून दिवसाला साडेसहा लाख प्रवासी प्रवास करतील असा दावा केला. पण प्रत्यक्षात मात्र आजसीशी मेट्रो १ ने प्रवास करत आहेत. तर आतापर्यंत म्हणजेच दहा वर्षात या मार्गिकेवरून ९७ कोटी प्रवाशांनी प्रवास केला आहे. मेट्रो १ मार्गिकेवरून दिवसाला ४१८ फेऱ्या होतात. या मार्गिकेवर १६ मेट्रो गाड्या धावत असून आतापर्यंत या गाड्यांनी १२.६ कोटी किमीचा प्रवास केला आहे. दरम्यान या मार्गिकेवरील प्रवासी संख्या वाढावी यासाठी अनेक बदल, उपाययोजना एमएमओपीएलकडून केल्या जात आहेत. असे असले तरी ही अद्याप दिवसाला साडेसहा लाख प्रवासी संख्या गाठता आलेली नाही.

हेही वाचा >>> विमान प्रवासादरम्यान मद्यसेवन का टाळावं?

तोटा आणि दिवाळखोरीची याचिका…

मेट्रो १ मार्गिकेची उभारणी खासगी-सार्वजनिक भागीदारी तत्त्वावर रिलायन्स इन्फ्रा अर्थात एमएमओपीएलकडून करण्यात आली आहे. यात ७४ टक्के हिस्सा एमएमओपीएल (रिलायन्स इन्फ्रा) तर २६ टक्के हिस्सा आहे. या मार्गिकेची मालकी आणि देखभाल, संचलन जबाबदारी एमएमओपीएलकडे आहे. ही मार्गिका सेवेत दाखल झाल्यापासून आर्थिक तोट्यात आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी एमएमओपीएलने तिकीट दरात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी एमएमओपीएलने न्यायालयातही धाव घेतली होती. पण ही वाढ करता आली नाही. अशात तोटा वाढत गेला. आजही एमएमओपीएला मोठा तोटा सहन करावा लागत आहे. अपेक्षित प्रवासी संख्या मिळत नसल्याने आणि तिकीट दर कायम असल्याने तोटा वाढत असल्याचे म्हटले जात आहे. तोट्यात असलेल्या एमएमओपीएलविरोधात दिवाळखोरीची याचिका दाखल झाली होती. एमएमओपीएलने सहा बँकांकडून १७११ कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. यात एसबीआय आणि आयडीबीआय बँकेकडून घेण्यात आल्याच्या कर्जाचाही समावेश होता. या दोन्ही बँकांनी  राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाकडे धाव घेत एमएमओपीएलविरोधात याचिका दाखल केली होती.

सद्यःस्थिती काय?

आर्थिक तोट्यात असलेल्या या मार्गिकेला तोट्यातून बाहेर काढणे एमएमओपीएलला शक्य झालेले नाही. त्यात दिवाळखोरीची याचिका. त्यामुळे एमएमओपीएलने आपला हिस्सा अर्थात ही मार्गिका विकण्याचा निर्णय घेतला. एमएमआरडीएचा २४ टक्के हिस्सा असल्याने २०२० मध्ये एमएमओपीएलने राज्य सरकारला पत्र पाठवीत ही मार्गिका एमएमआरडीएने ताब्यात घ्यावी अशी मागणी केली होती. ही मागणी मान्य करत नुकतीच ही मार्गिका ताब्यात घेण्यास मान्यता दिली आहे. चार हजार कोटीत ही मार्गिका ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे आता मेट्रो १ ची मालकी एमएमआरडीएकडे येणार आहे. अगदी दहा वर्षांतच ही मार्गिका विकण्याची वेळ एमएमओपीएलवर आली आहे. दरम्यान एमएमआरडीएने ही मार्गिका ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केल्याने, आतापर्यंत बँकेची १७५ कोटींची कर्ज परतफेड केल्याने आणि महत्त्वाचे म्हणजे कर्ज फेडीची हमी दिल्याने एमएमओपीएलविरोधातील दिवाळखोरीची याचिका एप्रिलमध्ये निकाली निघाली आहे. त्यामुळे ही मार्गिका ताब्यात घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.