रविवार किंवा सुट्टीचा दिवस हा लोकलच्या मेगाब्लॉकचा दिवस. विस्कळीत वेळापत्रक आणि गाड्यांना होणाऱ्या गर्दीमुळे रेल्वेच्या नावाने खडे फोडत अनेक जण त्या दिवशी प्रवास करतात. हा ब्लॉक प्रवाशांसाठी डोकेदुखीचा ठरत असला, तरीही तो महत्त्वाचा ठरतो. ब्लाॅक कशासाठी घेतला जातो, नेमके काम कसे चालते, आव्हाने कोणती हेदेखील तेवढेच समजून घेणे महत्त्वाचे.

मेगाब्लॉक कशासाठी?

रेल्वेची वाहतुक सुरळीत होण्यासाठी मेगाब्लॉक खूप महत्त्वाचा असतो. गेल्या काही वर्षात लोकल गाड्या आणि फेऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे रुळ, सिग्नल, ओव्हरहेड वायर यांच्या दुरुस्तीची कामे, रुळांखालील खडी नव्याने भरणे अशी नियमित कामे करण्यासाठी रेल्वेला ठराविक वेळासाठी वाहतूक बंद करण्याची गरज असते. रोज वाढलेल्या लोकल फेऱ्यांमुळे मध्य व पश्चिम उपनगरीय रेल्वे मध्यरात्री अडीच ते तीन तासच बंद असते.

आठवडाभर दर रात्री मिळणाऱ्या अडीच ते तीन तासांच्या अवधीत रेल्वेची विविध देखभाल, दुरुस्तीची कामे होणे शक्य नसते. ही कामे रविवारच्या चार ते पाच तासांच्या मेगा ब्लॉकच्या काळात पार पाडण्याचे आव्हान दर रविवारी रेल्वे कर्मचारी आणि अधिकारी यांना पेलावे लागते. त्यातच कधीकधी या नियमित कामांव्यतिरिक्तही नवीन मार्गिका टाकणे, रुळांवरील पादचारी किंवा उड्डाणपूल पाडणे तसेच त्यावर गर्डर बसविणे अशा कामांसाठी मोठ्या कालावधीचे ब्लॉक घ्यावे लागतात.

मेगाब्लॉक कुठे हे कसे ठरते?

पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते विरार, डहाणू दरम्यान, मध्य रेल्वे मुख्य मार्गावर सीएसएमटी ते कल्याण, कर्जत, खोपोली, कसारा आणि सीएसएमटी ते पनवेल हार्बर, ठाणे ते वाशी, पनवेल ट्रान्स हार्बरवर वेगवेगळ्या ठिकाणी दर आठवड्यातील रविवारी मेगाब्लॉक घेतला जातो. या आठवडय़ात ब्लॉकसाठी नेमक्या कोणत्या भागात वेळ द्यायचा, हे ठरवण्यासाठी आठवडाभर रेल्वे कर्मचाऱ्यांची तयारी सुरू असते.

एखादे मोठे काम आणि मोठा ब्लॉक असेल तर पंधरा दिवस ते महिनाभरआधीच तयारी होते. रेल्वेची अशी एक स्वतंत्र भाषा आहे. या भाषेत या भागांना सेक्शन म्हणजेच विभाग म्हणतात. रेल्वेचा कणा मानले जाणारे गँगमन, कीमन, पॉइंट्समन हे कर्मचारी आठवडाभर त्यांना नेमून दिलेल्या विभागामध्ये अक्षरश: रेल्वे रुळांवरून पायी फिरत असतात. दोघादोघांच्या जोडीने फिरणारे हे कर्मचारी त्या विभागामधील रुळांची, सिग्नलच्या पॉइंट्सची आणि अनेकदा ओव्हरहेड वायरची स्थिती तपासतात.

एखाद्या रुळावर दोष आढळल्यास त्या जागी लाल रंगाची एक खूण केली जाते. सिग्नल यंत्रणेच्या पॉइंट्समध्ये काही कामे करायची असल्यास, त्याची नोंद ठेवली जाते. त्यानंतर या नोंदी विद्युत, सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशन आणि अभियांत्रिकी अशा तीन विभागांकडे पाठवल्या जातात. या विभागांकडून परिचालन विभागाला एखाद्या ठरावीक विभागात मेगाब्लॉक घेण्यासाठी तजवीज करण्यासंबंधी पत्र लिहिले जाते. त्यानंतर परिचालन विभागातील अधिकारी ब्लॉकची वेळ, गाडय़ांचे वेळापत्रक आदी गोष्टींचा विचार करून मेगाब्लॉकचे वेळापत्रक ठरवतात.

पूर्वतयारी कशी?

एखाद्या रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक नियोजित असेल, तरीही त्याची पूर्वतयारी मोठ्या प्रमाणात केली जाते. रेल्वेत आणीबाणी वा अपघात प्रसंगाशिवाय कोणतेही काम अचानक केले जात नाही. त्याला ब्लॉकही अपवाद नसतो. एखाद्या मार्गावर ठराविक विभागात ब्लॉक निश्चित झाल्यावर त्या कामासाठी लागणारे साहित्य जवळच्या मोठ्या स्थानकाजवळ दोन ते तीन दिवस आधी आणले जाते. त्यानंतर प्रत्यक्ष कामाच्या दिवशी गॅंगमनसह अन्य कामगारांना त्या ठिकाणी कामाला पाठवले जाते.

रुळांच्या दुरुस्तीसह ओव्हरहेड वायरच्या कामांसह विविध कामांची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली जाते. ठरवून दिलेल्या कालावधीत काम पार पाडण्याची जबाबदारी उपस्थित कामगार, अधिकाऱ्यांवर असते. अन्यथा ब्लॉकचे काम वाढून रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होण्याची शक्यता असते.

ब्लॉककाळात काम कसे होते?

ऊन-पाऊस याची तमा न बाळगता मेगाब्लॉकचे काम होतच असते. ब्लॉकदरम्यान त्या मार्गावरील वाहतूक पूर्ण बंद असल्याने गँगमन निर्धास्त असतात. तरीही बाजूच्या मार्गावरून वाहतूक चालू असल्याने त्यांना काळजी घ्यावी लागते. काम सुरू असताना लोकल किंवा मेल,एक्स्प्रेसही धावत असल्याने एखादा अपघात होऊ नये, याची खबरदारीही घेतली जाते. रूळ बदलणे, ओव्हरहेड वायरसह अन्य किचकट कामे करताना बरीच कसरत करावी लागते. कामगारांचे काम सोपे व्हावे यासाठी खडी वाहून नेण्याची गाडी, क्रेन, टॉवर वॅगन यासह अन्य तांत्रिक साहित्यही असते.

आव्हानांचा ब्लॉक?

नियोजित मेगाब्लॉकमधील कामे ही वेळेत पूर्ण करण्याचे आव्हान रेल्वे प्रशासन व कामगारांसमोर असते. ही कामे पूर्ण करताना अपुरे मनुष्यबळ, अपुऱ्या सुविधा यासह अन्य आव्हाने, संकटांचा सामनाही कामगारांना करावा लागतो. रेल्वेच्या कायमस्वरूपी कामगारांबरोबरच कंत्राटी कामगारही असतात. ते कायमस्वरूपी कामगार नसल्याने त्यांना रेल्वेकडून थेट कोणत्याही सुविधा न मिळता कंत्राटदारामार्फतच मिळतात. त्यासाठी रेल्वे व कंत्राटदारात करारही झालेला असतो.

काही वेळा कंत्राटी कामगारांना अडचणींना सामोरे जावे लागते आणि त्याच परिस्थितीत ऊन, पावसात काम करावे लागते. एखादा अपघात झाल्यास रेल्वेकडूनही थेट नुकसान भरपाई मिळत नाही ती कंत्राटदाराकडूनच मिळते. यात अ्नेकदा त्यांची परवडच होते.

मेगाब्लॉकचा इतिहास?

जेव्हापासून रेल्वे सेवा अस्तित्वात आली, तेव्हापासून त्याच्या देखभाल, दुरुस्तीच्या नियोजित विविध कामांनाही सुरुवात झाली. १६ एप्रिल १८५३ रोजी दुपारी ३.३५ वाजता बोरीबंदर ते ठाणे अशी पहिली रेल्वे धावली. ३३.८ किलोमीटरच्या या सेवेचा विस्तार केला गेला आणि या विस्तारासाठी कामे घेतली गेली. तेव्हा मेगाब्लॉक हे नाव अस्तित्वात नव्हते.

हेही वाचा : लोकसत्ता विश्लेषण : रेडिओ कॉलर लावूनही बिबट्या बेपत्ता कसा?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कमी रेल्वेगाड्यांमुळे विविध तांत्रिक कामांसाठी पुरेपूर वेळ मिळत होता. मात्र वाढत जाणारी प्रवासी संख्या, गाड्या आणि कामासाठी न मिळालेला वेळ यामुळे मध्य रेल्वेवर रविवार मेगाब्लॉक ही संकल्पना १९९७ च्या सुमारास उदयास आली. त्यानंतर पश्चिम रेल्वेवर रविवार मेगाब्लॉक सुरू झाला.