राज्यातील सत्तेत मांडीला मांडी लावून बसणाऱ्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेल्या काही दिवसांपासून ठाण्यात टोकाचा कलगीतुरा रंगला आहे. खारेगाव पट्ट्यात ठाणे महापालिकेने उभारलेल्या रेल्वे उड्डाणपुलाच्या लोकार्पण सोहळ्यात जणू ठसठसणाऱ्या वादाचीच ठिणगी उडाली.
सेनेच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीचा बुरूज!
ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला असला तरी गेल्या काही वर्षांत राज्याचे विद्यमान गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कळवा-मुंब्रा पट्ट्यात राष्ट्रवादीची मोठी ताकद उभी केली आहे. मुंब्रा, कौसा हा तसा मुस्लिमबहुल पट्टा. त्यामुळे आव्हाडांच्या यशात मुंब्र्यातील एकगठ्ठा मतांचे समीकरण गृहित धरले जात असले तरी ते पूर्ण सत्य नाही.
आव्हाडांनी कळवा या शिवसेनेच्या एकेकाळच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावत येथील हिंदू, मराठीबहुल पट्ट्यातही राष्ट्रवादीचा बुरूज उभा केला हे राजकीय वास्तव आहे. कळव्यातील राष्ट्रवादीची ही वाढती ताकद शिवसेनेची दुखरी नस राहिली आहे. ठाणे महापालिकेतील शिवसेनेच्या ताकदीला आव्हाड आव्हान देतात तेच मुळी कळवा-मुंब्रा पट्ट्यातील या ताकदीच्या जोरावर. त्यामुळेच ठाण्यातील शिवसेना-राष्ट्रवादीतील या सत्तासंघर्षाचा केंद्रबिंदू येत्या काळातही कळवा परिसरच राहील असेच चित्र आहे.
मनोमीलनाच्या केवळ गप्पाच
खारेगाव रेल्वे उड्डाणपुलाचा सोहळा, त्यानिमित्ताने रंगलेले श्रेयवादाचे राजकारण, कार्यक्रमात रंगलेल्या राजकीय फटकेबाजीमुळे ठाण्यातील आगामी महापालिका निवडणुकीमध्ये या दोन पक्षांतील संघर्ष किती टोकाला पोहचेल याची चाहूल लागू लागली आहे. ठाण्यातील राजकीय पटलावर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे नेहमीच एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक राहिले आहेत.
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे एकमेकांसोबत असलेल्या अबोल मैत्रीच्या कितीही गप्पा मारत असले तरी या दोन पक्षांमधील सत्तासंघर्ष ठाणे, कळवेकरांना नवा नाही. एकनाथ शिंदे यांचा स्वभाव तसा सर्वपक्षियांशी जुळवून घेणारा. त्यामुळे निवडणुकांच्या रिंगणात संघर्ष करणारे शिंदे आणि आव्हाड एकमेकांच्या बालेकिल्ल्यात मात्र सहमतीचे, समन्वयाच्या राजकारणावर भर देतात हेही तितकेच खरे.
शिवसेनेतील नव्या पिढीला समन्वयाचे हे गणित मात्र मान्य नाही. काहीही झाले तरी हातातून निसटलेल्या कळव्यासारखा बालेकिल्ला पुन्हा मिळवायचा या इराद्याने शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे आक्रमक राजकारण करू लागले आहेत. ठाण्यात राष्ट्रवादीसोबत आघाडी करणे म्हणजे गल्लोगल्ली उभ्या असलेल्या शाखांमधील शिवसैनिकांची मुस्कटदाबी करणे. त्यामुळे काहीही झाले तरी आघाडी नकोच अशी भूमिका खासदार शिंदे आणि महापौर नरेश म्हस्के यांनी घेतली आहे. या दोघांनी मिळून निवडणुकांच्या तोंडावर ‘मिशन कळवा’ जाहीर करत राष्ट्रवादीला जाहीरपणे डिवचले आहे.
हा वाद इतका टोकाला पोहोचला आहे की अगदी दररोज महापौर म्हस्के आणि राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांच्यात कलगीतुरा रंगत आहे. शिंदे आणि आव्हाड जाहीर कार्यक्रमांमधून आघाडी, मनोमीलनाच्या गप्पा मारत असले तरी शिवसेनेला ठाण्यातील एकहाती सत्तेत वाटेकरी नकोच आहेत. त्यामुळे श्रेष्ठींकडून एखादा आदेश येण्यापूर्वी हा वाद आणखी चिघळत राहावा असाच सेनेचा प्रयत्न दिसतो आहे.
आकड्यांचा खेळ
ठाणे महापालिकेत शिवसेनेचे ६८ नगरसेवक असून या पक्षाची एकहाती सत्ता आहे. विरोधी बाकांवर बसलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ३४ तर भाजपचे २३ नगरसेवक आहेत. राष्ट्रवादीच्या ३४ नगरसेवकांपैकी ८ नगरसेवक हे राबोडी आणि लोकमान्यनगर पट्ट्यातून निवडून आले आहे. या विजयातही नजीब मुल्ला आणि हणमंत जगदाळे या दोन स्थानिक नेत्यांचा वाटा मोठा राहिला आहे. राष्ट्रवादीचे उर्वरित २६ नगरसेवक हे कळवा-मुंब्रा भागातून निवडून आले आहेत यावरून या पक्षाचा जीव नेमका कुठे आहे हे लक्षात येते. कळव्यातील १६ जागांपैकी गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे ९, शिवसेनेचे ६ तसेच १ अपक्ष नगरसेवक निवडून आला. या १६ पैकी किमान १२ जागांवर विजय मिळेल अशी आव्हाडांना खात्री होती, मात्र शिवसेनेने हे गणित त्यावेळी चुकविले.
हेही वाचा : लोकसत्ता विश्लेषण : ठाण्यातील आघाडीत बिघाडीच अधिक!
राज्यातील सत्ता, नगरविकाससारखे तगडे खाते आणि महापालिकेवरील पकड लक्षात घेऊन श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के या दोघांनी यंदा कळव्यात राष्ट्रवादीला कडवे आव्हान द्यायची रणनीती आखली आहे. कळव्यातील विकासकामांवर शिवसेनेची मोहर कशी उमटेल यासाठी हे दोन नेते प्रयत्न करताना दिसतात. पालकमंत्र्यांचाही अबोल पाठिंबा असल्याशिवाय हे दोघे आव्हाडांना अंगावर घेणार नाहीत अशीही दबक्या आवाजात चर्चा आहेच. त्यामुळे महापालिका निवडणुकीत आघाडी झाली तरीही कळव्याच्या भूमीवर शिवसेना-राष्ट्रवादी हा संघर्ष अटळ आहे. हा संघर्ष छुपा असेल की उघड हे येणारा काळच ठरवेल.