-राखी चव्हाण
राज्यातील मानव-वन्यजीव संघर्षाचा आलेख कमी होण्याऐवजी उंचावत आहे. यात वन्यप्राणी तर मृत्युमुखी पडत आहेतच, पण मनुष्यबळींची संख्याही वाढली आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत ही मृत्यूसंख्या दुपटीवर गेली आहे. आता उन्हाळ्यातच नाही तर पावसाळ्यातही वाघांच्या हल्ल्यात वाढ झाली आहे. वनखात्याचे अधिकारी, गावकरी, जंगल आणि वन्यजीवांसाठी काम करणारे स्वयंसेवी यांच्यातील समन्वयाचा अभाव संघर्षाला कारणीभूत आहे.
वाघ जंगलाबाहेर का जात आहेत?
वाघांची संख्या वाढल्यामुळेच ते जंगलाबाहेर जात आहेत. मात्र, ती वाढण्याबरोबरच अखंड जंगलाचे तुकडे होत असल्यानेदेखील वाघ बाहेर जात आहेत. काही वर्षांपूर्वीपर्यंत जंगल भरपूर असल्याने वाघांना त्यांचा नैसर्गिक अधिवास शोधण्यासाठी बाहेर पडण्याची गरज नव्हती. त्यावेळी शेती लहान होती, गावे लहान होती आणि लोकसंख्याही कमी होती. आता गावांचे शहरीकरण होत आहे. शेतीसाठी जंगलांवर अतिक्रमण होत आहे. जंगल झपाट्याने कमी झाल्यामुळे वाघ बाहेर पडत आहेत.
वाघांच्या नैसर्गिक अधिवासावर अतिक्रमण कुणाचे?
वाघांच्या नैसर्गिक अधिवासावर माणसांनीच अतिक्रमण केले आहे. विकास कामांसाठी होणारी अवैध वृक्षतोड, जंगलालगत व जंगलातून जाणारे रस्ते तसेच रस्त्याचे रुंदीकरण, खाणींसह मोठमोठे प्रकल्प जंगलात येत आहेत. परिणामी वाघांचा अधिवास विस्कळीत आणि कमी-कमी होत चालला आहे. बांबूसह तेंदू, मोहफुले आणि आता मशरूम्स यांसारख्या वनउपजासाठी सातत्याने गावकऱ्यांचे जंगलावरील अवलंबन कमी होण्याऐवजी वाढत आहे. याशिवाय अवैध गुरेचराईसारख्या विषयाला अजूनही आळा घालता आलेला नाही. त्यामुळे जंगलावर ताण निर्माण झाला आहे.
गावकऱ्यांशी संवाद कायम राखण्यात वनखात्याचे कुठे अडते?
गावकऱ्यांशी संवाद साधण्यात वनखाते अजूनही कमी पडत आहे हे खरे. गेल्या काही वर्षातला मानव-वन्यजीव संघर्षाचा आलेख पाहिला तर यावर नक्कीच शिक्कामोर्तब होऊ शकते. गावकऱ्यांचे जंगलावरील अवलंबन कमी करण्यासाठी खात्याने योजना आणल्या असल्या तरी संवादाची मोठी दरी त्यांच्यात आहे. वाघाने माणूस मारला की खाते त्यांना मोबदला देऊन मोकळे होते. मात्र, संवादाची पोकळी भरून काढण्यासाठी प्रयत्नच होत नाहीत. स्थानिक अधिकारी हा कार्यक्षेत्रातील त्याच्या निवासस्थानी राहण्याऐवजी शहरातील निवासस्थानी राहतो. परिणामी गावकऱ्यांच्या समस्या समजून घेण्यासाठी किंवा योजना त्यांना समजावून सांगण्यासाठी त्यांच्यात संवादच होत नाही.
संरक्षित क्षेत्राबाहेरील वाघांच्या व्यवस्थापनात वनखाते अपयशी ठरले का?
संरक्षित क्षेत्रात जेवढे वाघ आहेत, तेवढेच किंबहूना त्यापेक्षाही अधिक वाघ संरक्षित क्षेत्राबाहेर आहेत. त्याचाही परिणाम संघर्ष वाढण्यात झाला आहे. या बाहेरच्या वाघांचे व्यवस्थापन करणारी यंत्रणा खात्याकडे नाही. वाघांची संख्या कमी असणाऱ्या संरक्षित क्षेत्रात या बाहेरच्या वाघांचे स्थलांतरण करून हा प्रश्न सुटणार नाही. त्यासाठी संरक्षित क्षेत्रातील वाघांच्या व्यवस्थापनाबरोबरच खात्याला या क्षेत्राबाहेरील वाघांचे वैज्ञानिक दृष्टिकोनातून व्यवस्थापन करावे लागणार आहे. त्या दृष्टीने अजूनही प्रयत्न होताना दिसून येत नाही.
गेल्या तीन वर्षांत वाघांच्या हल्ल्यातील बळी किती?
२०२० आणि २०२१च्या तुलनेत २०२२मध्ये मानव-वन्यजीव संघर्ष दुपटीने वाढला आहे. गेल्या ११ महिन्यांतच राज्यातील बळींची संख्या ७०च्या जवळपास पोहोचली आहे. चंद्रपूर व गडचिरोली या दोन जिल्ह्यांतच बळींची संख्या ही ५०च्या जवळ आहे. २०२० मध्ये ती ३२, तर २०२१ मध्ये ४२ होती. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत हा संघर्ष अधिक मोठा झाला आहे. २०२२ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात पहिल्या दहा महिन्यांतच वाघाच्या हल्ल्यात ३६ माणसे मारली गेली. एकट्या ऑक्टोबर महिन्यात पाच दिवसात पाच माणसे मारली गेली. तर गडचिरोली जिल्ह्यातही जवळजवळ १८ माणसे मारली गेली.
वाघाच्या हल्ल्यातील माणसांच्या बळीची तीव्रता कुठे?
उन्हाळ्यात मोहफुले, तेंदूपानासाठी जंगलात जाणारे गावकरी आता पावसाळ्यात मशरुम आणि सिंधी गोळा करण्यासाठी जात आहेत. ही सर्व कामे वाकूनच करावी लागतात. अशा वेळी वाघ किंवा बिबट्याला इतर प्राण्यांसारखा भास होत असल्याने तो हल्ला करतो. मृत्यूचा हा आलेख पाहिल्यानंतर माणसांवर होणारे ९९ टक्के हल्ले जंगलातच झाले आहेत.