scorecardresearch

विश्लेषण : टाटा स्टीलची ‘मेगामर्जर’ योजना काय?

टाटा स्टीलने मोठी विलीनीकरण योजना (मेगामर्जर प्लॅन) आखली आहे. ती योजना नेमकी काय आहे, कशी पार पडेल, याबद्दल जाणून घेऊया…

विश्लेषण : टाटा स्टीलची ‘मेगामर्जर’ योजना काय?
टाटा स्टीलचे समभागाचे चालू वर्षात विभाजन करण्यात आले.

-गौरव मुठे

टाटा समूहातील आणि धातू क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या टाटा स्टीलने मोठी विलीनीकरण योजना (मेगामर्जर प्लॅन) आखली आहे. ती योजना नेमकी काय आहे, कशी पार पडेल, याबद्दल जाणून घेऊया…

टाटा स्टीलची मेगा मर्जर योजना काय?

टाटा समूहाने त्यांच्या समूहातील सर्व धातूनिर्मिती कंपन्यांचे कामकाज एकाच छत्राखाली आणण्याचे निश्चित केले आहे. समूहातील सर्व धातू कंपन्यांचे टाटा स्टीलमध्ये विलीनीकरण करण्यात येणार आहे. टाटा समूहातील भांडवली बाजारातील सूचिबद्ध चार आणि सूचिबद्ध नसलेल्या तीन अशा एकूण सात कंपन्यांचे टाटा स्टीलमध्ये विलीनीकरण करण्यात येईल.

कोणत्या कंपन्यांचे विलीनीकरण होणार?

टाटा समूहातील टाटा मेटॅलिक्स, टिनप्लेट, टाटा स्टील लाँग प्रॉडक्ट्स, टीआरएफ या चार भांडवली बाजारात सूचिबद्ध कंपन्यांचा विलीनीकरणात समावेश आहे. इंडियन स्टील अँड वायर प्रॉडक्ट्स, टाटा स्टील मायनिंग लिमिटेड आणि एस अँड टी मायनिंग कंपनी या तीन सूचिबद्ध नसलेल्या कंपन्यांचेदेखील विलीनीकरण करण्यात येईल.

विलीनीकरणाच्या बदल्यात इतर कंपन्यांच्या विद्यमान भागधारकांना काय मिळणार?

टाटा मेटॅलिक्सच्या १० समभागांच्या बदल्यात विलीनीकरणानंतर टाटा स्टीलचे ७९ समभाग मिळतील. टिनप्लेटच्या भागधारकांना १० समभागांच्या बदल्यात टाटा स्टीलचे ३३ समभाग मिळतील.

टाटा स्टील लाँग प्रॉडक्ट्सच्या १०  समभागांच्या बदल्यात टाटा स्टीलचे ६७ समभाग मिळतील. तर टीआरएफच्या भागधारकांना १० समभागांच्या बदल्यात १७ समभाग मिळतील. तर भांडवली बाजारात सूचिबद्ध नसलेल्या इंडियन स्टील अँड वायर प्रॉडक्ट्सच्या भागधारकांना प्रतिसमभाग ४२६ रुपये देण्यात येतील.

मेगामर्जर योजनेचा टाटा स्टीलवर काय परिणाम होणार?

ही योजना धातू कंपन्यांची समूह रचना सुलभ करण्याच्या धोरणाशी सुसंगत आहे. एकत्रीकरणामुळे वाहतूक आणि दळणवळण (लॉजिस्टिक), खरेदी धोरण आणि विस्तार योजनांसाठी सर्व प्रकल्पांमध्ये योग्य समन्वय साधता येणार आहे. एडलवाइज सिक्युरिटीजच्या मते, मेगामर्जरचा टाटा स्टीलच्या समभागावर फारसा परिणाम होण्याची शक्यता कमी आहे. उलट इतर कंपन्यांच्या विलीनीकरामुळे कंपनीचा खर्च कमी होण्याची आशा आहे. टाटा स्टीलचे मुख्य वित्तीय अधिकारी (सीएफओ) कौशिक चॅटर्जी यांच्या मते, टाटा समूहातील सर्व धातू कंपन्यांचे भविष्य उज्ज्वल असून त्या चांगली कामगिरी बजावत आहे. आता या महाविलीनीकरणामुळे त्याचा फायदा टाटा स्टीलला होणार असून कंपनीचे प्रति समभाग उत्पन्न (अर्निंग पर शेअर- ईपीएस) वाढणार आहे. शिवाय विलीनीकरण होणाऱ्या सर्व कंपन्यांची कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल.

सध्या समूहातील धातू कंपन्यांची परिस्थिती कशी?

टाटा मेटॅलिक्स

  • समभाग सध्या ३.२९ टक्के म्हणजेच २६.४० रुपयांच्या घसरणीसह ७७५.८५ रुपयांवर व्यवहार करतो आहे. सध्याच्या समभागाच्या बाजारभावानुसार कंपनीचे २,४५३ कोटी रुपयांचे बाजारभांडवल आहे.

टाटा टिनप्लेट

 – समभाग ६.०४ टक्क्यांच्या घसरणीसह म्हणजेच २०.४५ रुपयांच्या घसरणीसह ३१७.९५ रुपयांवर व्यवहार करतो आहे. तर बाजारभांडवल ३,३१८ कोटी आहे.

टाटा स्टील लाँग प्रॉडक्ट्स

  • समभाग ९.७९ टक्क्यांच्या घसरणीसह म्हणजेच ७३.३० रुपयांच्या घसरणीसह ६७५.३० रुपयांवर व्यवहार करतो आहे. तर बाजारभांडवल ३,०५१ कोटी रुपये आहे.

टीआरएफ

– समभाग ४.९९ टक्क्यांच्या घसरणीसह म्हणजेच १८.७५ रुपयांच्या घसरणीसह ३५६.६५ रुपयांवर व्यवहार करतो आहे. बाजारभांडवल ३९२ कोटी रुपये आहे. (येथे शुक्रवार, २३ सप्टेंबर २०२२ चा कंपन्यांचा बाजारभाव गृहीत धरला आहे)

टाटा स्टीलची कामगिरी कशी?

स्टीलची जागतिक मागणी कमी झाल्याने स्टीलच्या किमती कमी झाल्या आहेत. तीन महिन्यांत देशांतर्गत स्टीलच्या किमती २० टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. परिणामी कंपनीच्या नफ्यात घसरण झाली आहे. मात्र टाटा स्टीलचा टाटा समूहातील पाच सर्वाधिक फायदेशीर कंपन्यांमध्ये समावेश होतो. सरलेल्या आर्थिक वर्षात कंपनीने ३३,०११ कोटी रुपयांच्या नफ्याची नोंद केली. सरलेल्या जून तिमाहीत कंपनीने ७,७६५ कोटी रुपयांचा नफा मिळविला. ज्यात त्या आधीच्या याच तिमाहीच्या तुलनेत १२.८ टक्क्यांची घसरण झाली.

टाटा स्टीलचे समभागाचे चालू वर्षात विभाजन करण्यात आले. एका समभागाचे दहा समभागांत विभाजन केले. वर्षभरात कंपनीचा समभाग २६ टक्क्यांनी तर २०२२ मध्ये ३.६ टक्क्यांहून अधिक घसरला आहे. सध्या मुंबई शेअर बाजारात कंपनीचा समभाग अर्ध्या टक्क्यांच्या वाढीसह १०४ रुपयांवर व्यवहार करत आहे. सध्याच्या समभागाच्या बाजारभावानुसार, कंपनीचे १.२७ लाख कोटी रुपये बाजारभांडवल आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या