उत्तर प्रदेशच्या बांदा तुरुंगात शिक्षा भोगणाऱ्या मुख्तार अन्सारी (वय ६३) याचा २८ मार्च रोजी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्याने तुरुंगात विष प्राशन केल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला. मात्र, शवविच्छेदन अहवालात हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृत्यूच्या दोन दिवसांनंतर त्याला कुटुंबाच्या ‘कालीबाग कबरस्तान’मध्ये दफन करण्यात आले. ही स्मशानभूमी अन्सारी कुटुंबीयांची आहे; जिथे २५ सदस्यांना दफन करण्यात आले आहे. कोणाच्या थडग्यावर विद्वान, तर कोणाच्या थडग्यावर स्वातंत्र्यसैनिक, असे लिहिण्यात आले आहे. मुख्तार एका प्रतिष्ठित कुटुंबातील सदस्य होता. प्रतिष्ठित कुटुंबातील मुलगा कुख्यात गुंड कसा झाला? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ या.

६५ गुन्ह्यांची नोंद

मुख्तार अन्सारीवर उत्तर प्रदेश आणि नवी दिल्लीतील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत ६५ गुन्ह्यांची नोंद होती. त्यापैकी १६ गुन्हे खून प्रकरणाशी संबंधित होते. १९९१ मध्ये वाराणसीतील बलवान अवधेश राय आणि २००५ मध्ये भाजपा आमदार कृष्णानंद राय यांच्या हत्या प्रकरणासह गेल्या दोन वर्षांत त्याला आठ वेळा दोषी ठरविण्यात आले होते.

prashant kishor on bjp in loksabha election 2024
Video: २०२४च्या निवडणुकीत भाजपाचं काय होणार? प्रशांत किशोर यांनी मांडलं गणित; म्हणाले, “यावेळी पहिल्यांदाच…”
Kerala Student Death Case
केरळमधील जेएस सिद्धार्थन मृत्यू प्रकरण; पोलीस अहवालात धक्कादायक माहिती समोर, तब्बल २९ तास मानसिक छळ अन्…
Who was the first prime minister of India
कंगना रणौत म्हणते त्याप्रमाणे खरंच, नेहरू नाही तर सुभाषचंद्र बोस होते का भारताचे पहिले पंतप्रधान?
raj thackray mns latest news
“राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम”, मनसेला गळती; सात शिलेदारांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’

मोहम्मदाबादमध्ये अन्सारी कुटुंबाची समोरासमोर दोन घरे आहेत. दोन्ही घरे २५ हजार चौरस फूट परिसरामध्ये पसरली आहेत; जिथे संपूर्ण अन्सारी कुटुंब राहते. दोन्ही घरांच्या अंगणात ७८६ ने शेवट होणार्‍या ((इस्लामिक संस्कृतीत शुभ) क्रमांकाच्या किमान १५ एसयूव्ही गाड्या आहेत. मुख्तार अन्सारीचे भाऊ अफझल आपल्या धाकट्या भावाबद्दल बोलताना म्हणाले, ”त्याला क्रिकेट, सनग्लासेस, रायफल आणि एसयूव्हीचे वेड होते. “तो खेळात चांगला होता. तो सर्व मैदानी खेळ खेळला पण विशेषतः क्रिकेटमध्ये तो चांगला होता आणि एक महान फलंदाज होता.”

१९७० च्या दशकातील मोहम्मदाबाद येथील नगरपालिका अध्यक्ष काझी सुभानुल्ला आणि राबिया बीबी यांना तीन मुली आणि तीन मुले, अशी सहा अपत्ये होती. मुख्तार सर्वांत लहान होता. त्याने गाझीपूरमधून पदवी आणि वाराणसीमधून पदव्युत्तर शिक्षण घेतले.

हेही वाचा : एल्गार परिषद: शोमा सेन यांना सहा वर्षांनंतर जामीन, हे प्रकरण आहे काय आणि त्यातील अन्य १६ आरोपींची सद्यस्थिती काय?

मुख्तार आणि राजकारण

मुख्तारला राजकीय पार्श्वभूमी लाभली होती. त्याच्या पूर्वजांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला होता. १९९४ मध्ये मुख्तार याने राजकारणात पदार्पण केले आणि गाझीपूरमधून भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (सीपीआय) चिन्हावर विधानसभेची पोटनिवडणूक लढवली. “मुलायम सिंह यादव यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असलेले सपा-बसपचे संयुक्त उमेदवार राज बहादूर सिंह यांच्याकडून तो निवडणूक हरला,” असे अफझल अन्सारी सांगतात. मुख्तार याने १९९६ मध्ये मऊ विधानसभा मतदारसंघातून बसपचा उमेदवार म्हणून पहिली निवडणूक जिंकली. त्यानंतर २००२, २००७, २०१२ व २०१७ मध्ये हा विक्रम कायम ठेवला. २०२२ मध्ये त्याने ही जबाबदारी आपला मुलगा अब्बास याच्यावर सोपवली; जो सुहेलदेव समाज पक्षाच्या तिकिटावर मऊ येथून विजयी झाला.

१९९४ मध्ये मुख्तार याने राजकारणात पदार्पण केले. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

अन्सारी कुटुंब: मुत्सद्दी, विद्वान, स्वातंत्र्यसैनिक… आणि मुख्तार

अन्सारी कुटुंबाचे वंशज अफगाणिस्तानातील हेरात येथून १५२६ मध्ये भारतात स्थलांतरित झाले. त्यांच्या जवळच्या लोकांनी असा दावा केला की, १९५१ मध्ये जमीनदारी कायदा रद्द झाला तेव्हा त्यांच्याकडे २१ गावे होती. गेल्या शतकात अन्सारी कुटुंबातील अनेकांनी देशांत प्रतिष्ठित पदे भूषवली आहेत.

मुख्तार आणि अफझल यांच्या कुटुंबातील डॉ. मुख्तार अहमद अन्सारी १९२७ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते. ते जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाचे संस्थापक व स्वातंत्र्यपूर्व काळात आठ वर्षे कुलगुरू राहिले. त्यांच्या आईंच्या परिवारातील ब्रिगेडियर मोहम्मद उस्मान हे १९४७ च्या पाकिस्तानबरोबरच्या युद्धात शहीद झाले. ते भारतीय सैन्यातील सर्वोच्च अधिकारी होते. ‘नौशेरा का शेर’ म्हणून ओळखले जाणारे मोहम्मद उस्मान यांना मरणोत्तर महावीर चक्राने सन्मानित करण्यात आले होते. त्यानंतर फरीद-उल-हक अन्सारी, दोन वेळा राज्यसभा सदस्य (१९५८-६४) आणि स्वातंत्र्यसैनिक होते. अलीकडच्या काळात मुख्तारचे काका हमीद अन्सारी हे दोन वेळा भारताचे उपराष्ट्रपती राहिले. ते संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताचे स्थायी प्रतिनिधी व अलीगढ मुस्लिम विद्यापीठाचे कुलगुरू होते.

मुख्तारचे प्रतिष्ठित कुटुंब (छायाचित्र-लोकसत्ता डिजिटल टिम)

मुख्तारने निवडली वेगळी वाट

मुख्तारने मात्र अगदी वेगळी वाट निवडली. १९७८ मध्ये मुख्तार केवळ १५ वर्षांचा असताना धमकीच्या आरोपाखाली त्याच्यावर पहिला गुन्हा दाखल झाला. कुटुंबातील एका सदस्याने सांगितले की, दोन कुटुंबांमधील वादात हस्तक्षेप केल्यानंतर त्याने गाझीपूरमधील एका स्थानिकाला धमकावले होते. १९८६ मध्ये २३ वर्षांच्या वयात, त्याच्यावर पहिल्या खुनाच्या गुन्ह्याची नोंद झाली. त्याने कथितरीत्या स्थानिक कंत्राटदार सच्चिदानंद राय यांची हत्या केली होती. ३ ऑगस्ट १९९१ रोजी गॅंगवॉर प्रकरणात मुख्तार आणि इतर हल्लेखोरांनी कथितरीत्या अवधेश राय यांची वाराणसीतील त्यांच्या निवासस्थानाबाहेर गोळ्या झाडून हत्या केली होती. गेल्या वर्षी ५ जून रोजी वाराणसी न्यायालयाने मुख्तारला अवधेश हत्याप्रकरणी दोषी ठरवीत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

मुख्तार विरुद्ध असलेले सर्वांत उच्च-प्रोफाइल हत्येचे प्रकरण म्हणजे कृष्णानंद राय यांची हत्या. कृष्णानंद राय यांनी मुख्तारचे मुख्य प्रतिस्पर्धी ब्रिजेश सिंह यांना पाठिंबा दिला होता. २९ नोव्हेंबर २००५ ला मोहम्मदाबादमधील भाजपाचे विद्यमान आमदार राय हे क्रिकेट सामन्याचे उद्घाटन करण्यासाठी त्यांच्या घरातून निघाले होते, तेव्हा मुन्ना बजरंगीच्या नेतृत्वाखालील मुख्तारच्या टोळीतील सदस्यांनी आमदाराच्या गाडीला धडक दिली. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, हल्लेखोरांपैकी एकाने वाहनाच्या बोनेटवर चढून राय यांच्यावर गोळीबार केला. “मारेकऱ्यांनी त्यांच्या एके-४७ मधून किमान ५०० राऊंड गोळीबार केला,” असे अधिकारी म्हणाले. घटनास्थळी पोलिसांना राय यांच्या शरीरात किमान ६० गोळ्यांची छिद्रे दिसली. राय यांचा मुलगा पीयूष सांगतो, “माझ्या वडिलांची हत्या करण्यात आली. कारण- त्यांनी २००२ च्या निवडणुकीत अफजल अन्सारीचा पराभव केला होता.”

कुटुंबातील किमान चार सदस्यांवर सध्या गुन्हे दाखल आहेत. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

मुख्तारवर २००५ मध्ये मऊ येथे झालेल्या जातीय संघर्षादरम्यान दंगल घडविल्याचाही आरोप होता. मुख्तार २००९ मध्ये झालेल्या हत्येचाही मास्टरमाइंड होता. मुख्तारने खंडणीच्या प्रयत्नात रोड कॉन्ट्रॅक्टर मन्ना सिंह आणि त्याचा सहकारी राजेश राय याची हत्या केली होती. सहा महिन्यांनंतर या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार रामसिंह मौर्य आणि त्याच्या सुरक्षा अधिकाऱ्याची कथितपणे मुख्तारच्या माणसांनी हत्या केली. २०१७ मध्ये मुख्तारची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली होती; तर तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. मन्नाचा भाऊ अशोक सिंह याने ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले, “माझ्या भावाचा ड्रायव्हरही या घटनेत जखमी झाला होता; पण भीतीमुळे त्याने साक्ष दिली नाही. तेव्हा मुख्तारला पाठिंबा देणारी सरकारं होती.”

अन्सारी कुटुंब गुन्हेगारी प्रकरणांच्या जाळ्यात

मुख्तार गुन्हेगारी जगात आल्याने एकेकाळी विद्वान आणि नामवंत अन्सारी कुटुंब आता गुन्हेगारी प्रकरणांच्या जाळ्यात अडकले. कुटुंबातील किमान चार सदस्यांवर सध्या गुन्हे दाखल आहेत. माजी आमदार व खासदार भाऊ अफजल यांच्यावर तीन खटले आहेत. मुख्तारचा मोठा मुलगा अब्बास सध्या कासगंज तुरुंगात बंद आहे. राष्ट्रीय स्तरावरील ट्रॅप शूटर अब्बासने २०२२ च्या उत्तर प्रदेश राज्याच्या निवडणुकीत अधिकाऱ्यांना कॅमेऱ्यावर धमकावले होते. मुख्तारचा धाकटा मुलगा उमर उच्च शिक्षणासाठी लंडनला गेला होता आणि आता गाझीपूरला परतला आहे. त्याच्यावर सहा खटले आहेत. मुख्तारची पत्नी आफशा हिच्यावर गँगस्टर कायद्यांतर्गत १३ गुन्ह्यांची नोंद आहे आणि तिच्यावर ७५,००० रुपयांचे बक्षीस आहे.

‘गरीबों का मसीहा’

मुख्तारच्या बहिणी म्हणाल्या की, आमची इच्छा असूनही आम्हाला आमच्या भावाला पाहता आले नाही. कारण- त्याच्या अंत्ययात्रेला मोठी गर्दी जमली होती. “ईद असो, दिवाळी असो. तो सर्व सणांसाठी मोहम्मदाबादमधील सर्व घरांना पैसे पाठवायचा. त्याला लोक ‘गरीबों का मसीहा’ म्हणायचे,” असे त्याच्या एका बहिणीने सांगितले. मुख्तारच्या मृत्यूनंतर तीन दिवस मोहम्मदाबादच्या युसूफपूर भागातील दुकाने बंद राहिली. अन्सारी कुटुंबाने लोकांना कामावर परत जाण्याचे आवाहन केल्यावरच लोक कामावर परतले.

मुख्तार अन्सारीवर उत्तर प्रदेश आणि नवी दिल्लीतील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत ६५ गुन्ह्यांची नोंद होती. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

व्यापारी पीयूष गुप्ता सांगतात की, मुख्तार किंवा अन्सारी कुटुंब बाहेरच्या जगासाठी कसे होते याची त्यांना पर्वा नाही. पण, आमच्यासाठी ते आमचे कुटुंब होते. हिंदू असो वा मुस्लिम, अन्सारी कुटुंब सर्वांना मदत करते. या बाजारातील सर्व हिंदू व्यापारी तुम्हाला सांगतील की, अन्सारी कुटुंबाने त्यांचा व्यवसाय वाढविण्यास कशी मदत केली. मुख्तारच्या अंत्यसंस्कारासाठी जमलेल्या गर्दीवर अफझल अन्सारी म्हणाले, “आम्ही या लोकांना इथे आणण्यासाठी बस किंवा कार पाठविल्या नाहीत. आम्ही जेवणाची पाकिटेही वाटली नाहीत. लोक आमच्या आणि मुख्तारवरील प्रेमामुळे इथे आले. ”

मुख्तारची अनेक प्रकरणांमध्ये चौकशी करणारे उत्तर प्रदेशचे एक वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणतात, “हो, त्याने गरिबांना मदत केली; पण पैसा आला कुठून? त्याने पैसे उकळले, अधिकाऱ्यांना धमकावले आणि लोकांना मारले. चुकीच्या मार्गाने त्याने जे काही कमावले, ते गरिबांवर खर्च केले आणि गाझीपूर, मऊ आणि इतर काही जिल्ह्यांमध्ये स्वतःचे साम्राज्य तयार केले. सर्व बाहुबली हेच करतात.” “त्याला केवळ मुस्लिमांचा पाठिंबा नव्हता. तर इतर जाती आणि वर्गांचाही पाठिंबा होता. त्याच्या टोळीत दूरदूरच्या सदस्यांना त्याने सामील केले होते, ते सर्व हिंदू होते. संजीव जीवा नावाचा त्याचा एक सहकारी मुझफ्फरनगरचा होता. याहून लक्षात येते की, त्याचा प्रभाव आणि दहशत किती दूरवर होती. त्याने लोकांच्या मनात भीती निर्माण केली होती,” असे पोलीस अधिकारी म्हणाले.

हेही वाचा : Water Crisis: बंगळुरूमध्ये केपटाऊनपेक्षाही भीषण जलसंकट? कारणीभूत कोण?

अफझल अन्सारीने मात्र हे नाकारले आणि मुख्तारविरुद्धच्या खटल्यांना ‘राजकीय सूड’ म्हटले. त्याचा पुतण्या सुहैब अन्सारी म्हणतो, “माझ्या काकांवर सामान्य लोकांनी खटले दाखल केले असते, तर मला खेद वाटला असता. मात्र, ही सर्व प्रकरणे पोलिस अधिकारी आणि प्रशासनाने दाखल केली. ते सर्व राजकीय आहेत. आम्हाला कोणताही पश्चात्ताप नाही.”