केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामास सुरुवात झाली आहे. बुलेट ट्रेनसाठी १२ स्थानके असून त्यापैकी चार स्थानके महाराष्ट्रातील आहे. मुंबई, ठाणे, विरार आणि बोईसर या स्थानकांचा त्यामध्ये सामावेश असून ठाणे स्थानकाचा इंटिग्रेटेड (एकात्मिक) विकास करण्याचा निर्णय नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (एनएचएसआरसीएल) घेतला आहे. त्यामुळे बुलेट ट्रेनच्या ठाणे स्थानकाचे रुपडे पालटणार असून सर्व प्रकारच्या सार्वजनिक वाहतुकीस ठाणे स्थानक जोडले जाईल. मूळ ठाण्यापासून काहीशा लांब असलेल्या या प्रकल्पाचा एकात्मिक विकास केल्याने येथील नागरिकांना दळण-वळणाचा फायदा होणार आहे.

बुलेट ट्रेन प्रकल्प काय आहे?

देशातील पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प मुंबई ते अहमदाबाद असा जोडला जाणार आहे. शिळफाटा आणि झरोली गावादरम्यानचा हा भाग मुंबई महानगर प्रदेशातील ९५ गावे आणि शहरांमधून जाणार आहे, ज्यामध्ये ठाणे आणि पालघर जिल्ह्यांचा सामावेश आहे. हा प्रकल्प २०२९ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पासाठी १०० टक्के जमीन संपादित करण्यात आली आहे. तसेच मार्गासाठी निश्चित करण्यात आलेल्या १ हजार ३९० हेक्टरपैकी ४३० हेक्टर जमीन महाराष्ट्रात तर ९६० हेक्टर जमीन गुजरात आणि दादरा व नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातील आहे.

स्थानके कोणती, किती वेळात पोहोचाल?

बुलेट ट्रेन प्रकल्पात एकूण १२ स्थानके आहेत. त्यापैकी चार स्थानके महाराष्ट्रात असून उर्वरित दादरा-नगर हवेली आणि गुजरातमधील आहेत. बुलेट ट्रेनचा प्रवास मुंबईतील बीकेसीमध्ये सुरू होऊन गुजरातमधील साबरमतीमध्ये पूर्ण होतो. मुंबई, ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिलीमोरा, सुरत, भडोच, बडोदे, आणंद, अहमदाबाद आणि साबरमती स्थानकांचा सामावेश आहे. एकूण ५०८ किमी लांबीचा हा प्रकल्प असून ट्रेनचा वेग ताशी ३२० किमी तास असेल. या प्रकल्पात दोन प्रकारच्या गाड्या धावणार आहेत. मर्यादित थांबे असणाऱ्या ट्रेनमधून २ तास ७ मिनिटांत तर सर्व स्थानकांवर थांबणाऱ्या ट्रेनमधून २ तास ५८ मिनिटांत प्रवास पूर्ण करता येईल. प्रकल्पाच्या मार्गिकेत आठ बोगद्यांचा समावेश असेल. त्यासाठी न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग तंत्रज्ञान (एन.ए.टी.एम.) वापरले जात आहे. यातील सात बोगदे महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात आहेत, तर एक बोगदा गुजरातच्या वलसाड येथे आहे.

बुलेट ट्रेन प्रकल्पाची सद्यःस्थिती

या प्रकल्पातील ३२० किमीच्या पूलांची कामे पूर्ण झाली आहेत. हा प्रकल्प नदी, खाडीवरून जातो. त्यामुळे तेथील पुलांचे बांधकामही केले जाणार आहे. तर महत्त्वाच्या साबरमती बोगद्याचे काम पूर्णत्वाकडे आहे. नुकतेच शिळफाटा येथील बोगद्याचे काम यशस्वीरित्या पूर्ण झाले होते. विरार आणि बोईसर बुलेट ट्रेन स्थानकासाठी पहिले स्लॅब कास्टिंग पूर्ण झाले आहे. गुजरातमधील सर्व आठ स्थानकांची संरचनात्मक कामे पूर्ण झाली असून इमारतींच्या आतील आणि सुशोभीकरणाची कामे सुरू आहेत. गुजरातमध्ये आतापर्यंत सुमारे १९८ किमी ट्रॅक बांधकाम पूर्ण झाले आहे. गुजरातमधील बिलीमोरा ते सुरत ५० किमी भाग २०२७ मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे.

ठाणे स्थानक कुठे होत आहे?

बुलेट ट्रेनचे ठाणे स्थानक हे दिवा आणि कोपर या शहरांमध्ये असलेल्या बेतवडे गावाजवळ आहे. भविष्यात बुलेट ट्रेन प्रकल्प निर्माण होत असल्याने या भागात गृहखरेदीदेखील मोठ्या प्रमाणात झाली आहे. सध्या या भागात सार्वजनिक वाहतुकीसाठी चांगले पर्याय उपलब्ध नाहीत. त्यामुळे येथील रहिवाशांना रिक्षाने मध्य रेल्वेचे डोंबिवली किंवा दिवा स्थानक गाठावे लागते. बुलेट ट्रेन प्रकल्प सुरू झाल्यावर येथील पायाभूत सुविधाही मोठ्या प्रमाणात विकसित होतील अशी आशा नागरिकांना वाटते.

कसे असेल ठाणे स्थानक?

बुलेट ट्रेनच्या ठाणे स्थानकामध्ये बुलेट ट्रेन, रेल्वे, मेट्रो, अंतर्गत मेट्रो, बसगाड्या, जेट्टी ( जलमार्ग), कॅब-रिक्षा स्थानके तसेच लगतचे सर्व मोठे महामार्ग व विशेष रस्त्याद्वारे विमानतळही जोडण्यात येणार आहे. प्रवाशांना एकाच ठिकाणी सर्व सार्वजनिक वाहतुकीच्या सुविधा उपलब्ध होतील. या सर्व सुविधा अत्यंत नियोजनबद्ध एकमेकांना पूरक पध्दतीने जोडण्यात येतील. ठाणे बुलेट ट्रेन स्थानक परिसराचा विकास करताना २५ टक्क्यांहून अधिक जागेवर हरित क्षेत्र राखले जाणार आहे. हे स्थानक उल्हास नदीच्या जवळ स्थित आहे. त्यामुळे या स्थानकाच्या प्रवेश इमारतीच्या छताची रचना लाटांच्या रूपात असेल. बुलेट ट्रेन सुरू झाल्यास किंवा त्यापूर्वी या भागात नागरीकरण वाढणार आहे. त्यामुळे मध्ये रेल्वेच्या दिवा, कोपर आणि डोंबिवली स्थानकावर प्रवाशांचा भार वाढणार आहे. त्यामुळे या भागात मध्य रेल्वेला जोडणारे स्थानक तयार व्हावे अशी मागणी अनेक वर्षांपासून नागरिक करत आहेत.