Mumbai Kabutarkhana Controversy and PM Modi and Jawaharlal Nehru: सध्या मुंबईकरांसाठी कबुतर हाच विषय कोणत्याही इतर विषयांपेक्षा महत्त्वाचा ठरला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई महापालिकेने सर्व कबुतरखाने बंद तर केले, पण कबुतरप्रेमींनी कबुतरखान्यांवर टाकलेली ताडपत्री फाडून या आदेशाला विरोध केला. त्यामुळे सध्या महाराष्ट्र सरकार कबुतर आणि कबुतरप्रेमींच्या चांगलंच कचाट्यात सापडलं आहे.
कधी काळी प्रेमदूत असलेले कबुतरं, आज मात्र आगामी मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलं आहे. कबुतर हा नेहमीच भारतीय राजकारण्यांचा आवडता पक्षी होता. मुघलांपासून ते नेहरूंपर्यंत सगळ्यांनीच कबुतराला शांतीदूत मानले. म्हणूनच काही वर्षापूर्वी (२०२२) पंतप्रधान मोदींनी काँग्रेसला लक्ष्य करत “एक काळ होता जेव्हा कबुतरं उडवली जात होती… ” असा टोला लगावला होता.
मुलांच्या समस्या आणि बालदिन
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना कबुतर अतिशय प्रिय होते. ते त्यांच्या प्रत्येक वाढदिवशी कबुतरं उडवत असत. त्यामुळे बालदिन आणि कबुतर यांचा आगळावेगळा बंध निर्माण झाला. भारतात १४ नोव्हेंबर १९५७ रोजी बालदिन साजरा करण्यास सुरुवात झाली. पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन हा बालदिन म्हणून साजरा करण्यात येतो. परंतु, हाच दिवस का निवडण्यात आला हे जाणून घेण्यासाठी ५० च्या दशकात डोकावून पाहावं लागेल.
पं. नेहरूंचा जन्मदिनच बालदिन कशासाठी?
१९५१ साली संयुक्त राष्ट्रांचे सामाजिक कल्याण फेलो व्ही. एम. कुलकर्णी यांनी युनायटेड किंगडममधील गुन्हेगारीकडे वळलेल्या मुलांच्या पुनर्वसनावर सखोल संशोधन केले. यावेळी त्यांच्या लक्षात आले की, भारतात मुलांच्या समस्यांवर काम करणारी अशी कोणतीही संस्था अस्तित्त्वात नाही.
फ्लॅग डे ते बालदिन
इंग्लंडमध्ये राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या वाढदिवशी ‘सेव्ह द चाइल्ड फंड’साठी निधी उभारण्यासाठी ‘फ्लॅग डे’ साजरा केला जातो. त्यातूनच प्रेरणा घेत व्ही. एम. कुलकर्णी यांनी तत्कालीन भारतीय पंतप्रधानांचा वाढदिवस ‘फ्लॅग डे’ म्हणून साजरा करून भारतातील बालकल्याणासाठी कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांसाठी निधी गोळा करण्याची शिफारस संयुक्त राष्ट्रांना केली. त्यानंतर १४ नोव्हेंबर हा दिवस बालदिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली.
पहिला बालदिन – १४ नोव्हेंबर १९५७
भारताने १९५७ साली प्रथमच बालदिन साजरा केला. त्या वेळी भारत सरकारच्या पोस्ट अँड टेलिग्राफ विभागाने ‘फर्स्ट डे कव्हर’ आणि बालदिनासाठी तीन टपाल तिकीटे प्रसिद्ध केली. या दिवशी नवी दिल्लीमध्ये पंतप्रधान नेहरू यांच्या ६८ व्या वाढदिवसानिमित्त हजारो लहान मुलं पंतप्रधान निवासस्थानाच्या (तीन मूर्ती भवन) आवारात जमली. पुढे दिल्लीतील नॅशनल स्टेडियममध्ये एक मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात भारतातील विविध राज्यांतील हजारो शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. फुलांनी सजवलेल्या जीपमधून नेहरूंनी स्टेडियममध्ये फेरी मारली आणि कार्यक्रमात सहभागी विविध शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गटांचे निरीक्षण केले. सारनाथहून आलेल्या मुलांनी पंतप्रधानांना वाढदिवसाची भेटवस्तू म्हणून बुद्ध मूर्ती दिली. (Source: Selected Works of Jawaharlal Nehru, Series 2, Volume 40, Page 263)

कबुतर आणि नेहरू
१४ नोव्हेंबर १९५७ रोजी नॅशनल स्टेडियममधील कार्यक्रमादरम्यान अनेक पांढरी कबुतरं आकाशात सोडण्यात आली. त्यापैकी एक कबूतर परत येऊन नेहरूंच्या खांद्यावर बसले. नंतर ते कबूतर पुढे सरकून त्यांच्या डोक्यावर बसले आणि चांगली पंधरा-वीस मिनिटे तिथेच राहिले. हा क्षण अनेक छायाचित्रांमध्ये टिपण्यात आला आहे. विख्यात छायाचित्रकार होमाई व्यारावाला यांनी घेतलेल्या एका प्रसिद्ध छायाचित्रात नेहरू कबूतर आकाशात सोडताना दिसतात. या कार्यक्रमात पंतप्रधान नेहरूंनी मुलांना उद्देशून भाषण देखील केलं होतं (Address at a Children’s Rally, National Stadium, New Delhi, November 14, 1957. Source: Selected Works of Jawaharlal Nehru, Series 2, Volume 40, Page 264). नेहरूंच्या डोक्यावर बसलेल्या त्या कबुतरचा फोटो एक ऐतिहासिक क्षण ठरला, त्यानंतर पंडित नेहरू आणि कबुतर असं समीकरणचं झालं.

भाजपा, कबुतर आणि पंडित जवाहरलाल नेहरू
भाजपा आणि पंडित नेहरू यांचं नात विळ्या-भोपळ्याच आहे, असंच एकूण वारंवार होणाऱ्या टीकेतून लक्षात येतं. नेहरूंच्या कबुतरं आकाशात सोडण्याच्या कृतीवरुन अनेक भाजपा नेते टोलेबाजी नेहमीच करत असतात. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी २०२१ मध्ये आरोप केला होता की, माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या ‘शांततेचे दूत’ होण्याच्या इच्छेमुळे देश ‘कमकुवत झाला’.
राज्यपाल कोश्यारी कारगिल विजय दिनाच्या २२व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलत होते. ते म्हणाले, “मी पंडित जवाहरलाल नेहरूंचा आदर करतो, परंतु, नेहरू स्वतःला शांतीदूत समजत होते. त्यांना शांतीचे कबूतर उडवायचे होते. या विचारसरणीमुळे देश कमकुवत झाला आणि दीर्घकाळ तसाच राहिला,” तर, पंतप्रधान मोदींनी २०२२ मध्ये ‘राष्ट्रीय लॉजिस्टिक धोरणा’च्या उद्घाटनप्रसंगी केलेल्या भाषणात नेहरूंच्या कबुतरं उडवण्याच्या कृतीवरून मिश्किल टीका केली होती. त्याच दिवशी मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात नामिबियाहून आणलेल्या चित्यांना सोडण्यात आले होते, याचा उल्लेख करत मोदी म्हणाले होते की, “एक काळ होता जेव्हा कबूतरं सोडली जात होती. आता चित्ता सोडले जात आहेत… म्हणूनच आमची अपेक्षा आहे की, मालाची डिलिव्हरी चित्याच्या वेगाने व्हावी.”
पाहा व्हिडीओ
नेहरूंचे कबुतर प्रेम
‘An Autobiography’ या आत्मचरित्रातील ‘Animals in prison’ या प्रकरणात नेहरू लिहितात, “या काळात (तुरुंगात) मी अधिक निरीक्षण करू लागलो. ज्या-ज्या तुरुंगांत मी गेलो, तिथे सर्वत्र कबुतरांची विपुलता होती.”
एकुणातच, कबुतराने इतिहासाच्या पानात आपली जागा बळकट केली आहे आणि हा पक्षी कधी शांतीचा दूत, तर कधी वादाचा विषय ठरला आहे. काळ बदलला, संदर्भ बदलले, पण कबुतराने मात्र आपली झेप काही थांबवलेली नाही. आता तर दोन पंतप्रधानांचे (मोदी व नेहरू) दोन वेगवेगळे दृष्टिकोनही नागरिकांच्या अनुभवास आले. सत्तांतर केवळ सत्तेचे नसते तर अनेकदा विचारांचेही असते, हेच तर हे दोन भिन्न दृष्टिकोन सांगत नाहीत ना?(!)