AI facial recognition railway security केंद्र सरकारकडून वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) आणि नवी दिल्लीसह देशातील सात प्रमुख रेल्वेस्थानकांवर सुरक्षा वाढविण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित फेशियल रिकग्निशन सिस्टीम बसविण्यात येणार आहे. या तंत्रज्ञानाचा वापर केवळ सुरक्षेसाठीच नव्हे, तर तिकीट तपासणी आणि बोर्डिंग प्रक्रिया वेगवान करण्यासाठीदेखील करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचेल आणि तिकीटघरावरील गर्दी टाळता येईल.
रेल्वेस्थानकांना स्मार्ट स्टेशन्स करण्याच्या योजनेंतर्गत हे तंत्रज्ञान लागू केले जाणार आहे. त्याअंतर्गत सुरक्षा, पाळत ठेवणे आणि प्रवाशांच्या सुविधा वाढवण्यावर भर दिला जाईल. मुख्य म्हणजे हे तंत्रज्ञान विमानतळांसारख्या इतर ठिकाणी वापरले जात आहे. फेशियल रिकग्निशन तंत्रज्ञान नक्की काय आहे? त्याचा फायदा कसा होणार? रेल्वेस्थानकांना फेशियल रिकग्निशन तंत्रज्ञानाची गरज का आहे? या तंत्रज्ञानाचा धोका आहे का? त्याविषयी जाणून घेऊयात.
फेशियल रिकग्निशन तंत्रज्ञान म्हणजे नक्की काय?
- फेशियल रिकग्निशन हे एक बायोमेट्रिक तंत्रज्ञान आहे. हे तंत्रज्ञान एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरील वैशिष्ट्यांचे विश्लेषण करून, त्याची ओळख पटवते.
- डिजिटल प्रतिमा किंवा व्हिडीओ फ्रेम्समधील डोळे, नाक, तोंड व चेहऱ्याची रचना हे तंत्रज्ञान स्कॅन करते.
- या स्कॅन केलेल्या गोष्टी डेटाबेसमध्ये असलेल्या माहितीशी जुळवल्या जातात.
- हे फेशियल रिकग्निशन तंत्रज्ञान कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि मशीन लर्निंग अल्गोरिदमवर आधारित आहे.

रेल्वेस्थानकांना फेशियल रिकग्निशन तंत्रज्ञानाची गरज का आहे?
भारतीय रेल्वेने सुरक्षा आणि प्रवाशांचा अनुभव सुधारण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करण्याची योजना आखली आहे. रेल्वेस्थानके गर्दीची ठिकाणे आहेत. अशा गर्दीच्या ठिकाणांवर चोरी, दहशतवादी कारवाया किंवा इतर गुन्हे होण्याची शक्यता जास्त असते. फेशियल रिकग्निशन तंत्रज्ञाणामुळे संशयित व्यक्तींना, विशेषतः गुन्हेगारी डेटाबेसमध्ये नोंदणीकृत असलेल्यांना ओळखण्यास मदत होते. हे तंत्रज्ञान संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आणि गुन्हेगारांना पकडण्यासाठी उपयुक्त आहे. त्यामुळे या तंत्रज्ञानाद्वारे स्थानकांवरील सुरक्षा वाढण्यास मदत होईल.
फेशियल रिकग्निशन तंत्रज्ञानासाठी ‘आधार’चा होणार वापर?
आधार अधिनियम, २०१६ नुसार, आधार डेटाचा वापर केवळ विशिष्ट उद्देशांसाठी (उदा. सरकारी योजनांसाठी प्रमाणीकरण) केला जाऊ शकतो. फेशियल रिकग्निशन तंत्रज्ञानासाठी आधार डेटाचा वापर करण्यासाठी विशेष परवानगी आणि कायदेशीर प्रक्रिया आवश्यक आहे. यूयडीएआयने (UIDAI) म्हटले होते की, आधार डेटाचा वापर केवळ प्रमाणीकरण प्रक्रियेचा भाग असेल.
फेशियल रिकग्निशन तंत्रज्ञानाचा काय फायदा होणार?
फेशियल रिकग्निशन तंत्रज्ञान गुन्हेगार, फरारी असलेली व्यक्ती किंवा संशयितांना त्वरित ओळखू शकते आणि त्यामुळेच स्थानकांवरील सुरक्षा वाढेल. या तंत्रज्ञानामुळे तिकीट तपासणी व ओळख पडताळणी करण्यामध्ये वेळेची बचत होईल आणि प्रवाशांचा अनुभव सुधारेल. हे तंत्रज्ञान मॅन्युअल देखरेखीपेक्षा अधिक अचूक आणि वेगाने कार्य करते. संशयास्पद हालचाली लवकर ओळखून गुन्हे रोखता येतात. हे तंत्रज्ञान प्रवाशांच्या प्रवासाचे स्वरूप जाणून घेण्यास आणि स्थानक व्यवस्थापन सुधारण्यासदेखील फायद्याचे ठरेल.
फेशियल रिकग्निशन तंत्रज्ञानाचे धोके आहेत का?
फेशियल रिकग्निशन तंत्रज्ञान प्रवाशांची वैयक्तिक माहिती साठवते आणि त्या माहितीचा वापर करते, त्यामुळेच गोपनीयतेच्या उल्लंघनाची चिंता निर्माण होते. तसेच, हे तंत्रज्ञान नेहमी १०० टक्के अचूक असते, असे नाही. कमी प्रकाश, चेहऱ्यावरील मेकअप किंवा तांत्रिक चुकांमुळे तंत्रज्ञान काही वेळा चुकीचेदेखील ठरू शकते. डेटाबेसमध्ये साठवलेली चेहऱ्याची माहिती हॅक झाल्यास किंवा त्याचा गैरवापर झाल्यास गंभीर समस्या उद्भवू शकते. या तंत्रज्ञानाची अंमलबजावणी आणि देखभाल यांचा खर्चदेखील जास्त आहे. त्यामुळे अखेर करदात्यांवर भार येऊ शकतो.
हे तंत्रज्ञान भारतात कुठे बसवण्यात आले आहे?
भारतात हे तंत्रज्ञान विमानतळांवर वापरले जाते. दिल्ली, बंगळूरू, हैदराबाद आणि इतर विमानतळांवर ‘डिजी यात्रा’ उपक्रमांतर्गत प्रवाशांची ओळख आणि बोर्डिंग प्रक्रिया वेगवान करण्यासाठी फेशियल रिकग्निशन तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. त्यामुळे प्रवाशांना कागदी तिकीट किंवा ओळखपत्र तपासणीशिवाय विमानतळांवर प्रवेश करता येतो आणि विमानात चढता येते. हे तंत्रज्ञान जुलै २०१९ मध्ये काही भारतीय विमानतळांवर सुरू बसवण्यात आले होते. तसेच, दिल्ली पोलिसांनी हरवलेली मुले आणि गुन्हेगारांना ओळखण्यासाठी फेशियल रिकग्निशन तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. २०१९ मधील चाचणीदरम्यान, या तंत्रज्ञानाच्या मदतीने सुमारे ३,००० हरवलेल्या मुलांची ओळख पटवण्यास मदत झाली.
गुन्हेगारांच्या ओळख व देखरेख यांसाठी नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्यूरोने (एनसीआरबी) ऑटोमेटेड फेशियल रिकग्निशन सिस्टीम (एएफआरएस) लागू कीले आहे. हे तंत्रज्ञान सीसीटीव्ही फुटेज आणि डेटाबेसच्या माहितीच्या आधारे गुन्हेगारांना पकडण्यासाठी उपयुक्त ठरते. दिल्ली आणि चेन्नईमध्ये वाहतूक सिग्नल, सार्वजनिक ठिकाणी आणि इतर क्षेत्रांमध्ये पाळत ठेवण्यासाठी फेशियल रिकग्निशन तंत्रज्ञान वापरले जात आहे. हे तंत्रज्ञान पोलिसांना संशयित व्यक्तींचा शोध घेण्यास मदत करते. काही शाळा आणि महाविद्यालयांमध्येही हजेरी नोंदविणे आणि गैरहजर विद्यार्थ्यांना ओळखणे यांसाठी फेशियल रिकग्निशन तंत्रज्ञान वापरले जात आहे. हे तंत्रज्ञान काही बँकांमध्ये ग्राहक पडताळणी आणि सुरक्षिततेसाठीदेखील वापरले जाते.
चीन हे तंत्रज्ञान वापरत आहे का?
चीनमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह चौकांमध्ये आणि रस्त्यांवर फेशियल रिकग्निशन तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. २०१८ पर्यंत चीनमध्ये १७० दशलक्षांहून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे होते. २०२० पर्यंत त्यांची संख्या ४०० दशलक्षपर्यंत वाढवण्यात आली. या कॅमेऱ्यांचा वापर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना ओळखण्यासाठी, संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी केला जातो. चीनच्या ‘शार्प आइज’ प्रकल्पांतर्गत, चौकांमध्ये, रस्त्यांवर, शॉपिंग मॉल्समध्ये आणि इतर सार्वजनिक ठिकाणी कॅमेरे बसवून एक सुरक्षा नेटवर्क तयार करण्यात आले आहे. हे नेटवर्क फेशियल रिकग्निशन आणि एआयचा वापर करून नागरिकांच्या हालचालींचा मागोवा घेते. चौकांव्यतिरिक्त, चीनमध्ये बँका, विमानतळ, हॉटेल्स आणि सार्वजनिक शौचालयांमध्येही फेशियल रिकग्निशन तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.
कॉम्परटेकच्या (Compartech) २०२४ च्या अहवालानुसार, जगातील ४० टक्के देशांमध्ये कामाच्या ठिकाणी फेशियल रिकग्निशन तंत्रज्ञान वापरले जात आहे आणि २४ टक्के देशांमधील काही बसेसमध्ये आणि सुमारे ४० टक्के देशांमधील काही ट्रेन आणि मेट्रोमध्ये हे तंत्रज्ञान बसवण्यात आले आहे. अमेरिका, चीन, रशिया, संयुक्त अरब अमिराती, जपान, सिंगापूर, ब्राझील, दक्षिण कोरिया, ब्रिटन, जर्मनी व फ्रान्ससारख्या देशांमध्ये विमानतळ, सार्वजनिक वाहतूक आणि खासगी क्षेत्रात फेशियल रिकग्निशन तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.