मुंबईतील पहिली भुयारी मेट्रो मार्गिका नुकतीच वाहतूक सेवेत दाखल झाली. येत्या काही वर्षांत आणखी एक भुयारी मेट्रो मार्गिका वाहतूक सेवेत दाखल होणार असून वडाळ्यावरून या भुयारी मेट्रोतून देश-विदेशातील पर्यटकांचे आकर्षण स्थान असलेले गेट वे ऑफ इंडिया गाठता येणार आहे. मुंबईकरांनाच नव्हे, तर ठाणेकरांनाही आधी उन्नत आणि पुढे भुयारी मेट्रोने गेट वे ऑफ इंडियाला जाता येणार आहे. केवळ भुयारी मेट्रो ११ मार्गिकेमुळे हे शक्य होणार आहे. लवकरच आणिक आगार – गेट वे ऑफ इंडिया दरम्यान भुयारी मेट्रो ११ मार्गिका मार्गी लागणार आहे. त्यादृष्टीने मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशन (एमएमआरसी) एक-एक पाऊल उचलत आहे. ही भुयारी मेट्रो ११ मार्गिका नेमकी कशी आहे, प्रकल्पाची सद्यःस्थिती काय आणि या प्रकल्पामुळे ठाणेकरांना, मुंबईकरांना मेट्रोने गेट वे ऑफ इंडिया कसे गाठता येणार, याबाबत घेतलेला हा आढावा…

कशी आहे मेट्रो ११ मार्गिका?

मेट्रो ११ भुयारी मार्गिका वडाळ्यातील आणिक आगार – गेट वे ऑफ इंडिया अशी असणार आहे. या मार्गिकेची लांबी १७.५१ किमी असून या मार्गिकेत १४ मेट्रो स्थानकांचा समावेश आहे. या मार्गिकेवरील १४ पैकी १३ मेट्रो स्थानके भुयारी असून एक स्थानक जमिनीवर असणार आहे. आणिक आगार, वडाळा आगार, सीजीएस वसाहत, गणेश नगर, बीपीटी रुग्णालय, शिवडी, हे बंदर, दारुखाना, भायखळा, नागपाडा जंक्शन, भेंडी बाजार, सीएसएमटी, हाॅर्मिनल सर्कल आणि गेट वे ऑफ इंडिया या १४ मेट्रो स्थानकांचा त्यात समावेश आहे. ही मार्गिका सेवेत दाखल झाल्यास यावरून सहा डब्यांची मेट्रो ताशी ८० किमी वेगाने धावेल. या मार्गिकेवरून २०३१ मध्ये दिवसाला पाच लाख ८० हजार प्रवासी प्रवास करतील, असा अंदाज एमएमआरसीने व्यक्त केला आहे. या मार्गिकेवरील दैनंदिन प्रवासी संख्या २०५५ पर्यंत १० लाख १२ हजारांवर जाईल, असा दावा एमएमआरसीने केला आहे. या मार्गिकेतील कारशेड आणिक आगार आणि प्रतीक्षा नगर आगारातील १६ हेक्टर जागेवर प्रस्तावित करण्यात आली आहे. या मार्गिकेसाठी अंदाजे १६ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असून यात वाढ होण्याची शक्यता आहे.

वदर्ळीच्या भागांना जोडणारी मार्गिका

एमएमआरसीच्या नव्या संरेखनानुसार मेट्रो ११ मार्गिका आणिक आगार – गेट वे ऑफ इंडिया दरम्यान १७.५१ किमी लांबीची असणार आहे. ही मार्गिका मुंबई शहरातील दाट लोकसंख्येच्या, वर्दळीच्या अनेक भागांना जोडणार असून या मार्गिकेमुळे या भागात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा एक चांगला पर्याय उपलब्ध होणार आहे. शीव, वडाळा, शिवडी, भायखळा, भेंडी बाजार, नागपाडा, क्राॅफर्ड मार्केट हे परिसर वर्दळीचे असून या परिसरात वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर आहे. तसेच ही मार्गिका जात असलेला परिसर कोणत्याही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने थेट जोडलेला नाही. पण भविष्यात या परिसरातून भुयारी मेट्रो धावणार असून तेथील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटू शकणार आहे. त्याचबरोबर या परिसराला वेगळे महत्त्व प्राप्त होईल, असा दावा यानिमित्ताने केला जात आहे.

प्रकल्पाची सद्यःस्थिती

राज्य सरकारने मेट्रो ११ मार्गिकेला हिरवा कंदिल दाखवल्यास याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील कार्यवाही होणार आहे. मात्र यादरम्यान एमएमआरसीने इतर कामे मार्गी लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी एमएमआरसीने या प्रकल्पासंबंधीच्या संरेखन, आराखडा, पर्यावरणीय आणि सामाजिक प्रभाव मूल्यांकन अहवालावर नागरिकांकडून सूचना-हरकती नोंदवून घेण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. त्यानुसार नागरिक, संस्था, पर्यावरणप्रेमी, स्थानिकांना २० ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत townplanningassist@mmecl.com या ई – मेल आयडीवर सूचना-हरकती नोंदविता येणार आहेत. तर वांद्रे – कुर्ला संकुलातील एमएमआरसीच्या मुख्यालयात संचालक, नियोजन व रिअल इस्टेट विकास यांच्याकडेही सूचना-हरकती सादर करता येणार आहेत. या सूचना-हरकती सादर झाल्यानंतर त्यावर सार्वजनिक सुनावणी घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. सूचना-हरकती नोंदविण्यासाठी संबंधिताना संरेखन, आराखडा आणि अहवाल एमएमआरसीच्या संकेतस्थळावरील https://corporate.mmrcl,com/corporate/pages/projects-reports-dcouments या लिंकवर उपलब्ध करण्यात आला आहे. जन सूनवाणी आणि प्रस्ताव मंजुरीची प्रक्रिया पार पडल्यानंतर मेट्रो ११ मार्गिकेच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार आहे. यासाठी काही वेळ लागणार असला तरी एमएमआरसीने मेट्रो ३ मार्गिकेचे काम पूर्ण झाल्यानंतर तात्काळ या मार्गिकेच्या कामाला वेग देण्याचे नियोजन केले आहे.

झाडांवर कुऱ्हाड? बांधकामांवर हातोडा?

एमएमआरसीच्या मेट्रो ११ च्या अहवालानुसार मेट्रो स्थानक, कारशेड, लाॅन्चिंग शाफ्ट अशा विविध कामांसाठी १७.५१ किमी दरम्यानची २ हजार २०० हून अधिक झाडे बाधित होणार आहेत. यापैकी काही झाडे कापावी लागणार असून काही झाडे पुनर्रोपित केली जाण्याची शक्यता आहे. स्थानकांच्या प्रवेशद्वारासाठी आणि आणिक आगार येथील कारशेडसाठी सर्वाधिक झाडे कापली जाण्याची शक्यता आहे. बाधित होणाऱ्या झाडांच्या बदल्यात एमएमआरसीकडून नियमानुसार वृक्षारोपण, वनीकरण आणि पुनर्रोपण केले जाणार आहे. तर मेट्रो ११ मार्गिकेसाठी २,०३,५२७ चौ. मीटरपैकी काही जागा कायमस्वरूपी, तर काही जागा तात्पुरती संपादित करावी लागणार आहे. यापैकी २३,५०० चौ. मीटर जागा खासगी आहे. मेट्रो ११ प्रकल्पासाठी पर्यावरणीय मंजुरीची आवश्यकता नसली तरी ही मार्गिका सीआरझेड क्षेत्रातून जात असल्याने सीआरझेडशी संबंधित मंजुरी घेणे आवश्यक असणार आहे. मेट्रो ११ मार्गिकेत २ हजार २०० हून अधिक झाडांबरोबरच ७९६ बांधकामेही बाधित होणार आहेत.

कारशेडसाठी आणिक आगार येथील १५५ बांधकामे, वडाळा आगार स्थानकासाठी ३२४ बांधकामे, गणेशनगर स्थानकांसाठी १ बांधकाम, शिवडी स्थानकासाठी ६ बांधकामे, हे बंदर स्थानकासाठी ४ बांधकामे, दारुखाना स्थानकासाठी १ बांधकाम, भायखळा स्थानकासाठी १२ बांधकामे, नागपडा स्थानकासाठी ९३ बांधकामे, भेंडीबाजार स्थानकासाठी २०५ बांधकामे अशी एकूण ७९६ बांधकामे मेट्रो ११ साठी बाधित होत आहेत. यापैकी ५९० बांधकामे निवासी असून उर्वरित अनिवासी बांधकामे आहेत. या बाधित होणाऱ्या बांधकामाअंतर्गत ८०१ कुटुंबे बाधित होणार आहेत. दरम्यान, बाधित बांधकामांमध्ये चार प्रार्थनास्थळांचाही समावेश आहे. यात दोन जैन मंदिरे, एक हनुमान मंदिर आणि एका बौद्ध विहाराचा समावेश आहे. भेंडी बाजार येथील बाधित होणारी दोन जैन मंदिरे २०० वर्षे जुनी आहेत. त्यामुळे प्रार्थनास्थळे, बांधकामे विस्थापित करण्यासह २ हजार २०० हून अधिक झाडे कापणे, पुनर्रोपित करण्याचे मोठे आव्हान एमएमआरसीसमोर आहे.

ठाणेकरांनाही उपयुक्त?

मेट्रो ११ मार्गिका पूर्ण होऊन वाहतूक सेवेत दाखल झाल्यास वडाळ्यावरून मुंबईकरांना भुयारी मेट्रोने गेट वे ऑफ इंडियाला अतिजलद जाता येणार आहे. नागपाडा, क्राॅफर्ड मार्केट, शीव, भायखळा येथूनही भुयारी मेट्रोने गेट वेला जात येणार आहे. पर्यटकांना आजघडीला चर्चगेट रेल्वे स्थानक वा सीएसएमटी रेल्वे स्थानकात उतरून रस्ते मार्गे बेस्ट बस वा टॅक्सीने गेट वे ऑफ इंडियाला जावे लागते. पण यापुढे मात्र भुयारी मेट्रोने गेट वे ऑफ इंडियाला जाता येणार आहे. केवळ मुंबईकरांनाच नव्हे तर ठाणेकरांनाही मेट्रोने गेट वे ऑफ इंडियाला जाता येणार आहे. वडाळा – ठाणे – कासारवडवली मेट्रो ४ आणि कासारवडवली – गायमुख मेट्रो ४ अ मार्गिकेने ठाणे – वडाळा उन्नत मेट्रोने प्रवास करून पुढे वडाळ्यावरून, आणिक आगार येथून भुयारी मेट्रोने गेट वे ऑफ इंडियाला जात येणार आहे.