मुंबईकरांसाठी शुक्रवारची सकाळ थोडी आश्चर्यकारक ठरली. एकीकडे मुंबईकरांना थंडीची चाहूल लागली असतानाच दुसरीकडे आज सकाळी पावसाने हजेरी लावली. मुंबईत अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. दादर, माटुंगा, माहिम वडाळा भागात पावसाने हजेरी लावल्याचं पहायला मिळालं. दरम्यान मुंबईत एक ते दोन दिवसांत ढगाळ वातावरण निवळण्याची शक्यता आहे अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान विभागाच्या शुभांगी भुते यांनी गुरुवारी दिली होती. डिसेंबरमध्ये पाऊस पडत असल्याने मुंबईकरांनी आश्चर्य व्यक्त केलं असलं तरी असं नेमक कशामुळे होत आहे याची चर्चाही सोशल नेटवर्किंगवर रंगली आहे. याच डिसेंबरमधील पावसाळ्यामागील कारण आपण या लेखात जाणून घेणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नक्की वाचा >> मुंबईत ऐन थंडीत पावसाची हजेरी

पाऊस कुठे, कशामुळे?

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण झालं असून थंडी पुन्हा गायब झाली आहे. पुढील दोन ते तीन दिवस प्रामुख्याने मध्य महाराष्ट्रात आणि कोकणात काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने यापूर्वीच व्यक्त केली होती.

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने काही दिवसांपूर्वीच हवामान विभागाने मुंबई आणि परिसरामध्ये पावसाची शक्यता वर्तविली होती. अरबी समुद्राच्या दक्षिण- पश्चिम भागामध्ये सध्या कमी दाबाचे क्षेत्र आहे. त्यामुळे राज्याच्या दिशेने बाष्पाचा पुरवठा होऊन थंड वाऱ्यांना अडथळा निर्माण झाला आहे. परिणामी बहुतांश भागातून थंडी गायब झाली आहे. या बदलांमुळे मध्य महाराष्ट्र आणि कोकणात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज असून, बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार आहे. ११ आणि १२ डिसेंबरला मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. १० डिसेंबरला कोकणात तुरळक ठिकाणी, तर १३ डिसेंबरला विदर्भात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे.

बाकी महाराष्ट्रात काय परिस्थिती?

समुद्रातील चक्रीवादळांच्या मालिकांमुळे नोव्हेंबर कडाक्याच्या थंडीविना गेला. कोरडे हवामान आणि उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रवाहांमुळे डिसेंबरच्या सुरुवातीपासून रात्रीच्या किमान तापमानात काही प्रमाणात घट नोंदविली जात होती. गेल्या आठवडय़ाच्या शेवटी राज्यात जवळपास सर्वच ठिकाणी किमान तापमान सरासरीखाली गेल्याने थंडी अवतरली होती. कोकण विभागात मुंबईचा पाराही घसरला होता. मध्य महाराष्ट्रात पुणे, नाशिक, सातारा, सोलापूर आदी भागांतही चांगलाच गारवा होता. मराठवाडा आणि विदर्भातही थंडी होती.

ढगाळ वातावरणामुळे जवळपास सर्वच भागांमध्ये किमान तापमानात वाढ होऊन ते काही प्रमाणात सरासरीपुढे गेले आहे. मध्य महाराष्ट्रातील किमान तापमान किमान तापमान सरासरीच्या तुलनेत २ ते ५ अंशांनी वाढल्याने थंडी गायब झाली आहे. कोकण विभाग आणि मराठवाडय़ातही ते सरासरीपेक्षा १ ते ३ अंशांनी अधिक आहे. विदर्भातील किमान तापमान सरासरीच्या आसपास असल्याने तेथे काही प्रमाणात गारवा आहे.

 

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai why its raining in december scsg
First published on: 11-12-2020 at 10:44 IST