करोना विषाणूच्या बीए.२.८६ (BA.2.86) या नव्या प्रकारामुळे जगातील अनेक देशांमध्ये करोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढत असल्याचे ‘येल मेडिसिन रिव्ह्यू’ यांनी (दि. ३१ ऑगस्ट) प्रकाशित केलेल्या अहवालातून समोर आले आहे. करोना विषाणूच्या या नव्या प्रकाराला ‘पिरोला’ असे नाव देण्यात आले आहे. करोनाच्या नव्या प्रकाराचा संसर्ग इतर प्रकारांपेक्षा अधिक वेगाने होतो का? हे आताच ठरविता येणार नसल्याचे या अहवालात म्हटले असले तरी त्याच्यामुळे काळजी करण्याचे कारण असू शकते, असेही नमूद केले आहे. “अमेरिकेत प्रबळ असलेल्या ओमायक्रॉनचा उपप्रकार असलेल्या एक्सबीबी १.५ (XBB.1.5) च्या तुलनेत पिरोला या प्रकाराच्या टोकदार प्रथिनाची (spike protein) ३० हून अधिक उत्परिवर्तने आहेत”, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. करोना विषाणू ज्या पद्धतीने मानवी पेशीमध्ये प्रवेश करतो, त्याला स्पाइक प्रोटिन म्हणतात.

‘पिरोला’ करोना विषाणू काय आहे?

अमेरिका, यूके आणि इतर देशांमध्ये एकमेकांशी संबंधित नसलेल्या प्रकरणांमध्ये पिरोलाचे अस्तित्व आढळून आले आहे. येल मेडिसिन संसर्गजन्य रोगांचे तज्ज्ञ स्कॉट रॉबर्ट्स यांच्या मते, उत्परिवर्तनांची (Mutations) अधिक संख्या ही चिंतेची बाब आहे. करोना संसर्गाच्या सुरुवातीच्या प्रकारांपैकी एक असलेला ‘डेल्टा’ आणि त्यानंतर ओमायक्रॉन (२०२१ च्या हिवाळ्यात प्रबळ झालेला) यांच्यातील बदललेल्या उत्परिवर्तनांच्या संख्येशी त्याचे साधर्म्य आहे का? याचा रॉबर्ट्स यांनी अहवालात उल्लेख केला आहे.

हे वाचा >> विश्लेषण : ओमायक्रॉनची उत्परिवर्तने..

रॉबर्ट्स पुढे म्हणाले की, एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत श्वासोच्छवासाद्वारे विषाणू पसरतो आणि कालांतराने हळूहळू विकसित होत जातो. डेल्टा ते ओमिक्रॉनपर्यंत झालेले मोठे बदल चिंताजनक होते, हे आपण याआधी पाहिलेले आहे. सध्याच्या घडीला आणखी चिंताजनक बाब म्हणजे नव्या उपप्रकाराचे अस्तित्व किमान सहा देशांमध्ये आढळून आले आहे. हे प्रकरण एकमेकांशी संबंधित नसल्यामुळे आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये काही प्रमाणात झालेला हा प्रसार आपल्याला शोधता आलेला नाही, हे यातून दिसून येते.

विषाणूचे उत्परिवर्तन किंवा नव्या रुपात कसे येतात?

सर्व प्रकारच्या विषाणूंमध्ये कालांतराने उत्परिवर्तन होणे ही नैसर्गिक आणि स्वाभाविक प्रक्रिया आहे. विशेषतः आरएनए (RNA) असलेल्या विषाणूमध्ये असे बदल सामान्य असतात. करोना आणि इन्फ्लूएंझा विषाणूच्या बाबतीत हे बदल आपण पाहिले. विषाणूने मानवी शरीरात प्रवेश केल्यानंतर त्याचे विषाणूची अनुवांशिक माहिती असलेले आरएनए किंवा डीएनए हे स्वतःच्या प्रती बनविण्यास सुरुवात करतात. विषाणू जेव्हा त्याचे लक्ष्य असलेल्या पेशीत शिरतो, तेव्हा तो त्या पेशींच्या सर्व जैव रासायनिक क्रियांचा ताबा घेऊन विषाणूंना लागणारे रेणू तयार होतात, त्यापासून विषाणूचे शेकडो नवे कण तयार होतात; ज्यामुळे इतर पेशींना संसर्ग होण्याची शक्यता असते. तसेच या प्रक्रियेत एखादी त्रुटी निर्माण झाल्यास त्यातून विषाणूचे उत्परिवर्तन होण्यास चालना मिळते.

आणखी वाचा >> विज्ञान : विषाणूंचे आगर वटवाघूळ

स्वतःचे रेणू तयार करत असताना निर्माण झालेल्या त्रुटी विषाणूसाठीच फायदेशीर ठरतात, कारण त्यातून उत्परिवर्तन घडते. ज्यामुळे विषाणूला स्वतःचे कण तयार करणे आणि मानवी पेशींमध्ये शिरणे सहज शक्य होते. जेव्हा एखादा विषाणू लोकसंख्येमध्ये मोठ्या प्रमाणात पसरतो तेव्हा त्याची उत्परिवर्तन होण्याची शक्यता आणखी वाढते.

‘पिरोला’ वेगळा कसा?

येल स्कूल ऑफ मेडिसिनच्या येल सार्स-कोव्ह-२ (SARS-CoV-2) या विषाणूच्या रचनात्मक बदलांचे पर्यवेक्षण करणाऱ्या पोस्टडॉक्टरल (पीएचडीनंतरचा संशोधनासंबंधीचा उच्च दर्जाचा अभ्यास) सहयोगी ॲन हान म्हणाल्या की, एक्सबीबी १.९ (XBB.1.9) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ओमिक्रॉन विषाणूच्या उपप्रकाराशी तुलना केल्यानंतर लक्षात येते की, हा अतिशय वेगळ्या प्रकारचा विषाणू आहे. आधीचा उपप्रकार (XBB.1.9) मोठ्या वेगाने पसरला. मात्र, त्याचा लोकसंख्येवर फार गंभीर परिणाम दिसला नाही.

‘येल मेडिसिन रिव्ह्यू’च्या अहवालात पुढे म्हटले की, इस्रायल आणि डेन्मार्कमध्ये विषाणू पर्यवेक्षण करणाऱ्या प्रयोगशाळांमध्येही याचे अस्तित्व आढळून आले आहे. त्यानंतर इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि युनायटेड स्टेट्समधील प्रयोगशाळेनेही त्याला दुजोरा दिला.

फॉर्च्यून (मासिक) च्या मतानुसार, स्वीडनमधील कारोलिन्स्का इन्स्टिट्यूटचे संशोधक बेन मुर्रेल यांनी शुक्रवारी (दि. १ सप्टेंबर) ट्विटरवर एक डेटा प्रसिद्ध केला, ज्यामध्ये त्यांनी काही रक्त चाचण्यांचा हवाला देऊन सांगितले की, बीए.२.८६ (BA.2.86) विषाणू प्रकाराला निष्प्रभ करता येते, हे या चाचण्यांतून दिसून आले आहे.

हे वाचा >> ओमायक्रॉनचे उत्परिवर्तन अधिक घातक, अधिक गंभीर?

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) म्हणण्यानुसार, या नव्या विषाणूच्या प्रकारामुळे आतापर्यंत एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. फॉर्च्यून मासिकाच्या बातमीनुसार, मागच्या आठवड्यात युरोपमध्ये एका वृद्ध व्यक्तीला या विषाणूची लागण झाली होती, ज्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मागच्या काही आठवड्यात अमेरिकेत करोना रुग्णांमध्ये वाढ पाहायला मिळाली होती, ती रुग्णवाढ एरिस (एक्सबीबी १.९) या विषाणूच्या प्रकारामुळे झाली होती.

या नव्या प्रकाराविरोधात कोणती खबरदारी घ्यावी?

रॉबर्ट्स यांनी अमेरिकेच्या साथ रोग नियंत्रण आणि प्रतिबंध (CDC) च्या प्राथमिक अहवालाचा हवाला देताना सांगितले की, पिरोला विषाणूमुळे गंभीर आजार, मृत्यू किंवा रुग्णालयात दाखल होण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते की नाही, हे आताच स्पष्ट करणे कठीण आहे किंवा त्यासाठी हातात पुरेसे पुरावे नाहीत. “हा विषाणू कितपत संक्रमित करू शकतो किंवा किती वेगाने पसरू शकतो, याबाबत आताच माहिती देता येणार नाही. काही आठवडे निरीक्षण केल्यानंतर याबाबत ठामपणे बोलता येईल”, असेही रॉबर्ट्स यांनी सांगितले असल्याचे द इंडियन एक्सप्रेसने त्यांच्या लेखात नमूद केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मात्र, हे सांगत असताना रॉबर्टस यांनी सावधानतेचा इशाराही दिला आहे. या नव्या प्रकारच्या विषाणूच्या मुळाशी जुनाच विषाणू असल्यामुळे त्यापासून वाचण्यासाठी जुन्याच पद्धतींचा अवलंब करावा लागेल. मास्क वापरणे, लसीकरण करणे, हात स्वच्छ धुणे आणि लोकांमध्ये मिसळून संसर्ग होणार नाही, याची काळजी घेणे; असे जुनेच पर्याय सध्या अमलात आणता येऊ शकतात.