Deadlier Fatty Liver फॅटी लिव्हर हा आजार जीवनशैलीशी संबंधित आहे. गेल्या काही वर्षांत यकृताशी संबंधित समस्या निर्माण होण्याचे प्रमाण वाढले आहे. यकृतामध्ये अडचणी निर्माण होण्याचे आणि यकृत खराब होण्याचे प्रमुख कारण मद्यसेवन असल्याचे मानले जाते. परंतु, आपल्या दैनंदिन जीवनातीलही असे अनेक घटक आहेत, जे यकृतामध्ये समस्या निर्माण करण्यास कारणीभूत ठरत आहेत. अनेकांना असे वाटते की, मधुमेह असणाऱ्यांना फॅटी लिव्हरचा सर्वाधिक धोका असतो. परंतु, नवीन अभ्यासात याविषयी धक्कादायक आणि महत्त्वाची माहिती उघड झाली आहे. नव्या अभ्यासातून नक्की काय समोर आले? कोणाला फॅटी लिव्हरचा सर्वाधिक धोका? सविस्तर समजून घेऊयात…
फॅटी लिव्हर आजारामुळे होणाऱ्या मृत्यूस कारणीभूत काय?
युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्निया येथील वैज्ञानिकांनी जागतिक स्तरावर सर्वात सामान्य असलेल्या ‘मेटाबॉलिक डिसफंक्शन-असोसिएटेड स्टीएटोटिक लिव्हर डिसीज’ (MASLD)मुळे होणाऱ्या मृत्यूंसाठी उच्च रक्तदाब कारणीभूत असल्याचे स्पष्ट केले आहे. जागतिक लोकसंख्येपैकी एक तृतीयांशाहून अधिक लोकांना प्रभावित करणारा MASLD हा आजार अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिला आहे, परंतु हे नवीन संशोधन याच्या गंभीर धोक्यांकडे लक्ष वेधत आहे.

केक मेडिसिन ऑफ यूएससीच्या संशोधकांनी ३० वर्षांहून अधिक कालावधीच्या आरोग्य डेटाचे विश्लेषण केले आहे आणि यातून हे आश्चर्यकारक सत्य समोर आले. MASLD असलेल्या लोकांसाठी मधुमेह नव्हे, तर उच्च रक्तदाब हा सर्वात मोठा प्राणघातक घटक आहे. ‘क्लिनिकल गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी अँड हेपॅटोलॉजी’मध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासानुसार, उच्च रक्तदाबामुळे मृत्यूचा धोका ४० टक्क्यांनी वाढतो, त्यानंतर मधुमेह (२५ टक्के) आणि ‘चांगले कोलेस्ट्रॉल’ (HDL) चे कमी प्रमाण (१५ टक्के) यांचा समावेश होतो. जास्त घनता असलेले (High-Density) लिपोप्रोटीन कोलेस्ट्रॉल (HDL) यालाच आपण सोप्या भाषेत चांगले कोलेस्ट्रॉल, असे म्हणतो. अभ्यासकांच्या मते हे एक असे संशोधन आहे, जे डॉक्टरांना फॅटी लिव्हरच्या उपचारांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यास आणि रुग्णांचे जीवन वाचविण्यात मदत करू शकते.
अभ्यासातील प्रमुख निष्कर्ष काय?
अभ्यासात खालील गोष्टी आढळल्या आहेत:
- उच्च रक्तदाब: यापैकी सर्वात धोकादायक, मृत्यूचे प्रमाण तब्बल ४० टक्क्यांनी वाढवतो.
- मधुमेह (टाईप २ किंवा प्रीडायबिटीस): मृत्यूचा धोका २५ टक्क्यांनी वाढवतो, जे आजवरच्या अंदाजांपेक्षा कमी आहे.
- कमी HDL कोलेस्ट्रॉल: याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते, तरीही यामुळे मृत्यूचा धोका १५ टक्क्यांनी वाढतो.
- लट्ठपणा/बीएमआय: हे पहिल्या तीन प्राणघातक घटकांमध्ये नसले, तरी याचाही धोका आहे. बीएमआय (BMI) जितका जास्त, तितका धोका अधिक असतो.
- इतर धोकादायक घटक: याव्यतिरिक्त तुम्हाला इतर आजार असल्यास मृत्यूचा धोका आणखी १५ टक्क्यांनी वाढतो.
या अभ्यासाचे प्रमुख लेखक डॉ. मॅथ्यू ड्युकेविच म्हणाले, “आतापर्यंत मधुमेह ही मुख्य समस्या मानली जात होती. पण, आम्हाला हे पाहून आश्चर्य वाटले की रक्तदाब हा त्याहूनही मोठा धोका आहे.” त्यांच्या मते, या चुकीच्या समजामुळे अनेक MASLD रुग्णांना आवश्यक असलेले योग्य उपचार मिळत नव्हते आणि म्हणूनच हा अभ्यास वैद्यकीय समुदायासाठी एक जागरूकतेचा इशारा आहे.
अभ्यासाच्या वरिष्ठ लेखिका डॉ. नोरा टेरॉल्ट यांचा विश्वास आहे की या निष्कर्षांमुळे MASLD च्या उपचारांच्या पद्धतीत बदल व्हायला हवा. “परिणाम काय आहेत हे जाणून घेतल्यास, आपण आपल्या प्रयत्नांवर अधिक लक्ष केंद्रित करू शकतो,” असे त्यांनी स्पष्ट केले. आता ही टीम MASLD रुग्णांसाठी असणारे धोके ओळखण्यासाठी, जनुकीय घटक (Genetics), मद्यपान (Alcohol Use) आणि आहार (Diet) यांचा अभ्यास करण्याची तयारी करत आहे.
MASLD म्हणजे काय?
MASLD म्हणजेच Metabolic Dysfunction–Associated Steatotic Liver Disease. यालाच पूर्वी लोक ‘नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज’ (NAFLD) म्हणत असत. या स्थितीत, यकृतामध्ये चरबी जमा होते आणि कालांतराने यामुळे गंभीर नुकसान होऊ शकते. मुख्य म्हणजे MASLD ही परिस्थिती अनेकदा इतर आरोग्य समस्यांबरोबर उद्भवते. त्यात लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, हाय ब्लड शुगर, कोलेस्ट्रॉलच्या समस्या इत्यादींचा समावेश होतो.
उच्च रक्तदाबाचा MASLD रुग्णांवर कसा परिणाम होतो?
उच्च रक्तदाब हा MASLD रुग्णांसाठी सर्वात धोकादायक घटक असल्याचे आढळले आहे, ज्यामुळे मृत्यूचा धोका टक्क्यांनी वाढतो. बहुतेक लोक मेटाबॉलिक (चयापचय) रोगांमध्ये मधुमेह हा मोठा धोका मानतात, परंतु या अभ्यासात उच्च रक्तदाब हा MASLD साठी सर्वात प्राणघातक असल्याचे समोर आले आहे. यापूर्वी बहुतेक डॉक्टर आणि रुग्णांनी रक्तातील साखर किंवा लठ्ठपणा नियंत्रित करण्यावर अधिक लक्ष केंद्रित केले होते. हा अभ्यास सूचित करतो की, किमान या यकृत रोगाने त्रस्त असलेल्या लोकांसाठी रक्तदाब नियंत्रणात ठेवणे हे सर्वाधिक महत्त्वाचे आहे. उच्च रक्तदाब तुमच्या रक्तवाहिन्यांवर ताण देतो, तुमच्या हृदयाचे कार्य वाढवतो आणि अवयवांना (यकृतासह) नुकसान पोहोचवू शकतो. ज्या व्यक्तींना यकृताशी संबंधित आजार आहे, त्यांच्यावर अतिरिक्त रक्तवाहिन्यांचा ताण पडल्यास स्थिती अधिक बिघडते.
मधुमेह किंवा प्रीडायबिटीस
दुसरा महत्त्वाचा धोकादायक घटक म्हणजे मधुमेह किंवा प्रीडायबिटीस. MASLD असलेल्या एखाद्या व्यक्तीला जर ग्लुकोज नियंत्रणाची समस्या असेल, तर त्यांच्या मृत्यूचा धोका सुमारे २५ टक्क्यांनी वाढतो. हा अजूनही एक मोठा धोका आहे. वाढलेली रक्त शर्करा पातळी, इन्सुलिन प्रतिरोध किंवा टाइप २ मधुमेह हे सर्व अनेक अवयवांवर ताण टाकतात. सर्वाधिक ताण स्वादुपिंड, मूत्रपिंड, हृदय आणि यकृतावर येतो. उच्च रक्तदाब आणि मधुमेहाव्यतिरिक्त, कमी HDL कोलेस्ट्रॉलचे प्रमाण आणि उच्च बीएमआय (BMI) देखील MASLD रुग्णांमध्ये मृत्यूचा धोका वाढवण्यास हातभार लावतात.