पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. त्यानंतर काही महिन्यांनी दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद आता डिजिटल वॉलेटचा वापर करून पैसे गोळा करत आहे. बँक खात्यांऐवजी जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरच्या कुटुंबातील सदस्यांना डिजिटल वॉलेटच्या माध्यमातून ही संघटना पैसे पाठवीत आहे.
भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर दहशतवादी गटांनी आता पैसे गोळा करण्याचा आणि त्यांचे नेटवर्क पुन्हा तयार करण्याचा एक नवीन मार्ग सापडला आहे. गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार, पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय आणि जैश-ए-मोहम्मद मोठ्या प्रमाणात डिजिटल वॉलेटमार्फत पैसा गोळा करण्याचा प्रयत्न करीत आहे. ७ मे रोजी भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबवून नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. या कारवाईत १०० हून अधिक दहशतवाद्यांचा नायनाट केला.
जैश-ए-मोहम्मद पैसे गोळा करण्यासाठी डिजिटल वॉलेटचा वापर कसा करतेय?
पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मदने पैसे गोळा करण्यासाठी डिजिटल वॉलेटचा वापर केला आहे. सीमेपलीकडील त्यांच्या तळांवर पुढच्या कुठल्याच भारतीय कारवाईचा होणारा परिणाम कमी करण्यासाठी ते पुन्हा त्यांचे नेटवर्क उभारत असल्याचे एका मीडिया रिपोर्टसमध्ये म्हटले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार द इकॉनॉमिक्स टाइम्सने सांगितले की, या गटाने लष्कर-ए-तैयबाने वापरलेल्या मॉडेलचे अनुकरण करून मरकझ किंवा धार्मिक केंद्रांचे विस्तृत नेटवर्क तयार करण्यासाठी ३.९ अब्ज रुपये किमतीची योजना तयार केली आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणांना या दहशतवादी गटांच्या हालचालींवर लक्ष ठेवता येऊ नये यासाठी त्यांनी ३१३ नव्या छावण्या तयार करण्याची योजना आखली आहे.
या योजनेसाठीचा पैसा जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहर यांच्या नातेवाईकांच्या डिजिटल वॉलेटमार्फत गोळा केला जात आहे. अशा किमान पाच वॉलेटमध्ये बंदी घातलेल्या गटांशी थेट संबंध असल्याचे यंत्रणांना आढळले आहे.
७ मे रोजी भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबवले आणि या कारवाईत जैशचा तळ, मरकझ सुभानल्लाह, मरकझ बिलाल, मरकझ अब्बास, महमोना झोया व सरगल या प्रशिक्षण शिबिरांसह अनेक ठिकाणे उद्ध्वस्त करण्यात आली. या कारवाईनंतर लगेचच पाकिस्तान सरकारने या ठिकाणांच्या पुनर्बांधणीसाठी आर्थिक मदत जाहीर केल्याचे वृत्तही आले आहे.
इंडिया टुडेने दिलेल्या गुप्तचर अहवालांनुसार, जैशने पाकिस्तानमध्ये ३१३ नवीन छावण्या बांधण्यासाठी ३.९१ अब्ज रुपये उभारण्यासाठी इझी पैशाच्या माध्यमातून ऑनलाइन पैसे गोळा करण्याची सुरुवात केली आहे. बँक खात्यांऐवजी हा पैसा देणग्यांच्या नावाखाली अझहरच्या कुटुंबीयांच्या डिजिटल वॉलेटमध्ये पाठवल्या जात आहेत. त्यामुळे पाकिस्तानला असा दावा करता येत आहे की, जैश-ए-मोहम्मदसाठी पैसे जमा करण्याचे प्रयत्न कमी करण्यात आले आहेत. मात्र, प्रत्यक्षात पैशाचा प्रवाह सुरूच आहे.
FATF सारख्या जागतिक वॉचडॉग्सकडून होणाऱ्या तपासण्या टाळण्यासाठी या पद्धतीचा वापर केला जात आहे. FATF फक्त बँकिंग व्यवहारांचा मागोवा घेऊ शकतात आणि कुटुंबाशी जोडलेल्या वॉलेटमधून हस्तांतरित केलेल्या पैशांवर कारवाई करू शकत नाही. या पैसे गोळा करण्याच्या योजनेचे नेतृत्व स्वत: अझहर करत आहे. गेल्या काही वर्षांत भारतात झालेल्या अनेक दहशतवादी हल्ल्यांमागे त्याचा हात आहे. त्याचा भाऊ तल्हा अल सैफ हा समर्थकांना देणगी देण्याचे आवाहन करतो. ऑनलाइन चॅनेल्सव्यतिरिक्त जैशचे नेते शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी मशिदींमध्ये पैसे गोळा करीत आहे असा अंदाज गुप्तचर यंत्रणांचा असल्याचे वृत्त इकॉनॉमिक्स टाइम्सने दिले आहे. गाझामधील मानवतावादी कार्यासाठी देणग्या असल्याचे चित्र ते उभे करत आहेत. मात्र, गुप्तचर अधिकाऱ्यांना अशी खात्री आहे की, हा पैसा जैशच्या कारवायांकडे वळवला जात आहे, असे अहवालात सांगितले आहे.
बहावलपूरमध्ये असलेली जैशची दीर्घकाळापासून संलग्न असलेली अल रहमत ट्रस्ट ही संस्थादेखील या पैसे गोळा करण्याच्या योजनेत महत्त्वाची भूमिका बजावते. अझहर आणि त्याच्या जवळच्या सहकाऱ्यांद्वारे चालवली जाणारी ही ट्रस्ट एका वेगळ्या बँक खात्यातून पैसे वळवत आहे.
पैसे कसे खर्च केले जात आहेत?
इकॉनॉमिक्स टाइम्सला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इझी पैसा आणि सदापे यांसारख्या वॉलेटचा वापर पैसे गोळा करण्यासाठी होत आहे. त्यामार्फत वॉलेट टू वॉलेट आणि वॉलेट-टू-कॅश ट्रान्सफर करता येते. अहवालानुसार, अझहरच्या कुटुंबातील सदस्य सात ते आठ वॉलेट्स चालवतात आणि दर चार महिन्यांनी ते बदलत असतात. एकदा का मोठी रक्कम जमा झाली की, ते पैसे लहान लहान रकमेत किंवा रोख स्वरूपात काढले जातात. दरमहा सुमारे ३० नवीन वॉलेट्स सुरू केली जातात. फेसबुक आणि व्हॉट्सअॅपसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जैश-ए-मोहम्मद आणि त्याच्या सदस्यांशी जोडलेल्या प्रॉक्सी अकाउंट्सद्वारे अपील केले जाते. पोस्टर्स, व्हिडीओ आणि मसूद अझहर स्वत: पत्र लिहून हे अपील करतो.
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, अपीलमध्ये ३१३ मरकझ उभारण्याची आणि प्रत्येक केंद्रासाठी १.२५ कोटी रुपये मागण्याची योजना आहे. ही मोहीम केवळ पाकिस्तानमधील लोकांसाठीच नाही, तर परदेशातील पाकिस्तानी आणि त्यांच्या समर्थकांसाठीदेखील आहे.
सध्या जैश-ए-मोहम्मदचा जवळपास ८० टक्के व्यवहार या वॉलेटद्वारे केले जातात. त्यांचा वार्षिक व्यवहार ८० ते ९० कोटी पाकिस्तानी रुपयांचा असल्याचा अंदाज आहे, असे अहवालात म्हटले आहे. त्यानंतर हे पैसे शस्त्रखरेदी, प्रशिक्षण सुविधा, दळणवळण व्यवस्था, वाहन खरेदी आणि मसूद अझहरच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी वापरले जातात. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या पैशातला मोठा वाटा आखाती राष्ट्रांकडूनही येतो.