Actor Pankaj Dheer Cancer Death बी. आर. चोप्रा यांच्या ‘महाभारत’मध्ये कर्णाची भूमिका साकारणारे प्रसिद्ध अभिनेते पंकज धीर यांचे कर्करोगाने निधन झाले आहे. पंकज धीर ६८ वर्षांचे होते. त्यांच्या दमदार अभिनय आणि मनमिळाऊ स्वभावासाठी ओळखले जाणारे धीर काही काळापासून कर्करोगाशी लढा देत होते. ‘एएनआय’च्या वृत्तानुसार, ते पूर्वी या आजारातून बरे झाले होते; परंतु त्यांना पुन्हा कर्करोगाचे निदान झाले. या स्थितीला ‘कॅन्सर रीकरेन्स’ म्हणजेच कर्करोगाचा पुनःप्रादुर्भाव, असे म्हणतात.

काही वेळा कर्करोगाच्या पेशी पुन्हा सक्रिय होण्यापूर्वी अनेक वर्षे शरीरात सुप्त अवस्थेत राहतात. कर्करोगाची ही छुपी बाजू समजून घेणे केवळ रुग्णांसाठीच नव्हे, तर आपल्या प्रत्येकासाठी महत्त्वाचे आहे. उपचारानंतर कर्करोग पुन्हा उद्भवण्याची कारणे काय? त्याविषयी तज्ज्ञ काय सांगतात? धोका कमी करण्यासाठी काय करावे? जाणून घेऊयात…

त्यांच्या दमदार अभिनय आणि मनमिळाऊ स्वभावासाठी ओळखले जाणारे धीर काही काळापासून कर्करोगाशी लढा देत होते. (छायाचित्र-लोकसत्ता संग्रहित)

कर्करोग पुन्हा उद्भवणे सामान्य आहे का?

  • ‘सायन्स डायरेक्ट’मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासातून असे दिसून येते की, पुनरावृत्तीचा दर कर्करोगाचा प्रकार आणि अवस्था यांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असतो.
  • उदाहरणार्थ- स्तनाच्या कर्करोगाची (Breast Cancer) १० वर्षांच्या आत परत येण्याची शक्यता २० ते ३० टक्के असते; तर कोलोरेक्टल (Colorectal) आणि फुप्फसाच्या कर्करोगाची (Lung Cancer) लवकर तपासणी न झाल्यास पुनरावृत्तीची शक्यता अधिक असू शकते.
  • यशस्वी उपचारानंतरही कर्करोगाच्या काही पेशी शरीरात सुप्त अवस्थेत राहू शकतात. या पेशी नंतर वाढू शकतात, विशेषतः जेव्हा शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते किंवा इतर आरोग्य घटक अडथळा आणतात, तेव्हा याचा धोका आणखी वाढतो, असे ‘द टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तात नमूद करण्यात आले आहे.

कर्करोग पुन्हा उदभवण्याची कारणे काय?

कर्करोग हा एक जटिल रोग आहे. तज्ज्ञ सांगतात की, कर्करोगाच्या काही पेशी केमोथेरपी किंवा रेडिएशननंतरही जिवंत राहतात. या पेशी रोग पुन्हा सक्रिय करण्यापूर्वी अनेक महिने किंवा अनेक वर्षे निष्क्रिय अवस्थेत राहू शकतात. पुनरावृत्तीचा अंदाज बांधणे अवघड असते. कर्करोग पुन्हा उद्भवण्याची शक्यता आनुवंशिकता, वय, गाठीची आक्रमकता आणि उपचारानंतरची जीवनशैली यांसह अनेक घटकांवर अवलंबून असते. ‘एनआयएच ‘च्या संशोधनातून असेही दिसून आले आहे की, तणाव संप्रेरके (Stress Hormones), दाह (Chronic Inflammation) व झोपेची गुणवत्ता सुप्त कर्करोगाच्या पेशींच्या जगण्याला अप्रत्यक्षपणे मदत करू शकतात.

नियमित पाठपुरावा, वेळेवर स्कॅनिंग व रक्त तपासणी या बाबी कर्करोगाच्या पुन:प्रादुर्भावाची सुरुवातीची चिन्हे ओळखण्यास मदत करतात. मजबूत रोगप्रतिकार शक्ती राखणे यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट (एनसीआय)च्या अभ्यासानुसार, कर्करोगमुक्त झालेले जे लोक शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहतात आणि सकस आहार घेतात, त्यांना कर्करोगाच्या पुन:प्रादुर्भावाचा धोका कमी असतो.

जीवनशैलीचा आरोग्यावर परिणाम

पालेभाज्या आणि हळद यांसारख्या अँटीऑक्सिडंट्सनी समृद्ध अन्न, दाह आणि ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करण्यास मदत करतात. मध्यम स्वरूपाचा व्यायाम रक्ताभिसरण सुधारतो आणि पेशींची दुरुस्ती अधिक कार्यक्षमतेने करण्यास शरीराला मदत करतो. त्यात भावनिक आरोग्यदेखील महत्त्वाचे आहे. योग, लिखाण यांसारख्या सवयी तणाव संप्रेरकांना (Stress Hormones) संतुलित करतात. या सप्रेरकांचा संबंध अनेकदा रोग वाढण्याशी जोडलेला असतो.

कर्करोग पुन्हा उद्भवण्याविषयी आरोग्य तज्ज्ञ काय सांगतात?

द मेडिसिटी येथील कॅन्सर इन्स्टिट्यूट मेदांतामध्ये रेडिएशन ऑन्कोलॉजीच्या अध्यक्षा डॉ. तेजिंदर कटारिया यांनी ‘दी इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले की, उपचारानंतरच्या पहिल्या दोन वर्षांत पुन:प्रादुर्भावाचा धोका सर्वांत जास्त असतो. स्टेज १ व २ मधील कर्करोग ८० ते ९० टक्क्यांपर्यंत बरे होऊ शकतात. अशा प्रकरणांमध्ये कर्करोग पुन्हा उफाळून येण्याची शक्यता २० टक्क्यांहून कमी असते.

स्टेज ३ सारख्या प्रगत अवस्थेत रुग्णांना ६५ ते ७० टक्के बरे होण्याची आणि ३० टक्के गाठ परत येण्याची शक्यता असते. स्टेज ४ मध्ये कर्करोग पुन्हा डोके वर काढण्याची शक्यता जवळपास ६० ते ७० टक्के असते. हा धोका पहिल्या दोन वर्षांत सर्वाधिक असतो. दोन ते पाच वर्षांदरम्यान कर्करोग परत होण्याचे प्रमाण पूर्वीच्या धोक्याच्या दरापेक्षा सुमारे ५० टक्क्यांनी कमी होते. पाच वर्षांनंतर ते प्रमाण आणखी ५० टक्क्यांनी कमी होते. त्यामुळे जी व्यक्ती एकदा कर्करोग झाल्यानंतर तो होण्यापासून पाच वर्षे मुक्त राहते, त्याला सामान्यतः कर्करोगमुक्त मानले जाते. अशा व्यक्तींना आयुष्यभरात कर्करोग परत येण्याची शक्यता पाच ते सात टक्के असते, असे डॉ. कटारिया म्हणाले.

कर्करोगाच्या पुन:प्रादुर्भावाचे प्रकार कोणते आहेत?

अमेरिकन कॅन्सर सोसायटी स्पष्टपणे कर्करोग पुन्हा उद्भवण्याच्या तीन प्रकारांचा उल्लेख करते: स्थानिक, प्रादेशिक व दूरस्थ. स्थानिक म्हणजे कर्करोग जिथे पूर्वी आढळला होता, त्याच ठिकाणी परत येणे. प्रादेशिक म्हणजे कर्करोग मूळ ठिकाणाजवळच्या लसिका गाठींमध्ये (लिंफ नोड्स) परत येणे. दूरस्थ म्हणजे कर्करोग मूलतः जिथे सुरू झाला होता, त्यापासून दूर असलेल्या शरीराच्या इतर कोणत्याही भागात पुन्हा परतणे.

कर्करोग पुन्हा होऊ नये यासाठी काय करावे?

कर्करोग पुन्हा उद्भवू नये याची गुरुकिल्ली म्हणजे स्वतःची रोगप्रतिकार शक्ती वाढवणे. डॉ. कटारिया यांनी कर्करोग पुन्हा परत होण्यापासून रोखण्यासाठी खालील बाबी सुचवल्या आहेत:

  • उत्तम पोषण : तुमच्या आहारात फळे आणि भाज्यांचा समावेश किमान ५० टक्के असावा. हे खाद्यपदार्थ सूक्ष्म पोषक तत्त्वांचा (micronutrients) चांगला स्रोत आहेत, जे शरीराला कर्करोगाशी लढण्यास मदत करू शकतात.
  • व्यायाम : व्यायामामुळे रक्तभिसरण आणि चयापचय सुधारते. व्यायामामध्ये योग आणि ध्यान यांचाही समावेश होतो, जो शरीरातील ऑक्सिजनची पातळी सुधारण्यासाठी फायदेशीर ठरतो. त्यामुळे हायपोक्सिया (उतींमध्ये शरीराचे कार्य टिकवून ठेवण्यासाठी ऑक्सिजनची कमतरता) ही स्थिती टाळता येते. ही स्थिती कर्करोगाच्या वाढीस कारणीभूत ठरू शकते.
  • तणाव व्यवस्थापित करणे : योग हा तणाव कमी करण्यास आणि आत्मविश्वास वाढविण्यातदेखील मदत करू शकतो आणि कर्करोग पुन्हा उद्भवण्याचा धोका कमी करू शकतो.
  • शरीराचे वजन व्यवस्थापित करणे : कर्करोगमुक्त झालेले रुग्ण, जे लठ्ठ असतात त्यांना इतरांच्या तुलनेत कर्करोगाचा धोका जास्त असतो. योग्य आहार आणि शारीरिक व्यायामाने तुम्ही हे साध्य करू शकता.