PM Modi Recalls Manipur’s Role in India’s Freedom Struggle: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी मणीपूरचा दौरा केला. या दौर्यादरम्यान मणिपूरचा उल्लेख करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी मणिपूरचा उल्लेख भारताच्या स्वातंत्र्याचे द्वार असा केला होता. त्याच पार्श्वभूमीवर मणिपूरचे ऐतिहासिक संदर्भ नेमकं काय सांगतात, याचाच घेतलेला हा आढावा.
दुसरं महायुद्ध आणि भारत
दुसर्या महायुद्धाने जगाचा इतिहासच बदलून टाकला. या कालखंडात भारतीय सैन्याचं योगदान मित्र राष्ट्रांच्या (Allies) विजयात अत्यंत महत्त्वाचं होतं. मात्र, थेट भारताच्या भूमीवर दुसरं महायुद्ध लढलं गेलं नव्हतं. परंतु, भारताच्या दोन भूभागांचा संबंध आला होता. त्यापैकी एक भाग म्हणजे अंदमान -निकोबार बेटे. जपानने १९४२ साली ब्रिटीशांबरोबर कोणतीही लढाई करता ही बेटे ताब्यात घेतली होती आणि १९४५ पर्यंत हा भूभाग त्यांच्याच ताब्यात होता. दूसरा भूभाग म्हणजे ईशान्य भारत. महायुद्धातील सर्वात भीषण लढाया या भागात झाल्या, असे युद्धतज्ज्ञ मानतात.
१९४२ साली फेब्रुवारी महिन्यात जपानने सिंगापूर जिंकून घेतले, तर मे महिन्यापर्यंत बर्माचाही मोठा भाग ताब्यात घेतला. त्यामुळे जपानी सैन्याची ताकद थेट भारताच्या उंबरठ्यापाशी येऊन पोहोचली होती. भारत हा ब्रिटिशांच्या महत्त्वाच्या वसाहतींपैकी एक होता. भारताकडून मित्रराष्ट्रांना केवळ रसद पुरवली जात नव्हती. तर, सैनिक, साधनसामग्री आणि आर्थिक मदत देण्यातही भारताने निर्णायक भूमिका बजावली होती. म्हणूनच, दोन्ही युद्धात भारतामुळेच ब्रिटन युद्धं जिंकू शकलं, असं विधान भारताचे तत्कालीन सरसेनापती फील्ड मार्शल सर क्लॉड ऑकिनलेक यांनी केलं होतं.
इंफाळचं महत्त्व
त्या काळी लेफ्टनंट जनरल असलेले व्हिस्काउंट विल्यम ‘बिल’ स्लिम हे ब्रिटिशांच्या १४ व्या सैन्याचे प्रमुख होते. ईशान्य भारताचं रक्षण करणं आणि पुन्हा बर्मा जिंकणं ही जबाबदारी त्यांच्यावर होती. सुरुवातीपासूनच त्यांनी इंफाळचं महत्त्व ओळखलं होतं. आपल्या आत्मकथेत ‘Defeat into Victory (१९५६)’ मध्ये स्लिम यांनी लिहिलं आहे की, “इंफाळचं सपाट मैदान हे सुमारे ४० बाय २० मैलांचं एकमेव मोठं पठार आहे, जे भारत आणि बर्मा यांच्या दरम्यान पसरलेल्या डोंगराळ भागात आढळतं. हे मैदान ब्रह्मपुत्र खोरे आणि बर्माच्या मध्यवर्ती मैदानाच्या जवळपास मध्यावर आहे. त्यामुळे भारत आणि बर्मा यांच्यामधील मोठ्या लष्करी मोहिमेसाठी ते एक नैसर्गिक थांबा ठरते.”
१९४२ ते १९४४ दरम्यान इंफाळ मित्र राष्ट्रांचा (Allies) सर्वात महत्त्वाचा तळ ठरला होता. इथूनच चीनचे नेता च्यांग काई-शेक यांच्या सैन्याला रसद पुरवली जात होती, जे आपल्या देशात जपानशी लढत होते. ब्रिटिशांनीही इंफाळवरून अराकान खोऱ्यात अनेक मोहिमा केल्या. १९४४ साली बर्मावर पूर्ण लष्करी आक्रमण करण्याची योजना होती. परंतु, १९४४ मध्ये मार्च महिन्यात जपानच्या १५ व्या सैन्याने ईशान्य भारतावर आक्रमण सुरू केलं. हे आक्रमण दोन्ही बाजूंनी केलं गेलं आणि त्याचा अंतिम उद्देश इंफाळ ताब्यात घेणं हाच होता.
कोहिमा आणि इंफाळवरील हल्ला
कोहिमा या शहरावर जपान हल्ला करणार होते. कोहिमा फार महत्त्वाचं नव्हतं, पण ते डिमापूर–इंफाळ रस्त्यावर होतं. हा रस्ता तोडला गेला, तर इंफाळला रसद पोहोचवणं फार अवघड झालं असतं. दुसरा हल्ला थेट इंफाळवर होणार होता. इंफाळ जिंकलं असतं तर जपानला चीनला जाणाऱ्या हवाई रसद पुरवठ्यावर अडथळा आणता आला असता.
बोस यांच्या आयएनएची भूमिका
ब्रिटिश १४ व्या सैन्याबरोबर आणि जपानी १५ व्या सैन्याबरोबर आणखी एक घटक या लढायांमध्ये होता. तो म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखालील आझाद हिंद सेनेचा (INA).
जपानी सैन्याच्या तुलनेत INA चे सैन्य खूपच कमी होतं, फक्त ६,००० सैनिक INA मध्ये होते. परंतु, बोस यांना आपल्या सैन्याने “भारतामध्ये प्रवेश करणाऱ्या जपानी सैन्याच्या आघाडीवर असावं” अशी प्रबळ इच्छा होती. इतिहासकार हेमंतसिंह काटोच यांनी आपल्या India’s Historic Battles: Imphal-Kohima, 1944 (२०२४) या पुस्तकात लिहिलं आहे की “…हा तो क्षण होता, ज्याची INA ने खूप दिवस वाट पाहिली होती.” ९ जुलै १९४३ रोजी INAचं नेतृत्व स्वीकारताना बोस म्हणाले होते, “जेव्हा ब्रिटिश सरकारवर दोन बाजूंनी हल्ला होईल, एक भारताच्या आतून आणि दुसरा बाहेरून तेव्हा ते कोसळेल आणि भारतीयांना आपलं स्वातंत्र्य पुन्हा मिळेल.” पण प्रत्यक्षात, INA आणि जपानी सैन्य या दोघांनाही या लढायांमध्ये भयंकर पराभवाचा सामना करावा लागला. हाच पराभव आशियातील युद्धाचं पारडं कायमचं मित्र राष्ट्रांच्या बाजूने झुकवणारा ठरला.
दोन लढाया
- कोहिमाची लढाई १९४४ साली एप्रिल ते जून अशी चालली. ती दोन टप्प्यांत झाली, पहिल्या टप्प्यात केवळ १,५०० ब्रिटिश-भारतीय सैनिकांनी कोहिमा रिजवरील आपली ठाणी जपानी सैन्याच्या १५,००० सैनिकांविरुद्ध वाचवली. तर, दुसऱ्या टप्प्यात मित्र राष्ट्रांच्या सैन्याने हळूहळू कोहिमाभोवतालच्या टेकड्यांमधून जपानींना बाहेर हाकललं.
- ही लढाई खूपच तीव्र होती. एका ठिकाणी तर दोन्ही सैन्यांच्या ठाण्यांमध्ये फक्त टेनिस कोर्टाएवढं अंतर होतं. इतिहासकार काटोच यांच्या मते, “या टेनिस कोर्टवरूनच जपान्यांनी पुन्हा पुन्हा हल्ले चढवले.” शेवटी ब्रिटिशांनी रणगाडे (tanks) आणले. त्यामुळे जपानी सैन्याचं मोठं नुकसान झालं.
- इंफाळच्या दक्षिणेकडे, एप्रिलपर्यंत जपानी सैन्याने संपूर्ण इंफाळ खोऱ्याला घेरलं होतं. जून अखेरपर्यंत त्यांनी स्लिम यांच्या संरक्षण रेषा अनेक दिशांनी फोडण्याचे आटोकाट प्रयत्न केले, पण त्यात ते यशस्वी झाले नाहीत.
- स्लिम यांनी लिहिलं आहे की, “लढाई सतत सुरू होती. दोन्ही बाजू एकमेकांना चकवून ठार करण्यासाठी हालचाली करत होत्या. कुठेतरी जपानी सैन्याचा जोरदार हल्ला होत असे आणि तो तिथेच रोखून नष्ट करावा लागत असे. तरीही, या लढाईला एक ठरावीक ढाँचा होता. मुख्य संघर्ष हे रस्त्यांच्या ‘आऱ्यां’वर (spokes of the wheel) होत होते, कारण तोफखाना, रणगाडे आणि वाहने फक्त त्याच मार्गांवरून जाऊ शकत होती.”
इतिहासातील एक पान
शेवटी, स्लिम यांची संरक्षणात्मक धोरणं आणि मित्र राष्ट्रांची रसद व हवाई शक्ती यशस्वी ठरली. इंफाळ आणि कोहिमामध्ये अपयशी ठरल्यानंतर, जपानचं १५वं सैन्य आणि आझाद हिंद सेनेला (INA) माघार घ्यावी लागली. त्यांना शत्रूचे हवाई हल्ले, तोफखाना, उपासमार आणि रोगराई यांचा मोठा फटका बसला. ८५,००० सैनिकांचं जपानी सैन्य होतं, पण त्यात ५३,००० जण मारले गेले. तर ब्रिटिशांच्या सुमारे १२,५०० सैनिकांना इंफाळमध्ये आणि ४,००० सैनिकांना कोहिमामध्ये जीव गमवावा लागला.
…आणि सुभाषबाबूंचा मृत्यू
१९४५ पर्यंत ब्रिटिशांनी बर्मा पुन्हा जिंकण्यासाठी आपली मोहीम सुरू केली. जपानी आणि INA परत माघारी ढकलले गेले. बरेच जण मारले गेले, काहींनी शरणागती पत्करली. ऑगस्टमध्ये बोस, INA आणि जपानी सैन्य परत सिंगापूरमध्ये पोहोचले. त्याच महिन्यात अमेरिकेने हिरोशिमा आणि नागासाकीवर अणुबॉम्ब टाकले आणि १५ ऑगस्टला जपानने शरणागती पत्करली. त्यानंतर अवघ्या तीन दिवसांनी सुभाषचंद्र बोस यांचा विमान अपघातात मृत्यू झाला.
इतिहासातील एक विस्मरणात गेलेलं पान
इंफाळ आणि कोहिमाच्या लढाया मित्र राष्ट्रांच्या विजयासाठी निर्णायक ठरल्या, तरीही त्इतिहासात त्यांची फारशी दखल घेतली गेली नाही. पाश्चात्त्य जगाच्या स्मृतीत या लढाया युरोप, उत्तर आफ्रिका किंवा पॅसिफिकमधील मोहिमांइतक्या ठळक नाहीत. भारतातही या लढाया राष्ट्रीय इतिहासात सहज बसत नाहीत, कारण आपल्याकडे प्रामुख्याने आझाद हिंद सेनेच्या शौर्याचा गौरव केला जातो. पण वस्तुस्थिती अशी होती की, खूप मोठ्या संख्येने भारतीय ब्रिटिश सैन्यात लढले आणि मृत्युमुखी पडले. यात स्थानिक नागा, मैतेई आणि कुकी आदींचाही मोठा सहभाग होता.
२०१९ साली द इंडियन एक्स्प्रेससाठी लिहिताना प्रा. मेघनाद देसाई यांनी म्हटलं होतं की, “…कोहिमाने मित्र राष्ट्रांचा विजय निश्चित केला. भारताने या लढाईचा गौरव करण्यात काहीही गैर नाही. कारण यात सहभागी झालेल्या शूर लोकांची आठवण ठेवणं गरजेचं आहे. त्यांनी ज्यासाठी लढा दिला, त्यावर त्यांचा विश्वास होता.”