अमोल परांजपे

नवी दिल्लीमध्ये ९ आणि १० सप्टेंबर रोजी होणाऱ्या जी-२० राष्ट्रप्रमुखांच्या शिखर परिषदेला चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग येणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता त्यामागच्या कारणांची चर्चा सुरू झाली आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिनही येणार नाहीत. दोन मोठ्या देशांचे अध्यक्ष दिल्ली शिखर परिषदेला दांडी मारणार असल्याने जगभरातील तमाम नेते एका छताखाली आणण्याच्या मोदी सरकारच्या घोषणेला सुरुंग लागला आहे. शिवाय यामुळे सध्याची दुभंगलेली भूराजकीय परिस्थिती प्रकर्षाने अधोरेखित झाली आहे.

दिल्ली परिषदेचे महत्त्व काय?

‘ग्रुप ऑफ २०’ किंवा ‘जी-२०’ हा जगातील सर्वात प्रभावी राष्ट्रगट समजला जातो. सर्वात मोठ्या २० अर्थव्यवस्था असलेले देश परस्पर सहकार्यातून जागतिक प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करतात. चक्राकार पद्धतीने अध्यक्षपदी असलेला देश अशा विविध बैठका, परिषदांचे जगमानपद भूषवितो. २०२३ या वर्षात भारताकडे अध्यक्षपद असल्याने जी-२० राष्ट्रप्रमुखांची शिखर परिषद यंदा दिल्लीमध्ये होणार आहे. करोनाकाळ सरल्यानंतर जगाची घडी पुन्हा बसविणे आवश्यक असताना पुन्हा एकदा रशिया-युक्रेन युद्धामुळे त्यात व्यत्यय आला आहे. त्यामुळे दिल्ली परिषदेमध्ये पुढील वर्षभरासाठी रूपरेषा आखली जाणे अपेक्षित आहे. केंद्र सरकारने या परिषदेचा बराच गाजावाजा केला असून अनेक राष्ट्रांचे प्रमुख दोन दिवस देशाच्या राजधानीमध्ये असतील. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्राँ, तुर्कस्तानचे अध्यक्ष तय्यिप रेसेप एर्दोगन, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन त्रुदो आदी नेत्यांनी परिषदेला उपस्थित राहणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र पुनित आणि जिनपिंग या परिषदेला येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

आणखी वाचा-जी-२० शिखर परिषद : भारत अशा कोणकोणत्या जागतिक संघटनांचा सदस्य आहे?

पुतिन यांची अनुपस्थिती का?

पुतिन यांनी गेल्या आठवड्यात पंतप्रधान मोदी यांना फोन करून आपण दिल्ली परिषदेला येणार नसल्याचे कळविले. आपल्याला त्या काळात काही लष्करी कामे असल्यामुळे येऊ शकत नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र युक्रेन युद्धामुळे पाश्चिमात्य देशांशी, प्रामुख्याने अमेरिकेशी संबंध ताणले गेले असताना त्या नेत्यांबरोबर एका व्यासपीठावर येणे पुतिन टाळत आहेत. गतवर्षी बालीमध्ये झालेल्या जी-२० शिखर परिषदेलाही ते गेले नव्हते. दुसरे संभाव्य कारण म्हणजे पुतिन यांच्याविरोधात हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने बजावलेल्या वॉरंटमुळे पुतिन शक्यतो रशियाबाहेर जाणे टाळत असल्याचे बोलले जाते. फेब्रुवारी २०२२ मध्ये युक्रेनवर हल्ला केल्यापासून पुतिन केवळ बेलारूस, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उझबेकिस्तान याच देशांच्या दौऱ्यावर गेले आहेत. गेल्या महिन्यात दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे झालेल्या ‘ब्रिक्स’ शिखर परिषदेमध्ये पुतिन दूरदृश्य प्रणालीमार्फत सहभागी झाले होते. दिल्ली परिषदेला रशियाचे प्रति परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव्ह करतील.

भारतात येणे जिनपिंग यांनी टाळले?

जिनपिंग यांच्या अनुपस्थितीबाबत अद्याप चीन किंवा भारताने अधिकृतरीत्या काहीही जाहीर केले नसले, तरी चिनी अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे. जिनपिंग यांच्याऐवजी चीनचे पंतप्रधान ली चिआंग दिल्ली परिषदेमध्ये आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करतील, असे या अधिकाऱ्याने सांगितले. यामागची कारणे मात्र देण्यात आलेली नसली, तरी दोन शक्यता वर्तविण्यात येत आहेत. पहिली गोष्ट म्हणजे लडाखमधील संघर्षानंतर भारत-चीन संबंध ताणले गेले आहेत. अलीकडेच चीनच्या अधिकृत नकाशामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. दक्षिण चीन समुद्रातील चीनच्या अरेरावीला लगाम घालण्यासाठी भारत अमेरिका, जपान यांच्याबरोबर सहकार्याच्या भूमिकेत आहे. त्यामुळे भारत दौरा जिनपिंग टाळत असतील. भारतीय अधिकाऱ्यांनी मात्र या शक्यतेचा इन्कार केला आहे. दुसरी शक्यता ही जागतिक भूराजकीय स्थितीमुळे निर्माण झाली आहे. युक्रेन युद्धामुळे पुन्हा एकदा जग दोन गटांमध्ये विभागले गेल्याचे चित्र आहे. अमेरिकेतील व्यापारी निर्बंधांमुळे त्यांचे चीनशी संबंध ताणले गेले आहेत. त्यामुळे रशियाला अधिक जवळ असलेले जिनपिंग बायडेन, सुनक, मॅक्राँ यांच्यासमक्ष येणे टाळत असावेत.

आणखी वाचा-संसदेचे विशेष अधिवेशन घेण्याची संविधानात तरतूद आहे का?

जी-२० मध्ये उपस्थितीचे स्वरूप काय?

जी-२० राष्ट्रप्रमुखांची परिषद साधारणत: वर्षातून एकदा होत असली, तरी त्याला दर वेळी सर्वच प्रमुख उपस्थित असतात, असे होत नाही. २००९ आणि २०१० या वर्षांत झालेल्या पहिल्या तीन परिषदा सोडल्या तर आतापर्यंत १६ पैकी एकाही बैठकीला सर्वच्या सर्व राष्ट्रप्रमुख उपस्थित होते, असे झालेले नाही. अन्य महत्त्वाच्या कार्यक्रमांमुळे किंवा राजकारणाचा भाग म्हणून राष्ट्रप्रमुखाऐवजी दुसरा एखादा नेता देशाचे प्रतिनिधित्व करतो. दिल्ली परिषदही याला अपवाद नाही, एवढेच…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

amol.paranjpe@expressindia.com