दिग्गज क्रिकेटपटू राहुल द्रविडने इंडियन प्रीमियम लीगमधील (आयपीएल) राजस्थान रॉयल्स संघाचे प्रशिक्षकपद सोडल्याची घोषणा काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती. द्रविडला ‘आणखी मोठी’ जबाबदारी देण्याची राजस्थान संघाची तयारी होती, पण द्रविडने त्यासाठी नकार देत संघाला सोडचिठ्ठी देणे पसंत केल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, यात नक्की कितपत तथ्य आहे, असा सवाल दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्सने उपस्थित केला आहे. इतकेच नाही, तर द्रविडने स्वतःहून संघापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला की त्याला तसे करण्यास भाग पाडण्यात आले अशी शंकाही डिव्हिलियर्सने उपस्थित केली आहे.
द्रविडची प्रशिक्षकपदी नियुक्ती कधी?
द्रविडच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने गेल्या वर्षी ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेचे जेतेपद पटकावले. त्यानंतर त्याचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपुष्टात आला आणि द्रविडने पुन्हा अर्ज करणे टाळले. ‘आयपीएल’च्या २०२५च्या हंगामापूर्वी द्रविडची राजस्थान रॉयल्स संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. त्याचे सहा वर्षांनी ‘आयपीएल’मध्ये पुनरागमन झाले. त्याच्याशी बऱ्याच वर्षांचा करार करण्यात आल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते, परंतु हा आकडा स्पष्ट करण्यात आला नव्हता.
राजस्थानची निराशाजनक कामगिरी…
द्रविडच्या मार्गदर्शनाखाली राजस्थान संघाची कामगिरी निराशाजनक झाली. त्यांना १४ पैकी केवळ चार सामने जिंकता आले. त्यामुळे दहा संघांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत राजस्थान संघ नवव्या स्थानी राहिला. हंगामादरम्यान द्रविड आणि राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन यांच्यात काही मतभेद झाल्याची चर्चा रंगली. हंगामानंतर सॅमसनने संघ सोडण्याची इच्छा फ्रँचायझीच्या व्यवस्थापनाकडे व्यक्त केल्याचे वृत्तही समोर आले. त्यानंतर फ्रँचायझीने एकूण परिस्थितीचा आढावा घेतला आणि काही बदल करण्याचे ठरवले.
राजस्थानकडून काय स्पष्टीकरण?
‘‘मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी आपला कार्यकाळ संपविण्याचा निर्णय घेतला आहे. राहुल हे अनेक वर्षे राजस्थान संघाचा भाग होते. त्यांचे नेतृत्व अतिशय प्रभावी ठरले असून राजस्थान संघाची घडी बसविण्यात, मजबूत मूल्ये रुजविण्यात आणि विविध पिढ्यांतील खेळाडूंना घडविण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे,’’ असे राजस्थान संघाच्या पत्रकात नमूद करण्यात आले. ‘‘फ्रँचायझीची एकंदर बांधणी आणि परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर राहुल यांना आणखी मोठी जबाबदारी देण्याची आमची तयारी होती. परंतु राहुल यांनी त्यास नकार दिला,’’ असेही राजस्थान संघाकडून सांगण्यात आले होते.
एबी डिव्हिलियर्स काय म्हणाला?
द्रविड स्वतःहून संघापासून दूर झाल्याचे सांगण्यात आले असले, तरी हे डिव्हिलियर्सला खरे वाटत नाही. ‘‘हा निर्णय संघमालक, फ्रँचायझीने घेतलेला वाटतो. त्यांनी प्रशिक्षकपदाऐवजी अन्य एखादी जबाबदारी सांभाळण्याचा पर्याय द्रविडसमोर ठेवला. मात्र, याने बहुधा द्रविड नाराज झाला. त्याला कदाचित प्रशिक्षकपदीच कायम राहायचे होते,’’ असे डिव्हिलियर्स आपल्या यूट्युब वाहिनीवर म्हणाला. ‘‘द्रविडची उणीव राजस्थान संघाला निश्चित जाणवेल. तो केवळ खेळाडू किंवा प्रशिक्षक म्हणूनच नाही, तर माणूस म्हणूनही खूप मोठा आहे. मी याआधी अनेक युवा खेळाडूंशी संवाद साधला आहे. ते द्रविडबाबत कायमच आदराने बोलतात. आमच्या कारकीर्दीवर त्याचा मोठा प्रभाव असल्याचे ते सांगतात. अशा व्यक्तीला संघापासून दूर करणे आश्चर्यकारक आहे,’’ असेही डिव्हिलियर्सने सांगितले.
‘आयपीएल’ आता फुटबॉलच्या मार्गावर?
‘आयपीएल’ आता फुटबॉलच्या मार्गावरच चालल्याचे मत डिव्हिलियर्सने व्यक्त केले. फुटबॉलमध्ये संघ अपयशी ठरत असल्यास व्यवस्थापकांची (मॅनेजर/प्रशिक्षक) हकालपट्टी केली जाते. तसेच आता क्रिकेटमध्येही दिसू लागले आहे असे डिव्हिलियर्सला वाटते. ‘‘लीगमधील प्रशिक्षक आणि व्यवस्थापकांवर सातत्याने विजय मिळविण्यासाठी, स्पर्धा जिंकण्यासाठी दडपण असते. त्यात अपयशी ठरल्यास संघमालकांचा रोष तुम्ही ओढवून घेता. ते तक्रार करण्यास सुरुवात करतात. द्रविडबाबत नक्की काय झाले, हे आपल्याला ठाऊक नाही. त्याने अन्य जबाबदारीसाठी नकार दिला म्हणून त्याला संघापासून दूर जाण्यास भाग पाडले असू शकते. हे योग्य नाही. आगामी हंगामाच्या दृष्टीने राजस्थान संघ आणि द्रविडच्या योजना बहुधा वेगवेगळ्या होत्या. कदाचित संघ व्यवस्थापनातील बदलामुळे संघाच्या कामगिरीत सुधारणा दिसून येईल अशी राजस्थानची धारणा असू शकते,’’ असेही डिव्हिलियर्सने नमूद केले.
द्रविड आणि राजस्थानचे नाते…
द्रविड आणि राजस्थान रॉयल्स यांचे नाते जवळपास दीड दशकांपासूनचे आहे. द्रविड प्रथम २०११ मध्ये खेळाडू म्हणून राजस्थान संघाशी जोडला गेला होता. त्यानंतर ‘आयपीएल’च्या २०१२ आणि २०१३च्या हंगामात त्याने या संघाचे नेतृत्व केले. यापैकी २०१३च्या हंगामात राजस्थान संघ अंतिम फेरीपासून केवळ एक विजय दूर राहिला होता. खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यावर द्रविडने २०१४ आणि २०१५ मध्ये संघ-संचालक, तसेच ‘मेंटॉर’ अर्थात ‘प्रेरक’ म्हणून काम केले. यातील २०१४च्या हंगामात राजस्थानने ‘प्ले-ऑफ’मध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर द्रविडकडे भारताच्या १९ वर्षांखालील, तसेच ‘अ’ संघाच्या प्रशिक्षकपदाची धुरा सोपविण्यात आली. पुढे तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचाही (एनसीए) प्रमुख झाला. या भूमिकांतील यशस्वी कामगिरीनंतर त्याची भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाली. जवळपास तीन वर्षे हे पद सांभाळल्यानंतर त्याचा कार्यकाळ संपुष्टात आला आणि तो पुन्हा राजस्थान रॉयल्सचा भाग झाला. मात्र, या संघाबरोबरची त्याची ‘सेकंड इनिंग’ फारशी यशस्वी ठरू शकली नाही.