सध्या सुरू असलेल्या ‘आयपीएल’मध्ये राजस्थान रॉयल्सकडून १४ वर्षीय फलंदाज वैभव सूर्यवंशीने ३५ चेंडूंत शतक झळकावत सर्वांचे लक्ष वेधले. ‘आयपीएल’मधील हे दुसरे सर्वांत जलद शतक ठरले. तसेच ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या इतिहासात शतक झळकावणारा तो सर्वांत युवा फलंदाज ठरला. या खेळीनंतरही वैभवच्या वयाची चर्चा सुरू झाली. तो खरेच १४ वर्षांचा आहे का, असा प्रश्न उपस्थित केला गेला. तसेच मागील एका मुलाखतीमुळे संभ्रम वाढला.
सूर्यवंशीच्या वयाबाबत चर्चेला उधाण का?
अधिकृत नोंदीनुसार वैभव सूर्यवंशीचा जन्म २७ मार्च २०११ साली बिहारच्या समस्तीपूरजवळील ताजपूर येथे झाला. मात्र, एप्रिल २०२३ मध्ये ‘यूट्यूब’वर प्रसिद्ध झालेल्या मुलाखतीत त्याने सप्टेंबरमध्ये १४ वर्षांचे होणार असल्याचे नमूद केले होते. त्या विधानावर विश्वास ठेवायचा झाल्यास, अधिकृत नोंदींमध्ये वर्षाच्या व्यतिरिक्त त्याच्या जन्माचा महिना चुकीचा लिहिला गेला आहे. ‘‘माझ्या वडिलांनीच मला क्रिकेट खेळण्यास प्रेरित केले होते,’’ असे सूर्यवंशीने त्याच मुलाखतीत पुढे सांगितले. जरी त्याचा जन्म सप्टेंबर २००९ मध्ये झाला असता, तरी १५ वर्षे आणि सात महिन्यांच्या वयात वेगवान गोलंदाज इशांत शर्मा, मोहम्मद सिराज आणि रशीद खान यांच्या गोलंदाजीविरुद्ध ३५ चेंडूंत शतक ठोकणे ही साधी गोष्ट नाही.
वडील संजीव यांचे म्हणणे काय?
वैभवचे १३ वर्षे आठ महिने असे वय असताना राजस्थान रॉयल्सने ‘आयपीएल’ लिलावात त्याला १ कोटी १० लाख रुपयांसह संघात घेतले. यानंतरच खऱ्या अर्थाने त्याच्या वयाबाबत चर्चा सुरू झाली होती. शतकी खेळीनंतर आता पुन्हा एकदा तोच विषय समोर आला आहे. मात्र, लिलावाच्या वेळीच वैभवचे वडील संजीव यांना याबाबत स्पष्टीकरण दिले होते. ‘‘माझ्या मुलाने कठोर मेहनत घेतली आहे. त्याने १६ वर्षांखालील जिल्हा निवड चाचणीत चांगली कामगिरी केली होती. त्याची अस्थी चाचणी (बोन टेस्ट) पुन्हा करण्यास आम्हाला हरकत नाही,’’ असे संजीव त्या वेळी म्हणाले होते. लोकांच्या म्हणण्यानुसार वैभवचे वय १५ वर्षे आहे. मात्र, त्याच्या वडिलांनी त्याच्या वयाबाबत सुरू असलेल्या चर्चेला त्या वेळी स्पष्ट उत्तर दिले होते. ‘‘जेव्हा तो साडेआठ वर्षांचा होता, तेव्हा प्रथमच तो ‘बीसीसीआय’च्या बोन टेस्टसाठी उपस्थित राहिला होता. तो भारताच्या १९ वर्षांखालील संघाकडून खेळत आहे. आम्ही कोणालाच घाबरत नाही. तो कोणतीही चाचणी करण्यासाठी तयार आहे,’’ असे संजीव सूर्यवंशी म्हणाले.
कमी वयात सूर्यवंशीचे कोणते विक्रम?
वयाच्या नवव्याच वर्षी सूर्यवंशीने क्रिकेट अकादमीत सरावाला सुरुवात केली. वयाच्या १२व्या वर्षी त्याने विनू मंकड करंडकात बिहारकडून पाच सामन्यांत ४०० धावा केल्या. काही महिन्यांनंतर भारतीय ‘ब’ संघाकडून तो १९ वर्षांखालील चार संघांच्या मालिकेत सहभागी झाला. यानंतर त्याने बांगलादेश, इंग्लंड यांच्याविरुद्ध भारताच्या १९ वर्षांखालील ‘अ’ संघात स्थान मिळवल्याले. २०२४ मध्ये झालेल्या १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकाच्या निवड चाचणीत सहभागी होण्याची संधी त्याला मिळाली. मग, त्याला बिहारच्या रणजी संघात जानेवारी २०२४ मध्ये स्थान मिळाले. मुंबईविरुद्ध त्याने प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने पाच रणजी सामने खेळले आहेत. तो प्रथमश्रेणी क्रिकेट खेळणारा चौथा सर्वांत युवा खेळाडू आहे. यानंतर ऑस्ट्रेलियाच्या १९ वर्षांखालील संघाविरुद्ध सूर्यवंशीने ५८ चेंडूंत १०४ धावांची खेळी केली. १३ वर्षे १८७ दिवस वय असलेला वैभव त्यावेळी युवा क्रिकेटमध्ये शतकी खेळी करणारा सर्वांत कमी वयाचा खेळाडू ठरला. सूर्यवंशीने १९ वर्षांखालील चारदिवसीय सामन्यात त्याने सर्वांत जलद शतक झळकावले.
वय फसवणुकीबाबत ‘बीसीसीआय’चे धोरण काय?
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) वयाच्या फसवणुकीविरुद्ध कडक धोरण आहे. वय फसवणुकीत खेळाडू दोषी आढळल्यास त्यावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई केली हाते. वयाच्या फसवणुकीची माहिती स्वेच्छेने उघड करणाऱ्या खेळाडूंना योग्य वयोगटात खेळण्याची परवानगी दिली जाऊ शकते, परंतु बनावट कागदपत्रे सादर केलेल्या खेळाडूंना निलंबनाला सामोरे जावे लागेल, अशी ‘बीसीसीआय’ची भूमिका राहिलेली आहे. ‘बीसीसीआय’ वय फसवणुकीची माहिती मिळवण्यासाठी ‘टीडब्ल्यूथ्री’ पद्धतीचा वापर करतो. या पद्धतीच्या आधारे डावा हात आणि मनगट यांची क्ष-किरण तपासणी केली जाते. त्याच्या आधारे वय फसवणुकीची माहिती समोर येते. या पद्धतीनुसार दोषी आढळल्यानंतर नितीश राणा याला दिल्लीच्या युवा गटात खेळण्यापासून रोखण्यात आले होते. ‘बीसीसीआय’ने प्रत्येक राज्यातील रुग्णालये निश्चित केली आहेत आणि खेळाडूंना तेथेच जाऊन चाचणी करावी लागते. त्यानंतर ‘क्ष-किरण’ चाचणीचे निकाल थेट ‘बीसीसीआय’ने निश्चित केलेल्या दोन डॉक्टरांकडे पाठवले जातात. ते याचा अभ्यास करून ‘बीसीसीआय’ला अंतिम माहिती देतात.