Ratnagiri triple murder case: ऑगस्ट महिन्यात रत्नागिरीत २६ वर्षीय गर्भवती तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या कुटुंबीयांनी केली. भक्ती मयेकर घराबाहेर जाताना एका मैत्रिणीला भेटायला जात असल्याचं सांगून घरातून निघाली होती, मात्र ती पुन्हा कधीच परतली नाही. या बेपत्ता तक्रारीच्या तपासात पोलिसांना स्थानिक बारशी संबंधित धागेदोरे मिळाले आणि तिथे केवळ एक नव्हे, तर तब्बल तीन खुनांचा उलगडा झाला. नेमकं काय आणि कसं घडलं, जाणून घेऊ!

भक्ती मयेकर हिच्या कुटुंबीयांनी रत्नागिरी शहर पोलिसांकडे धाव घेतल्यानंतर, २१ ऑगस्टपासून या शोधाची सुरुवात झाली. त्यांनी सांगितले की, १७ ऑगस्टपासून भक्ती बेपत्ता आहे. कुटुंबीयांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, रत्नागिरीतील सायली बारचा मालक दुर्वास पाटील याच्यावर त्यांचा संशय होता. भक्तीचे त्याच्याशी कथित संबंध असल्याची माहिती कुटुंबियांनी दिली होती. रत्नागिरी शहर पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा त्यांना कळलं की, भक्तीने बेपत्ता झाल्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी आपल्या भावाला शेवटचा मेसेज पाठवला होता. त्या मेसेजमध्ये तिने आपण सुखरूप असल्याचं सांगितलं होतं आणि कुटुंबीयांनी काळजी करू नये, असंही लिहिलं होतं.

“जेव्हा आम्ही तिच्या मोबाईल फोनचं लोकेशन तपासलं, तेव्हा तो मेसेज पाठवतानाचं ठिकाण दुर्वासच्या बारमध्ये असल्याचं पोलिसांना लक्षात आलं. दुर्वासला जेव्हा विचारलं, तेव्हा त्याने भक्तीला गेल्या काही दिवसांत भेटल्याचं नाकारलं. यामुळेच त्याचा खोटेपणा उघडकीस आला,” असं रत्नागिरीचे पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी पत्रकारांना सांगितलं.

ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात पोलिसांनी चौकशीसाठी दुर्वासला ताब्यात घेतलं. याच काळात रत्नागिरी पोलिसांची दुसरी एक टीम, वेगळ्या प्रकरणाच्या तपासासाठी, दुर्वासच्या बारमध्ये पोहोचली. राकेश जंगम (वय २८), हा दुर्वासच्या बारमध्ये वेटर म्हणून काम करत होता, तो बराच काळ बेपत्ता होता. त्याची आई स्वतः पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्याकडे गेली आणि सांगितलं की, राकेश ६ जून २०२४ पासून बेपत्ता आहे. त्याच चौकशीसाठी काही दिवसांतच दुर्वासला अटक करण्यात आली. चौकशीत त्याने केवळ भक्तीच नाही, तर आपल्या बारमध्ये काम करणाऱ्या दोन तरुणांच्याही खुनाची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

बगाटे यांनी पत्रकारांशी बोलताना संगितले की, भक्ती प्रकरणात सलग चौकशीदरम्यान दुर्वासने त्याचे भक्तीशी संबंध होते हे मान्य केलं. मात्र, त्याला तिच्याशी लग्न करण्याची इच्छा नव्हती, कारण तो आपल्या जातीतच लग्न करू इच्छित होता. “ती त्याला सोडून जायला तयार नसल्यामुळे त्याने आपल्या बारच्या वरच्या मजल्यावरील खोलीत तारेने तिचा गळा आवळल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याने तिचं प्रेत अंबा घाटात टाकून दिलं. आमच्याकडे बारमधील फुटेज आहे, त्यात खून झाल्यानंतर तो नाचताना दिसत आहे. जणू ती त्याच्या आयुष्यातून गेल्यामुळे त्याला दिलासा मिळाला होता. याआधी दोन खुनांतून तो बचावलाय, त्यामुळे हाही प्रकार तसाच मिटून जाईल, असं त्याला वाटत होतं,” असं एका अधिकाऱ्याने इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितलं.

दुर्वास कमकुवत पडत असल्याचं लक्षात घेऊन पोलिसांनी त्याच्याकडे जंगम प्रकरणाबाबतही चौकशी केली. “त्याने कबुली दिली की, गेल्या वर्षी त्याने जंगमचा खून केला होता, कारण जंगमनेच त्याच्या बारमध्ये काम करणाऱ्या दुसऱ्या कर्मचाऱ्याचा म्हणजे ५५ वर्षीय सीताराम वीरचा खून केल्याचं त्याने पाहिलं होतं. अशा रीतीने दुर्वासने तिसऱ्या खुनाचीही कबुली दिली,” असं बगाटे म्हणाले. दुर्वासने पोलिसांना सांगितल्याप्रमाणे, तो आणि वीर अनेकदा एकत्र दारू पित असत. जेव्हा त्याने भक्तीशी बोलणं बंद केलं, तेव्हा तिला ब्लॉकही केलं. यानंतर भक्तीने दुर्वासशी संपर्क साधण्यासाठी वीरची मदत घेतली, असा आरोप आहे.

“दुर्वासला संशय आला की, वीर आणि भक्ती जवळ येत आहेत. एकदा त्याने वीरला तिच्याशी मेसेज करताना पकडलं आणि त्यानंतर बारमध्येच त्याला बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याने जंगमला वीरच्या कुटुंबीयांना तो दारू पिऊन बेशुद्ध पडला आहे, असं सांगायला लावलं,” असं बगाटे म्हणाले. मात्र, घरी आणल्यानंतर वीरचा मारहाणीमुळे मृत्यू झाला. त्यानंतर दुर्वास आणि त्याचे वडील दर्शन पाटील यांनी वीरच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला आणि अंत्यसंस्कारासाठी काही पैसे दिले, असं पोलिसांनी सांगितलं. वीरच्या कुटुंबीयांनी अंत्यसंस्कार केले, परंतु त्यांना काहीही संशय आला नाही.

“पण जंगमने दुर्वास यानेच वीरला मारहाण करून ठार करताना सर्व पाहिलं होतं. दुर्वासला भीती वाटत होती की, जंगम सत्य बाहेर काढेल. त्यामुळे त्याने त्याला पैसे दिले आणि कुटुंबासह रत्नागिरी सोडून जाण्यास सांगितलं,” असं बगाटे यांनी स्पष्ट केलं. नंतर दुर्वासला कळलं की, जंगम रत्नागिरी सोडून गेलेला नाही, तेव्हा त्याने त्याचा खून करण्याचा डाव आखल्याचा आरोप आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, एका दिवशी त्याने जंगमला दारू पाजली आणि वाहनात बसवून अंबा घाटाकडे नेलं. तिथे पोहोचल्यानंतर दुर्वास आणि त्याचा दुसरा वेटर निलेश भिंगर्डे यांनी जंगमचा गळा आवळून खून केला आणि प्रेत अंबा घाटात टाकून दिलं, अशी माहिती पोलिसांनी इंडियन एक्स्प्रेसला दिली.

(Express photo)

कबुलीनंतर पोलिसांनी दुर्वासला अंबा घाटात नेलं, जेणेकरून भक्ती आणि जंगमची प्रेते सापडू शकतील. “अंबा घाट गाठण्यासाठी दाट जंगलातून ४०-५० मिनिटं पायपीट करावी लागते, कारण घाट खूपच खोल आहे. तिथे आर्द्रता इतकी जास्त आहे की, काही दिवसांतच भक्तीच शरीर पूर्णपणे कुजून गेलं. दहा दिवसांच्या शोधानंतर आम्हाला फक्त तिची कवटी सापडली. जंगमचं प्रेत मात्र सापडलं नाही, कारण त्याला ठार करून तिथे टाकून एक वर्ष उलटलं होतं,” असं बगाटे यांनी सांगितलं.

दुर्वासव्यतिरिक्त पोलिसांनी त्याचे कथित साथीदार निलेश भिंगर्डे आणि विश्वास पवार यांनाही अटक केली. याच महिन्याच्या सुरुवातीला पुढील तपासादरम्यान पोलिसांनी दुर्वासचे वडील दर्शन पाटील यांनाही अटक केली. त्यांनीच जंगमला पैसे देऊन रत्नागिरी सोडून जाण्यास सांगितल्याचं उघड झालं होतं. पाटील कुटुंबीयांना अटक झाल्यानंतर, ४ सप्टेंबर रोजी स्थानिक राज्य उत्पादन शुल्क विभागाने सायली बार सील केला. अशाप्रकारे एका खुनाच्या तपासासाठी गेलेल्या पोलिसांना एकून तीन खुनांचा उलगडा झाला!