ओडिशाच्या बालासोर येथे २ जून रोजी भीषण रेल्वे अपघात झाला, ज्यामुळे आतापर्यंत २८८ प्रवाशांचा मृत्यू आणि एक हजाराहून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती प्राप्त झालेली आहे. या अपघाताच्या कारणांच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न रेल्वे विभागाने केला आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले, “ट्रकवर असलेल्या पॉइंट मशीनमध्ये बदल केल्यामुळे रेल्वेची धडक होऊन हा अपघात झाला.” रेल्वेमंत्र्यांनी जरी हे कारण पुढे केले असले तरी हा बदल करण्यामागे मानवी चूक होती की घातपात करण्याच्या दृष्टीने केलेली जाणीवपूर्वक कारवाई, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याआधी रेल्वे अधिकाऱ्यांनी बहानगा बाजार स्थानक येथे झालेल्या अपघाताची अर्धवट आणि अपुरी माहिती दिली होती. अपघाताचे खरे कारण काय आहे? तो नेमका कसा घडला? याची स्पष्टता ही अधिकृत तपासानंतरच समोर येऊ शकेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रेल्वेमंत्री नेमके काय म्हणाले?

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ४ जून रोजी माध्यमांशी संवाद साधत असताना सांगितले की, अपघाताचे मूळ कारण शोधण्यात आले असून या कृत्यामागे कोणत्या व्यक्तीचा हात आहे, हेदेखील शोधण्यात आले आहे. तसेच रेल्वे सुरक्षा आयुक्तांचा अहवाल लवकरच सार्वजनिक केला जाईल, अशी माहिती त्यांनी ‘डीडी न्यूज’ला दिली.

अपघातामागे घातपाताची शक्यता?

घातपातामुळे सदर अपघात झाला का? याची अद्यापही खात्रीशीर माहिती मिळालेली नाही. रेल्वेमंत्र्यांनी या घटनेमागे असामाजिक तत्त्वांचा हात असल्याचा संशय जरूर व्यक्त केला, मात्र त्यावर अधिक भाष्य करण्यास नकार दिला. ते म्हणाले, रेल्वे सुरक्षा आयुक्तांचा (CRS) अहवाल येईपर्यंत यावर अधिक भाष्य करणे योग्य ठरणार नाही.

हे वाचा >> ओडिशा रेल्वे अपघाताला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न; पोलिसांनी दिली सक्त ताकीद; म्हणाले, “कठोर कारवाई होईल!”

२ जूनच्या सायंकाळी अपघात नेमका कसा घडला? हे एकदा जाणून घेऊ. बालासोर जिल्ह्यातील बहानगा बाजार स्थानकाच्या काही अंतरानंतर हा अपघात घडला. हा भाग दक्षिण पूर्व रेल्वे विभागाच्या खरगपूर डिव्हिजनमध्ये येतो. तीन ट्रेन अपघातात सामील होत्या. कोरोमंडल आणि बंगळुरु-हावडा एक्स्प्रेस या प्रवासी ट्रेन विरुद्ध दिशेला जाणाऱ्या होत्या. तर ज्यावर टक्कर झाली ती मालगाडी ट्रॅकवरच उभी होती.

बहानगा रेल्वे स्थानक येथील ट्रकची स्थिती

कोलकातामधील हावडा येथून निघालेली कोरोमंडल एक्सप्रेस (१२८४१) चेन्नईच्या दिशेने निघाली होती. एक्स्प्रेसने खरगपूर आणि बालासोर ही दोन्ही स्थानके पार केली होती, तिचा पुढचा थांबा भद्रक स्थानक होता. त्या दिवशी कोरोमंडल एक्स्प्रेस वेळेवर धावत होती. सायंकाळी ७ वाजून १ मिनिटांनी एक्स्प्रेसने बहानगा बाजार स्थानक पार केले.

बहानगा बाजार स्थानकालगत अप आणि डाऊन अशा दोन मार्गिका आहेत. अप लाइन चेन्नईच्या दिशेने जाते, तर डाऊन लाइन हावडाच्या दिशेने जाते. यासोबतच या दोन्ही ट्रॅकच्या बाजूला दोन लूप लाइन आहेत. लूप लाइनचा हेतू हा रेल्वे थांबविण्यासाठी केला जातो, जेणेकरून अतिमहत्त्वाच्या आणि जलदगतीच्या रेल्वेसाठी मुख्य मार्गिका मोकळी होईल.

कोरोमंडल एक्स्प्रेस ज्या लूप लाइनवर गेली, त्या ठिकाणी आधीपासूनच एक मालगाडी उभी होती. जिचे इंजिन अप लाइनवरील मार्गिकेच्या दिशेने होते. लूप लाइनवर जाण्याऐवजी कोरोमंडल एक्स्प्रेसने मुख्य अप लाइनवरून चेन्नईच्या दिशेने भद्रक येथे जाणे अपेक्षित होते.

हे ही वाचा >> ओडिशामधील रेल्वे अपघात टाळता आला असता? ‘कवच’ प्रणाली कशी काम करते?

मग चूक कुठे झाली?

रेल्वे विभागाने ३ जून रोजी दिलेल्या अल्प माहितीनुसार, “कोरोमंडल एक्स्प्रेसने अप लाइनवरून जाणे अपेक्षित असताना ती बाजूच्या अप लूप लाइनवर गेली. ज्यामुळे तिची तिथे आधीपासून उभ्या असलेल्या मालगाडीला धडक बसली. बहानगा बाजार स्थानकावर तिचा थांबा नसल्यामुळे कोरोमंडल एक्स्प्रेस तिच्या निर्धारित वेगाने धावत होती.” मागून जोरात धडक बसल्यामुळे कोरोमंडल एक्स्प्रेसचा इंजिन डबा मालगाडीवर चढल्याचे चित्र अपघातस्थळी दिसले.

रेल्वेच्या चालकांना सिग्नल दिशा देत असतात. ट्रॅकवर पुढे रेल्वे उभी आहे की नाही? हे चालकाला दिसत नाही. विशेषतः रात्रीच्या वेळी तर पुढे काय आहे, हे दिसणे कठीण असते. त्यामुळे सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे सदर अपघात झाला का? याचाही शोध रेल्वेकडून घेतला जात आहे. रेल्वेच्या प्राथमिक संयुक्त तपासणीत असे निदर्शनास आले की, कोरोमंडल एक्स्प्रेसला मुख्य अप लाइनमधून जाण्यासाठी हिरवा सिग्नल मिळाला, मात्र ती अप लूप लाइनवर जाऊन मालगाडीवर आदळली.

संयुक्त तपासणी पथकाने शनिवारी सांगितले, “आम्ही या अपघाताची काळजीपूर्वक तपासणी केल्यानंतर या निष्कर्षापर्यंत आलो आहोत की, कोरोमंडल एक्स्प्रेसला आधी मुख्य अप लाइनवरून जाण्याचा सिग्नल मिळाला आणि नंतर तो काढला गेला. मात्र कोरोमंडल एक्स्प्रेसने लूप लाइनमध्ये प्रवेश केला आणि मालगाडीला धडक दिली.”

रेल्वे अधिकारी आणि रेल्वेमंत्री यांच्या वक्तव्याचा काय संबंध?

रेल्वेमंत्री वैष्णव यांनी सांगितल्याप्रमाणे कुणी तरी ट्रकवरील पाॅइंटमशीनमध्ये छेडछाड केली. त्यामुळे कोरोमंडल एक्स्प्रेसने लूप लाइनमध्ये प्रवेश केला. “सिग्नल यंत्रणेमध्ये ट्रॅकवरील पॉइंटमशीनमधून छेडछाड करण्यात आली, ज्यामुळे अपघात घडला, असे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले असले तरी अंतिम दावा सीआरएसच्या अहवालानंतर केला जाईल, असेही त्यांनी नमूद केले.

आणखी वाचा >> Odisha Train Accident : दोन दशकानंतर देशातला सर्वात मोठा अपघात; याआधी शेकडो मृत्यू होणाऱ्या अपघातांची मालिका पाहा

रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, कोरोमंडल एक्स्प्रेस तिच्या निर्धारित वेगानुसार धावत होती. याचा अर्थ या रेल्वेचा वेग ताशी १०० हून अधिक किमी एवढा होता. एवढ्या वेगात असताना जर इमर्जन्सी ब्रेक लावला तरी काही किलोमीटर पुढे गेल्याशिवाय रेल्वे थांबणार नाही.

तिसऱ्या रेल्वेचा अपघात कसा झाला?

ज्या वेळी कोरोमंडल एक्स्प्रेसने मालगाडीला मागून टक्कर दिली, त्यावेळी यसवंतपूर – हावडा एक्स्प्रेस डाऊन लाइनवरून हावडा येथे जात होती. कोरोमंडल एक्स्प्रेसची मालगाडीला धडक बसली असताना हावडा एक्स्प्रेस त्या ठिकाणाहून पुढे गेली होती. त्यामुळेच त्याच्या शेवटच्या काही डब्यांना धडक बसून या डब्याचे नुकसान झाले. अपघातामुळे कोरोमंडल एक्स्प्रेसच्या रुळावरून घसरलेल्या डब्यांनी या तिसऱ्या रेल्वेला धडक दिली असावी, असा अंदाज सध्या बांधण्यात येत आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Root cause identified what railway minister ashwini vaishnaw has said about odisha train accident detailed kvg
First published on: 05-06-2023 at 11:13 IST