पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूर सुरू करीत दहशतवादाला पोसणाऱ्या पाकिस्तानचा खरा चेहरा भारताने जगासमोर आणला आहे. पाकिस्तानमध्ये तणाव वाढला असताना पाकिस्तानमध्ये एका कुख्यात दहशतवाद्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. भारतातील अनेक मोठ्या दहशतवादी हल्ल्यांमागील कुख्यात दहशतवादी सैफुल्ला खालिद याची रविवारी (१८ मे) पाकिस्तानच्या सिंध प्रांतात अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केली. तो हाफिज सईदच्या लष्कर-ए-तैयबाचा टॉप कमांडर, होता. त्याला अनेक नावांनी ओळखले जायचे. खालिद हा नेपाळ दहशतवादी मॉड्यूलचादेखील प्रमुख होता. भारतातील अनेक दहशतवादी हल्ल्यांचा तो मास्टरमाईंड होता. कोण होता सैफुल्ला खालिद? त्याने भारतात कोणकोणते दहशतवादी हल्ले घडवून आणले? त्याविषयी जाणून घेऊ…
सैफुल्ला खालिद कोण होता?
मोहम्मद सलीमसह अनेक नावांचा वापर करणारा सैफुल्ला खालिद २००६ मध्ये नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) मुख्यालयावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार होता. पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत हल्ला करणारे तिन्ही दहशतवादी मारले गेले होते. संघ मुख्यालयातील हल्ल्यापूर्वी त्याच्यावर २००५ मध्ये बंगळुरू येथील भारतीय विज्ञान संस्थेत (आयआयएससी) झालेल्या गोळीबाराचा कट रचल्याचा आरोप होता. या दहशतवादी हल्ल्यात आयआयटीचे प्राध्यापक मुनीष चंद्र पुरी यांचा मृत्यू झाला होता आणि इतर चार जण जखमी झाले होते. परंतु, घटनास्थळावरून पलायन करण्यात दहशतवाद्यांना यश आले होते.
पोलिसांच्या तपासानंतर खालिदचा जवळचा सहकारी ‘लष्कर’चा दहशतवादी अबू अनस याच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले. अनस अजूनही फरारी आहे. २००८ मध्ये उत्तर प्रदेशातील रामपूर येथील केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) छावणीवर झालेल्या हल्ल्यामध्येही खालिदचा हात होता. या दहशतवादी हल्ल्यात सात सीआरपीएफ जवान आणि एका नागरिकाचा मृत्यू झाला होता. दोन्ही दहशतवाद्यांनी हल्ला करून पळ काढला होता. २००० च्या मध्यातच खालिदला लष्कर-ए-तैयबाच्या नेपाळ मॉड्यूलचे प्रमुख करण्यात आले होते.
भारत-नेपाळ सीमेपलीकडे कॅडर भरती करणे, आर्थिक आणि लॉजिस्टिक साह्य पुरवणे आणि लष्कर-ए-तैयबाच्या कार्यकर्त्यांच्या हालचालींना अधिक सक्षम करणे, ही कार्ये त्याच्या नियंत्रणात होती, असे वृत्त पीटीआयने दिले आहे. ‘इंडिया टुडे’च्या वृत्तानुसार, लष्कर-ए-तैयबाच्या कमांडर खालिदने नेपाळमध्ये खोट्या ओळखीद्वारे राहत असताना नगमा बानू या स्थानिक महिलेशी लग्न केले होते.
‘द प्रिंट’च्या सूत्रांनुसार, भारतीय गुप्तचर यंत्रणेने लष्कर-ए-तैयबाच्या नेपाळ मॉड्यूलचा पर्दाफाश केल्यानंतर खालिद पाकिस्तानात पळून गेला होता. पाकिस्तानात त्याने लष्कर-ए-तैयबाचा जम्मू-काश्मीरचा कमांडर युसूफ मुझम्मिल, मुझम्मिल इकबाल हाश्मी व मुहम्मद युसूफ तैयबी यांच्यासह अनेक नेत्यांबरोबर काम केले होते. खालिदकडे पाकिस्तानच्या सिंधमधील बदिन व हैदराबाद या जिल्ह्यांमधून कॅडर भरती करण्याचे काम, तसेच दहशतवादी संघटनेसाठी निधी गोळा करण्याचे कामदेखील सोपविण्यात आले होते.
सैफुल्ला खालिदची गोळ्या घालून हत्या
पाकिस्तानातील बदिन शहरात तीन अज्ञात बंदूकधार्यांनी सैफुल्ला खालिदची हत्या केली. नवी दिल्लीतील अधिकाऱ्यांनी रविवारी पीटीआयला सांगितले, “तो आज दुपारी माटली येथील त्याच्या निवासस्थानातून बाहेर पडला. त्यांनंतर सिंध प्रांतातील बदनी येथील क्रॉसिंगजवळच हल्लेखोरांनी त्याची गोळ्या घालून हत्या केली.” प्राप्त वृत्तानुसार, सिंधमधील रुग्णालयात खालिदला मृत घोषित करण्यात आले, तसेच वैयक्तिक शत्रुत्वातून त्याची हत्या झाल्याचेदेखील सांगण्यात आले.
पाकिस्तानात एकापाठोपाठ एक दहशतवाद्यांच्या हत्या
गेल्या काही वर्षांत पाकिस्तानमध्ये हाय-प्रोफाइल दहशतवाद्यांच्या हत्या झाल्या आहेत आणि दहशतवाद्यांच्या हत्यांची संख्यादेखील वाढली आहे. या वर्षी मार्चमध्ये हाफिज सईदचा जवळचा सहकारी अबू कताल याची पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील झेलम जिल्ह्यात अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केली. तो लष्कर-ए-तैयबाचा कमांडर सईदचा पुतण्या असल्याचे सांगितले जाते. त्याच्या हत्येनंतर, हाफिज सईदची सुरक्षा वाढविण्यात आली होती. युनायटेड जिहाद कौन्सिलचा स्वयंघोषित सरचिटणीस शेख जमील-उर-रहमान मार्च २०२४ मध्ये खैबर पख्तुनख्वाच्या अबोटाबादमध्ये मृतावस्थेत आढळून आला होता.
२०१६ च्या पठाणकोट हल्ल्यामागील सूत्रधार आणि जैश-ए-मोहम्मदमधील (जेईएम) दहशतवादी शाहिद लतीफ याची ऑक्टोबर २०२३ मध्ये सियालकोट येथे गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. लतीफच्या हत्येच्याच काही दिवसांपूर्वी भारताचा वाँटेड दहशतवादी मौलाना मसूद अझहरचा सहकारी म्हणून ओळखला जाणारा दाऊद मलिक याची उत्तर वझिरिस्तानमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या करण्यात आली. सप्टेंबर २०२३ मध्ये पाकिस्तानच्या कराचीमध्ये मोटरसायकलवरून आलेल्या हल्लेखोरांनी मौलाना झियाउर रहमान याला गोळ्या घालून ठार केले.
त्याच महिन्यात अबू कासिम काश्मिरीची रवलकोटमधील अल-कुदुस मशिदीत नमाज पठण करताना अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली. अबू कासिम काश्मिरी हा राजौरी जिल्ह्यातील धांगरी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार असल्याचे मानले जात होते. या हल्ल्यात सात जणांचा मृत्यू झाला होता आणि १३ जण जखमी झाले. ऑगस्ट २०२३ मध्ये, हाफिज सईदचा सहकारी सरदार हुसेन अरैन याची सिंधच्या शहीद बेनझीराबाद जिल्ह्यातील काझी अहमद शहरात हत्या करण्यात आली होती. मे २०२३ मध्ये लाहोरमध्ये खलिस्तानी दहशतवादी परमजीत सिंग पंजवार याची दोन अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केली होती.
फेब्रुवारी २०२३ मध्ये हिजबुल मुजाहिदीनचा प्रमुख सय्यद सलाहुद्दीनचा जवळचा सहकारी मानला जाणारा बशीर अहमद पीर ऊर्फ इम्तियाज आलम याला रावळपिंडीतील एका दुकानाबाहेर बंदूकधाऱ्यांनी अगदी जवळून गोळ्या घालून ठार मारले होते. त्याच्या एकाच आठवड्यानंतर, अल-बद्र मुजाहिदीनचा माजी कमांडर सय्यद खालिद रझा याची कराचीमध्ये दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केली. मार्च २०२२ मध्ये इंडियन एअरलाइन्सच्या फ्लाइट आयसी ८१४ च्या अपहरणकर्त्यांपैकी एक असलेल्या झहूर मिस्रीचीदेखील हत्या करण्यात आली. कराचीच्या अख्तर कॉलनीत दोन दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या.