भारतीय हवाई दलाचा ९३वा वर्धापन दिन हिंडन येथे साजरा झाला. या सोहळ्यात सिंदूर मोहिमेतील शौर्याबद्दल कॉर्पोरल वरुण कुमार यांना वायू सेना पदकाने सन्मानित करण्यात आले. हे पदक स्वीकारण्यासाठी हवाई दल प्रमुखांसमोर उभे राहिल्यानंतर वरुण यांनी डाव्या हाताने सलाम करीत लष्करी परंपरेतील शिस्त, आदर आणि निष्ठेचे दर्शन घडवले. कारण त्यांचा उजवा हात निकामी झाला होतता. त्यांची डाव्या हाताने सलामी हवाई दलाच्या धैर्याचे प्रतीक ठरली.
डाव्या हाताने सलाम का?
केरळ येथील वरुण कुमार हे २०१३ मध्ये भारतीय हवाई दलात वैद्यकीय सहायक म्हणून रुजू झाले. मागील दोन वर्षांपासून ते धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या उधमपूर तळावरील वैद्यकीय केंद्रात तैनात होते. हवाई योद्धे, कर्मचाऱ्यांना आपत्कालीन वैद्यकीय सेवा पुरवत होते. भारताच्या सिंदूर मोहिमेदरम्यान पाकिस्तानी क्षेपणास्त्राने उधमपूर येथील त्यांच्या चौकीवर हल्ला केला. यात सार्जंट सुरेंद्र कुमार मोग यांचा मृत्यू झाला, वरुण हे गंभीर जखमी झाले. या हल्ल्यात त्यांचा उजवा हात तुटला. तातडीने वैद्यकीय मदत मिळाल्याने वरुण बचावले. परंतु, संसर्ग टाळण्यासाठी डॉक्टरांना त्यांचा हात कापावा लागला. नंतर पुण्यातील कृत्रिम अवयव केंद्रात प्रशिक्षणाद्वारे ते दैनंदिन कामांसाठी डाव्या हाताचा वापर करून बदललेल्या जीवनाशी जुळवून घेऊ लागले. स्वातंत्र्यदिनापूर्वी त्यांना कृत्रिम हात मिळाला. हवाई दलाच्या वर्धापन दिन सोहळ्यात व्यासपीठाजवळ येताच वरुण यांनी डाव्या हाताने हवाई दल प्रमुख अमरप्रीत सिंग यांना सलाम केला. आणि उपस्थित भारावले.
इतिहास, परंपरा काय?
ऐतिहासिककदृष्ट्या सलाम हा नि:शस्त्र असल्याचे दर्शविण्यासाठी, शांतीचे प्रतीक म्हणून सुरू झाला. उजवा हात तलवारधारी असायचा. सैनिक उजवा हात वर करून आपल्याकडे शस्त्र नसल्याचे दर्शवत असत. कालांतराने सलाम लष्करी शिस्त व सुव्यवस्थेचा अविभाज्य भाग बनला. सलाम करण्याच्या प्रथेची मुळे रोमन लष्करी रितीरिवाजांमध्ये असल्याचे सांगितले जाते. गणवेशात सलाम करणे खोलवरचे अभिवादन दर्शवते. सलाम हा वरिष्ठ अधिकारी, सहकारी सेवेतील सदस्य किंवा राष्ट्रध्वजाकडे निर्देशित केलेला असतो. तो हावभाव सन्मान, शिस्त आणि निष्ठा या मूल्यांना मूर्त रूप देतो. जगभरातील लष्करी दलांमध्ये उजव्या हाताने सलाम करण्याची परंपरा आहे. उजव्या हाताने सलामी ही लष्करी शिस्तीचे एक शक्तिशाली प्रतीक मानली जाते. तो केवळ साधा हावभाव नसून आदर, शिस्त आणि व्यावसायिकतेचे लक्षण आहे, जी लष्करी संस्कृतीत अद्वितीय वारसा, समृद्ध परंपरा प्रतिबिंबित करते.
सलामीची मूलतत्त्वे
योग्य सलाम करण्यासाठी केवळ हात वर करणे पुरेसे नसते. कठोर नियमांनुसार नियंत्रित केलेला तो अचूक हावभाव आहे. योग्यरित्या सलाम कसा करायचा, हे सैन्यात जितके महत्त्वाचे असते, तितकेच तो कधी करायचा, हे महत्त्वाचे आहे. ध्वजवंदन करताना, गणवेशात कामावर अथवा कामाबाहेर अधिकाऱ्यांना भेटल्यावर, औपचारिक लष्करी समारंभात सलाम केला जातो. सलाम करताना शरीरयष्टीत आत्मविश्वास आणि आदर अधोरेखित होणे आवश्यक असते. त्यामुुळे सलाम नेहमीच लक्ष केंद्रित करून उभा राहून केला जातो. नव्याने भरती झालेल्यांसाठी योग्य सलामीची कला आत्मसात करणे, हे लष्करी शिष्टाचार समजून घेण्याचे पाऊल मानले जाते.
सैन्य दलांचे वेगवेगळे सलाम
भारतीय सैन्य दलांचे वेगळे सलाम हे त्यांचा समृद्ध इतिहास, परंपरा आणि मूल्यांचे प्रतीक आहेत. प्रत्येक शाखेने स्वत:ची सलाम शैली विकसित केली आहे. भारतीय लष्कराच्या सलामीत तळहात उघडा करून दाखवला जातो. बोटे आणि् अंगठा एकत्र धरलेला असतो. मधले बोट टोपी किंवा कपाळाला स्पर्श करीत असते. याउलट नौदलाच्या सलामीत कपाळाच्या ९० अंशाच्या कोनात तळवा खाली करून अभिवादन केले जाते. हे विशिष्ट हावभाव त्याला इतर शाखांपासून वेगळे करतात. भारतीय हवाई दलाने सलामीची विशिष्ट शैली स्वीकारली. जमिनीपासून ४५ अंशांच्या कोनात उंचावलेला तळहात असतो. ही स्थिती लष्कर आणि नौदलाच्या सलामीतील मध्यबिंदू आहे. तीनही दलांच्या मानक सलामी पलीकडे विशेष सलाम आहेत. काही कार्यक्रमात विशिष्ट सलामी दिली जाते. शहीद सैनिकांचा सन्मान करताना आदराचे प्रतीक म्हणून गंभीर अभिवादन केले जाते.
नियम, अपवाद कधी?
लष्करी नियमात डाव्या हाताने सलाम करण्याची परवानगी नाही. तथापि, जेव्हा एखाद्या सैनिकाला दुखापत, कायमच्या अपंगत्वाने उजव्या हाताने सलाम करणे शक्य नसते, तेव्हा अपवाद केले जातात. डाव्या हाताने सलाम करण्यासाठी भारतीय सैन्यासह अन्य दल कठोर नियमावलीचे पालन करतात. जेव्हा एखाद्या सैनिकाला उजव्या हाताचा वापर करणे अशक्य असते, तेव्हाच डाव्या हाताने सलाम करणे योग्य मानले जाते. राष्ट्रीय रायफल्सचे शिपाई धनसिंग गुर्जर यांनी युद्धात उजवा हात गमावला होता. दहशतवादी विरोधी कारवाईत दाखविलेल्या अतुलनीय शौर्याबद्दल २०२४ मध्ये सेना पदकाने सन्मानित करताना त्यांनी डाव्या हाताने सलाम केला. असाधारण परिस्थितीत डाव्या हाताने केलेली सलामी खूप महत्त्वाची आहे. गुर्जर आणि वरुण कुमार सारखे सैनिक शारीरिक मर्यादा योद्ध्याला खचवू शकत नसल्याचे प्रतीत करतात. त्यांची कृती सहकारी सैनिकांबरोबर राष्ट्राला प्रेरणा देते.
