One Queen Ant Two Species Offsprings जिवंत सजीवांच्या जगाला एक मूलभूत जैविक नियम लागू होतो, तो म्हणजे कोणताही सजीव अपत्य जन्माला घालतो, तेव्हा ते त्या पालकांच्याच प्रजातीचे असते. पण विज्ञानाने आता या नियमालाच आव्हान दिले आहे. भूमध्य सागरी किनाऱ्यावरील Messor ibericus या मुंग्यांच्या प्रजातीतील राणी आपल्याच नव्हे, तर दुसऱ्या Messor structor या प्रजातीच्या नरांना जन्म देते, असा जगाला हादरवून टाकणारा निष्कर्ष ‘Nature’ या विज्ञान विषयक प्रतिष्ठित जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला आहे.
हा संशोधनप्रकल्प फ्रान्स, इटली, बल्गेरिया आणि ऑस्ट्रिया येथील संशोधकांनी एकत्र येऊन हाती घेतला होता. फ्रान्समधील मॉँपेलिए विद्यापीठातील जीवशास्त्रज्ञ जोनाथन रोमीगीए (Jonathan Romiguier) या शोधनिबंधाचे सहलेखक आहेत. त्यांनी CNN शी बोलताना सांगितले की, “या प्रजातीबाबत काहीतरी विलक्षण घडते आहे अशी शंका आम्हाला होती. पण ते इतके अविश्वसनीय असेल, हे आम्ही स्वप्नातही कल्पिले नव्हते.”
शंकेची पाल चुकचुकली…
मुंग्यांच्या जगात सामाजिक रचना अत्यंत काटेकोर असते. राणी मुंगी अंडी घालते, नर मुंगी केवळ प्रजननासाठी असतो, तर फलन प्रक्रियेत नसलेल्या (sterile) कष्टकरी मुंग्या घरबांधणी, अन्न साठवणे आणि पिल्लांची देखभाल करणे आदी जबाबदाऱ्या सांभाळतात. पण रोमीगीए आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जेव्हा Messor ibericus या मुंग्यांच्या वसाहतींचे जनुकविश्लेषण केले, तेव्हा त्यांना एक धक्कादायक गोष्ट आढळली ती म्हणजे, या प्रजातीतील सर्व कष्टकरी मुंग्यांच्या डीएनएपैकी अर्धा भाग Messor structor या दुसऱ्या प्रजातीशी जुळत होता!
Taliban FM Muttaqi India Visit: मुत्तकींच्या भेटीतून उघड होतोय का अफगाणिस्तानातील भारताचा नवा प्लॅन?
मुंग्यांमध्ये अशा प्रकारचा संकर (hybridisation) पूर्णपणे नवीन नाही. काही प्रजातींमधील राणी मुंगी परप्रजातीच्या नरांशी मिलन करून संकरित कष्टकरी मुंग्या निर्माण करते. मात्र Messor ibericus च्या बाबतीत कोडे असे होते की, या प्रजातींच्या वसाहती भूमध्य प्रदेशातील अनेक भागांत सापडल्या, तिथे तर Messor structor चा मागमूसही नव्हता. मग या राणी मुंग्या त्या दुसऱ्या प्रजातीच्या नरांशी संकर कसा करतात? हा प्रश्न संशोधकांना सतावत होता.

प्रयोगशाळेतील शोध
उत्तर शोधण्यासाठी संशोधकांनी Messor ibericus वसाहतींच्या डीएनएचे बारकाईने विश्लेषण केले. आणि त्यांना लक्षात आले की, त्या वसाहतींमध्ये Messor structor प्रजातीचे नर मुंग्यांचे समूह अस्तित्वात होते! यानंतर त्यांनी त्या नर मुंग्यांचे सूक्ष्म जनुकपरीक्षण केले. निष्कर्ष धक्कादायक होता. त्या नरांच्या माइटोकॉन्ड्रियल डीएनएमध्ये Messor ibericus प्रजातीचा ठसा होता. माइटोकॉन्ड्रियल डीएनए केवळ आईकडून अपत्यात जातो, त्यामुळे स्पष्ट झाले की, हे Messor structor नर प्रत्यक्षात Messor ibericus राणीचीच अपत्ये होती.
हे म्हणजे माणसाने चिंपांझीच्या पिल्लांना जन्म देण्यासारखेच
संशोधकांनी मग काही राणी मुंग्या वेगळ्या ठेवल्या आणि त्यांच्यानी घातलेल्या अंड्यांचे निरीक्षण केले. साधारण १० टक्के अंडी पूर्णपणे Messor structor प्रजातीची होती! संशोधक म्हणतात, “हे म्हणजे माणसाने चिंपांझीच्या पिल्लांना जन्म देण्यासारखेच होते!”
ही प्रक्रिया नेमकी कशी घडते?
शास्त्रज्ञांच्या मते, Messor ibericus राणी मुंग्या त्यांच्या शरीरात असलेल्या ‘स्पर्माथेका’ (spermatheca) नावाच्या खास अवयवात जतन केलेल्या नराच्या जनुकद्रव्याचा वापर करून दोन प्रजातींची अपत्ये निर्माण करतात. या प्रक्रियेत तयार होणाऱ्या काही अंड्यांमध्ये केवळ Messor structor नराच्या जनुकांचा वापर होतो, तर मातेचा (राणी) डीएनए त्यात नसतो. फक्त तिचे माइटोकॉन्ड्रियल डीएनए अपत्यात राहतो. परिणामी ती अंडी दुसऱ्या प्रजातीच्या नरांमध्ये रूपांतरित होतात.
एकाच वेळी दोन प्रजातींच्या नराचा जन्म
संशोधक सांगतात, “या युक्तीमुळे राणी एकाच वेळी दोन प्रजातींचे नर निर्माण करते. त्यामुळे तिच्या मुली , ज्या नंतर राणी मुंगी होतात, त्या दोन्ही प्रजातींच्या नरांशी संकर करू शकतात. Messor ibericus नरांशी संकरातून नवीन राणी मुंग्या जन्माला येतात, तर Messor structor नरांचे शुक्राणू वापरून संकरित कष्टकरी मुंग्या आणि नवीन Messor structor नर तयार होतात.”
निसर्गाचे आश्चर्यकारक संतुलन
या अभ्यासामुळे जीवशास्त्रातील अनेक जुने समज ढवळून निघाले आहेत. एक सजीव दुसऱ्या प्रजातीची संतती निर्माण करू शकतो, ही कल्पनाच विज्ञानासाठी क्रांतिकारक आहे. यामुळे उत्क्रांतीच्या टप्प्यात ‘प्रजाती’ची सीमारेषा किती लवचिक असू शकते, याची नवी दिशा मिळू शकेल, असे संशोधकांना वाटते. रोमीगीए म्हणतात, “ही उत्क्रांतीतील एक अप्रतिम क्लृप्ती आहे. राणी मुंगीने तिचा वंश आणि समाजरचना टिकावी म्हणून निर्माण केलेली जैविक यंत्रणा अत्यंत सूक्ष्म, पण प्रभावी आहे.” शास्त्रज्ञांच्या मते, या नव्या शोधामुळे केवळ मुंग्यांच्या सामाजिक जैविकतेबद्दलच नव्हे, तर प्रजातींच्या उत्क्रांतीच्या मर्यादांबद्दलही आपली समज आणि उमज वेगळे वळण घेईल.
निसर्गाच्या ‘सृजनशक्ती’चे अद्भुत उदाहरण
एकाच राणीने दोन वेगळ्या प्रजातींची संतती निर्माण करणे, हे निसर्गाच्या ‘सृजनशक्ती’चे अद्भुत उदाहरण आहे. मानवजातीसाठी हा अभ्यास केवळ कुतूहल निर्माण करणाराच नाही, तर प्रजातींच्या उत्क्रांतीच्या रहस्यांकडे नेणारा एक नवा मार्गही आहे. ‘Nature’ मध्ये प्रसिद्ध झालेल्या या संशोधनाने दाखवून दिले आहे की, निसर्गाच्या प्रयोगशाळेत अजून कितीतरी गुपिते लपलेली आहेत आणि प्रत्येक छोट्या मुंगीच्या घरातदेखील विज्ञानाचा नवा अध्याय लिहिला जात आहे