प्रसिद्ध अमरनाथ यात्रेला येत्या ३० जूनला सुरुवात होत आहे. ४३ दिवस सुरु रहाणाऱ्या या अमरनाथ यात्रेच्या निमित्ताने अभुतपूर्व सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. करोना संसर्गामुळे दोन वर्षांच्या खंडानंतर अमरनाथ यात्रा होत आहे. यामुळे यावेळी याआधीचे गर्दीचे उच्चांक मोडले जातील एवढी भाविकांची गर्दी होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

अमरनाथ यात्रा ही दोन मार्गांनी केली जाते. पारंपारिक ४८ किलोमीटरच्या पहलगाम मार्गे जाणाऱ्या भाविकांची संख्या ही सर्वात जास्त असेल असा अंदाज आहे. तर १४ किलोमीटरच्या बालताग मार्गेही काही तासात अमरनाथ यात्रा करत शिवलिंगाचे दर्शन घेतले जाते. या दोन्ही मार्गावर संपूर्णपणे सीसीटीव्ही कॅमेराच्या माध्यमातूव नजर ठेवली जाणार आहे. एवढंच नाही या मार्गावर असलेल्या विविध भुभागांवरील टोकावर – शिखरांवरही सुरक्षा दले तैनात केली जाणार आहे. विविध टप्प्यात अमरनाथ यात्रा ही केली जात असल्याने प्रत्येत टप्प्यात सुरक्षा यंत्रणांची विविध फळी उभारण्यात आली आहे.

गुप्तचर विभागाकडून विशिष्ट इशारा अजून मिळाला नसला तरी या संपूर्ण मार्गावर ड्रोनविरोधी यंत्रणा (Anti-drones system) सक्रिय करण्यात आली आहे. कारण गेल्या काही दिवसांत सीमेपलिकडून – पाकिस्तानातून ड्रोनद्वारे स्फोटके पाठवण्यात आल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. तेव्हा यानिमित्ताने नव्या पद्धतीने हल्ला होण्याची भिती व्यक्त केली जात असतांना अमरनाथ यात्रेसाठी विशेष काळजी घेण्यात येत आहे.

अमरनाथ यात्रेसाठी आलेल्या प्रत्येक भाविकाला RFID tags दिले जाणार आहे. यामुळे यात्रेसाठी होणाऱ्या गर्दीवर लक्ष ठेवणे सोपे जाणार असून प्रत्येक टप्प्यात असलेल्या यात्रेकरुंच्या संख्येवरही नियंत्रण ठेवता येणार आहे.

अमरनाथ यात्रेत सुरक्षा व्यवस्थेत लष्कर, निमलष्करी दल आणि जम्मू काश्मिर पोलिस दल हे वेगवेगळ्या पातळीवर काम करत आहे. या सुरक्षा दलांच्या समन्वयासाठी Multi Agency Centre (MAC) ची स्थापना करण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यातच आता करोना बाधितांची संख्या देशभरात वाढत असल्याने सुरक्षा दलाची चिंता वाढली आहे. सुरक्षेच्या उपाययोजना करतांना, अमरनाथ यात्रेमधील एवढ्या मोठ्या गर्दीला हाताळतांना करोना संसर्गाची बाधा सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांमध्ये न होण्याचे मोठे आव्हान सुरक्षा दलापुढे असणार आहे.