S M Raju Stuntman Death: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील स्टंट कलाकार एस. एम. राजू यांचा एका स्टंटदरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. तमिळ चित्रपटातील अॅक्शन सीन शूट करताना राजू यांचा १३ जुलैला जागीच मृत्यू झाला. वेट्टुवन या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असताना हा अपघात घडला. दरम्यान, स्टंटमन एस एम राजू यांच्या निधनानंतर सुरक्षा आणि प्रोटोकॉलसंदर्भातील मुद्दा अधोरेखित झाला आहे. या अपघातानंतर स्टंटमनना संरक्षण देण्यासाठी कायदेशीर तरतूद आहे का किंवा दुखापत वा मृत्यू झाल्यास त्यांना भरपाई मिळते का असे अनेक प्रश्न उभे राहिले आहेत.

अॅक्शन सीनदरम्यान स्टंटमन राजूंचा मृत्यू

तामिळनाडूच्या नागापट्टणम जिल्ह्यात पा रंजीत दिग्दर्शित आर्य अभिनीत चित्रपटासाठी कार पलटवण्याचा जीवघेणा स्टंट चित्रित करत असताना हा अपघात घडला आहे. राजू यांना तातडीने नागापट्टणम इथल्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, अशा अपघातांना रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी या क्षेत्रातील काही लोकांकडून होत आहे.

या अपघातानंतर चित्रपट दिग्दर्शक पा रंजित आणि इतरांविरुद्ध निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल करण्यामागे नेमकं कोण जबाबदार आहे आणि सुरक्षा नियमांचे पालन करण्यात आले होते का याचा तपास पोलिस करत आहेत. भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६(१), कलम २८९ आणि कलम १२५ नुसार हा गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. कलम १०६(१)-निष्काळजीपणामुळे मृत्यू घडवणे, कलम २८९- यंत्रसामग्रीबाबत निष्काळजीपणा बाळगणे आणि कलम १२५-इतरांच्या जीवाला धोका होऊ शकतो अशी कृती.

स्टंटमनला सुरक्षा देणारे कायदे आहेत का?

कामाच्या ठिकाणी किंवा त्यादरम्यान अपघात किंवा दुखापत झाल्यास भरपाईसाठी कायदेशीर तरतूद आहे.

कामगार भरपाई कायदा

या कायद्यानुसार कामगार त्यांच्या कामामुळे आणि कामाच्यादरम्यान मृत्यू किंवा दुखापत झालेल्यांना भरपाई देण्याची तरतूद आहे. यामध्ये कामाच्यादरम्यान आणि कामामुळे उद्भवणारी दुखापत किंवा अपघात यांचा समावेश आहे, म्हणजे सेटवर स्टंट करताना किंवा संबंधित सराव सत्रादरम्यान भरपाई मिळू शकते.

या कायद्याअंतर्गत कंपनी किंवा संबंधित व्यक्तीने खालील प्रकरणांमध्ये कोणताही दोष नसताना भरपाई द्यावी लागते

  • कामावर अपघाती दुखापत
  • कायमचे किंवा तात्पुरते अपंगत्व
  • कामाच्या ठिकाणी अपघातामुळे मृत्यू

कर्मचारी राज्य विमा कायदा, १९४८

रोजगाराशी संबंधित अपघात किंवा आजारांमुळे दुखापत किंवा मृत्यू झाल्यास कर्मचाऱ्यांना वैद्यकीय, अपंगत्व आणि इतर फायदे या कायद्याद्वारे दिले जातात. या कायद्यात मृत कामगारांच्या कुटुंबीयांना तात्पुरते किंवा कायमचे अपंगत्व येणे आणि मृत्यूनंतर भरपाई देण्याच्या तरतुदी समाविष्ट आहेत.

औद्योगिक वाद कायदा, १९४७

या कायद्यात कार्यालयीन वादांचे निराकरण करण्याची तरतूद आहे, ज्यामध्ये कामगारांच्या दुखापती आणि मृत्यूसाठी भरपाईशी संबंधित वादांचा समावेश आहे. तसंच भरपाईच्या दाव्यांशी संबंधित वादांचे समेट, मध्यस्थी आणि निर्णय घेण्याची तरतूद आहे.
अपघाताची विशिष्ट परिस्थिती आणि रोजगाराच्या स्वरूपावर अवलंबून मोटार वाहन कायदा (जर अपघातात वाहन असेल तर) यासारखे इतर कायदेदेखील भरपाई निश्चित करू शकतात.

स्टंटमनसाठी निश्चित भरपाई किंवा विमा आहे का?
चित्रपट निर्मिती कंपन्यांकडून सामान्यतः स्टंट कलाकारांच्या दुखापती किंवा मृत्यूसाठी विमा पॉलिसी असणे गरजेचे असते.

जर अपघात कंपनी किंवा संबंधित जबाबदार व्यक्ती तसंच उत्पादनात सहभागी असलेल्या इतर पक्षांच्या निष्काळजीपणामुळे झाला असेल तर स्टंटमन किंवा त्यांचे कुटुंबीय कामगार भरपाई कायदा किंवा ESI कायद्याद्वारे नुकसान भरपाईसाठी दावा दाखल करू शकतात.
स्टंट कलाकारांच्या रोजगार करारांमध्ये दुखापती किंवा मृत्यूसाठी भरपाईशी संबंधित विशिष्ट तरतुदीदेखील समाविष्ट असू शकतात, ज्या कायदेशीर तरतुदींव्यतिरिक्त लागू केल्या जाऊ शकतात.

मूव्ही स्टंट आर्टिस्ट असोसिएशन (MSAA), मुंबई</strong>
ही FWICE (फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज) अंतर्गत एक संस्था आहे. ही संस्था स्टंट कलाकार आणि दिग्दर्शकांचे प्रतिनिधित्व करते. एकूण सुमारे ४०९ सदस्य आणि ६९ स्टंट दिग्दर्शक आहेत. चित्रपट निर्माते असोसिएशनच्या परवानगीशिवाय स्टंट कलाकाराला कामावर ठेवू शकत नाहीत.

ऑक्टोबर २०२३ मध्ये नेटफ्लिक्स इंडिया आणि एमएसएए यांनी ५० स्टंट आणि एसएफएक्स तज्ज्ञांसाठी एक सुरक्षा कार्यशाळा आयोजित केली होती, यामध्ये कामादरम्यानच्या जोखमीचे मूल्यांकन, अग्निशामक स्टंट, हवाई रिगिंग, स्फोटके यांसारख्या पद्धतींचा समावेश होता. कार्यशाळांच्या माध्यमातून FWICE संस्था कंपनी किंवा संबंधित जबाबदारी व्यक्तींसोबतच्या त्यांच्या सामंजस्य करारांमध्ये सुरक्षा मानके अंतर्भूत करण्याचे काम करत आहे. यामध्ये अग्निरोधक, वीज, कामाचे तास, स्वच्छता यांचा समावेश आहे. पूर्वी चित्रपटाच्या शूटिंग सेटवर रुग्णवाहिका किंवा डॉक्टर नसायचे. अॅस्बेस्टॉस सूट, जाळी, बॉक्स, गाद्या वापरल्या जात असत. आज या सगळ्या साधनांऐवजी एअरबॅग्ज, अग्निरोधक जेल, हार्नेस आणि परदेशी सुरक्षा रिग्सचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.

स्टंटमन विम्याकडे एक पाऊल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०१४-१५ मध्ये अक्षय कुमार आणि एशियन हार्ट इन्स्टिट्यूटने मुंबईतील ३७० स्टंटमनसाठी अपघात आणि जीवन विमा सुरू केला. यामध्ये प्रत्येकी १० लाख रुपयांचा विमा होता. या योजनेत १८-५५ वयोगटातील स्टंटमनला सहा लाख रुपयांचे विमा कवच रुग्णालयात दाखल झाल्यास आणि १० लाख रुपयांचे विमा कवच मृत्यू झाल्यास मिळेल.