महाराष्ट्राच्या स्वप्निल कुसळेने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला तिसरे पदक मिळवून दिले. स्वप्निलने नेमबाजीच्या ५० मीटर रायफल थ्री-पोझिशन प्रकारात कांस्यपदकाची कमाई करताना इतिहास घडवला. नेमबाजीच्या या प्रकारात ऑलिम्पिक पदक जिंकणारा तो पहिलाच भारतीय ठरला. मात्र, त्याचा इथपर्यंतचा प्रवास फारसा सोपा नव्हता. त्याच्या याच प्रवासाचा आणि यापूर्वीच्या कामगिरीचा आढावा.

स्वप्निलचे ऑलिम्पिक यश का खास ठरते?

ऑलिम्पिकमध्ये ५० मीटर रायफल थ्री-पोझिशन प्रकारात यापूर्वी भारताच्या एकाही नेमबाजाला अंतिम फेरीपर्यंत पोहोचता आले नव्हते. त्यामुळे मूळात अंतिम फेरी गाठणे हेच स्वप्निलसाठी मोठे यश होते. त्यानंतर आठ नेमबाजांच्या अंतिम फेरीत त्याच्यासमोर चीनचा विश्वविक्रमवीर लिऊ युकुन आणि जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेला चेक प्रजासत्ताकचा जिरी प्रिवरातस्की आदींचे आव्हान होते. चीनच्या नेमबाजाने अपेक्षित यश मिळवताना सुवर्णपदक पटकावले. मात्र, तिसऱ्या स्थानासाठी स्वप्निल आणि जिरी यांच्यात स्पर्धा सुरू होती. या दडपणाखाली स्वप्निलने संयमाने वेध घेतला आणि ‘वर्ल्ड नंबर वन’ला मागे टाकत कांस्यपदक कमावले. युक्रेनचा सेरी कुलिश रौप्यपदकाचा मानकरी ठरला.

हेही वाचा – हमास प्रमुख इस्माईल हानियाच्या हत्येनंतर तणाव वाढणार, भारताच्याही चिंतेत वाढ; कारण काय?

स्वप्निलची पार्श्वभूमी…

स्वप्निल मूळचा कोल्हापूरजवळील कांबळवाडीचा रहिवासी. वडील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक, तर आई गावची सरपंच. धाकट्या भावाला कबड्डीची आवड, पण पायाच्या दुखापतीमुळे खेळापासून दूर. बहिणीने अभ्यासाला प्राधान्य देत खेळांमध्ये कारकीर्द न करण्याचा निर्णय घेतला. स्वप्निलने मात्र खेळातच काही तरी करण्याचे ध्येय बाळगले.

नेमबाजीकडे कसा वळला?

स्वप्निलने २००८ मध्ये सांगली येथील क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रवेश मिळवला आणि पुढील वर्षी खेळ निवडण्याच्या वेळी त्याने नेमबाजीला पसंती दिली. त्याने २००९ ते २०१४ या कालावधीत क्रीडा प्रबोधिनीच्या नाशिक केंद्रात सराव केला. त्यानंतर मध्य रेल्वेमध्ये नोकरी मिळाल्यावर तो पुण्यात वास्तव्यास आला आणि तिथे बालेवाडी स्टेडियममध्ये सरावाला प्रारंभ केला. माजी ऑलिम्पिकपटू दीपाली देशपांडे यांचे स्वप्निलला मार्गदर्शन लाभले. तो मध्य रेल्वेमध्ये तिकीट तपासनीस म्हणून काम करतो. मात्र, नेमबाजीलाही तो तितकाच वेळ देतो.

पहिली विशेष कामगिरी कोणती?

नेमबाजीला सुरुवात केल्याच्या चार वर्षांनंतर २०१५ मध्ये स्वप्निलने आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत ५० मीटर रायफल प्रोन प्रकारात सुवर्णयश संपादन केले. ही त्याची पहिली विशेष कामगिरी ठरली. त्याच वर्षी त्याने याच नेमबाजी प्रकारात राष्ट्रीय जेतेपद मिळवले. यावेळी त्याने ऑलिम्पिक पदकविजेत्या गगन नारंगला मागे टाकले होते. त्यानंतर हळूहळू तो ५० मीटर रायफल थ्री-पोझिशनकडे वळला. नेमबाजीच्या या प्रकारात मांडीवर बसून (नीलिंग), मग पोटावर झोपून (प्रोन) आणि शेवटी उभे राहून (स्टँडिंग) वेध घेतला जातो.

हेही वाचा – ब्रेडपासून डायपरपर्यंत सगळंच महागलं! केनियापासून इतर आफ्रिकन देशांमध्ये पसरतंय असंतोषाचं लोण

याआधीची कामगिरी कशी?

२८ वर्षीय स्वप्निल बऱ्याच वर्षांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळत आहे. त्याने बरेच यशही मिळवले आहे. २०२२ मध्ये त्याने बाकू, अझरबैजान येथे झालेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत वैयक्तिक आणि पुरुष सांघिक गटात राैप्य, तर मिश्र सांघिक गटात सुवर्ण अशी तिहेरी पदककमाई केली होती. त्याआधी २०२१ मध्ये दिल्ली येथे झालेल्या विश्वचषकातही सांघिक गटात त्याने सुवर्णपदक मिळवले होते. तसेच हांगझो येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतही सांघिक गटातील भारताच्या सुवर्णयशात स्वप्निलची कामगिरी महत्त्वाची होती. तसेच २०२३ मध्ये आशियाई अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेतही स्वप्निलचा समावेश असलेल्या भारतीय संघाने ५० मीटर रायफल थ्री-पोझिशन प्रकारात रौप्यपदक मिळवले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्वप्निल ऑलिम्पिकसाठी कसा पात्र ठरला?

२०२२ मध्ये कैरो येथे झालेल्या विश्वचषक स्पर्धेतील चौथ्या क्रमांकासह स्वप्निलने भारताला ऑलिम्पिक कोटा मिळवून दिला. त्यानंतर मे २०२४ मध्ये दिल्ली आणि भोपाळ येथे झालेल्या निवड चाचणीतील कामगिरीच्या आधारे त्याला पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारतीय संघात स्थान मिळाले. अखेरच्या निवड चाचणीत स्वप्निल पाचव्या स्थानी होता. मात्र, पहिल्या तीन निवड चाचणीमध्ये यशस्वी कामगिरी केल्यामुळे त्याला पॅरिस ऑलिम्पिकसाठी संधी देण्यात आली आणि त्याने भारताला कांस्यपदक मिळवून दिले.