संयुक्त राष्ट्रांची प्रतिष्ठित संस्था असलेल्या ‘युनेस्को’च्या उपाध्यक्षपदाची निवडणूक गेल्या आठवड्यात झाली. यात पाकिस्तानने भारतावर मात करत २०२३ ते २०२५ या काळासाठी हे पद स्वत:च्या पदरात पाडून घेतले. हा पराभव आपल्या मुत्सद्देगिरीचे अपयश मानले जात असून उच्च पातळीवर याची दखल घेतली जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर ‘युनेस्को’ची रचना आणि कार्य, त्यातील पदांचे महत्त्व, भारताच्या पराभवाचा अर्थ आदी बाबींचा घेतलेला आढावा…

‘युनेस्को’ म्हणजे काय?

१९४५ साली स्थापन झालेल्या ‘युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन’ याचे संक्षिप्त रूप म्हणजे ‘युनेस्को’. शिक्षण, कला, विज्ञान आणि संस्कृती यामध्ये विविध राष्ट्रांचा दुवा साधून जागतिक शांतता व सुरक्षेसाठी प्रयत्न करणे हे या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या संस्थेमध्ये १९४ सदस्य देश व १२ सहयोगी सदस्य आहेत. तसेच सरकारी-खासगी संस्था, कंपन्यांचेही ‘युनेस्को’ला सहकार्य होत असते. या संस्थेचे मुख्यालय फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये आहे. याखेरीज ५३ प्रादेशिक कार्यालये व १९९ देशांमध्ये आयुक्तालये कार्यरत आहेत. संस्थेमध्ये महासंचालक हे सर्वोच्च पद असून स्थापनेपासून आतापर्यंत ११ जणांनी हे पद भूषविले आहे. संस्थेचे सर्व कामकाज ‘कार्यकारी मंडळा’मार्फत चालविले जाते. द्वैवार्षिक निवडणुकीत प्रदेशवार सदस्य निवडले जातात.

हेही वाचा – ग्रे मार्केट प्रीमियम म्हणजे काय? ग्रे मार्केटमध्ये शेअर्सचा व्यवहार कसा होतो?

अलीकडे झालेल्या निवडणुकीचा निकाल काय?

नुकत्याच झालेल्या निवडणुकीत जगभरातील ५८ देश कार्यकारी समितीवर निवडून गेले. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना यात स्थान मिळाले. त्यानंतर गेल्या शुक्रवारी पॅरिसमध्ये झालेल्या २१८व्या सत्रामध्ये पदाधिकाऱ्यांची निवडणूक झाली. या ५८ देशांनी एक अध्यक्ष व सहा प्रदेशांमधून सहा उपाध्यक्षांची निवड केली. यात आशिया-प्रशांत (एशिया पॅसिफिक) प्रदेशातून पाकिस्तानचा प्रतिनिधी निवडून आला. यावेळी पाकिस्तानला ३८ तर भारताला केवळ १८ मते मिळाली. एरवी जागतिक पातळीवर महत्त्वाची भूमिका बजावणारी सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतासाठी एवढ्या मोठ्या फरकाने झालेला पराभव जिव्हारी लागणारा आहे.

‘युनेस्को’ उपाध्यक्षपदाचे महत्त्व काय?

या संस्थेमार्फत जगभरात राबविले जाणाऱ्या उपक्रमांना कार्यकारी समितीमध्ये अंतिम मंजुरी दिली जाते. यावेळी समितीमधील सहा उपाध्यक्ष आपापल्या प्रदेशाचे नेतृत्व करतात. त्यामुळे आता पुढील किमान दोन वर्षे आशिया-प्रशांत प्रदेशातील उपक्रमांच्या नाड्या प्रामुख्याने पाकिस्तानच्या हाती असतील. कार्यकारी समितीच्या बैठकांमध्ये अध्यक्ष अनुपस्थित असल्यास सहापैकी एक उपाध्यक्ष ती जबाबदारी पार पाडतो. त्या दृष्टीनेही उपाध्यक्षपदाला महत्त्व आहे. पाकिस्तानने अर्थातच या निकालाचे स्वागत करून आपल्या बाजूने कौल देणाऱ्या देशांचे आभार मानले आहेत. उपाध्यक्षपदाची आपली जबाबदारी योग्य रीतीने पार पाडू, असे आश्वासनही पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने ‘एक्स’ या समाजमाध्यमाद्वारे दिले आहे.

हेही वाचा – सॅम माणेकशा पाकिस्तान लष्करात गेले असते तर? जिना यांचा प्रस्ताव त्यांनी का फेटाळला?

निकालावर भारताची प्रतिक्रिया काय?

भारताने निकालावर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र केंद्रीय स्तरावर या पराभवाची गांभीर्याने नोंद घेतली गेल्याचे सांगितले जात आहे. चक्राकार पद्धतीने आलेले ‘जी-२०’चे अध्यक्षपद यशस्वीरीत्या भूषविल्याबद्दल गेले वर्षभर भारताने आपली पाठ थोपटून घेतली आहे. मात्र संयुक्त राष्ट्रांमधील महत्त्वाच्या संस्थेतील महत्त्वाच्या पदावर निवडून येणे भारताला शक्य झालेले नाही. त्यामुळेच ‘युनेस्को’ची जबाबदारी असलेल्या परराष्ट्र व्यवहार आणि मनुष्यबळ या विभागांकडून परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ‘युनेस्को’मधील राजकीय नियुक्ती असलेले भारताचे प्रतिनिधी विशाल शर्मा यांच्याकडे या दारुण पराभवाबाबत विचारणाही करण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

amol.paranjpe@expressindia.com