scorecardresearch

Premium

विश्लेषण : जागावाटपाचे कोडे अन् बावनकुळेंचे आकडे… भाजपचे विधानसभा निवडणुकीचे गणित काय?

चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक वक्तव्य केलं ज्याचे पडसाद राज्यात उमटताना दिसत आहेत

The puzzle of seat distribution and the figures of Bawankule What is BJP maths for assembly elections?
वाचा सविस्तर विश्लेषण

हृषिकेश देशपांडे

लोकसत्ताची ही बातमी वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have a account? Sign in

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप आगामी विधानसभा निवडणुकीत २४० जागा लढवेल असे जाहीर केल्याने नव्या चर्चेला तोंड फुटले. मग शिंदे गटाला केवळ ४८ जागा मिळणार काय, रामदास आठवले यांचा रिपाइं तसेच महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष यांना किती जागा मिळणार, हे प्रश्न उपस्थित होतात. याखेरीज कोल्हापूर जिल्ह्यातील विनय कोरे यांच्या जनसुराज्य पक्षाचीही भाजपशी जवळीक आहे. विनायक मेटे यांचा शिवसंग्राम पक्षही भाजप आघाडीत आहे. या पक्षांबाबत काय भूमिका आहे, या प्रश्नांची उत्तरे शोधावी लागतील. अर्थात बावनकुळे यांनी सारवासारव करत जागावाटप निश्चित झाले नसल्याचा खुलासा केला. भाजपची सर्व २८८ मतदारसंघात तयारी केली जात आहे असे त्यांनी नमूद केले. मात्र यातून भाजपचे उद्दिष्ट स्पष्ट होते.

पेच कुठे उद्भवू शकतो?

गेल्या विधानसभेला भाजपने १६४ जागा लढवल्या होत्या तर शिवसेनेच्या वाट्याला १२६ जागा आल्या होत्या. आता केंद्रात आठ वर्षे भाजपचे सरकार आहे. त्यामुळे आता साहजिकच मोठा भाऊ भाजपच राहणार. मग जर खरेच भाजपने २४० जागा लढवल्या तर, मग शिंदे गटाचे आताच ४० आमदार आहेत. केवळ आठच अतिरिक्त जागा त्यांना मिळतील. त्यांच्या पक्षात अनेक नवे कार्यकर्ते प्रवेश करत आहेत. जागावाटप सूत्र ठरले असेल, तर मग या नव्या कार्यकर्त्यांना कसे सामावून घेणार? जागावाटप हे केंद्रात ठरते, त्यामुळे भाजपचे श्रेष्ठीच त्याबाबत निर्णय घेणार, मग अशा वेळी बावनकुळे यांच्यासारख्या अनुभवी नेत्याने असे वक्तव्य करून सरकारमधील दोन पक्षांमध्ये अस्वस्थता निर्माण केली. उठसूट बोलू नका असा मौलीक सल्ला त्यांनी प्रवक्त्यांना दिला. मग बावनकुळेच अपवाद कसे ठरतील?

जुने मित्र दुरावले…

पंजाबमधील अकाली दल तसेच ठाकरे गट हे दोन जुने मित्र राष्ट्रीय लोकशाही पासून दुरावले आहेत. हे दोन्ही पक्ष जवळपास तीन दशके भाजपबरोबर होते. वैचारिक दृष्ट्याही हे दोन पक्ष भाजपला जवळचे होते. तर नितीशकुमार यांचा संयुक्त जनता दलही आघाडीत नाही. तामिळनाडूतील अण्णा द्रमुकचे भाजपशी तितके सौहार्दाचे संबंध नाही. जयललितांच्या पश्चात या पक्षात नेतृत्वाचा अभाव आहे. त्यामुळेच द्रमुकने स्थान भक्कम केले. भाजपच्या आघाडीत ईशान्येकडील छोटे पक्ष आहेत. बिहारमध्ये मुकेश साहनी, जितनराम मांझी यांचे पक्षही आज भाजपपासून दूर गेले आहेत. लोकजनशक्ती पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीत आहे. पण त्यांची ताकद मर्यादित आहे. भाजप मित्रांचा वापर करते असा काही जणांचा आरोप आहे. अशा स्थितीत महाराष्ट्रात भाजप प्रदेशाध्यक्षांनी २४० जागा लढण्याचे लक्ष्य ठेवल्यास, मित्रपक्षांनी नुसता प्रचार करायचा काय, हा सवाल आहे.

भाजपसाठी मित्रपक्षांची कामगिरी का महत्त्वाची?

महाराष्ट्रात विरोधातील तीन प्रमुख पक्षांनी जर महाविकास आघाडीचा प्रयोग केला तर भाजपपुढे किती मोठे आव्हान निर्माण होऊ शकते, हे पुण्यातील कसबा मतदार संघातील निकालाने दाखवून दिले आहे. अशा वेळी राज्यात भाजपला मित्रपक्षांना महत्त्व द्यावे लागणार आहे. बावनकुळे यांच्या वक्तव्याने विरोधकांना भाजपच्या मित्रांना डिवचण्याची संधी मिळाली आहे. निवडणुकीपर्यंत शिंदे गटाला लढण्यास पाच जागा तरी लढण्यास शिल्लक राहतील काय, असा खोचक टोला राष्ट्रवादीने लगावला आहे. अशा स्थितीत भाजपला छोटे पक्ष तसेच शिंदे गट सत्ता राखण्यासाठी गरजेचा आहे. शिंदे यांच्या समर्थकांपैकी अनेकांची मतदारसंघात चांगली ताकद आहे, संस्थात्मक कामही आहे. त्यामुळे त्यांना दुखावल्यास वेगळा संदेश जाऊ शकतो. जागावाटपात मतदारसंघ सुरक्षित नाही याची जाणीव झाल्यास ते अन्य पर्याय शोधू शकतात याचे भान भाजपच्या धुरिणांना हवे.

पहिले आव्हान लोकसभा निवडणुकीत…

खरा कस वर्षभराने येणाऱ्या लोकसभेत लागेल. भाजपसाठी महाराष्ट्रातील ४८ जागा खूपच महत्त्वाच्या आहेत. बिहारमधील सध्याची राजकीय समीकरणे पाहता भाजपला तेथे संघर्ष करावा लागणार आहे. त्यामुळे तेथे पूर्वीच्या काही जागा गमवाव्या लागतील. जनता दल-राजद व काँग्रेस हे समीकरण सामाजिक दृष्ट्या भक्कम आहे. अशा वेळी महाराष्ट्रात लोकसभेसाठी शिंदे गटाने जागा मिळवणे भाजपसाठी गरजेचे आहे. मित्रपक्षांमध्ये सौहार्द रहावा यासाठी त्यांना दुखावणे टाळले पाहिजे. त्यामुळेच कार्यकर्त्यांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी जरी असे वक्तव्य केले असले तरी, त्यातून शह-काटशहाचे राजकारणही वाढीला लागण्याचा धोका आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-03-2023 at 14:42 IST