What’s the significance of sword of Maratha warrior Raghuji Bhosale?: नागपूरच्या भोसले घराण्याचे पूर्वज आणि छत्रपती शाहू महाराजांच्या कालखंडातील मराठा सैन्यातील एक महत्त्वाचे सरदार रघुजी भोसले यांची लंडन येथे लिलावात निघालेली तलवार मिळविण्यात राज्य सरकारला यश आले आहे. श्रीमंत राजे रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार लंडनहून मुंबईत दाखल झाली असून राज्य शासनातर्फे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर जोरदार स्वागतही करण्यात आले. यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी X पोस्टच्या माध्यमातून या विषयी माहिती दिली होती. सध्या प्रभादेवीच्या पु. ल. देशपांडे कला अकादमीमध्ये ती प्रदर्शनार्थ ठेवण्यात आली आहे.
‘सेनासाहिबसुभा’ ही उपाधी कशासाठी?

“नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक राजे रघुजी भोसले यांची लंडनमध्ये लिलावात निघालेली ऐतिहासिक तलवार ही राज्य सरकारने खरेदी केली आहे, हे सांगताना मला आनंद होत आहे. त्यामुळे आपल्या मराठा साम्राज्यातील एक मौलिक आणि ऐतिहासिक ठेव आता महाराष्ट्रात येणार आहे. रघुजी भोसले हे छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील मराठा सैन्यातील एक महत्त्वाचे सरदार होते. त्यांची युद्धनीती आणि शौर्य यावर प्रसन्न होत छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना ‘सेनासाहिबसुभा’ ही उपाधी दिली होती.

लष्करी आणि राजकीय दबदबा

मुख्यमंत्र्यांनी केलेल्या पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे… रघुजी भोसले यांनी १७४५ च्या दशकात बंगालच्या नवाबांविरुद्ध युद्धमोहिमांचे नेतृत्त्व करीत मराठा साम्राज्याचा बंगाल, ओडिशापर्यंत विस्तार केला होता. दक्षिण भारतात सुद्धा त्यांनी आपला लष्करी आणि राजकीय दबदबा निर्माण केला होता. आपले सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव आणि माझ्याच कार्यालयात कार्यरत विकास खारगे यांनी वेगाने सूत्रे हलवून ही कामगिरी पूर्ण केली. काही तांत्रिक अडचणी होत्या, त्यामुळे एका मध्यस्थामार्फत ती खरेदी करण्यात आली. यासाठी ४७ लाख १५ हजार रुपये राज्य सरकार देणार आहे.

तलवारीची वैशिष्ट्ये

मुख्यमंत्री फडणवीस यांनी याच पोस्टमध्ये तलवारीची वैशिष्ट्येही दिली आहेत. ही तलवार मराठा शैलीच्या फिरंग पद्धतीच्या तलवारीचा उत्कृष्ट नमुना आहे. एकधारी पाते, सोन्याचे नक्षीकाम हे त्या तलवारीचे वैशिष्ट्य आहे. युरोपिय बनावटीचे पाते हे त्या काळात प्रसिद्ध होते. या पात्याच्या पाठीवर तळाशी ‘श्रीमंत रघोजी भोसले सेनासाहिबसुभा’ असे सोन्याच्या पाण्याने लिहिले आहे. १८१७ साली नागपुरात ईस्ट इंडिया कंपनीने भोसल्यांच्या खजिन्याची लूट केली होती. त्यात ही तलवार नेली असावी, असा जाणकरांचा अंदाज आहे.” अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी आपल्या पोस्टाच्या माध्यमातून दिली.

त्याच पार्श्वभूमीवर रघुजी भोसले यांच्या ऐतिहासिक कारकिर्दीचा घेतलेला हा आढावा.

नागपूर भोसले घराण्याचे अध्वर्यू आणि थोर लष्करी सेनानी रघुजी भोसले

रघुजी भोसले (प्रथम) (किंवा रघोजी भोसले) हे शूर मराठा लष्कर सेनापती होते. त्यांचा जन्म १६९५ साली साताऱ्यात झाला. १८ व्या शतकात मराठा साम्राज्याच्या विस्तारात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आणि छत्रपती शाहू महाराजांच्या अधिपत्याखाली मध्य भारतात नागपूरच्या भोसले घराण्याची स्थापना केली. रघुजी हे हिंगणकर भोसले घराण्यातील होते आणि त्यांच्या कुटुंबाची मराठा लष्करी परंपरेशी खोलवर नाळ जोडलेली होती. त्यांच्या पूर्वजांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रति नेहमीच निष्ठा दर्शवली होती.

ओडिशा आणि बंगालवर मराठा साम्राज्य

रघुजी भोसले यांच्या कारकीर्दीची सुरुवात त्यांचे काका कान्होजी भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. रघुजींनी बऱ्हाणपूर आणि गोंडवाना प्रदेशावर आपले अधिपत्य प्रस्थापित केले होते. त्यांच्या धोरणात्मक कौशल्यामुळे आणि अढळ महत्त्वाकांक्षेमुळे छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना ‘सेनासाहिबसुभा’ हा किताब दिला होता. रघुजी भोसले यांनी हाती घेतलेल्या लष्करी मोहिमा म्हणजे प्रादेशिक अस्थिरतेच्या काळात संधीचं सोने कसं करावं याचं उत्तम उदाहरण होतं. त्यांच्या अनेक यशस्वी लष्करी मोहिमांमध्ये १७४१ ते १७४८ या काळातील बंगालवरच्या स्वाऱ्या विशेष महत्त्वाच्या ठरल्या. रघुजी भोसले यांनी स्वतः या मोहिमांचे नेतृत्व केले होते आणि भास्कर राम कोल्हटकर यांच्यासारख्या सेनानींच्या मदतीने ओडिशा आणि बंगालच्या काही भागांवर मराठा साम्राज्याचे वर्चस्व प्रस्थापित केले.

डावपेचात पारंगत

राजकीय डावपेचात पारंगत असलेल्या रघुजी भोसले यांनी आपल्या शत्रूंच्या सेवकांमध्ये असलेल्या असंतोषाचा खुबीने वापर केला. अशाच असमाधानी सेवकांपैकी एक होता बंगालचा नवाब अलीवर्दी खानचा मीर हबीब. त्याने अलीवर्दी खानला पदच्युत करण्यासाठी भोसल्यांची मदत मागितली. अखेर, अलीवर्दी खान आणि भोसले यांच्यातील संघर्षाचा परिणाम करारात झाला. या करारानुसार, रघुजींनी कटक आणि सुवर्णरेखा नदीपर्यंतचा प्रदेश तसेच बिहार आणि बंगालसाठी १२ लाख रुपयांची कर वसूल करण्याचा अधिकार मिळवला.

नागपूर राज्याची स्वतंत्र ओळख निर्माण केली

Life and Times of Raghuji Bhonsle I of Nagpur या पुस्तकात शांता अस्थाना नमूद करतात की, रघुजी यांनी केवळ बंगाल जिंकले नाही तर मध्य प्रांतातील गोंड राज्यांना मराठ्यांच्या अधिपत्याखाली आणण्याची दूरदृष्टीही दाखवली, त्यांचे एकत्रीकरण केले आणि नागपूर राज्याची स्वतंत्र ओळख निर्माण केली. देवगड या गोंड राज्याचा राजा चांद सुलतान १७३९ साली मरण पावला, तेव्हा त्याच्या विधवा पत्नीला तिच्या मुलांना बुरहान आणि अकबर शाह यांना गादीवर बसवण्यासाठी रघुजींची मदत घ्यावी लागली. चांद सुलतानचा अनौरस मुलगा वली शाह याने गादी बळकावली होती. परिणामी, रघुजी भोसले यांनी वली शाहचा पराभव करून बुरहान आणि अकबर यांना देवगडच्या गादीवर बसवले. असे असले तरी १७५१ पर्यंत त्यांनी देवगड प्रदेश, छत्तीसगड जिंकले होते. देवगड आणि चांदा हे भोसल्यांच्या सत्ता केंद्राचे मुख्य भाग होते, असे शांता अस्थाना लिहितात.

दक्षिण भारतातील (दख्खनमधील) रघुजी भोसले यांच्या प्रभावी मोहिमा

रघुजी भोसले यांनी दक्षिण भारतातही अनेक यशस्वी लष्करी मोहिमा पार पाडल्या. १७४० साली कर्नाटकमधील नवाब दोस्त अली खान याच्या अतिरेकाला उत्तर देण्यासाठी छत्रपती शाहू महाराजांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, रघुजी भोसले यांनी फतेसिंग भोसले यांच्याबरोबर ४०,००० सैन्यासह कर्नाटकमध्ये प्रवेश केला. २० मे १७४० रोजी रघुजी भोसले आणि कर्नाटकमधील नवाब यांच्यात दमलचेरीची लढाई झाली. या लढाईत मराठ्यांनी विजय मिळवला. या लढाईत नवाब दोस्त अली खान ठार झाला. त्याची राजधानी अर्खोट लुटली गेली. यानंतर रघुजी भोसले यांच्या नेतृत्वाखालील मराठा सैन्याने तिरुचीवर (तिरुचिरापल्ली) कूच केले आणि मण्णाप्परै येथे कर्नाटक नवाबाच्या सेनेचा नऊ तासांच्या घमासान लढाईनंतर पराभव केला. या मोहिमेतही रघुजींच्या फौजांनी विजय मिळवला आणि मराठा वर्चस्व प्रस्थापित केले. याशिवाय कुर्नूल आणि कडप्पा येथील नवाबांविरुद्ध रघुजी भोसले यांच्या यशस्वी मोहिमांनी दख्खनमध्ये मराठ्यांचे सामर्थ्य अधिक बळकट केले.

स्वाभिमानाचा व परंपरेचा अमूल्य ठेवा

रघुजी भोसले यांच्या तलवारीचे महाराष्ट्रात पुनरागमन हे केवळ ऐतिहासिक वस्तूचे परत येणे नाही, तर मराठा साम्राज्याच्या शौर्य, मुत्सद्देगिरी आणि परंपरेचा गौरव करणारी घटना आहे. ही तलवार केवळ भूतकाळाचा भाग नसून आपल्या स्वाभिमानाचा व परंपरेचा अमूल्य ठेवा आहे.