अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची या वर्षातील दुसरी भेट हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथे होत आहे. भेटीची तारीख ठरली नसली तरी येत्या पंधरा दिवसांमध्ये ही भेट होणे अपेक्षित आहे, खुद्द ट्रम्प यांनीच तसे संकेत दिले आहेत. रशिया आणि युक्रेनदरम्यान फेब्रुवारी २०२२पासून सुरू असलेले युद्ध थांबवणे हा या भेटीचा मुख्य हेतू आहे. हे युद्ध थांबवण्यासाठी शांतता करार कसा असू शकतो, त्याचे आडाखे बांधले जात आहेत.

सद्यःस्थिती काय आहे?

रशियाने युक्रेनच्या १ लाख १६ हजार चौरस किलोमीटरपेक्षा जास्त भूभागावर नियंत्रण मिळवले आहे. हा भूभाग युक्रेनच्या एकूण क्षेत्रफळाच्या १९ टक्के इतका आहे. रशियाने २०१४मध्ये क्रायमिया ताब्यात घेतला होता. त्याशिवाय युद्ध सुरू झाल्यापासून डोनेत्सक, लुहान्स्क, झापोरिझ्झिया आणि खेरसन हे भूभाग रशियाने ताब्यात घेतले असून आता ते आपला अधिकृत भाग असल्याचे रशियाचे म्हणणे आहे.

शांतता कराराची माहिती असलेल्या तीन सूत्रांनी ‘रॉयटर्स‘ला दिलेल्या माहितीनुसार, युक्रेन सैन्याने डोनेत्सकमधून माघार घ्यावी असा रशियाचा आग्रह आहे. दोन महिन्यांपूर्वी ट्रम्प यांच्याबरोबर झालेल्या भेटीदरम्यान पुतिन यांनी तशी मागणी केली होती. युक्रेनच्या सैन्याने सध्या डोनेत्सकचा २० टक्के, सुमारे ५,३०० चौरस किलोमीटर भूभाग व्यापलेला आहे. पुतिन यांनी गेल्या वर्षी डोनेत्सक, लुहान्स्क, झापोरिझ्झिया आणि खेरसन या एकूण २० हजार चौरस किलोमीटर भूभागावरील हक्क सोडावा अशी अट ठेवली होती.

‘नाटो’बद्दल रशियाची भूमिका

‘नाटो’ पूर्वेच्या दिशेने आपला विस्तार थांबवेल, असे पाश्चात्त्य देशांच्या नेत्यांनी लेखी वचन द्यावे ही पुतिन यांच्या सर्वात महत्त्वाच्या अटींपैकी एक आहे. १९८९ मध्ये बर्लिन भिंत पडल्यानंतर अमेरिकेचे तत्कालीन परराष्ट्रमंत्री जेम्स बेकर यांनी १९९०मध्ये सोव्हिएत रशियाचे नेते मिखाईल गोर्बाचेव्ह यांना आश्वासन दिले होते की, ‘नाटो’ पूर्वेकडे विस्तार करणार नाही.

मात्र, त्याचे उल्लंघन करून अमेरिकेने रशियाची दिशाभूल केली अशी पुतिन यांना ठाम खात्री असल्याचे रशियन सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळेच यावेळी त्यांना लेखी वचन हवे आहे. तसेच युरोपमधील ‘नाटो’च्या वर्चस्वामुळे पुतिन नाखुश आहेत. त्यामुळेच त्यांनी युरोपसाठी वारंवार नव्या सुरक्षा आराखड्याचा प्रस्ताव मांडला आहे. मात्र, हा प्रस्ताव म्हणजे गेल्या दोन शतकांपासून युरोपवर वर्चस्व मिळवण्याचा रशियाचा प्रयत्न असल्याचे युरोपच्या राजनैतिक अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

दरम्यान, युक्रेन आणि जॉर्जिया यांना एक दिवस ‘नाटो’चे सदस्यत्व मिळेल असे २००८च्या बुखारेस्ट परिषदेत ‘नाटो’ नेत्यांनी मान्य केले होते. ‘नाटो’ आणि युरोपीय महासंघाचे संपूर्ण सदस्यत्व मिळण्यासाठी युक्रेनने २०१९मध्ये आपल्या राज्यघटनेत दुरुस्ती केली होती.

युक्रेनच्या सुरक्षा हमीबाबत

युक्रेनला आपल्यावर पुन्हा आक्रमण होणार नाही याची हमी हवी आहे. तर रशियाची आण्विक ताकद पाहता, भविष्यात त्या देशाबरोबर युद्धाची शक्यता निर्माण करणाऱ्या कोणताही करार करण्यास पाश्चात्त्य देश उत्सुक नाहीत. यापूर्वी २०२२ साली इस्तंबूलमध्ये युक्रेन आणि रशियादरम्यान चर्चा झाली होती.

त्यावेळी सुरक्षा परिषदेच्या अमेरिका, रशिया, चीन, ब्रिटन आणि फ्रान्स या पाच स्थायी सदस्य देशांकडून आंतरराष्ट्रीय सुरक्षा हमी मिळवण्याच्या बदल्यात कायमस्वरूपी तटस्थ राहण्याचे युक्रेनने मान्य केले होते. शांतता करारासाठी युक्रेनची ही भूमिका आधारभूत असावी यासाठी रशिया आग्रही आहे. तर रशियाने दिलेल्या हमीवर विश्वास ठेवता येणार नाही असे युक्रेन आणि त्यांच्या युरोपमधील मित्रदेशांना वाटते. युक्रेनने आपले सशस्त्र दल मर्यादित राखावे, अशीही रशियाची मागणी आहे.

अमेरिका-रशिया व्यापार पूर्ववत?

पुतिन यांच्याबरोबर दूरध्वनीवरून संभाषण झाल्यानंतर ट्रम्प यांनी शांतता प्रस्थापित झाल्यावर अमेरिका-व्यापार पुन्हा सुरू होऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली. सध्या चीन आणि रशियादरम्यानची अमर्यादित भागीदारी अमेरिकेच्या दृष्टीने डोकेदुखी ठरली आहे. चीनच्या अधिकाधिक जवळ गेलेला रशिया अमेरिकेसाठी त्रासदायक ठरू शकतो. त्यामुळे रशियाला आपल्याकडे खेचण्याचा अमेरिकेचा प्रयत्न असेल.

तर रशियाच्या दृष्टीने आर्थिक निर्बंध उठवले जाणे अतिशय महत्त्वाचे आहे. त्यामुळे त्यांना अमेरिकी डॉलरमध्ये व्यवहार करणे शक्य होईल आणि मुख्यतः पाश्चात्त्य देशांच्या प्रभावाखाली असलेल्या आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांकडून मदतनिधी मिळवण्याचीही चाचपणी करता येईल. दुसरीकडे, युरोपीय देश युक्रेनच्या संरक्षण दलांना आणि पुनर्बांधणीसाठी निधी पुरवठा करत राहण्याचा मार्ग शोधत आहेत. त्यासाठी त्यांना २१० अब्ज युरो मूल्याच्या रशियाच्या गोठवलेल्या मालमत्तांचा वापर करता येईल का तपासून पाहायचे आहे. मात्र, असा कोणताही उपाय केल्यास त्यामुळे युरोचे मूल्य कमी होईल आणि दीर्घकाळ चालणारा कायदेशीर लढा सुरू होईल, असा इशारा रशियाने दिला आहे.

युक्रेनच्या मुलांची सुटका

डोनाल्ड ट्रम्प यांची पत्नी आणि अमेरिकेची फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प यांनी जाहीर केले आहे की, युद्धात अडकलेल्या युक्रेनियन मुलांना मायदेशी परत पाठवण्यासाठी त्यांनी पुतिन यांच्याबरोबर संपर्क साधला आहे. युक्रेनने कतारच्या मदतीने काही मुलांची सुटका केली आहे. रशियातून आणखी मुलांची सुटका होईल अशी त्यांना आशा आहे.