TVK’s Vijay Rally; 38 Dead, Dozens Injured at Karur: दक्षिण भारतात अभिनेता हा फक्त अभिनेता नसतो, तो जनतेसाठी एखाद्या देवासारखा असतो. पडद्यावरचा नायक खऱ्या आयुष्यात राजकारणाच्या रणांगणात उतरतो, तेव्हा मात्र या चाहत्यांची भक्ती अक्षरशः उफाळून येते. हजारोंच्या संख्येने लोक त्याच्या दर्शनासाठी, त्याच्या सभेत उपस्थित राहण्यासाठी प्राण पणाला लावतात. पण या आंधळ्या भक्तीची किंमत अनेकदा जीवघेणी ठरते.
तमिळ सुपरस्टार थलपथी विजयच्या करूर येथील सभेत झालेली भीषण चेंगराचेंगरी याचं ताजं उदाहरण आहे. राजकारण आणि चित्रपटसृष्टीच्या संगमातून निर्माण झालेली ही ‘भक्ती’ किती धोकादायक ठरू शकते, हा प्रश्न पुन्हा विचारला जात आहे. जयललिता, एमजीआर, एनटीआर यांच्यापासून ते आजच्या थलपती विजयपर्यंत… दक्षिणेकडील प्रत्येक सुपरस्टारने राजकीय नेता बनून चाहत्यांच्या हृदयावर अधिराज्य गाजवलं आहे.
दक्षिणेकडील जनतेचं आपल्या कलाकारांवरचं प्रेम इतकं अपार आहे की, ते अभिनय सोडून राजकारणात आले तरी त्यांचं कौतुक प्राणांपेक्षा अधिक केलं जातं. मग प्रश्न पडतो की, ही आंधळी भक्ती नेत्यांना बळ देते की, समाजालाच कमकुवत करते?

शनिवारी संध्याकाळी तमिळ अभिनेता थलपथी विजय याच्या करूर येथे झालेल्या सभेत चेंगराचेंगरी झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या दुर्घटनेत तब्बल ३८ जणांचा मृत्यू झाला असून १०० हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. जखमींवर तातडीने रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर राजकीय नेत्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही एक्सवर (ट्विटर)पोस्ट करून या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

राजकारण आणि दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीचं नातं अनेक वर्षांपासून परस्परसहजीवनासारखं झालं आहे. दक्षिणेकडील कलाकारांवर चाहत्यांचे असलेले प्रचंड प्रेम पाहता, त्यांनी राजकारणात सहज प्रवेश करणं, ही काही आश्चर्याची गोष्ट नाही. २ फेब्रुवारीला तमिळ चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय सुपरस्टारपैकी एक थलपती विजय याने आपला राजकीय पक्ष ‘तमिळगा வெற்றि कझगम’ (Tamilaga Vettri Kazhagam) स्थापन करण्याची घोषणा केली होती.
दक्षिण भारतात अशा अनेक कलाकारांची परंपरा आहे, त्यांनी केवळ पडद्यावरच नव्हे तर आपल्या लोकप्रियतेचा राजकारणातही प्रभावी वापर करून चाहत्यांच्या संख्येत वाढ करून घेतली. दिग्गज एम.जी. रामचंद्रन (एमजीआर) पासून ते करिष्माई नंदमुरी तारक रामाराव (एनटीआर) पर्यंत प्रसिद्धी, चित्रपटसृष्टी आणि राजकारण यांचा संगम नेहमीच आकर्षक ठरला आहे.
तमिळ सुपरस्टार थलपती विजय याने २०२३ साली वारिसु आणि लिओ या चित्रपटांना मिळालेल्या यशाच्या माध्यमातून बॉक्स ऑफिसवर आपला ठसा उमटवला. २०२३ साली त्याने २०२४ साली प्रदर्शित होणार्या आपल्या द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम या आगामी चित्रपटाची घोषणा केली होती. परंतु, या चित्रपटापेक्षा त्याने हा आपला शेवटचा चित्रपट असल्याचे जाहीर केलेला मथळा अधिक गाजला. थलपती विजय अभिनयाला रामराम करून राजकारणात प्रवेश करण्यास सज्ज झाला होता. या निर्णयाने विजयच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. अभिनय सोडून ‘दीर्घकालीन हेतू’ने राजकारणात येणार असल्याचं त्याने जाहीर केलं. त्याचबरोबर, कोणत्याही विद्यमान राजकीय पक्षात सामील होणार नसल्याचंही त्याने स्पष्ट केलं होतं, त्यानंतर त्याने ‘तमिऴगा வெற்றி कझगम (टीव्हीके)’ म्हणजेच तमिळनाडू विजय पक्ष हा स्वतःचा पक्ष स्थापन केला.

अभिनयाच्या कारकिर्दीच्या शिखरावर असताना हा निर्णय का घेतला, यामागचं कारण सांगताना विजय याने स्पष्ट केलं होतं की, तमिळनाडूतील आणि तमिळ समाजातील लोकांनी वर्षानुवर्षं दिलेल्या प्रेमाच्या परतफेडीसाठी तो राजकारणात उतरू इच्छित आहे. या दक्षिण भारतीय सुपरस्टारने २०२६ च्या राज्य विधानसभेच्या निवडणुकीत उतरल्याचीही घोषणा केली होती. परंतु, या चेंगरचेंगारीच्या घटनेमुळे या प्रवासाला गालबोट लागलेलं आहे.
यापूर्वीच्या कलाकारांचा राजकीय प्रवास
एम. जी. रामचंद्रन (एमजीआर)
- एमजीआर हे दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील तसेच राजकारणातील एक दिग्गज व्यक्तिमत्त्व होतं. त्यांनी अनेक भूमिका समर्थपणे पार पाडल्या. लोकप्रिय भारतीय अभिनेता, चित्रपट निर्माते आणि यशस्वी राजकारणी अशा सर्वच ठिकाणी आपला न पुसणारा ठसा उमटवला. १९७७ साली ते तमिळनाडूचे मुख्यमंत्री झाले आणि १९८० साली चार महिने वगळता, १९८७ साली त्यांचं निधन होईपर्यंत त्यांनीच मुख्यमंत्रीपद भूषवलं होतं. तमिळनाडूतील जनतेमध्ये त्यांची लोकप्रियता एवढी प्रचंड होती की, त्यांना ‘मक्कल तिलगम’ (जनतेचा राजा) म्हणून ओळखलं जात होतं.
- १९८४ मध्ये एमजीआर यांना गंभीर आजार झाला आणि त्यांना अमेरिकेत उपचारासाठी नेण्यात आलं. त्या काळात तमिळनाडूत अक्षरशः शोककळा पसरली होती. हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची त्यांची बातमी कळताच हजारो लोकांनी रक्तदान केलं. काही चाहत्यांनी त्यांच्यासाठी प्राणत्याग केल्याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या. एमजीआर बरे झाल्यावर त्यांच्या स्वागतासाठी लाखोंचा जनसागर लोटला होता.
एन. टी. रामाराव (एनटीआर)
अभिनय कौशल्यापलीकडे एनटी रामाराव यांनी राजकारणातही आपला ठसा उमटवला. लोक त्यांना प्रत्यक्षात देवाचा अवतार समजू लागले होते. अनेक गावांमध्ये त्यांच्या पोस्टरपुढे अगरबत्ती लावून प्रार्थना केली जात होती. १९८२ साली त्यांनी तेलुगु देशम पार्टीची (टीडीपी) स्थापना केली आणि १९८३ ते १९९५ या काळात तीन वादळी कार्यकाळांसह आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते. त्यांच्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात ‘मना देशम’ या चित्रपटातून झाली, ज्यात त्यांनी धाडसी पोलिसाची भूमिका साकारली होती. भारतीय चित्रपटसृष्टीवर त्यांच्या लक्षणीय प्रभावाची दखल घेत भारत सरकारने त्यांना १९६८ मध्ये पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवले. त्यामुळे ते केवळ मनोरंजन क्षेत्रातीलच नव्हे तर राजकारणातीलही एक दिग्गज नेते ठरले.
जयललिता
जयललिता यांची लोकप्रियता इतकी प्रचंड होती की त्यांच्या मृत्यूनंतर (२०१६) अनेक चाहत्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या. त्यांच्या शवपेटिकेसमोर लोक बेशुद्ध पडत होते. काही ठिकाणी आंदोलने झाली.

यशस्वी चित्रपट कारकिर्दीनंतर जयललिता यांनी राजकारणात प्रवेश केला होता. १९६१ ते १९८० या काळात त्यांनी तमिळ चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवला. आपले मार्गदर्शक एमजीआर यांच्या पावलांवर पाऊल ठेवत, जयललिता यांनी १९८२ साली एआयएडीएमकेत (अखिल भारतीय अण्णा द्रविड मुनेत्र कळघम) प्रवेश केला. १९९१ साली त्यांनी तमिळनाडूचा सर्वांत तरुण मुख्यमंत्री म्हणून धुरा सांभाळली. त्यानंतर त्यांच्या राजकीय प्रवासात त्यांनी १९९१ ते २०१६ दरम्यान एकूण १४ वर्षांहून अधिक काळ मुख्यमंत्री म्हणून राज्य केलं.
जयललिता विरुद्ध रजनीकांत
- १९९० च्या दशकात जयललिता या तमिळनाडूच्या मुख्यमंत्री होत्या. त्यांचा ताफा जाणार होता आणि सुरक्षेच्या दृष्टीने त्यांनी अनेक ठिकाणी खबरदारी घेण्याचे आदेश दिले होते. त्यातील एक आदेश सुपरस्टार रजनीकांत यांनाही देण्यात आला होता. त्यांनी रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी वावरू नये अशी सक्त ताकीद होती.
- जयललितांनी थेट रजनीकांत यांना “तुम्ही बाहेर पडू नका” असा संदेशही दिला होता. पण रजनीकांत हे नेहमीप्रमाणे ‘थलैवर’ स्टाईलमध्ये बाहेर पडले. त्यांनी कार थांबवली, बॉनेटवर बसले आणि सिगारेट पेटवून शांतपणे उभे राहिले. क्षणातच आजूबाजूला प्रचंड गर्दी जमा झाली. परिस्थिती एवढी बिघडली की, जयललितांचा मुख्यमंत्री ताफा पुढे जाऊ शकला नाही.
- शेवटी परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचं पाहून स्वतः जयललिता कारमधून उतरल्या. त्यांनी रजनीकांत यांच्याकडे जाऊन लोकांची गर्दी पांगवण्याची आणि रस्त्यातून निघून जाण्याची विनंती केली. तेव्हा रजनीकांत उभे राहिले, चाहत्यांना हात हलवून अभिवादन केलं आणि तिथून निघून गेले.
मोहन बाबू
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ कलाकारांमध्ये मोहन बाबू हे अग्रगण्य नाव मानलं जातं. त्यांनी तेलुगू सिनेमा क्षेत्रात आपलं ठोस स्थान निर्माण केलं, तसेच एन. टी. रामाराव यांच्याशी त्यांचे घनिष्ट संबंध होते. १९८२ साली त्यांनी तेलुगू देशम पक्षाला पाठिंबा देत राजकारणात प्रवेश केला आणि आंध्र प्रदेशचे प्रतिनिधित्व करत ते राज्यसभेचे सदस्य झाले. केवळ तेलुगू चित्रपटच नव्हे तर त्यांनी तमिळ चित्रपटसृष्टीतही आपलं कौशल्य दाखवलं. मोहन बाबू यांनी ५०० हून अधिक चित्रपटांत अभिनय केला आहे.
चिरंजीवी
मेगास्टार म्हणून ओळखले जाणारे चिरंजीवी यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘पुनाधिराल्लू’ या चित्रपटातून केली, मात्र प्रणाम खरीडू या चित्रपटाने त्यांचा खरा प्रवास सुरू झाला. २००७ ते २०१७ या काळात त्यांनी चित्रपटसृष्टीला अलविदा केलं आणि राजकारणात सक्रिय झाले. याच काळात त्यांनी मुलगा रामचरणच्या मगधीरा आणि ब्रूस ली-द फायटर या दोन चित्रपटांमध्ये लहानशा भूमिकाही केल्या. त्यांनी २००८ साली प्रजा राज्यम पार्टीची स्थापना केली. शिवाय, २०१२ ते २०१४ या कालावधीत पर्यटनमंत्रीपद सांभाळले.
चिरंजीवी यांनी पक्ष स्थापन करून पहिली सभा घेतली तेव्हा आंध्र प्रदेशातील तिरुपती येथे प्रचंड गर्दी उसळली होती. इतकी गर्दी झाली की, शेवटी पोलिसांना लाठीमार करावा लागला, त्यात काही लोक जखमी झाले होते.
कमल हासन
भारतीय चित्रपटसृष्टीतील गूढ आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेला कमल हासन हा देशभरात आदराचे स्थान मिळवून आहे. २०१८ साली त्याने स्वतःचा ‘मक्कल नीधी मय्यम (एमएनएम)’ हा राजकीय पक्ष स्थापन केला आणि अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. सहा दशकांचा प्रवास पूर्ण करून २०१९ साली त्यांनी एक अनोखा मैलाचा दगड गाठला. त्याच्या नावावर २०० हून अधिक चित्रपट असून, फार थोड्या कलाकारांना मिळालेला हा मान आहे. बहुगुणी असलेल्या कमल हासन याने केवळ तमिळ नव्हे तर तेलुगू, मल्याळम, कन्नड, हिंदी आणि बंगाली चित्रपटांतही आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.
पवन कल्याण
चित्रपटगृहात प्रेक्षकांची प्रचंड गर्दी खेचणारे पवन कल्याण यांनी आपल्या अभिनयाबरोबरच राजकारणातही आपली स्वतंत्र वाट निर्माण केली. त्यांचे बंधू चिरंजीवी काँग्रेसशी संबंधित होते, मात्र पवन कल्याण यांनी २०१४ साली जन सेना पार्टी (जेएसपी) स्थापन करून वेगळी दिशा निवडली. त्यांच्या अभिनयातील कसब ‘थोली प्रेम’ या चित्रपटात दिसली, या चित्रपटाने १९९८ साली तेलुगू विभागातील सर्वोत्तम फीचर फिल्मसाठी राष्ट्रीय पुरस्कार पटकावला.

रजनीकांत
भारतीय चित्रपटसृष्टीतील थलैवर म्हणून ओळखले जाणारे रजनीकांत यांनी आपल्या चित्रपटांमधून केवळ जनतेचं मनोरंजनच नाही, तर बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाईही केली. त्यांच्या अभिनयाची जादू आणि व्यक्तिमत्त्वाचा करिष्मा याला तोड नाही. मात्र, इतर नामवंत कलाकारांप्रमाणेच त्यांनीही ३१ डिसेंबर २०१७ रोजी राजकारणात प्रवेश करण्याची घोषणा केली आणि रजनी मक्कल मंद्रम हा पक्ष स्थापन केला.
परंतु, आरोग्याच्या कारणामुळे त्यांनी हा पक्ष बरखास्त केला आणि पुन्हा कधीही राजकारणात प्रवेश करणार नाही, हेही स्पष्टपणे सांगितलं. रजनीकांतचा वाढदिवस आला की हजारो चाहते रक्तदान शिबिरं, अन्नदान करतात. त्यांच्या चित्रपटांच्या रिलीज दिवशी तिकिटांसाठी मध्यरात्रीपासून रांगा लागतात. काही वेळा चाहत्यांमध्ये मारामारी झाली, चेंगराचेंगरी झाली आणि जखमी झाले.
एकूणच, करूरमधील थलपथी विजय याच्या सभेत घडलेली घटना एक कटू सत्य अधोरेखित करते. नेता कितीही लोकप्रिय असो, परंतु लोकशाहीची खरी ताकद व्यवस्थेच्या जबाबदार नियोजनात आणि नागरिकांच्या सुरक्षिततेत दडलेली असते. चाहत्यांचं प्रेम, त्यांची निष्ठा आणि उत्साह हे निश्चितच राजकारणाला बळ देतात, पण जर ही शक्ती अनियंत्रित झाली, तर तिचं रूपांतर विनाशात होतं आणि त्याची किंमत नेहमीच निरपराध जनतेलाच आपला प्राण गमावून चुकवावी लागते.