-अमोल परांजपे

भारतीय वंशाची व्यक्ती ब्रिटनची पंतप्रधान होण्याची आशा सध्या तरी मावळली आहे. इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई ऋषी सुनक यांचा लिझ ट्रस यांनी पराभव केला आहे. मावळते पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांच्या राजीनाम्यानंतर कन्झर्वेटीव्ह म्हणजेच हुजूर पक्षामध्ये झालेल्या पक्षांतर्गत निवडणुकीत ट्रस यांनी सुनक यांना पराभूत केले. ट्रस या ब्रिटनच्या तिसऱ्या महिला पंतप्रधान असतील. त्यांच्या विजयाला सर्वात मोठा हातभार लागला आहे तो त्यांच्या करविषयक धोरणाचा.

Abhishek Ghosalkar, murder,
अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण : एकापेक्षा जास्त व्यक्तींच्या सहभागाच्या दृष्टीने तपास केला का ? उच्च न्यायालयाची पोलिसांना विचारणा
Israel-Iran Conflict
इराणला प्रत्युत्तर देऊ नका! जागतिक नेत्यांचे इस्रायलला आवाहन
Benjamin Basumatary sleeping on cash
नोटांच्या ढिगाऱ्यावर झोपलेल्या नेत्याचा फोटो व्हायरल; भाजपाच्या मित्रपक्षाने म्हटले…
raghav chadha british mp meeting
खलिस्तान समर्थकाच्या भेटीमुळे राघव चड्ढा वादाच्या भोवऱ्यात

करकपातीचे आश्वासन फायदेशीर ठरले का?

ऋषी सुनक आणि लिझ ट्रस यांच्यामध्ये सर्वांत कळीचा मुद्दा होता तो करकपातीचा. ट्रस यांनी ब्रिटिश जनतेला करांमध्ये मोठी कपात करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यासाठी निवडून येताच नवे करविषयक धोरण जाहीर करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले होते. त्यामुळे आधीच्या सर्व फेऱ्यांमध्ये आघाडीवर असलेल्या सुनक यांना शेवटच्या फेरीत (या फेरीमध्ये पक्षाचे सर्वसामान्य सदस्य मतदान करत असतात) पराभवाचा सामना करावा लागला. सध्याच्या परिस्थितीमध्ये कर कमी करणे चुकीचे ठरेल, अशी भूमिका सुनक यांनी मांडली होती. विशेष म्हणजे, सुनक हे जॉन्सन यांच्या सरकारमध्ये अर्थमंत्री होते आणि कोरोनाकाळात आरोग्यव्यवस्थेवर पडलेला ताण कमी करण्यासाठी त्यांनीच करवाढ केली होती. खासदारांना हे मान्य असले तरी पक्षातून ट्रस यांच्या ‘लोकप्रिय’ घोषणेलाच झुकते माप मिळाले. असे असले तरी ट्रस अगदीच काठावर पास झाल्या आहेत.

‘काठावर पास’ पंतप्रधान किती काम करू शकणार?

सोमवारी जाहीर झालेल्या दुसऱ्या टप्प्यातील निकालानुसार ट्रस यांना ८१,३२६ मते मिळाली आहेत. तर सुनक यांच्या बाजूने ६०,३९९ पक्ष कार्यकर्त्यांनी मतदान केले आहे. याचाच अर्थ ट्रस या केवळ २०,९२७ मतांनी निवडून आल्या आहेत. वैध मतांपैकी अवघी ५७ टक्के मतेच त्यांना मिळाली आहेत. पहिल्या टप्प्यात झालेल्या पाचही फेऱ्यांमध्ये सुनक हे सातत्याने आघाडीवर होते. याचाच दुसरा अर्थ असा, की सर्वसामान्य पक्ष कार्यकर्ते ट्रस यांच्या बाजूने असले तरी खासदार, पदाधिकारी यांची सुनक यांना अधिक पसंती आहे. त्यामुळेच त्यांचा पंतप्रधानपदाचा मुकूट काटेरी ठरण्याची शक्यता आहे.

देशासमोरच्या आव्हानांचा सामना कसा करणार?

ब्रेग्झिट आणि त्यानंतर एकापाठोपाठ आलेल्या कोरोनाच्या लाटा यामुळे ब्रिटनची अर्थव्यवस्था पुरती खिळखिळी करून टाकली आहे. ताज्या आकडेवारीनुसार ब्रिटनचा महागाई निर्देशांक १०.१ टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे. गेल्या अनेक वर्षांत प्रथमच महागाई निर्देशांकाने दोन आकडी संख्या गाठली आहे. देशामध्ये विजेचे दर हे ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचले आहेत. रशियाने हल्ला केल्यानंतर ब्रिटनने अमेरिकेच्या खांद्याला खांदा लावून युक्रेनला साथ दिली आहे. या युरोपियन युद्धाचे सावटही ट्रस यांच्या राजवटीवर असेल. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ट्रस यांना आपले नेतृत्व सिद्ध करण्यासाठी फार कमी काळ मिळणार आहे.

ब्रिटनमध्ये पुढल्या सार्वत्रिक निवडणुका कधी?

२०१९ साली १२ डिसेंबरला ब्रिटनच्या लोकसभेसाठी (हाऊस ऑफ कॉमन्स) मतदान झाले होते. त्यानंतर १७ डिसेंबरला संसदेचे पहिले अधिवेशन भरले. त्यामुळे ब्रिटनच्या कायद्यानुसार १७ डिसेंबर २०२४ला लोकसभा आपोआप बरखास्त होईल. त्यानंतर २५ दिवसांनी, म्हणजे २४ जानेवारी २०२५ रोजी मतदान होईल. त्यामुळे ट्रस यांच्याकडे जेमतेम २ वर्षे आहेत. या काळात त्यांना देशाच्या अर्थव्यवस्थेचा गाडा रुळावर आणण्याचे कडवे आव्हान पेलायचे आहे.

सामान्य खासदार ते पंतप्रधानपदाचा लिझ ट्रस यांचा प्रवास कसा होता?

ट्रस १९९६ साली कन्झर्व्हेटिव्ह पक्षात आल्या. २०१० साली सर्वप्रथम खासदार झाल्यानंतर त्या दोन वर्षांत शिक्षण आणि बालसंरक्षण खात्यांचा राज्यमंत्री झाल्या. त्यानंतर पर्यावरण, अन्नसुरक्षा, ग्रामीण विकास अशी अनेक खाती त्यांनी सांभाळली आहेत. सप्टेंबर २०२१मध्ये बोरिस जॉन्सन मंत्रिमंडळात त्या परराष्ट्रमंत्री झाल्या. आता त्या ब्रिटिश सरकारमधील सर्वोच्च स्थानावर पोहोचल्या आहेत.

ब्रिटनच्या पहिल्या महिला पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांना ट्रस आपला आदर्श मानतात. गेल्याच वर्षी रणगाड्यावर बसून काढलेला त्यांचा फोटो प्रचंड गाजला होता. विशेष म्हणजे, १९८६ साली थॅचर यांचाही असाच रणगाड्यावर बसलेला फोटो प्रसिद्ध आहे. मात्र ब्रिटनची ‘आयर्न लेडी’ हे बिरुद मिरवणाऱ्या थॅचर यांच्याइतकं कर्तृत्व गाजवण्यासाठी ट्रस यांना बराच पल्ला पार करावा लागणार आहे. पुढल्या दोन वर्षांत त्यांची कामगिरी कशी होते, त्यावर त्यांचा पुढला राजकीय प्रवास अवलंबून असेल.