युक्रेन युद्धाला २४ फेब्रुवारी २०२२ रोजी सुरुवात झाली. रशियाचे चार दिशांनी झालेले आक्रमण परतवून लावण्यासाठी युक्रेनला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागत आहे. रशियाने व्यापलेला काही भूभाग सोडून द्यावा लागेल, अशीच शक्यता आहे. पण याही परिस्थितीत युक्रेनने १ जून रोजी रशियावर केलेला ड्रोन हल्ला अभूतपूर्व ठरतो. कारण रशियात प्रदीर्घ टापूमध्ये पाच ठिकाणी हे हल्ले झाले. यात रशियाच्या किमान ४१ लढाऊ विमानांचे नुकसान झाले. विशेष म्हणजे रशियाची हवाई संरक्षण प्रणाली हे हल्ले रोखण्यात किंवा हाणून पाडण्यात संपूर्णपणे निष्क्रिय ठरली.

ड्रोन हल्ले कुठे?

रशियाच्या पाच प्रांतांमध्ये ड्रोन हल्ले झाल्याची कबुली त्या देशाच्या संरक्षण खात्याने दिली. विशेष म्हणजे हे पाचही प्रांत पाच काल विभागांमध्ये (टाइम झोन) विखुरले आहेत. मुर्मान्स्क हा प्रांत नॉर्वेला लागून आहे. तर इर्कुत्स्क हा प्रांत पार सैबेरियात आहे! हे ड्रोन युक्रेनची सीमा ओलांडून गेले, की ट्रकच्या माध्यमातून त्यांनी रशियात प्रवेश केला नि तेथून ते डागले गेले याविषयी स्पष्टता नाही. अनेक ड्रोन आम्ही उद्ध्वस्त केले असे रशियाचे म्हणणे आहे. तरीदेखील इतक्या मोठ्या प्रमाणावर युक्रेनी ड्रोन्सनी रशियाची उच्च सुरक्षित लक्ष्ये भेदली कशी, याचे उत्तर रशियाला देता आले नाही. ड्रोन हल्ल्यांमध्ये काही टीयू-९५ आणि टीयू-२२ स्ट्रॅटेजिक बॉम्बर्सचा समावेश आहे. 

ऑपरेशन स्पायडर वेब!

युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी समाज माध्यमांवर या हल्ल्याची माहिती दिली. अशा प्रकारे ड्रोन हल्ल्याची तयारी दीड वर्षे सुरू होती असे त्यांनी सांगितले. या मोहिमेला ‘ऑपरेशन स्पायडर वेब’ असे सांकेतिक नाव दिले गेले. हे ड्रोन्स घेऊन अनेक ट्रक युक्रेनमधून रशियात दाखल झाले. लाकडी कॅबिनमध्ये ड्रोन दडवण्यात आले होते. दूरनियंत्रकांद्वारे ईप्सित लक्ष्याजवळ ट्रकची झाकणे उघडण्यात आली आणि तेथून ड्रोन उड्डाणे झाली. जवळपास १२५ ड्रोन या मोहिमेसाठी वापरले गेले. त्यांनी रशियाच्या ४१ बॉम्बर विमानांचेच नव्हे, तर क्षेपणास्त्र प्रक्षेपक वाहनांचेही नुकसान केले. सर्व ट्रक आणि संबंधित युक्रेनी सैनिक मायदेशी परतल्याचेही झेलेन्स्की यांनी जाहीर केले. 

हल्ल्याची पार्श्वभूमी

रशियाने गेले काही दिवस युक्रेनच्या प्रमुख शहरांना हवाई हल्ल्यांद्वारे लक्ष्य केले होते. जवळपास २५० ते ५०० ड्रोन्सचा वापर या हल्ल्यांमध्ये रशियाकडूनही झाला. विशेष म्हणजे, युद्धविरामाची चर्चा अजूनही अपूर्णावस्थेत असताना रशियाने हल्ल्यांची तीव्रता वाढवली. गेल्या आठवड्यात अशाच एका हल्ल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पही हतबुद्ध झाले आणि त्यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा उल्लेख ‘वेडगळ’ अशा आशयाच्या शब्दांत केली. रशियाने हल्ले वाढवल्यामुळे आम्हाला बचाव करण्याचा पूर्ण अधिकार प्राप्त होतो. ताजा ड्रोन हल्ला याचेच निदर्शक असल्याचे झेलेन्स्की यांनी म्हटले आहे. अजून असे हल्ले होतील असा इशाराही त्यांनी दिला.

रशियाची प्रतिक्रिया काय?

रशियाकडून अणुहल्ल्याचा वापर होऊ शकेल, अशी भीती काही विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. पण खुद्द पुतिन यांनी गेल्या महिन्याच्या सुरुवातीस याविषयी खुलासा केला होता. अण्वस्त्रे वापरण्याची वेळ येणार नाही, पण युद्ध संपवण्याची आमची क्षमता अबाधित आहे असे विधान त्यांनी केले होते. अर्थात त्यावेळी त्यांना युक्रेनच्या ड्रोन हल्ल्याची कल्पना नव्हती.

शांतता चर्चेचे काय?

दोन्ही देशांदरम्यान शस्त्रविरामाची पुढील फेरी २ जून रोजी इस्तंबूल येथे नियोजित आहे. या फेरीच्या आधी युक्रेनने हल्ला केल्यामुळे चर्चेचे काय होणार असा प्रश्नही उपस्थित होतो. युक्रेनने चर्चेस आणि युद्धविरामास केव्हाही तयार असल्याचे जाहीर केले आहे. तर रशियानेही चर्चेतून माघार घेत असल्याचे अजून तरी म्हटलेले नाही. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ड्रोन हल्ल्यांचे महत्त्व

भारत-पाकिस्तान संघर्षानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रोन हल्ले पुन्हा एकदा पाहावयास मिळाले. ड्रोन युद्धामध्ये युक्रेन रशियाला तोडीस तोड ठरू लागला असून, त्यामुळे युद्धाचे पारडे पुन्हा एकदा पालटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच, रशियाच्या हद्दीत शिरून छुपे हल्ले करण्याची युक्रेनची क्षमताही या निमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झाली.